पक्षी उडाले की, मी 'सदानंद सदानंद' हाक मारी. सदानंद कोठून तरी येईल असे मला वाटे मी चोहोबाजूस पाहात होतो. मी झाडावर डोके आपटी, दगडावर डोके आपटी; परंतु फूटून जाईल इतक्या जोराने काही आपटीत नव्हतो मी हळूच आपटीत होतो. स्वत: मरुन जावे, असे काही मला वाटत नव्हते. माझे दु:ख कृत्रिम होते, असे नाही; परंतु तळयात उडी घ्यावी, असे काही वाटले नाही.
मी भटक-चटक भटकलो. रड-रड रडलो. शेवटी दमून एके ठिकाणी बसलो. इतक्यात अकस्मात कोठूनसे माझ्यासमोर एक सुंदर पाखरु येऊन बसले. किती तरी वेळ ते पाखरु हालेना, चालेना बोलेना. मी त्या पाखराकडे पाहात राहिलो. ते पाखरु छातीशी लावावे असे मला वाटले.
मी उठलो. पण पुन्हा बसलो ते पाखरु उडून जाऊ नये, असे मला वाटत होते. सूर्य अस्तास जायची वेळ होत आली. पाखरे घरटयांत जायची वेळी झाली; पण हे पाखरु का जात नाही? हे पाखरु सदानंदाचा निरोप घेऊन का आले आहे? बोल, पाखरा बोल, सदानंदाचा संदेश सांग, मी त्या पाखराला म्हटले
काय आश्चर्य ! इतका वेळ स्तब्ध बसलेले ते पाखरु चिवचिव करु लागले. नाचू लागले जणू त्याला सूर्योदय होत आहे. असेच वाटत होते. मला आनंद झाला. मी त्या पवित्र पाखराला नमस्कार केला. ते पाखरु उडून गेले. किती तरी वेळ मी पाहात होतो. गेले, दूर गेले.
मी माघारा वळलो. तो मला शोधीत सखारम वगैरे येत होते.
''श्याम, कुठे रे भटकत होतास? आम्ही तुला किती शोधलं? सखाराम म्हणाला.
''आमच्या मनात भलभलत्या शंका येऊ लागल्या,'' गोविंदा म्हणाला.
''तळयात उडी टाकलीस की काय, असंही वाटलं. आम्ही कावरेबावरे झालो होतो, वाटे, तुझ्या मावशीला तार करावी'' सखराम म्हणाला.
''सखारम तळयात उडी टाकून मरावं, इतके प्रेम कुठे आहे माझ्याजवळ; प्रेमाचा किती अल्प अशं आपल्याजवळ असतो, ते अशा प्रसंगी कळून येत आपण प्रेम प्रेम म्हणून बसल्या-उठल्या बोलत असतो; परंतु मरणाप्रसंगीच प्रेमाची खरी परीक्षा होते,'' मी म्हटले.
''चल आता. काही थोडं खा,'' गोविंदा म्हणाला.
''आम्ही दुपारी आग्रह केला नाही. परंतु आत्त्ता मात्र आग्रह करणर,'' सखाराम म्हणाला.
''सखाराम. अरे रोज जेवायचंच आहे. आजचा दिवस तरी नको हो जेवण. जेवायला बसलो, तर जेवण जाणार का नाही? पण मनाला नाही बरं वाटत आजचा दिवस सदानंदाच्या स्मृतीचाच चारा मला खाऊ दे. त्याचे शब्द आठवू दे. त्याच्या गोष्टी आठवू दे जेवलो तर जड अन्नाच्या दडपणाखाली त्या स्मृती दडपल्या जातील. उद्या तुम्ही न सांगताही मी जेवेने,'' मी म्हटले.
''श्याम आजचा दिवस तू कधीही विसरणार नाहीस,'' गोविंदा म्हणाला.
''मृत्युवार्ता आणणारी तीन पत्रं एकाच दिवशी मिळाली!'' सखाराम म्हणाला.