जवळ असून दूर

महर्षीच्या महाप्रस्थानयात्रेस गेल्यामुळे त्या दिवशी रामकडे सायंकाळी मला जाता आले नाही. दुस-या दिवशी सकाळीच मी रामकडे गेलो. राम वाचीत होता.

'' अरे राम, तुझा श्याम आला रे,'' रामच्या भावाने वर्दी बसविले.

राम उठणार तोच मी समोर उभा राहिलो. त्याने हात धरून बसविले.

'' कसं काय?'' त्याने विचारले.
'' काय सांगू?'' मी म्हटले.
'' मग इथे राहणार का? एकच अडचण आहे. इथली वार्षिक परीक्षा जवळ आली आहे.आठ दिवसांनी परीक्षा सुरू होणार आहे?'' राम म्हणाला.
'' मी परीक्षेला बसेन. पास झालो तर इथे राहीन नाही तर औंधला जाईन. तिथली परिक्षा पुढे आहेच. वर्ष काही फुकट जाणार नाही,'' मी म्हटले.
'' तुला फक्त इंग्रजी करावं लागेल. बाकीचा अभ्यास तोच असतो. आठ दिवस इंग्रजीच वाच. इंग्रजीची तीन पुस्तकं आहेत,'' राम म्हणाला.
''पाहू या मी पास होईन असं वाटतं नाव घालू देतील ना?'' मी विचारले.
'' त्यांना परिस्थिती सांगितली म्हणजे 'नाही' म्हणणार नाहीत. त्यांचं काय नुकसान आहे?'' राम म्हणाला.
'' मग मी तुझ्याकडे संध्याकाळी येतो'' मी म्हटले
''हो ये. पण त्या शाळेचा दाखला लागेल,'' रामने शंका काढली.
''खरंच मी आज तार करतो, म्हणजे उद्याला दाखला इथे येईल,'' मी म्हटले.
''हो तारच करणं बरं. जा तर आधी लवकर तार कर,'' रामने संमती दिली.

मी पोस्टात गेलो. औंधच्या शाळाचालकांस तार केली. नूतन मराठीच्या शाळाचालकांच्या नावावर दाखला मागवला. तार करून मी मामांकडे आलो. मामांजवळ मी काहीच बोललो नाही. मामा कचेरीत गेले. मुली शाळेत गेल्या. मुली शाळेत गेल्या. मी वरती वाचीत बसलो होतो.इतिहास वाचीत होतो. अभ्यासाला मी सुरूवात केली.

तिस-या प्रहरी मी मामीला सांगितले,''मामी, आज मी औंधला जाणार आहे. रात्री आठची गाडी. गर्दी असते लवकर गेलं पाहिजे,''

मामीने स्वयंपाक लवकर केला. मी सहा वाजताच जेवलो. एक टांगा आणला. मामीला नमस्कार केला.

'' अण्णा, चाललास? राहा ना रे आणखी, येसू म्हणाली.
'' मला गेलं पाहिजे. अभ्यास बुडतो,'' मी सांगितले.
''पत्र पाठव हो पोचल्याच तिकडे मावशीला पाटवशीलच परंतु इथेही पाठवावं एखादं,'' मामी म्हणाली.
'' अण्णा मोठं अक्षर लिही, म्हणजे मीही वाचीन,'' शांती म्हणाली.
''माझ्या नावाने पाठव रे अण्णा,'' येसू म्हणाली.

मी टांग्यात बसलो. टांगा निघाला टांगा कोठे आला? शनिवार पेठेत रामच्या घरी आला. रामचे घर म्हणजे माझे औंध होते! मी माझे सामान काढले. राम व त्याचे भाऊ वरून खाली आले.

''ट्रंक जड आहे, मी घेतो,'' राम म्हणाला.

रामचा पाठचा भाऊ बाळूने वळकटी केव्हाच नेली होती!
''जेवण झालं का रे?'' रामच्या आईने विचारले.

''मी पास झालो, तर सर्वांना कळवीन. मी इथेच आहे म्हणून. जर नापास झालो, तर हे मधले प्रयोग कुणालाही कळवणार नाही. मी औंधला गेलो असंच सारी समजतील. 'नापास झालो तर मग मी औंधला जाईन नि तिथून सर्वांना पत्रं लिहीन. सध्या माझा अज्ञातवास आहे,'' मी म्हटले.

राम रात्री कधी अभ्यास करीत नसे. त्याला करायची जरूरच नसे. तो अंथरूणावर पडला. मी त्याच्याजवळ बोलत होतो. बोलता बोतला तो झोपी गेला. मीही शेवटी अंथरूणावर पडलो. मला मात्र झोप लागेना पहाटे सर्व मंडळी लवकर उठली. मीही उठलो नळावर गर्दी होत असे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel