‘तू सुध्दा थट्टा कर. मी आपली जातेच इथून’ असे म्हणून विमल उठून गेली.

‘तू फोनो लाव, म्हणजे आता येईल हरिणीप्रमाणे धावत.’

सुंदर चांदणे पडले होते. कृष्णनाथाने फोनो लवला. ‘बोल रे पपी’ ही प्लेट सुरु झाली. आत्याबाईही ऐकायला आल्या.
‘विमल नाही दिसत ती?’  त्यांनी विचारले.

‘तिला नाही गाणे आवडत!’  माधवराव म्हणाले.

‘मीच ना पण फोनो घ्यायला लावला?’  विमल एकदम पुढे येऊन म्हणाली. कृष्णनाथाने टाळया वाजविल्या. तो ‘बोल रे पपी’ ‘बोल रे पपी’ करु लागला.

कृष्णनाथाची कॉलेजमध्ये जाण्याची तयारी झाली. तो मॅट्रिकमध्ये पास झाला. त्याने शारदाश्रमाच्या चालकांस एक सुंदर पत्र पाठवले. त्यांचेही अभिनंदनपर व आशीर्वादपर पत्र आले.

पुण्याच्या भाऊ कॉलेजमध्ये त्याने नाव घातले.
पुणे म्हणजे शिक्षणाचे केंद्र. तेथे किती शिक्षणसंस्था! जिकडे तिकडे विद्यार्थीच विद्यार्थी. पुणे म्हणजे सर्व प्रकारच्या विचारांचे क्षेत्र. तेथे गांधीवादी आहेत, तेथे समाजवादी आहेत, तेथे कम्युनिस्ट आहेत, तेथे हिंदुमहासभावाले आहेत, तेथे लीगवाले आहेत. तेथे वर्णाश्रम स्वराज्यसंघवाले आहेत, तर डॉ. आंबेडकरवालेही आहेत. परंतु राजकीय पक्षोपक्षच तेथे केवळ आहेत असे नाही; इतरही ज्ञानोपासक संस्था तेथे आहेत. तेथे इतिहास- संशोधन- मंडळ आहे, भांडारकार संशोधन मंदिर आहे, रसायनशाळा आहे. तेथे थोर भारतसेवक-समाज आहे. केसरी-मराठा संस्था आहे. त्यांच्या ग्रंथालयातून जावे, तेथे बसावे, ज्ञानसंपदा मिळवावी. ज्ञानकोशमंडळ, चरित्रकोशमंडळ. नाना मंडळे पुण्यातच चालली-चालत आहेत. अग्निहोत्राच्या चर्चेपासून तो धर्म अफू आहे, येथपर्यंतच्या सा-या चर्चा तेथे चालतात. संस्कृतीवर हल्ले चढविणारे तेथे वीर आहेत, तर संस्कृती-संरक्षण-दलेही आहेत. पुण्याच्या मंडईत ज्याप्रमाणे हवे ते मिळते; पुण्याच्या गल्ल्यांतून व रस्त्यांतून ज्याप्रमाणे कच-याचे ढीग सर्वत्र फैलावत असतात, त्याप्रमाणे पुण्याहून सर्व प्रकारचे ज्ञानही फैलावत असते. कच-याच्या पेटयांत कचरा मावत नाही, त्याप्रमाणे लोकांच्या डोक्यांतही ज्ञान मावत नाही. असे हे थोरामोठयांचे पुणे-त्या पुण्यात कृष्णनाथ आला.

या सर्व प्रकारच्या विचारवादळात तोही सापडला. जो तो आपल्या कळपात त्याला ओढू पाहात होता; परंतु अद्याप तो अलिप्त होता. काँग्रेसविषयीचे अपार प्रेम त्याच्या हृदयात होते. जिची दारे सर्वांसाठी मोकळी आहेत, अशी ही एकच खरी राष्ट्रीय संस्था, असे तो म्हणे.  बाकीच्या संस्थांच्या दारांवर विशिष्ट धर्माची, विशिष्ट जातीची, विशिष्ट गटांची नावे. या विशाल राष्ट्राला शोभणारी एकच संस्था त्याला दिसे, ती म्हणजे काँग्रेस!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel