'कसली क्षमा नि काय ? प्रेमा एक पोरकी मुलगी आहे. लहानपणापासून तिला सहानुभूतीचे प्रेम मिळाले नाही. मीही पोरकी असल्यामुळे तिचे मन मी समजू शकते. किती आशेने ती तुमच्याकडे पाहू लागली होती ! अरेरे ! त्या प्रेमळ हृदयाचा तुम्ही घात केलात. ते भोळे प्रेमळ डोळे, काळेभोर डोळे, त्यांच्यासमोर निराशेची अंधेरी येईल. ज्याने दुसर्‍या एका प्रेमळ जीवाचा असा विश्वासघात केला तो का माझे हृदय जिंकू शकेल ? मला का तुम्ही इतकी क्षुद्र लेखता ? प्रेमाच्या हृदयाची होळी करणार्‍याने माझ्या प्रेमाची अपेक्षा करावी हा माझा अपमान आहे. स्त्रीजात इतकी तुच्छ लेखू नका. दुसर्‍या भगिनीच्या कोमल भावनांच्या राखेवर माझे प्रेममंदिर उभारण्याइतकी मी नीच नाही. जी स्त्रीचा स्वाभिमान, प्रतिष्ठा, अब्रू यांना कमी लेखते, ती स्त्रीच नाही. स्त्रीजातीला ती कलंक आहे, असे मी म्हणेन. आणि त्या मुलीचीही घोर निराशा होणार तीही माझ्यामुळे. अरेरे ! एकंदरीत मी दुर्दैवीच आहे. रमाकांत, जा तुम्ही ! पुन्हा कोणा स्त्रीची अशी वंचना करू नका. स्त्रियांच्या कोमल भावनांना कचरा समजून वागत जाऊ नका.'

'मिरा, तू जरा विचार करून बघ. तुझ्यावरील उत्कट प्रेमामुळेच मी हे केले ना ? माझ्या भावनांना तूही लाथाडू नकोस. मी जातो. जगांत प्रेमाच्या गोष्टी इतक्या सोप्या नसतात. तू मला झिडकारलेस, तरी तुझ्यावर केलेल्या प्रेमाचा सुगंध माझ्या जीवनात राहील. जातो मी. या पागलाला क्षमा कर.'

रमाकांत निघून गेला आणि एकदम प्रेमा पुढे येऊन स्फुंदत-स्फुंदत मिरीच्या गळयात पडली. तिला भावना आवरत नव्हत्या. दु:ख, निराशा, अगतिकता- किती तरी कल्लोळ तिच्या हृदयात उसळले होते. तिची छाती समुद्राप्रमाणे खालीवर होत होती. मिरीच्या डोळयांत पाणी आले. परंतु संयमाने तिने स्वत:ला आवरले.

'प्रेमा, रडू नकोस. तू का पलीकडे होतीस ? सारे बोलणे का तू ऐकलेस ?'

'होय. मिरा, मीही वसंतोत्सवातून लवकरच आले. रमाकांत निघून आले. मग माझेही लक्ष तेथे लागेना. त्यांच्यासाठी तर मी सजून गेले. तू मला सजवून पाठवलेस. मी तिथे कोणासाठी राहू ? आले निघून त्यांच्या पाठोपाठ. तो तुमचे दोघांचे बोलणे कानांवर आले. मिरा, ते निखारे माझ्या जीवनाची होळी करीत होते. रमाकांतांना मी माझे हृदय देऊ केले होते. दिलेच होते आणि त्यांनी का असे फसवावे ? अशी कशी ही दुनिया ? मला फुले देत, प्रेमपत्रे लिहीत. माझ्याकडे गोड डोळयांनी बघत, प्रेमाने माझा हात हातात घेत. सारे का ते सोंग होते ? केवळ नाटक होते ? त्या दिवशी मला रमाकांत म्हणाले, 'तू माझी जीवनदेवता आहेस.' असे कसे हे पुरुष ! मिरा, कशाला मी जगू, कशाला राहू ? मिरा, तुझ्या स्वभावाची थोरवी आज अधिकच मला कळली. तू सामान्य स्त्री नाहीस. तू उदात्त, आदर्श आहेस. निराळयाच देवाने तुला घडवले आहे. तुझी मूर्ती बनविताना देवाने सारे मांगल्य, सारी विशुध्दता, सारे सत्य जणू एकत्र ओतले. तूच मला मार्ग दाखव.'

'प्रेमा, ज्याला तू हृदय देऊ केलेस, तो जर असा वंचक निघाला, तर तू काय करणार ? रमाकांतला विसरून जा. कदाचित तुला त्याच्याविषयी वाटणारे प्रेम हेही वरवरचे असेल. क्षणभर तू दिपून गेली असशील. परंतु काही काळ गेल्यावरही तुला रमाकांतांची मूर्ती हृदयमंदिरात उभी आहे असे वाटले, तर तू त्या मनोमय रमाकांताची प्रेमपूजा करीत व्रती जीवन जग. प्रेमस्वर्गातील, आशाधामातील आदर्श रमाकांताची पूजा कर. तुझा रमाकांत तुझ्या स्वप्नात राहो. प्रेमकुंजात राहो. परंतु काही काळानंतर रमाकांताची मूर्ती जर तुझ्या जीवनातून निघून गेली, तर तुझे प्रेम दुसर्‍या अनुकूल व्यक्तीला शोधत राहील. रडू नकोस. सारे चांगले होईल. तू पुढे सुखी होशील. हे एक क्षणिक मृगजल होते असे समज.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel