रात्री खलाशांची सागरगीते ऐकण्यात मंडळी रंगली. डॉक्टरांनी खलाशांना बक्षिसी दिली व ते म्हणाले, 'ताडी मात्र नका पिऊ.'

'ताडी प्यायल्याने तर गाण्यांना रंग चढतो.' एक म्हणाला.

'ताडीशिवाय गाण्यांना चव नाही.' दुसरा म्हणाला.

'तुम्ही ताडी पीत नाही म्हणून असे हवा खायला तुम्हांला यावे लागते.' तिसरा म्हणाला.

ते खलाशी गेले आणि प्रवासी मंडळी झोपली.

सकाळी एका नावेत बसून ती पलीकडे गेली. तेथून त्यांना चार कोसांवर जायचे होते. बैलगाडी करून ती गेली.

'मिरे, आपण जात आहोत. परंतु तेथे जागा मिळेल की नाही ? बंगले भरलेले असतात.'

'बंगला न मिळाला तर हिरव्या बंगल्यात राहू.' मिरी म्हणाली.

'हिरवा बंगला कोठला ?' डॉक्टरांनी विचारले.

'हिरवीहिरवी झाडे.'

'झाडाखाली पडावे, दगड उशाला घ्यावा.' गाडीवान म्हणाला.

गाडी हळूहळू जात होती. सुंदर पाखरे दिसत होती. रस्त्याने दाट छाया होती. या बाजूची झाडे त्या बाजूच्या झाडांना मिठ्या मारीत होती.

शेवटी एकदाची गाडी गावात आली. लहानसा गाव. परंतु तेथे बंगले बरेच होते. सुखी लोक मधून मधून हवेसाठी तेथे येऊन राहात. डॉक्टर बंगल्याची चौकशी करू लागले. इतक्यात एक भय्या धावत आला.

'मिराबेन कौन है ? आपका नाम है क्या ?'

'हां भय्या. क्यों ?'

'आपके लिए तो बंगला रक्खा है। एक भला आदमी कल यहाँ आया था । उन्होंने लेकर रक्खा है । किराया भी उन्होंने दिया हैं ।'

त्या पाहुण्याने केलेली ही सोय पाहून त्यांना आश्चर्य वाटले.

'वो आदमी कहा है भय्या ?'

'वो चला गया । आप लोगोंको यहाँसे जहाँ जाना है वहाँ वो गया है । वहाँ भी सुविधा कर रखेगा वो भला आदमी !'

त्या गावात ही मंडळी जवळजवळ आठवडाभर राहिली. आसपास हिंडली. तेथील हवा फारच आरोग्यदायी होती. एक प्रकारचा उत्साह तेथे वाटे. सुमित्राची प्रकृती सुधारली. तोंडावर थोडा तजेला आला.

'आपण आता परत जाऊ.' सुमित्रा म्हणाली.

'एक सुंदर जागा अद्याप बघायची राहिली आहे. तेथे जाऊन मग परत फिरू.' डॉक्टर म्हणाले.

'तेथून बोटही मिळेल.' मिरी म्हणाली.

'हो. ते मोठे गाव आहे. सुंदर वने-उपवने तेथे आहेत. रेल्वेचाही रस्ता तेथे मिळाला आहे. मोटरींची सारखी ये-जा तेथे चालू असते.

'गर्दी असेल तर कशाला तेथे जायचे ?' सुमित्राने विचारले.

'आपण गर्दीपासून दूर राहू.' मिरी म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel