प्रवेश पाचवा
( लक्ष्मीधरपंतांची ओसरी. रामराव, गोपाळराव, खंडेराव व माधवराव.)

राम -  ऐकलंत का गोपाळराव ?  जें जें ऐकावं तें तें आपलं ऐकेक आश्चर्यच !

माधव -  काय होईल या काळांत कांहीं सांगतां येत नाही.
(तपकीर ओढतो.)

राम -  कलियुग बरं हें !

गोपाळ - कलौ तु भ्रष्ट्राचार

राम -  अहो तो लक्ष्मीधरपंतांचा नारायण ---

खंडे - मग काय दिवे लावलेन् त्यानं ? अंडी खाल्लींन कीं काय ?

माधव -  अहो, अंडयांच एवढं कांही नाहीं हो. औषध म्हणून माझ्या पोरालाहि तीं द्यावीं लागलीं. (तपकीर ओढतो.)

राम -  अहो, तो नारायण म्हणे, महारामांगांच्या घरांत जातो. त्यांच्या पोरांचे पाय चेपतो.

खंडे -  आईबापांचे मात्र जन्मांत चेपणार नाही !

राम -  त्यांच्या तिथं खातो, निजतो-आणि पुन्हां लक्ष्मीधरपंतांच्या घरीं वावरतो. खरोखर त्यांच्या घरीं भ्रष्टाचार माजत चालला आहे. पंतांसारख्या धर्मवीराला हें कसं चालतं कुणास माहीत !

गोपाळ - अहो, पंतांना कळलंच नसेल ! हीं उपद्व्यापी काटीं घरीं थोडीच दाद देणार आहेत ? लक्ष्मीधरपंत खरोखर लाख माणूस ! अलीकडे अशीं धार्मिक माणसं आढळतच नाहींत. अधार्मिक गोष्ट पंतांना कधींच खपायची नाहीं.

खंडे - आपण आलोंच आहांत, घालूं त्यांच्या कानांवर ! नाहींतर त्यांच्या घरावर बहिष्कार घालण्यापर्यंत पाळी यायची !

माधव -  (पुढें होऊन तपकीर नाकांत कोंबतो ). लक्ष्मीधरपंत, लक्ष्मीधरपंत !

लक्ष्मीधरपंत -  (आंतून ) ओ, ओ, आलों. (येऊन सुपारी कातरून देत ) काय माधवराव ठीक आहे ना ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel