आवाज कसा गोड आहे ! आमचा गुराखी गायी चारून आणी. वत्सला त्याच्याजवळ गाणी शिके. सारें तिला हवें. तीर मारायला शिकली, तलवार फिरवायला शिकली. पोहायलाहि शिकली. परंतु पुरांत उडी टाकायला भिते. कधी उंच झाडावर चढते व मला म्हणते, 'आजी, मी वानर; मी चिमणी; मी पोपट; मी मैना; मी कोकिळा; मी कावळा.' सा-या पक्ष्यांचीं नांवे घेते. वरून विचारते, 'आजी, झाडांवरून आकाशाला हात नाहीं लागत. खालून आपलं उगीच वाटतं कीं, हात लागेल.' कसें बोलणें, कसें हंसणे ! एकदा तिचा सुखाचा संसार पाहिला म्हणजे मग दुसरी मला इच्छा नाही.' सुश्रुता म्हणाली.
"जातों. आजी, मी कदाचित् मोठया पहाटे उळून जाईन. आतांच तुम्हाला नमस्कार करतो.' असें म्हणून कार्तिक सुश्रुतेच्या पायां पडला.
कार्तिक गेला. त्याचें का वत्सलेवर प्रेम होतें ? त्याच्या हृदयांत का वत्सला शिरली होती, जीवनांत आली होती ? वाढदिवसासाठी म्हणून तो आला होता, का वत्सला कदाचित् भेटेल म्हणून आला होता ? वत्सला येणार असें त्याला कळलें होतें, त्यामुळे का आला ? वत्सलेला तो आवडला का ? त्याच्या घराण्यांत तर नागांचा फार द्वेष. त्याचे वडील तर नागाला दारांत उभें करूं देत नसत. वत्सला त्या घरांत कशी जाईल ? परंतु कार्तिक तसा नव्हता. त्यानें नाग व आर्य तरुणांची मारामारी होऊं दिली नाही. तो समन्वयवादी होता, परंतु तो आर्य होता. 'लग्न लावायचेंच झालें तर नाग तरुणांशी लावीन' असा वत्सलेचा निश्चय तयानें ऐकला व तो जरा निराश झाला. सुश्रुतेच्या लक्षांत ती गोष्ट आली. ती विचार करूं लागली. कार्तिक सौम्य वृत्तीचा तरुण होता. त्याच्यांत तडफ नव्हती, धमक नव्हती; परंतु प्रसंगविशेषी तयाचें तेज प्रकट होत असे. तसा तो वाईट नव्हता. लहानपणी वत्सला व तो एकत्र खेळली होती, पाण्यांत डुंबली होती. सुश्रुतेकडे तो अनेक वेळा जेवला पण होता, वत्सलाही कार्तिकाच्या घरी जेवली होती. परंतु ते सारें लहानपणी. लहानपणीं मिळाले ते मोठेपणी मिळेल का ? मोठेपणीं एकत्र राहतील का ? पतिपत्नी म्हणून एकत्र राहूं शकतील का ?
सुश्रुतेने आपल्या एका मांडीवर वत्सला व एका मांडीवर कार्तिक लहानपणीं निजविली होती. त्या दिवशीं कार्तिकाला त्याच्या वडिलांनी मारलें होतें, तो रडायचा थांबेना. त्या दिवशी, 'आमच्याकडे चल, कार्तिक, वाईट आहेत तुझे बाबा.' असे म्हणून वत्सलेनें त्याला घरी आणलें होतें. तो रडायचा थांबला. 'तुझे बाबा नाहींत तें किती छान ! तुला नाहीं कोणी मारणार.' असें त्या दिवशी तो बोलला व 'असे नये हो बोलू' म्हणून सुश्रुतेनें त्याच्या तोंडावर हात ठेवला. दोघा मुलांना तिने मांडीवर निजविले. त्या दिवशीं कार्तिक घरी गेला नाही. रात्री सुश्रुतेजवळ निजला. एका कुशीत कार्तिक, एका कुशीत वत्सला.
सुश्रुतेला सारे प्रसंग आठवू लागले. परंतु त्या वेळची वत्सला आज नव्हती. आज ती स्वतंत्र विचाराची, तेजस्वी कल्पनांची नवतरुणी होत होती. ती बंधनांत पडूं इच्छीत नव्हती. आकाशाला मिठी मारूं पाहत होती. दिक्कालातील तत्त्वाला भेटूं पाहत होती ! वेडी वत्सला ! शेवटी परब्रह्म एका मूर्तीत आहे, एका प्रेससेवेंत आहे, एका कटाक्षात आहे, अनंत काळ एका क्षणांत आहे, एका मधुर स्मृतीत आहे, हें तिला शिकावें लागेल. सुश्रुता हंसली. बंधनातच एक दिवस वत्सला मोक्ष मानील हे मनांत येऊन सुश्रुता हंसली !