एका गाण्यानें दुस-या गाण्यास जन्म दिला. दिवा दिव्याला पेटवतो. एकदां एक दिवा लागला कीं लाखों लागतात. एक तारा दिसूं लागतांच मग लाखों दिसतात, एक फूल फुललें कीं मागून पखरण पडूं लागते. सारा एकाचा पसारा.
हें दुसरें गाणें मुली म्हणत आहेत, फेर धरून नाचत आहेत, गोड गोड गाणें :
आलें सोन्याचें ग पीक
आले सोन्याचें ग पीक
पोरी वेंचायला शीक
पोरी टिपायला शीक
भरला सोन्याचा हा रंग
झालें पिवळें अपुलें अंग
भरला सोन्याचा हा रंग
पोरी नाचामध्यें दंग
भरला सोन्याचा हा रंग
पोरी खेळामध्यें दंग
तुझा आटपं बाई खेळ
घरीं जाया होईल वेळ
आई मारित असेल हांक
पोटीं वाटे मला धाक
येथें सोन्याचा हा पूर
घर राहिलें माझें दूर
राही दूर अपुलें घर
लूटूं सोनें पोटभर
पोरी पुरेल जन्मभर
गेलें आकाशांतलें सोनें
थांबलें आमचें बघा गाणे
आकाशांतील ती सुदामपुरी क्षणांत अदृश्य झाली. सोनें दिसेनासें झालें मुलीचें गाणें संपलें. जोंवर सोनें तोंवर गाणें. मुलांमुलींचे गाणें संपलें. परंतु तो तरुण एकदम नाचू लागला व गाऊं लागला. तो त्या मुलांचे कांहीं चरण म्हणूत नाचूं लागला:
सोन्याचा पडतो पाऊस पाऊस
रुसुन नको तूं जाऊंस जाऊंस
सोन्याचा पडतो पाऊस पाऊस
नको भिकारी राहूंस राहूंस'
हे चरण तो म्हणत होता व नाचत होता.