कांही दिवस गेले. परीक्षिति त्या चित्रशाळेंत चित्रें पाहत होता. उत्तरा सती जाऊं बघत आहे, असें तें चित्र तो बघत होता. पुन्हां खिन्नतेचे विचार त्याच्या मनांत आले. आपण काय केलें आयुष्यांत असें त्याच्या मनांत आलें. तो फार उद्विग्न झाला. सेवकांनी त्याला उपवनांत नेलें. तेथील सुंदर फुलें पाहून त्याला आनंद झाला नाहीं. एका सेवकानें अत्यंत सुगंधी अशी नाग-चाफ्याची फुलें त्याला आणून दिलीं.

'याला नागचाफा म्हणतात. नागलोक हीं फुलें नागदेवाला वाहतात.  हें फूल जणूं नागाच्या फणेसारखें दिसत आहे, नाहीं ?  घ्या, महाराज, हीं फुलें.' एक सेवक म्हणाला.

'कशाला देतां हीं फुलें ? हीं फुलें तोडलींत तरीहि तीं वास देतात. तोडणा-याला प्रसन्न करतात. मला तुम्ही मारायला धावलांत तरी मी तुमचें कल्याण चिंतीन का ? ह्या लहानशा फुलांत जी महनीयता आहे ती आम्हां मानवांत आहे का ? ह्या लहान लहान फुलांत परिपूर्ण जीवन भरलेंलें आहें. आपण आपलें जीवन किती परिपूर्णतेस नेलें ? छे, व्यर्थ मी जगतों --' परिक्षिति तेथील एका आसनावर बसला.

एके दिवशीं परीक्षितीनें आपल्या प्रधानास विचारलें,'माझ्या त्रस्त मनाला कोण देईल विसांवा ? माझ्या अशान्त हृदयाला कोण देईल शांति ? माझ्या शुष्क जीवनाला पल्लव फुटावेत म्हणून कोण येईल वसंतऋतु घेऊन, कोण येईल भरलेला मेघ घेऊन ? असा कोण आहे महात्मा, कोण आहे पुण्यात्मा ?  ज्याच्या जीवनांत अनुपम शांति भरून राहिली आहे असा कोण आहे ? '

'महाराज, शुकदेवांत ही शक्ति आहे. बालब्रह्मचारी ते. केवढा संयम, केवढी विरक्ति त्यांना बोलवावें. ते येतील. परोपकारार्थ त्यांचे जीवन. ते नाहीं म्हणणार नाहींत.' मुख्य प्रधान म्हणाले.

'बोलवा, शुक्राचार्यांना बोलवा. त्यांना आणण्यासाठीं पाठवा रथ. त्यांच्या स्वागताची सिध्दता करा. त्यांना आणायला आपण सारे सामोरे जाऊं. सारें नगर शृंगारा. चंदनाचे, केशरकस्तुरीचे सडे घाला. दीपमाळा लावा. उंच गगनचुंबी ध्वज उभारा. मार्गांत ठायी ठायीं नाना प्रकारच्या कमानी उभारा. सहस्त्र वाद्यांचे ध्वनि त्या वेळेस होऊं देत. नागांची मंजुळ वाद्यें, नागाला डोलावणा-या या त्यांच्या पुंग्या, तशींच तीं भिल्लांचीं वाद्यें -- येऊं देत सारीं.  अपार सोहळा करा. शुक्राचार्य ! ज्ञानसूर्यच ते. ज्ञानाची महान् पूजाअर्चा होऊं दे. येऊं देत शुक्राचार्य. हरूं देत अंधार.' परीक्षिति म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel