उत्सवाचा दिवस आला. गांवांत संमिश्र आनंद होता. गगनभेदी भेरी वाजत होत्या. शंख त्राहाटिलें गेले. शिंगे फुंकिलीं गेली. सारा गांव श्रृंगारण्यांत आला. आज नागेश्वराची महान् पूजा. ती पूजा साध्या पुष्पांनी होणार कीं शिरकमलांनी होणार ? आज येथें रक्त सांडलें जाणार का ?
'जनमेजयाचें सैन्य चालून येत आहे' अशी वार्ता पसरलीं दूर आकाशांत धूळ उडतांना दिसत होती. नागसेना सामना देण्यासाठीं सिध्द झाली. 'मारू किंवा मरूं' अशा त्यांनी आणा घेतल्या. चतुर नागनायकानें नागांची एक तुकडी जनमेजयाच्या सैन्यावर पाठीमागून हल्ला करण्यांसाठीं पाठविली. बाणांच्या गाडया घेऊन ती तुकडी गुपचूप गेली. बाकीचे नाग बाहेर पडले. शत्रूकडून बाण येऊं लागले. नागांनी उत्तर दिलें. हजारों गोफणींतून दगड फेंकलें जाऊं लागले. डोकी फुटूं लागलीं इतक्यांत जनमेजयाच्या सेनेवर पाठीमागून बाण येऊं लागले. कचाटयांत सांपडलें तें सैन्य. तें घाबरलें व सैरावैरा पळत सुटलें नागांनी पाठलाग केला. फारच थोंडें शत्रुसैन्य जिवंत जाऊं लागलें. बहुतेक प्राणांस मुकले.
नागांचा विजय झाला. परंतु हा तात्पुरता विजय होता. पराजयानें जनमेजय संतापेल, तो सहस्त्रावधि सैन्य घेऊन येईल, हे नागांना पक्के माहीत होतें. त्यांनी तो गांव सोडण्याचें ठरविलें. ज्या गांवांत त्यांचे वाडवडील नांदल आले, त्या गांवांत ते सुखानें नांदत होते. तें गांव सोडणें त्यांच्या जिवावर आलें. तेथील घरें, तेथील क्रीडाभूमि, तेथील तडागवापी, तेथील नागमूर्ति सारें सोडून जावयाचें होतें. तेथील शेतेंभातें, झाडेंमाडें सारें सोडायचें होतें. ज्या झाडावरून जे झोके घेत, जीं झाडें त्यांनी स्वत: लाविली, त्या सर्वांना निरोप द्यावयाचा होता. किती तरी तेथील आठवणीं. किती तरी स्मृति-चिन्हें ! -- परंतु जाण्याशिवाय उपाय नव्हता.
हिमालयाच्या उतरणीवरील राजा इंद्राच्या आश्रयांस जाण्याचें त्यांनी ठरविलें. एकजात सर्व मंडळी निघाली. म्हाता-याकोता-यांना व लहान मुलांना रथांतून, गाडयांतून बसविण्यांत आलें. कोणी घोडयावर बसले. बहुतेक पायीं निघालें. जितकें आवश्यक तितकें सामान त्यांनी बरोबर घेतलें कुत्री, मांजरें, तींहि त्यांनी बरोबर घेतली. महान् यात्रा सुरू झाली. स्त्रिया दमून गेलया. पायांना फोड आले. त्यांनी पायांना पल्लव लपेटलें. चालतच होत्या. वाटेंत वेळ दवडणें धोक्याचें होतें. निघतांना ती भव्य नागमूर्ति त्यांनी मोठा खड्डा खणून त्यांत पुरून टाकली. जणूं आपले प्राणच पुरीज आहोंत. असें त्यांना वाटलें. अश्रूंनी व पुष्पांनी शेवटची पूजा त्या मूर्तीची त्यांनी केली व मग वर माती लोटली.
राजा इंद्र यांचे घराणें फार प्रसिध्द होतें. आर्य व नाग या दोघांशी या घराण्याचें संबंध स्नेहाचें होतें. इंद्र आश्रय देईल, अशी नागांना श्रध्दा होती. अतिशय हाल व अपेष्टा सोशीत हे स्वातंत्र्याचें यात्रेकरू इंद्राच्या राजधानीस पोंचलें. इंद्रानें तयांचे स्वागत केलें. त्यांना अभय दिलें.
जनमेजयाच्या कानांवर या सर्व गोष्टी गेल्या. वक्रतुंड व जनमेजय बोलत असतांच, वार्ताहरानें जनमेजयाचें पत्र जाळून टाकल्याची वार्ता दिली.
'राजा, किती दिवस सौम्यपणा दाखवणार ?' वक्रतुंड म्हणाला.