'तूं एकटा म्हणून रडूं आलें.' ती म्हणाली.
'एकटा वाटतें वांचवायचा ? वांचलों तरी पुढें मरेनच. आणि आज या तापांतच मेलों तर ? खरें ना, आई ? मी कांही मरणार नाहीं. लोक मला अमर करतील. माझ्या गोष्टी लिहितील. माझ्यावर गाणी रचितील. तुझा शशांक अनंत काळपर्यंत लोकांच्या ओठांवर नाचेल, त्यांच्या हृदयांत बसेल. शशांक चिरंजीव होईल.' बाळ म्हणाला.
'बाळ, तूं एकटा, तूं जाणार, म्हणून नाहीं तुझ्या आईला वाईट वाटलें. आपल्याजवळ एकच मुलगा अर्पावयास म्हणून वाईट वाटलें.' नागानंद म्हणाला.
'मलाहि मागें वाटत असे कीं मी एकटा. मला ना भाऊ ना बहीण. परंतु या आश्रमांत कितीतरी भाऊं मिळाले. आतां मी एकटा नाहीं. 'शशांक म्हणाला.
'तुला दूध देऊं का ? ' मातेनें विचारिलें.
'दे.' तो म्हणाला.
तिनें त्याला दूध दिलें. त्याच्या मस्तकावरून हात फिरवीत बसली.
'तुम्ही शीतळाईचें गाणें म्हणतां ? ' वत्सलेनें नागानंदास विचारलें.
'विसरलों आतां मी.' तो म्हणाला.
'मला म्हणून दाखविलें होतेंत, आठवतें का ?' तिनें विचारिलें.
'हो आठवतें. कपोताक्षीच्या कांठीं, सोन्याचा पाऊस पडला त्या दिवशीं ! ' तो म्हणाला.
'सोन्याचा पाऊस ?' शशांकानें विचारिलें.
'होय, बाळ.' माता म्हणाली.