'परवानगी आहे. आपण अहिंसक रीतीने तालुका स्वतंत्र करू. एकदम छापा घालून बंदुका लांबवू. शेतक-यांचे राज्य स्थापू. जमिनी वाटू देऊ.'
'जमिनी वाटून द्यायच्या?'
'काँग्रेसच्या ठरावात नाही का, की शेतकरी नि कामगार यांच्या हाती सत्ता यायची असे?'
'परंतु शेतक-यांच्या हाती सत्ता देणे म्हणजे काय?'
'काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत त्याची चर्चा झाली होती. शेतक-यांच्या हाती सत्ता देणे म्हणजे त्याला जमीन वाटून देणे.
महात्माजी नि जवाहरलाल यांचे या बाबतीत एकमत होते.'
'परंतु जमीन वाटणे म्हणजे समाजवाद नव्हे.'
'शेतक-याला आधी जमीन वाटूनच द्यावी लागते. मागून सरकारी सामुदायिक शेतीचे तत्व त्याला पटवा. रशियात १९१७ मध्ये क्रांती झाली, त्या वेळेस 'शेतक-याला जमीन' ही एक घोषणा होती आणि क्रांती सुरू होताच शेतक-यांनी जमिनी वाटूनही घेतल्या. पुढे आपल्याला मिळेल याची वाटही पाहात ते बसले नाही.'
'परंतु महात्माजी काय म्हणतील?'
'महात्माजींचे हेच मत आहे. तो अमेरिकेतील कोणी पत्रपंडित त्यांच्याकडे आठवडाभर होता. त्याने महात्माजींना विचारले की, 'उद्या तुमचा स्वातंत्र्याचा प्रखर संग्राम सुरू झाला तर शेतक-यांनी काय करावे?' महात्माजींनी उत्तर दिले, 'त्यांनी जमिनी आपल्या ताब्यात घ्याव्यात.'
'परंतु या गोष्टींचा प्रचार सर्वत्र आधीच का झाला नाही?'
'तडजोड होईल अशी आशा वाटत असावी. ते काही असो. आपण आपला तालुका स्वतंत्र करायचा. कोणाला न मारत स्वतंत्र करायचा. शत्रूला नि:शस्त्र करून आपण शेतकरी-कामगारांचे राज्य स्थापू.'
'परंतु मिळविलेले स्वातंत्र्य टिकवायचे कसे?'
'एकदा स्वतंत्र झाल्यावर मग आपण शस्त्रांनीही लढलो तरी दोष नाही. स्वातंत्र्य मिळाल्यावर हिंदुस्थानात का लष्कर ठेवले जाणार नाही? स्वतंत्र हिंदुस्थान जपानबरोबर हातांत शस्त्र घेऊन का लढणार नाही? राष्ट्राध्यक्ष आझाद म्हणाले की मी प्रथम बंदूक हातात घेईन. आपला तालुका एकदा स्वतंत्र केल्यावर स्वतंत्र स्वतंत्र राष्ट्राचे सारे हक्क मग त्याला प्राप्त होतात. यांत काँग्रेसच्या अहिंसक धोरणाशी प्रतारणा होत नाही; विरोधही नाही.'
सर्वांची मुखमंडळे तेजाने फुलली होती. आपण स्वतंत्र होणार, या विचाराने ते जणू पेटले होते. त्यांनी सर्व योजना केली आणि त्याप्रमाणे ते वीर हातांत प्राण घेऊन निघाले. खरोखरच त्यांनी आपला तालुका स्वतंत्र केला. शिवापूरची मामलेदार कचेरी त्यांनी ताब्यात घेतली. तिच्यावर तिरंगी झेंडा डौलाने फडकू लागला. पोलीस नि:शस्त्र केले गेले; आणि स्वतंत्र तालुक्याचे स्वतंत्र नवे लष्कर उभे झाले. तालुक्यात शेतक-यांना धान्य नव्हते. काळाबाजार करणारे नि कोठारेवाले यांना तुरूंगात घालण्यात आले. या काळाबाजार करणा-यांना सरकारी अधिका-यांचा कसा पाठिंबा असे, त्याचे कितीतरी पुरावे मिळाले. जनतेची कोठारे ठायी ठायी सुरू झाली. सर्व तालुक्यांत एक नवीन चैतन्य आले. घरोघर तिरंगी झेंडे होते. झाडांवर, डोंगराच्या शिखरांवर तिरंगी झेंडे होते. गावोगावच्या अस्पृश्य बंधूंनाही जमीन मिळाल्यामुळे तेही हातात तिरंगी झेंडे घेऊन गाणी गाऊ लागले. काँग्रेसचा असा ठराव होता हे आम्हाला माहीतच नव्हते असे ते म्हणाले. मुसलमान जनताही सामील झाली. सारे सुखी झाले. विद्यार्थ्यांच्या मिरवणुकी निघत. लहान मुलामुलींच्या प्रभातफे-या निघत. ठायी ठायी कवायती, ठायी ठायी सेवादले, स्वतंत्र तालुक्यात स्वतंत्र पोलीसव्यवस्था ठेवू लागले. त्यांच्या दंडांवर तिरंगी फीत असे.