तुम्ही दोन मित्र एकमेकांना भेटला, तर तुम्हांला किती आनंद होतो! आणि पुष्कळ वर्षांनी भेटलात तर हा आनंद आणखी शतपट असतो. दोन मित्रांच्या भेटीत गोडी असते. कारण तेथे निर्मळ प्रेम असते. परंतु दोन थोर पुरुष परस्परांस भेटतात तेव्हा तर अपूर्व गोडी असते. ती चंद्रसूर्यांची भेट असते. हरिहरांची ती भेट असते. समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांची अशीच एकदा भेट झाली होती. एका नदीकिनारी या दोन साधूंचे काय बोलणे होणार म्हणून हजारो लोक जमले होते. परंतु एकाने पाण्यात दगड टाकला. दुस-याने आकाशाकडे बोट केले. दोघे निघून गेले. त्याचा अर्थ काय? एकजण म्हणाला : ‘पाण्यात दगड बुडतो त्याप्रमाणे हे लोक संसारात बुडत आहेत.’ दुसरा म्हणाला : काय करणार? प्रभूची इच्छा.’

परंतु मी तुम्हांला बापूजींची गोष्ट सांगणार आहे. येरवडा तुरुंगात  महात्माजींनी १९३२ मध्ये उपवास सुरू केला होता. हरिजनांना हिंदू समाजापासून कायमचे अलग करून टाकण्याचा इंग्रजांचा डाव होता. महात्माजींना ती गोष्ट असह्य झाली. देहाचा एक भाग कर्वतून वेगळा करणे कोणाला सहन होईल? आणि हिंदू समाजाचीही ती कायमची नामुष्की झाली असती. म्हणून महात्माजींनी उपवास सुरू केला. इंग्लंडचे त्या वेळचे प्रधान मॅक्डोनल्ड यांनी दिलेला निवाडा बदलण्यासाठी तो उपवास होता. धावपळ सुरू झाली. येरवडा तुरुंग भारताचे राजकीय चर्चाक्षेत्र झाला. पंडित मदनमोहन मालवीय आले. राजाजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले. शेवटी डॉ. बाबासाहेबांना मंजूर होईल असा पुणे-करार झाला. सारे आनंदले.

त्या वेळेस येरवड्यास उपवास सुटायच्या वेळेस कोण कोण होते? देशबंधू दासांच्या पत्नी वासंतीदेवी आल्या होत्या. देवी सरोजिनी होत्या. मदनमोहन होते आणि गुरुदेव रवींद्रनाथ होते. ते महात्माजींच्या जवळ आले. आंब्याच्या झाडाखाली महात्माजींची खाट होती. तो राष्ट्रपिता तेथे पडून होता. उपवास सुटायचा होता. रवींद्रनाथ महात्माजींच्या जवळ गेले. तो महान कवी भावनांनी ओथंबला होता. ते वाकले. महात्माजींच्या वक्षस्थलावर डोके ठेवून ते कवींद्र, ते गुरुदेव लहान बालकाप्रमाणे रडले! ते दृश्य डोळ्यांसमोर येऊन मी कितीदा सदगदित झालो आहे! तुम्हांला नाही का हा प्रसंग अतिपावन नि मधुर वाटत? भारतातील सारे सत्य. शिव, सुंदर त्या वेळेस येरवड्यास एकत्र झाले होते. थोर प्रसंग! प्रणाम त्या पवित्र मंगल प्रसंगाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel