४५

गांधीजी सेवाग्रामच्या आश्रमात असतानाची गोष्ट आहे. आश्रमातील जेवण फारसे साधे असे. निरनिराळ्या प्रकारचे चविष्ट अन्न करण्याचे ते टाळीत. साधेच अन्न परंतु भूक लागेल तेव्हा भरपूर खाल्ल्याने माणसाची प्रकृती उत्तम राहते, असे ते समजत असत. शिवाय आश्रमात अस्वाद-व्रत सर्व आश्रमावासी पाळीत असत.

अस्वाद म्हणजे स्वत:च्या चवीचे चोचले न पुरवता अन्न सेवन करणे. जेवण साधे असे परंतु सर्वांना मनसोक्त जेवण्यास मुभा असे. गांधीजी वेळ असल्यास सर्वांना स्वत: वाढीत. कोणी कमी जेवल्यास ते त्याच्या प्रकृतीची चौकशी करीत. विचारपूस करीत. सर्वांमध्ये आनंद, समाधान, संतोष पसरवण्याचा प्रयत्न करीत.

एकदा एक अमेरिकन पत्र-पंडित लुई फिशर सेवाग्रामच्या आश्रमात त्यांची मुलाखत घ्यायला आले होते. त्यांचा आठवडाभर मुक्काम होता. एकदा दुपारी ते गांधीजींबरोबर जेवाण्यास बसले. गांधीजी आश्रमात अस्वाद-व्रताचा प्रचार करीत असत, पण परक्या पाहुण्यावर जबरदस्ती करीत नसत. शक्त तितकी त्यांची चव सांभाळायचा प्रयत्न करीत असत. त्या दिवशी त्यांनी फिशरना जेवणाबरोबर आंबा खायला दिला होता. त्यांना तो फार आवडला.

जेवता जेवता फिशर गांधीजींना विनोदाने म्हणाले : ‘गांधीजी, तुम्ही या लोकांना साधं अन्न देता. त्यांना चव मारायला का शिकवता? तुम्ही अहिंसेचे पुरस्कर्ते, आणि मारायला शिकवता हे कसं?’

त्यांची कोटी गांधीजींच्या लक्षात आली. पण ते सवाई विनोदी! ते उत्तरले : ‘होय फिशरसाहेब, जर जगानं चव मारण्यापर्यंतच आपल्या हिंसेची मजल नेली, तर मी संबंध जगाला तसं करण्याची मुभा देईन.’

आणि मग सबंध पंगत हसू लागली.

गांधीजी अशा रीतीने बोलताना विनोद करीत असत. त्यामुळे गंभीर चर्ची चालू असतानासुद्धा मजेचे वातावरण अनेक वेळा निर्माण होई.

‘माझ्या जीवनात विनोद नसता तर ते मला कधीच नीरस वाटलं असतं.’ असे गांधी एकदा म्हणाले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel