१०२

महात्माजींबरोबर दांडी-यात्रेच्या वेळेस ८० सत्याग्रहींची तुकडी होती. दंडधारी गांधीजी आपली पिशवी खाकेला अडकवून सर्वांच्या पुढे असत. शहामृगाप्रमाणे झपझप पावले टाकीत ते चालत. रेंगाळत चालणे गांधीजींना कधीही आवडत नसे. ते फिरायला जातानाही वेगाने चालायचे. त्यांचे फिरणे व्यायामासाठी असे.

महात्माजींच्या बरोबरीचे सत्याग्रही दमायचे, थकायचे, शेवटी महात्माजींनी ‘यंग इंडिया’त त्या वेळेस व्यायामावर लेख लिहिला. महात्माजी अहिंसेचे उपासक होते, याचा अर्थ कोणी करतात की त्यांना दुबळेपणा हवा होता. ही साफ चुकीची कल्पना आहे. महात्माजींना निरोगी, सामर्थ्यसंपन्न संदेश देणारा राष्ट्रपिता त्या वेळेस व्यायामावर लिहिता झाला आणि त्या लेखात ते लिहितात; ‘निदान फिरण्याचा व्यायाम तरी सर्वांना घेता येईल. फिरायला जाणं हा व्यायाम सर्व व्यायाम प्रकारांचा राजा होय.’

१०३

१९३२ मध्ये हरिजनांसाठी महात्माजींनी उपवास केला. जातीय निवाडा त्यांनी बदलून घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संमती दिली. महात्माजींनी तुरुंगातूनच ‘हरिजन’ पत्र सुरू केले. पुढे सरकारने त्यांना सोडले. ते अहमदाबादला गेले. साबरमतीचा आश्रम जप्त करा म्हणून सरकारला त्यांनी कळविले. लढा चालू होता. सरकार आश्रम घेईना. तेव्हा महात्माजींनी तो हरिजन सेवेसाठी हरिजन सेवक संघाच्या ताब्यात दिला, आणि स्वत: कायदेभंगाचा प्रचार करायला निघाले. कारण देशभर चळवळ चालू होती. अहमदाबादच्या एका खेड्यात ते गेले. सरकारने त्यांना पकडून येरवड्यात आणून ठेवले. तेथून पूर्वीप्रमाणे हरिजन साप्ताहिकासाठी लेख लिहायची परवानगी त्यांनी मागितली. ती सवलत सरकार देईना. महात्माजींनी उपवास सुरू केला. सरकारने त्यांना सोडले, तेव्हा येरवडा गावातच सत्याग्रह करायला महात्माजी निघाले. सरकारने त्यांना पकडून आणले. त्यांनी पुन्हा हरुजन पत्रासाठी लिहायची परवानगी मागितली. नाठाळ सरकारने ती नाकारली आणि राष्ट्रपुत्याने पुन्हा उपवास सुरू केला. पुन्हा सुटका झाली. सरकार जणू अंत पाहत होते. परंतु सरकारला लाजलज्जा नसली तरी गांधीजी सदभिरुचीचे उपासक. हा उंदरामांजरांचा खेळ कोठवर चालायचा? उन्मत्त साम्राज्याशी राष्ट्रपित्याचा पदोपदी अपमान करीत होती. अखेर महात्माजींनी ठरविले की, सरकारने सोडले तरी वर्षभर तुरुंगातच आहे असे समजून राजकीय कार्य करायचे नाही. अस्पृश्यता निवारणार्थ देशभर दौरा काढायचे त्यांनी ठरविले. परंतु दौ-याआधी पर्णकुटीत त्यांनी २१ दिवसांचा उपवास केला. त्या वेळेस त्यांचे सहकारी स्वामी आनंद व खाजगी चिटणीस प्यारेलाल नाशिक तुरुंगात होते. महात्माजींनी त्यांना पत्रांत लिहिले; ‘हरिजन कार्याला श्रीमंत लोक आर्थिक मजत तर करतील. परंतु उपवासाने मी आधी आध्यात्मिक भांडवल देत आहे.’

१०४

उपवास सुरू जाला. नाशिक तुरुंगात प्यारेलालजी अस्वस्थ होते. ते म्हणायचे, ‘बापूंच्या सर्व उपवासांच्या वेळेस मी त्यांच्याजवळ असे. एनिमा किती द्यायचा, पाणी किती, कसं द्यायचं, सारं मला माहीत. परंतु या वेळेस मी त्यांच्याजवळ नाही.’ गांधीजींकडून पत्र आले; उपनिषदात म्हटलं आहे, ‘तदंतके तददूरं’ आत्मा जवळही आहे, दूर असलेल्या आत्म्याच्या तो जवळच आहे, असा अनुभव अशाच प्रसंगी घ्यायचा असतो. नाही का?

१०५

महात्माजींचा उपवास चालू होता. नाशिक तुरुंगात त्यांची पत्रे यायची. पत्रांत उपवासाविषयी फारसे न लिहिता स्वामी आनंद वगैरेंना तुमची प्रकृती कशी आहे, असे विचारीत. उपवासातही ते दुस-याची चिंता वाहायचे. आणि एकदा पत्रात पुढील मजकूर होता; ‘मी अन्न घेत नाही हे खरं, पाण्याशिवाय इतर रस घेत नाही. परंतु रामनामाचा रस तरी पोषण देऊन राहिलाच आहे!’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel