'मी एखाद्या वेळेस चंपूताईबरोबर जातो; परंतु ती माझा हात सारखा धरुन ठेवते. तिला वाटते मी हरवेन. ती मला पळू देत नाही. समुद्राच्या पाण्यात जाऊ देत नाही. मी समुद्रात जातो. लाटांशी खेळतो. चंपू एकदम माझ्यावर रागावते. 'श्याम ! पाण्यात जायचे असेल तर माझ्याबरोबर येत जाऊ नकोस,' असे ती म्हणते. मला वाळूतसुध्दा खेळू देत नाही. इतर मुले वाळूत देवळे करतात, किल्ले बांधतात, बोगदे करतात. मी बसलो वाळूत तर चंपू रागावते. ती म्हणते, 'श्याम ! वाळूत काय बसतोस ? कपडे मळतील.' शेवटी मी उठतो. चंपू पळत नाही, खेळत नाही. मी चंपूला जर म्हटले, 'चंपू तू पळ मी तुला पकडीन.' तर चंपू म्हणते, 'मला येथे पळायची लाज वाटते.' माधवराव ! तुम्ही याल समुद्रावर माझ्याबरोबर ? मी तुम्हाला पकडीन, तुम्ही पळा. का तुम्हालाही लाज वाटेल ? मोठया माणसांना खेळायला आवडत नाही ? मोठी माणसे समुद्रावर बसतात. चंपूताई स्वत: खेळत नाही ! मला खेळू देत नाही. तिच्याबरोबर फिरावयास जाण्याचा मला कंटाळा येतो. तुम्ही मला फिरायला न्याल ? हे काय तुम्ही तर हसता ! मी बोलतच नाही.' मी म्हटले.

'अरे ! चंपूला मी हसलो. तुला नाही हसलो. श्यामला कोण हसेल ? श्याम, तुला लवकर झोप येते. माझ्याबरोबर फिरावयास आलात तर घरी येण्यास उशीर होईल. तू वाटेतच पेंगू लागशील.' माधवराव म्हणाले.

'मला काही लवकर झोप येत नाही. तुम्ही मला गमती दाखवा, गाणी शिकवा, गोष्टी सांगा, माझ्याबरोबर पळा, पाण्यात या. मला नाही झोप येणार' मी म्हटले.

'रोज तू लवकर झोपतोस ?' माधवरावांनी विचारले.

'ती खरी झोप नसते. ते सोंग असते झोपेचे.' मी म्हटले.

'काल रात्री मी आलो होतो. तेव्हा तुला झोप नव्हती लागली ? तुला माहीत होते ?' माधवरावांनी विचारले.

'हो. सारे तुमचे बोलणे मी ऐकत होतो. मी जागा होतो. एकदम उठून तुमच्याजवळ यावे, असेसुध्दा वाटते होते.' मी जरा लाजत म्हटले.

'मग का नाही आलास ? तुझे मामासुध्दा म्हणाले की, श्याम, लौकर झोपतो म्हणून. मामीही म्हणाली. मी तुला हाका मारल्या. तू ओ का नाही दिलीस !' माधवराव विचारु लागले.

'मी रोज झोपेचे सोंग करतो. मी खोटीखोटी झोप घेत असतो.' मी सांगितले.

'का बरे ? असे खोटे का करावे ? झोप लागलेली नसेल तर हाक मारताच ओ द्यावी.' माधवराव गंभीरपणे म्हणाले.

'मला मामांची भीती वाटते म्हणून मी झोपेचे सोंग करतो. तुम्ही रोज रात्री याल तर मी असे सोंग करणार नाही. तुमच्या मांडीवरच गोष्ट ऐकत डोके ठेवून निजेन.' मी त्यांच्या मांडीवर डोके ठेवून म्हटले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel