२१.  सानुला कवी

कविता करण्याचा मला अगदी लहानपणापासून नाद होता. इंग्लंडमधील पोप कवी बापाचा मार खाताखाता 'बाबा बाबा पुरे मार  ।  झालो आता मी बेजार' असे रडत रडत काव्यातच बोलला. लहानपणी मी माझ्या धाकटया भावांना आंदुळताना साक्या करुन म्हणत असे. सुधन्वा, चंद्रहास वगैरेंच्या ज्या कथा पोथीत वाचीत असे, त्या मी साकीत रचून आंदुळताना म्हणत असे. त्या वेळेस मी काव्य रचतो आहे, मी कवी झालो आहे, हे मला ठाऊक नव्हते. मला नकळत मी कवी झालो होतो.

एकदा आमच्या घरी एक वेदाध्ययन केलेले भिक्षुक आले होते. ते विष्णुसहस्त्रनाम म्हणत होते. त्यांना एक चरण आठवेना. मी त्यांच्याजवळ होतो. काहीतरी एक चरण करुन मी त्यांना दिला. ते म्हणाले, 'वा ! श्याम, तू पुढे कवी होशील.' त्यांचा हा आशीर्वाद थोडाफार खरा झाला आहे.

बालपणाची माझी काव्यशक्ती मी विसरुन गेलो होतो. दापोलीच्या शाळेत ती पुन्हा जागी झाली. दापोलीस असतांना नवनीत, काव्यदोहन वगैरे मी पाठ केली होती. नवनीत सदैव माझ्या हातात असावयाचे. वृत्तदर्पणही मी वाचले. माझा एक मित्र मुरुडकर व मी शाळेतून परत येताना काव्यचर्चा करीत येत असू. राधारमण कवींच्या काव्याबद्दल आम्ही बोलत असू. चरणच्या चरण कसे यमकात्मक ते रचितात, याचे आम्हास आश्चर्य वाटे. एके दिवशी बाबा मला म्हणाला, 'श्याम ! तुला येईल रे कविता करावयास ?' मी म्हटले, 'न यावयास काय झाले ? उद्या मी एक कविता करुन आणतो-'

त्या दिवशी मी कवितेचे चरण तयार करुन ठेवले.

"रामनाम असे हितकारक
तेच होई सदा भवतारक'


हे दोन चरण मला फार आवडले. मी माझ्याशीच ते गुणगुणत बसलो. शाळेत गेल्यावर बाबाला हे चरण केव्हा दाखवीन असे मला झाले. ते चरण म्हणजे माझी निर्मिती होती. आजपर्यंत इतरांचे श्लोक मी घोकले. इतरांची काव्ये पाठ केली. त्या दिवशी मी माझे चरण घोकीत होतो. स्वत: निर्माण केलेल्या सृष्टीत मानवाचा खरा आनंद आहे. स्वत:चे मूल कसेही असले तरी आईबापांना आवडते. त्याप्रमाणे स्वत:चे चित्र, स्वत:चे काव्य कलावानास आवडते. लहान मूल पाटीवर वेडेवाकडे चित्र काढते, ते चित्र तुम्ही पूसू जाल तर लहान मूल पुसू देणार नाही. त्याने ते निर्माण केलेले असते. या निर्मितीचा आनंद तुम्ही पुसू पहाल तर मूल डोके फोडील व रडरड रडेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel