नैराश्य Depression

ग्रुप मधिल सर्वांनी अवश्य वाचा

लेखक -अनामिक.

पन्नास पेक्षा जास्त वयाची नैराश्याने (डिप्रेशन) ग्रासलेली एक व्यक्ती होती. त्यांच्या पत्नीने एका मनोचिकित्सकाची (साईकियाट्रिस्ट), जे भविष्य ही बघत असत, त्यांची भेट घेण्यासाठी वेळ मिळवली.  
पत्नी म्हणाली:- "हे खुपच निराशाग्रस्त आहेत. यांची कुंडली पण बघा." आणि सांगितले की या सर्वामुळे माझीही तब्ब्येत ठिक रहात नाही. 
 ज्योतिष्याने कुंडली बघितली. त्यात ग्रहस्थिती वगैरे सर्व काही ठिक दिसले. आता त्यांनी बोलायला सुरुवात केली. काही खाजगी प्रश्न ही विचारले आणि त्यांच्या पत्नी ला बाहेर बसायला सांगितले.
ती व्यक्तीला बोलते केले...
'खुप त्रासात आहे...
काळजीच्या ओझ्याने दबला गेलोय... नोकरी चा ताण... मुलांच्या शिक्षण आणि त्यांना नोकरी मिळेल की नाही याची काळजी.. घरासाठी घेतलेले कर्ज, गाडीसाठी घेतलेले कर्ज...
कशातच मन लागत नाही...

लोक मला खूपच यशस्वी व्यक्ती समजतात... पण खरंतर माझ्याकडे काहीच नाही....
मी खूपच निराश आहे...' वगैरे म्हणत संपुर्ण जीवनाचे पुस्तक उलगडून सांगीतले. 
मग त्या विद्वान चिकित्सकाने काही विचार केला आणि विचारले, "दहावी ला असताना कोणत्या शाळेत शिकत होतात ?"
त्या व्यक्तीने शाळेचे नाव सांगितले.
 

चिकित्सक म्हणाले:-
"तुम्हाला त्या शाळेत जावे लागेल. तेथून तुमच्या दहावी च्या  वर्गाची नोंदवही (रजिस्टर) घेऊन या, आपल्या मित्रांची नावे बघा आणि त्यांना शोधून त्यांच्या आजच्या स्थितीची माहिती मिळवायचा प्रयत्न करा. सर्व माहिती एका वहीत लिहुन काढा व एका महिन्यांनी ती माहिती घेऊन मला येऊन भेटा." 
ती व्यक्ती आपल्या जुन्या शाळेत गेली, खुप विनंत्या करुन नोंदवही (रजिस्टर) शोधले व त्याची प्रत बनवून आणली. त्यात एकशे वीस नावे होती. महीनाभर दिवस-रात्र प्रयत्न केले तरीही मोठ्या मुश्किलीने आपल्या पंचाहत्तर ते ऐशी वर्गमित्रांच्या विषयी माहिती जमा करु शकले.  
 त्यांना मोठे आश्चर्य वाटले....
त्यांतील वीस मित्रांचा मृत्यू झालेला होता... सात मित्र/मैत्रीणी विधवा/विधुर आणि तेरा घटस्फोटीत होते... दहा नशेच्या अधिन झाले होते, जे बोलण्याच्या लायकीचेही नव्हते. काहींचा तर ठावठिकाणा ही माहित होत नव्हता.... पाच तर इतके गरीब होते की विचारता सोय नाही... सहा इतके श्रीमंत निघाले की विश्वासच बसत नव्हता.
काही कॅन्सर ने पिडीत होते, काहींना अर्धांगवायू झाला होता, कुणाला साखरेचा, कुणाला दमा तर कुणी हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त होते.  एक दोघांचा अपघात होऊन त्यात हात/पाय किंवा मणक्याचे हाड मोडून अंथरुणावर पडून होते.... काहींची मुलं वेडी, व्यसनी, रिकामटेकडी, कामातून गेलेली निघाली... एक कारागृहात कैदेत होता.... एक पन्नास वय झाल्यावर स्थिरस्थावर झाला होता म्हणून आता विवाहबद्ध होण्याच्या विचारात होता तर एक अजूनही स्थिरावू शकला नव्हता पण दोन घटस्फोट होऊन ही तिसरे लग्न करायच्या बेतात होता....

महीन्याभरात दहावी इयत्तेची नोंदवही (रजिस्टर) भाग्याची व्यथा स्वतः ऐकवत होती...

चिकित्सकाने विचारले :- "आता सांगा, तुम्हाला नैराश्य (डिप्रेशन) कसलं आलं आहे?"

या व्यक्ती च्या लक्षात आले की 'त्याला कुठला आजार नाही, तो भुकेने मरत नाही, मेंदू अगदी ठणठणीत आहे, कोर्टकचेरी पोलिस-वकीलांशी कधी संबंध आला नाही, त्याची पत्नी-मुलं खूप चांगले आहेत, स्वस्थ आहेत, तो ही स्वस्थ आहे, डाॅक्टर, दवाखान्याची कधी गरज पडली नाही...'

त्याला असे जाणवले की जगात खरंच खूपच दुःख आहे आणि मी खुप सुखी आणि भाग्यवान आहे, तेव्हा नैराश्य येण्यापासून दूर रहाण्यासाठी-
दूसऱ्याच्या ताटात ढुंकून पहाण्याची सवय सोडून आपल्या ताटातील भोजन प्रेमाने ग्रहण करावे. तुलनात्मक विचार करु नये, सर्वांचे नशिब वेगवेगळे असते. आणि अजून एक गोष्ट.... सांगीतल्या-ऐकलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे....
#लेखक_अनामिक.