श्रीगणेशाय नमः ॥

जय जय श्रीकृष्ण सर्वसाक्षा ॥ सर्वाद्यमूळ निर्विकल्पकल्पवृक्षा ॥ तुझी करुं जातां विवक्षा ॥ आदि कोणा न सांपडे ॥१॥

ऐसा आदिकारण तूं वृक्ष साचार ॥ मुख्य कोंभ तो पयोब्धिजावर ॥ द्वितीय शाखा पिनाकधर ॥ कमलायन तृतीय शाखा ॥२॥

सकळ मुनीश्वरांचें मंडळ ॥ या उपशाखा चालिल्या सबळ ॥ ऋग्यजुःसामादि सुकोमळ ॥ पत्रें तयांसी फुटलीं हीं ॥३॥

न्याय मीमांसा सांख्यशास्त्र ॥ पातंजल व्याकरण वेदांत ॥ षट्‌शास्त्रांचा हा निश्चित ॥ मोहोर आला तयावरी ॥४॥

इंद्र अग्नि यम नैऋत ॥ रसनायक समीर पौलस्तिसुत ॥ शीतांशु चंडांशु भगणांसहित ॥ पुष्पें त्यावरी साजिरीं ॥५॥

अष्टलोकपालां सहित ॥ स्वर्गसुखें वायफुलें समस्त ॥ सलोकतामुक्ति अद्‌भुत ॥ फळें आलीं तयावरी ॥६॥

लागतां द्वैताचा प्रभंजन ॥ तींही फळें पडती गळोन ॥ निर्गुण सायुज्यता मोक्ष पूर्ण ॥ पक्क फळ अक्षयी ॥७॥

तें फळ भक्षितां निर्धारीं ॥ आपण होय ब्रह्मांडभरी ॥ जेथें येणें जाणें द्वैत कुसरी ॥ कल्पांतींही घडेना ॥८॥

ऐसा आदिवृक्ष ब्रह्मानंद ॥ मोक्षदायक त्याचें पादारविंद ॥ त्यामाजी श्रीधर मिलिंद ॥ दिव्य आमोद भोगीतसे ॥९॥

निर्विकल्प वृक्ष सद्‌गुरुनाथ ॥ तो अक्षयफळ दासांसी देत ॥ तें सेवूनि जाहला तृप्त ॥ तरी हरिविजयग्रंथ पुढें चाले ॥१०॥

मागें एकविसावा अध्याय जाहला पूर्ण ॥ उद्धवें गोपींसी कथूनि ज्ञान ॥ आला मथुरेसी परतोन ॥ हरिदर्शन घेतलें ॥११॥

यावरी पुढें कथानुसंधान ॥ तें ऐकोन पंडित विचक्षण ॥ जें ऐकतां पापविपिन ॥ होय दहन क्षणमात्रें ॥१२॥

मथुरेसी असतां रमानाथ ॥ उग्रसेन हरिकृपें राज्य करीत ॥ दुष्ट निंदक पळाले समस्त ॥ कंसवध होतांचि ॥१३॥

जैसें तृण होतांचि दग्ध ॥ त्यासरसा विझे जातवेद ॥ कीं प्राण जातां करणें स्तब्ध ॥ ठायीं ठायीं निचेतन ॥१४॥

तैसे कंसासी मारितां जाण ॥ विराले समस्त दुर्जन ॥ मथुरापुरींचे प्रजानन ॥ आनंदघन नांदती ॥१५॥

नाहीं आधि व्याधि मृत्यु आकांत ॥ हरिकृपेनें सकळ भाग्यवंत ॥ यथाकाळीं घन वर्षत ॥ सदा फलित वृक्ष सर्व ॥१६॥

तों कंसाच्या दोघी स्त्रिया ॥ अस्ति प्राप्ति नामें तयां ॥ त्या सांगों गेल्या पितया ॥ जरासंधासी तेधवां ॥१७॥

दोघी जणी अत्यंत दीन ॥ भेटल्या जरासंधालागोन ॥ पितयाच्या कंठीं मिठी घालोन ॥ रुदन करिती आक्रोशें ॥१८॥

जरासंध घाबरला बहुत ॥ म्हणे काय जाहला वृत्तांत ॥ येरी भूमीसी पडती मूर्च्छागत ॥ शब्द न फुटे बोलतां ॥१९॥

आक्रोशें बोलती तत्त्वतां ॥ कृष्णें मारिलें तुझ्या जामाता ॥ मुष्टिकचाणूरादि वीरां समस्तां ॥ मृत्युपंथा पाठविलें ॥२०॥

परमपुरुषार्थीं कृष्णराम ॥ केला मथुरेमाजी पराक्रम ॥ उग्रसेन राज्यीं स्थापिला परम ॥ सुख जाहलें लोकांसी ॥२१॥

ऐकतां श्रीकृष्णप्रताप ॥ मागधासी चढला परम कोप ॥ जैसा पाय पडतां खवळे सर्प ॥ नेत्र आरक्त वटारिले ॥२२॥

केलें कन्यांचें समाधान ॥ म्हणे मथुरा क्षणमात्रें जाळीन ॥ यादवकुळ सकळ छेदीन ॥ धरुनि आणीन रामकृष्णां ॥२३॥

ऐसी जरासंधें होड बांधोनी ॥ धाव तेव्हां घातला निशाणीं ॥ तेणें दुमदुमली अवनी ॥ तेवीस अक्षौहिणी दळ ज्याचें ॥२४॥

धडकला वाद्यांचा कल्लोळ ॥ प्रतिध्वनीनें गाजलें निराळ ॥ भयभीत ब्रह्मगोळ ॥ चालिलें दळ मागधाचें ॥२५॥

भेरी धडकल्या शशिवदना ते क्षणीं ॥ ऐकतां त्रास उपजे कर्णीं ॥ रणतुरें खणखणती तेणें गगनीं ॥ देवयानें डळमळती ॥२६॥

श्रृंगें बुरंगें पणव काहळ ॥ गोमुखी चळका चौंडकी दुटाळ ॥ मुखवातें सनया रसाळ ॥ गर्जती ढोल गिडबिडी ॥२७॥

बावीस सहस्त्र छत्रपती ॥ जेणें बंदीं घातले नृपती ॥ ऐसा जरासंघ मागधपती ॥ मथुरा घेऊं चालिला ॥२८॥

पदाति दळ पुढें जात ॥ त्यांचे पायीं ब्रीदें झणाणत ॥ पदीं त्यांच्या तोडर गर्जत ॥ हांक फोडीत आवेशें ॥२९॥

नाना परींच्या कांसा घालूनी ॥ यमदष्ट्रा खोविल्या जघनीं ॥ हातीं कुंत असिलता घेऊनी ॥ खेटकें अपार मस्तकावरी ॥३०॥

जैसा फुटे कल्पांतींचा सागर ॥ तैसें पायदळ जात अपार ॥ सडका पाश भिंडिमाळा थोर ॥ घेऊनि पुढें धांवती ॥३१॥

बडगे चक्रें शिळा डांगा ॥ घेऊनि बिलगती चमकती वेगा ॥ धनुष्यबाण सुरया उरगा ॥ आकृती ऐशा सतेज ॥३२॥

लघु उल्हाटयंत्रें आधीं ॥ घेऊनि पुढें धांवती खांदीं ॥ उर्वी दणाणे चालतां पदीं ॥ भूधर होय साशंक ॥३३॥

मुसळ गदा मुद्गर परिघ ॥ शूळ शक्ति लोहकंदुक अभंग ॥ पट्टिश बाण लोहवृश्चिक उरग ॥ दशघ्न्या आणि शतघ्न्या ॥३४॥

लोहार्गळा त्रिशूळ कोयते कातिया ॥ परशु तोमर कुठार घेऊनियां ॥ धांवती पुढें लवलाह्या ॥ मथुरापंथ लक्षूनि ॥३५॥

सवें चालिले तुरंगमांचे भार ॥ चपळ नागर मनोहर ॥ मित्ररथींचा जैसा रहंवर ॥ बलाढ्य सुंदर तैसेचि ॥३६॥

कित्येक निघाले श्यामकर्ण ॥ ऐका तयांचें लक्षण ॥ काढिले क्षीरसागरीं धुवोन ॥ तैसा वर्ण तयांचा ॥३७॥

डोळे आरक्त सुंदर ॥ पुच्छें विद्रुमवर्ण खूर ॥ समीराहूनि गति अपार ॥ तिहीं लोकीं गमन तयां ॥३८॥

एक घोडे ढवळवर्ण विशाळ ॥ एक नीळवर्ण अति निर्मळ ॥ एक पिंवळेचि केवळ ॥ आरबी चपल चौताळती ॥३९॥

एकाची माणिकाऐसी ज्योती ॥ परी वीरां सांवरितां न थारती ॥ ज्या तुरंगाची जैसी अंगकांती ॥ तद्रूपवर्ण छाया दिसे ॥४०॥

सांवळे घोडे कित्येक ॥ एक गर्जती सिंहमुख ॥ एक चकोर परम चाळक ॥ एक कुंकुमकेशरवर्ण ॥४१॥

एक चंदनवर्ण चांगले ॥ एक चंद्रवर्ण सोज्ज्वळे ॥ एक क्षीरवर्ण हंसाळे ॥ चपळ चालती पुढें पुढें ॥४२॥

जंबुद्वीपींचें जांभूळवर्ण ॥ श्वेतद्वीपींचे चंद्रवर्ण ॥ क्रौंचद्वीपींचे पिंवळे पूर्ण ॥ चितळे चित्रांगे साजिरे ॥४३॥

शाल्मलिद्वीपींचे बदीर ॥ प्लक्षद्वीपींचे वर्णचकोर ॥ कुशद्वीपींचे सोज्ज्वळ सुंदर ॥ पुष्करींचे श्यामकर्ण ॥४४॥

परम रागीट कुमाईत ॥ बदकश्याम स्थिर चालत ॥ आरबी उदकावरी पळत ॥ खूर न भिजे तयांचा ॥४५॥

नव खंडें छप्पन्न देश ॥ तेथींचे वारु एकाहूनि एक विशेष ॥ चित्रींचीं भांडारें आसमास ॥ उघडिलीं जयापरी ॥४६॥

उचंबळला श्रृंगारसागर ॥ ज्यांची सुपर्णा समान गति अपार ॥ संकेत दावितां अणुमात्र ॥ परचमूंत प्रवेशती ॥४७॥

चक्राकार वाजी वावरती ॥ अश्वखर्गक्षत्रिय एकजाती ॥ एकरुप होवोति वर्तती ॥ सपक्ष उडती तुरंग एक ॥४८॥

रत्‍नजडित वरी पाखरा ॥ चालतां दणाणे वसुंधरा ॥ चरणीं नेपुरें मस्तकीं तुरा ॥ रत्‍नजडित झळकतसे ॥४९॥

मुखीं रत्‍नजडित मोहाळी ॥ चामरें रुळती तेजागळीं ॥ नृत्य करिती भूमंडळीं ॥ पाय पुढील न लागती ॥५०॥

हिंसती जेव्हां सबळबळें ॥ तेणें बैसती दिग्गजांचे टाळे ॥ कवच टोप घेऊनि बळागळे ॥ वरी आरुढले राउत ॥५१॥

जैसी सौदामिनी अंबरीं ॥ तैशा असिलता झळकती करीं ॥ ऐसे अश्वभार ते अवसरीं ॥ मथुरापंथें चालिले ॥५२॥

अश्वभारांमागें लिगटले ॥ उन्मत्त नागभार उठावले ॥ ऐरावतासम तुकेले ॥ चौदंत आणि चपळत्वें ॥५३॥

सुवर्णाच्या श्रृंखळा ॥ खळाळती विशाळा ॥ वरी पाखरा घातल्या ॥ कनकवर्ण सुरेख ॥५४॥

वरी रत्‍नजडित चवरडोल ॥ ध्वज भेदीत गेले निराळ ॥ फडकती अति तेजाळ ॥ बोलाविती शत्रूंतें ॥५५॥

उर्वीवरी चामरें रुळती ॥ घंटा गर्जतां दिशा दुमदुमती ॥ गजाकर्षक स्कंधीं बैसती ॥ अंकुश सतेज घेऊनियां ॥५६॥

तो जिकडे दावीं संकेत ॥ तिकडे चौताळती गज उन्मत्त ॥ झडप हाणोनि पर्वत ॥ चुरा करिती मार्गीचे ॥५७॥

पुढें हिंसत चौताळती तुरंग ॥ मागें सबळ किंकाटती मातंग ॥ त्यांपाठीमागें रथ सवेग ॥ धडघडाट चालिले ॥५८॥

रथांचीं रत्‍नजडित चक्रें ॥ चपळेऐसीं चित्रविचित्रें ॥ साटे घातले जे वज्रें ॥ न फुटती सर्वथा ॥५९॥

मणिमय शोभतीं स्तंभ ॥ वरील छत्र कनकवर्ण स्वयंभ ॥ ध्वज भेदीत गेले नभ ॥ भिन्नभिन्न स्वरुप पैं ॥६०॥

नाना शस्त्रांचे भार ॥ रथीं रचिले अपार ॥ सप्तशत चापें परिकर ॥ भरले तूणीर बाणांनीं ॥६१॥

वरी आरुढलें महारथी ॥ पुढें धुरे बैसले चतुर सारथी ॥ जे संकटीं स्वामीसी रक्षिती ॥ जीवित्व मानिती तृणासम ॥६२॥

पुढें जुंपिले सबळ घोडे ॥ जे कां अनिळाहूनि वेगाढे ॥ सारथी संकेत दावी जिकडे ॥ जाती तिकडे चपळत्वें ॥६३॥

असो ऐसा तेवीस अक्षौहिणी ॥ दळभार निघाला तेचि क्षणीं ॥ वाद्यें वाजती तेणें धरणीं ॥ उलों पाहे तेधवां ॥६४॥

मध्यभागीं जरासंध ॥ दिव्य रथ परम सुबद्ध ॥ वरी आरुढला भोंवते सनद्ध ॥ महावीरीं वेष्टिला ॥६५॥

जैसा शक्रावरी वृत्रासुर ॥ निघाला सहित दळभार ॥ तैसा जरासंध प्रचंड वीर ॥ मथुरेसमीप पातला ॥६६॥

रातोरातीं धांविन्नले ॥ वेगें मथुरापुर वेढिलें ॥ सैन्यसमुद्राचें पडिलें ॥ वेष्टण भोंवतें अद्‌भुत ॥६७॥

लोक गजबजिले सकळ ॥ म्हणती ओढवला प्रळयकाळ ॥ जरासंध परम सबळ ॥ करील निर्मूळ मथुरेचें ॥६८॥

पळावया नाहीं वाट ॥ प्रजा करिती कलकलाट ॥ महाद्वारें झांकिलीं सदट ॥ न उघडती कोणातें ॥६९॥

कंस मारिला यदुवीरें ॥ म्हणोनि हा आला मथुरे ॥ जामाताच्या कैवारें ॥ प्रळय थोर करील ॥७०॥

हुडां हुडां वीर चढती ॥ परसैन्यातें विलोकिती ॥ एक बोलती एकाप्रती ॥ बरी गती न दिसे की ॥७१॥

कृष्ण आणि संकर्षण ॥ दुर्गावरुनि विलोकिती सैन्य ॥ हरीजवळी आला उग्रसेन ॥ म्हणे कैसें आतां करावें ॥७२॥

सात्यकी उद्धव अक्‍रुर ॥ म्हणती संकट आलें थोर ॥ भोंवते अवघे दीनवक्‍त्र ॥ यादवेंद्रें देखिले ॥७३॥

जो महाराज नरवीरपंचानन ॥ जो यादवकुळमुकुटरत्‍न ॥ जो पूर्णब्रह्म सनातन ॥ इंदिराजीवन श्रीरंग ॥७४॥

जो विश्वपित्याचा जनक ॥ जो सर्गस्थित्यंतकारक ॥ अनंत ब्रह्मांडें देख ॥ इच्छामात्रें घडी मोडी ॥७५॥

तेव्हां अद्‌भुत केलें सर्वेश्वरें ॥ उर्ध्व विलोकिलें श्रीकरधरें ॥ तों अकस्मात निराळपंथें त्वरें ॥ दोन रथ उतरले ॥७६॥

ते वैकुंठींचे दिव्य रथ ॥ सहस्त्र मित्रप्रभा भासत ॥ कोणा न वर्णवे तेज अद्‌भुत ॥ गरुडध्वज झळके वरी ॥७७॥

शारंगशंखचक्रगदामंडित ॥ रथीं असती आयुधें अद्‌भुत ॥ दारुक सारथी देदीप्यवंत ॥ शस्त्रास्त्रीं मिरवे जो कां ॥७८॥

वरी ठेविले अक्षय भाते ॥ कोण वर्णील तुरंगमांतें ॥ जे अश्व अमृतपानकर्ते ॥ ऐका नामें तयांचीं ॥७९॥

शैब्य सुग्रीव अतिसुस्वरुप ॥ तिजा बहालक चौथा मेघपुष्प ॥ ऐका दुजिया रथाचा प्रताप ॥ संकर्षण आरुढला जेथें ॥८०॥

तालध्वजमंडित रथ ॥ चारी वारु चपळ श्वेत ॥ नांगर मुसळ आयुधें समर्थ ॥ तयावरी ठेविलीं ॥८१॥

दोनी रथ मथुरे उतरले ॥ जैसे कां शशिमित्र प्रकटले ॥ दारुकें साष्टांग घातलें ॥ श्रीकृष्णासी दंडवत ॥८२॥

सकळ पाहती जन डोळां ॥ तत्काळ श्रीकृष्ण चतुर्भुज जाहला ॥ चारी आयुधें घेतलीं ते वेळां ॥ रथीं चढला यादवेंद्र ॥८३॥

देव सुमनांचे संभार ॥ वरुनि वर्षती अपार ॥ दुजे रथीं चढला भोगींद्र ॥ हल मुसळ सांभाळिलें ॥८४॥

ऐसें देखोनि तये वेळे ॥ उग्रसेनासी स्फूरण आलें ॥ चतुरंग दळ सिद्ध जाहलें ॥ निशानीं दिधले घाव वेगीं॥८५॥

अपार यादवांचे भार ॥ चहूंकडूनि उठावले समग्र ॥ रथीं बैसले उद्धव अक्‍रुर ॥ प्रतापशूर प्रचंड जे ॥८६॥

बळिभद्रें आणि घननीळें ॥ सबळ बळें शंख त्राहाटिले ॥ जरासंधाचें सैन्य दचकलें ॥ वीर जाहले भयभीत ॥८७॥

तों वसुदेव निजभारेंसीं ते वेळीं ॥ आला उग्रसेनाजवळी ॥ एकचि घाई लागली ॥ रणतुरांची ते वेळी ॥८८॥

उल्हाटयंत्रांचे मार ॥ दुर्गावरुनि होती अपार ॥ परसैन्याचे यंत्रगोळ समग्र ॥ दुर्गपरिघामाजी पडती ॥८९॥

उघडिलें मथुरेचें महाद्वार ॥ सिंहनादें गर्जती अपार ॥ यादव निघाले बाहेर ॥ रामकृष्णांसमवेत ॥ पैं ॥९०॥

दोनी सैन्यां जाहला मेळ ॥ धडकत वाद्यांचा कल्लोळ ॥ डळमळीत उर्वीमंडळ ॥ दिग्गज त्रास पावले ॥९१॥

जाहली एकचि रणधुमाळी ॥ नारद नाचे अंतराळीं ॥ म्हणे भली मांडली येथें कळी ॥ वाजवी टाळी आनंदें ॥९२॥

उतरावया पृथ्वीचा भार ॥ यालागीं अवतरला श्रीधर ॥ तो विजयी हो कां निरंतर ॥ सकळ सुरवर बोलती ॥९३॥

असो पायदळावरी पायदळ ॥ लोटलें तेव्हां अति सबळ ॥ तुरंगारुढ वीर सकळ ॥ तेही मिसळले परस्परें ॥९४॥

गजांवरी गज लोटले ॥ रथांशीं रथ झगटले ॥ एकचि घनचक्र मांडलें ॥ रामकृष्ण पाहती ॥९५॥

जैशा जलदाचिया धारा ॥ तैसे शर येती एकसरां ॥ एक एकासी लागूनि चुरा ॥ होवोनि पडती धरेवरी ॥९६॥

शिरें वीरांचीं उसळती देख ॥ जैसे आकाशपंथें कंदुक ॥ प्रेतें पडती असंख्य ॥ गणना नाहीं अश्वांसी ॥९७॥

शोणिताचे पूर जात ॥ माजी गजकलेवरें वाहत ॥ रथ मोडले असंख्यात ॥ नाहीं गणित अश्वांसी ॥९८॥

कृष्णबळें यादव अनिवार ॥ केला परदळाचा संहार ॥ उठावले जरासंधाचे वीर ॥ शिशुपाळ आणि वक्रदंत ॥९९॥

कृष्णद्वेषी मिळाले अपार ॥ त्यांत रुक्मिया आला भीमककुमर ॥ महाभिमानी दुराचार ॥ अतिनिंदक दुरात्मा ॥१००॥

त्यांनी अपार युद्ध केलें ॥ यादवसैन्य माघारलें ॥ ऐसें रामकृष्णें देखिलें ॥ रथ लोटिले तेधवां ॥१॥

जैसें वारणचक्र दारुण ॥ त्यांत रिघती दोघे पंचानन ॥ श्रीकृष्णें शारंग चढवून ॥ सोडिले बाण चपळत्वें ॥२॥

जैसें पूर्वीं श्रावणारिसुतें ॥ जाऊनि वैश्रवणबंधुपुरीतें ॥ किंपुरुषांसहित युद्ध तेथें ॥ प्रतापवंतें केलें जेवीं ॥३॥

कंसांतक तैसाचि येत ॥ परमप्रतापी रणपंडित ॥ असंख्यात बाण सोडीत ॥ नोहे गणित शेषातें ॥४॥

कीं कुंभोद्भव वसुदेवनंदन ॥ रणसागर करुं पाहे प्राशन ॥ कीं मागधसैन्य शुष्क विपिन ॥ त्यासी कृशान श्रीरंग ॥५॥

कीं मागधवीर हेचि नग ॥ त्यांवरि वज्रधर श्रीरंग ॥ हस्तपक्ष छेदूनि सवेग ॥ पाडी मंगळजननीवरी ॥६॥

तेवीस अक्षौहिणी दळ ॥ त्यांत मुख्य मुख्य उरले सबळ ॥ वरकड सैन्य समूळ ॥ कृष्णें आणिलें बाणांवरी ॥७॥

मुकुटरांगावळी तुटोनी ॥ कां गलटोप पडिले धरणीं ॥ महावीर पाठी देऊनी ॥ पळों लागले तेधवां ॥८॥

गुढारांसहित रित कुंजर ॥ सैरा धावती अनिवार ॥ ध्वजांसहित रथ अपार ॥ शून्य पडिले मोडोनि ॥९॥

छत्रें चामरें पताका ॥ तेथें केर पडिला देखा ॥ अशुद्धनदीचा वाहे भडका ॥ घायाळ जींत पोहती ॥११०॥

देखोनि पंडितांचें दिव्यज्ञान ॥ पाखंडी पळती घेऊनि वदन ॥ तैसे वीर पृष्ठ दावून ॥ पळते झाले तेधवां ॥११॥

इकडे कृतांत दचके देख ॥ ऐसी बळिभद्रें फोडिली हांक ॥ जरासंधावरी एकाएक ॥ रथासमवेत लोटला ॥१२॥

देखोनि बळरामाचा प्रताप ॥ हरपला मागधाचा दारुण दर्प ॥ जैसा शंकरापुढें कदर्प ॥ दहनकाळीं शंकला ॥१३॥

मुसळ आणि नांगर ॥ हातीं घेऊनि बळिभद्र ॥ रथाखालीं उडी सत्वर ॥ घालूनियां धांविन्नला ॥१४॥

नांगर घालूनि ओढी वीर ॥ मुसळघायें करी चूर ॥ झाला बहु वीरांचा संहार ॥ जरासंध पहातसे ॥१५॥

धनुष्या चढवोनि गुण ॥ जरासंधें सोडिले बाण ॥ जैसा धारा वर्षे घन ॥ शर निर्वाण सोडिले ॥१६॥

ते कृष्णाग्रजें न मानोनि ते वेळीं ॥ धांव घेतली रथाजवळी ॥ नांगर घालूनि तत्काळीं ॥ जरासंध ओढिला ॥१७॥

मुसळघायें करावा चूर्ण ॥ तों बोले जगज्जीवन ॥ यासी न मारावें आपण ॥ न्यावा बांधोनि रथासी ॥१८॥

तों देववाणी बोले आकाशीं ॥ भीमाहातीं मरण यासी ॥ मग वरुणपाश घालूनि वेगेंसीं ॥ दृढ रथासी बांधिला ॥१९॥

जैसा मृगेंद्रें धरिला वारण ॥ तैसा चालविला रथीं बांधोन ॥ विजयी जाहले रामकृष्ण ॥ वृंदारक पुष्पें वर्षती ॥१२०॥

जरासंधाचे वीर ते वेळे ॥ उरले ते अवघेचि पळाले ॥ जैसें यजमानासी संकट ओढवलें ॥ आश्रित पळती दश दिशां ॥२१॥

श्रीरंग म्हणे बळिरामातें ॥ आतां सोडावें जरासंधातें ॥ हा मेळवूनि आणील दैत्यांतें ॥ मागुती त्यांतें संहारुं ॥२२॥

पृथ्वीवरील जे निंदक खळ ॥ येथें तितुके आणील सकळ ॥ ऐसें बोलतां घननीळ ॥ सोडिला तत्काळ बळरामें ॥२३॥

मग अत्यंत करीत खेद ॥ स्वस्थळा पातला जरासंध ॥ म्हणे बावीस सहस्त्र रायां केला बंध ॥ तो पुरुषार्थ व्यर्थ गेला ॥२४॥

मी सेवीन घोर अरण्य ॥ तप करीन तेथें बैसोन ॥ परी नगरासी जाऊनि वदन ॥ काय दावूं लोकांतें ॥२५॥

तों रुक्मिया शिशुपाळ वक्रदंत ॥ मार्गीं भेटले अकस्मात ॥ मागधाचें समाधान करीत ॥ तपसंकल्प करुं नको ॥२६॥

जय अथवा पराजय ॥ महावीरांसी पडे हा समय ॥ पुरुषें पुरुषार्थ सांडूं नये ॥ करावा उपाय मागुती ॥२७॥

जों कायेंत असे प्राण ॥ तों न सोडावी आंगवण ॥ मागुती दळभार घेऊन ॥ रामकृष्ण धरुनि आणूं ॥२८॥

ऐसें जरासंधासी वळविलें ॥ मागुती तितुकेंचि दळ मेळविलें ॥ सवेंचि मागधें धावणें केलें ॥ मथुरेवरी पूर्ववत ॥२९॥

मागुती बळिरामें धांवोन ॥ बांधिला वरुणपाश घालून ॥ माधवें दिधला सोडून ॥ पुढती उत्थान आणिक केलें ॥१३०॥

ऐसा सप्तदश वेळ ॥ संग्राम माजला तुंबळ ॥ सिंहावरी सिंह लोटले सबळ ॥ तैसा फणींद्र धरी त्यातें ॥३१॥

सत्रा वेळ बळिरामें धरिला ॥ तैसाचि श्रीरंगें सोडविला ॥ तों नारदमुनि पातला ॥ जरासंधाचे भेटीतें ॥३२॥

म्हणे तूं कष्टलासी सत्रा वेळ ॥ तुज नाटोपे राम घननीळ ॥ तरी काळयवन असे सबळ ॥ त्यासी साह्य बोलाविंजे ॥३३॥

यादवांचा पराभव संपूर्ण ॥ काळयवनाहातीं असे जाण ॥ त्यासी असे शंकरवरदान ॥ तें वर्तमान ऐक तूं ॥३४॥

गर्गाचार्य महाऋषी ॥ तो कुळगुरु होय यादवांसी ॥ विद्यासंपन्न तेजोराशी ॥ प्रतिसूर्य दूसरा ॥३५॥

एके यादवें आपुली कन्या ॥ गर्गऋषीसी दिधली जाणा ॥ परी ठाव नाहीं संताना ॥ बहुत दिवस लोटले ॥३६॥

तों यादव विनोदी उदंड ॥ म्हणे गर्गऋषि आहे षंढ ॥ ऐसें ऐकतांचि प्रचंड ॥ क्रोध आला मुनींतें ॥३७॥

म्हणे यादव तुम्ही उन्मत्त ॥ ऐसा निर्मितों पुरुषार्थी सुत ॥ त्यापुढें पराभव समस्त ॥ होय तुमचा एकादांचि ॥३८॥

परम क्रोधावला ब्राह्मण ॥ केलें हिमाचळीं अनुष्ठान ॥ हिमनगजामात प्रसन्न ॥ तत्काळचि जाहला ॥३९॥

येरु मागे वरदान ॥ ऐसा पुत्र दे मजलागून ॥ जो यादवांसी पराभवून ॥ राज्य हिरोन घेईल ॥१४०॥

शिव म्हणे तूं करितां अनुष्ठान ॥ म्लेंच्छस्त्री मागेल भोगदान ॥ तिचें पोटीं पुत्र दारुण ॥ महादुष्ट होईल तुझा ॥४१॥

ब्राह्मणस्त्रीचें पोटीं पुत्र ॥ कदा नव्हे अपवित्र ॥ यथा भूमि तथांकुर ॥ होईल साचार द्विजवरा ॥४२॥

तो तुझा वीर्यनंदन ॥ दुष्टक्षेत्रीं होय निर्माण ॥ असो गर्ग करीत अनुष्ठान ॥ महाविपिन सेविलें ॥४३॥

तों दुष्ट एक म्लेंच्छपती ॥ त्यासी नव्हे पुत्रसंतती ॥ तेणें स्त्री पाठविली गर्गाप्रती ॥ श्रृंगारुनि एकांतीं ॥४४॥

तीस भोग दिधला जाण ॥ तोचि हा म्लेंच्छ काळयवन ॥ यासी तूं संगें घेऊन ॥ मथुरेवरी जाय कां ॥४५॥

ऐकतां जरासंध संतोषला ॥ काळयवनापासीं गेला ॥ सर्व वृत्तांत सांगितला ॥ क्रोधावला काळयवन ॥४६॥

तीन कोटी म्लेंच्छ त्याचे ॥ तेवीस अक्षौहिणी दळ मागाधाचें ॥ रुक्मिया शिशुपाळ दैत्य साचे ॥ साह्य झाले सत्वर ॥४७॥

ऐसी सेना मेळवूनि सवेग ॥ रजनीमाजी क्रमिती मार्ग ॥ सर्वांतरात्मा श्रीरंग ॥ वर्तमान कळलें तें ॥४८॥

मग भक्तकैवारी रमाधव ॥ समुद्रापासीं मागोनि ठाव ॥ द्वारकानगर अपूर्व ॥ विरिंचिहातीं रचविलें ॥४९॥

द्वारकेची रचना सांगतां समस्त ॥ तरी हा अध्याय वाढेल बहुत ॥ द्वारकावर्णन अद्‌भुत ॥ पुढें कथन केलें असे पैं ॥१५०॥

असे जैसी वैकुंठनगरी ॥ तैसीच द्वारका भूमीवरी ॥ कमलोद्भवें निर्मिली ते अवसरीं ॥ श्रीकृष्णाज्ञेकरुनियां ॥५१॥

जेणें इच्छामात्रें आणिले रथ ॥ तेणेंचि द्वारका रचिली अद्‌भुत ॥ तेथें नाना संपत्ती समस्त ॥ कुबेरें आणूनि भरियेल्या ॥५२॥

तों रातोरातीं काळयवनें ॥ मथुरेवरी मांडिलें धांवणें ॥ तों मथुरेसी लोक निद्रेनें ॥ आबालवृद्ध व्यापिले ॥५३॥

परम नाटकी पूतनारी ॥ योगमाया घालोनि वरी ॥ रजनीमाजीं द्वारकापुरीं ॥ समस्त लोक पाठविले ॥५४॥

धनधान्यपशूंसमवेत ॥ गज तुरंग रथ अद्‌भुत ॥ सहकुटूंबें यादव समस्त ॥ उग्रसेनही पाठविला ॥५५॥

दारुक सारथी रथ आयुधें ॥ तींही पाठविलीं गोविंदें ॥ बळिभद्रही परमानंदें ॥ पाठविला तेधवां ॥५६॥

एक श्रीकृष्णावेगळें ॥ मथुरेंत कोणी नाहीं उरलें ॥ जैसें अयोध्यानगर पूर्वीं नेलें ॥ रामचंद्रें वैकुंठीं ॥५७॥

द्वारकेमाजी लोक जागे जाहले ॥ पाहती उगेचि चाकाटले ॥ वस्तुजात तैसेंचि संचलें ॥ परी नगर आपुलें नव्हेचि ॥५८॥

उद्धव अक्रूर उग्रसेन ॥ वसुदेव देवकी संकर्षण ॥ रोहिणी प्रजा सकळ ब्राह्मण ॥ म्हणती हरिविंदान न कळेचि ॥५९॥

मथुरेच्या शतगुणें चांगलें ॥ द्वारकानगर आम्हां दिधलें ॥ असो इकडे काय वर्तलें ॥ तेंचि ऐका भाविक हो ॥१६०॥

जरासंध आणि काळयवन ॥ उगवला नसतां चंडकिरण ॥ वेढा घातला मथुरेसी येऊन ॥ पळेल कृष्ण म्हणोनियां ॥६१॥

जरासंध म्हणे बरें झालें ॥ मज सत्रा वेळां इंहीं गांजिलें ॥ धरोनि आतांचि एक वेळे ॥ संहारीन हरीसहित ॥६२॥

तों सवेंचि उगवला अर्क ॥ नगरांत न दिसती लोक ॥ उल्हाटयंत्रांचे मार अधिक ॥ न होती दुर्गावरोनियां ॥६३॥

नगरद्वार उघडें भणभणित ॥ एकलाचि उभा कृष्णनाथ ॥ नाहीं शस्त्रास्त्रें रथ ॥ वाट पाहत यवनाची ॥६४॥

आश्चर्य करिती समस्त ॥ म्हणती गोवळा कपटी बहुत ॥ यासीच धरावें त्वरित ॥ मग लोक शोधावे ॥६५॥

काळयवनें कृष्ण लक्षिला ॥ शस्त्रेंविरहित चरणीं देखिला ॥ आपण रथाखालीं उतरला शस्त्रें ठेवूनि समस्त ॥६६॥

जरासंधासी म्हणे काळयवन ॥ आतांचि कृष्ण आणितों धरुन ॥ नेऊं रथासी बांधोन ॥ सूड घेईन तुझा आतां ॥६७॥

यवनें भुजा पिटोनि सत्वर ॥ सन्मुख लक्षिला श्रीधर ॥ आवेशें धांव घेतली थोर ॥ तें यदुवीर पाहतसे ॥६८॥

जवळी येतां काळयवन ॥ जगद्वंद्य करी हास्यवदन ॥ करावया गर्गवचन प्रमाण ॥ नारायण चालिला ॥६९॥

जो इच्छामात्रें घडी समस्त ॥ तो काळयवन भेणें पळत ॥ परी शिववचनासी मान देत ॥ भक्तवत्सल म्हणोनियां ॥१७०॥

असो कायेंतूनि निघे प्राण ॥ तो कदा नव्हे दृश्यमान ॥ अवघ्या दळादेखतां कृष्ण ॥ जाय निघोन क्षणमात्रें ॥७१॥

जैसी गगनीं झळके चपळा ॥ तैसा हरि वेगें निघाला ॥ काळयवन पाठीं लागला ॥ दळभार राहिला दूरी पैं ॥७२॥

पुढें जात शेषनयन ॥ समीरगती धांवे यवन ॥ उल्लंघिलीं अरण्यें दारुण ॥ महाकठिण पर्वत ॥७३॥

नर्मदा तापी गोदावरी ॥ अनेक नद्या उल्लंघी मुरारी ॥ भीमा उल्लंघूनि कृष्णातीरीं ॥ कृष्ण वेगें पातला ॥७४॥

कृष्णावेणीसंगम सुरंग ॥ ज्यासी म्हणती दक्षिणप्रयाग ॥ तेथें उभा ठाकला श्रीरंग ॥ तों भार्गवराम भेटला ॥७५॥

जाहलें दोघां क्षेमालिंगन ॥ परशुराम पुसे हरीलागून ॥ कोणीकडे जाहलें आगमन ॥ कृष्णें वर्तमान सांगीतलें ॥७६॥

तों जवळी आला काळयवन ॥ पुढें चालिला जगन्मोहन ॥ पूर्ण ब्रह्म सनातन ॥ त्यासी यवन धरुं पाहे ॥७७॥

वाटे जवळी सांपडला दिसे ॥ परी दूरी बहुतचि असे ॥ बहु धांव घेतली सायासें ॥ परी नाटोपे श्रीरंग ॥७८॥

एक सद्भावावांचोन ॥ कोणा नाटोपे जगज्जीवन ॥ त्यासी काय धरील काळयवन ॥ अतर्क्य पूर्ण वेदशास्त्रां ॥७९॥

काळयवन म्हणे रे भ्याडा ॥ किती पळसील दडदडां ॥ तुवां गोकुळीं केला पवाडा ॥ तें मजपुढें न चलेचि ॥१८०॥

सत्रा वेळ मागधासीं ॥ तूं मथुरेपुढें युद्ध करिसी ॥ मजभेणें कां तूं पळसी ॥ नपुंसक होसी गोवळ्या ॥८१॥

गौळणी बांधिती उखळासी ॥ मज उशीर काय धरावयासी ॥ तूं गोकुळीं चोरी करिसी ॥ तेंचि पाहसी चहूंकडे ॥८२॥

कलिया आणि अघासुर ॥ किरडें मारुनि जाहलासी थोर ॥ अश्व मारिला केशी वीर ॥ बकासुर पांखरुं ॥८३॥

वल्मीकतुल्य गोवर्धन ॥ पुरुषार्थ भोगिसी उचलून ॥ कंस मारिला कपटेंकरुन ॥ आतां धरीन क्षणें तुज ॥८४॥

ऐसे उणे बोल बोलत ॥ बोलां नाटोपे कृष्णनाथ ॥ नाना तपें अनुष्ठान करीत ॥ त्यांसी निश्चित न सांपडे ॥८५॥

दुग्धाहारी फळाहारी ॥ नग्न मौनी जटाधारी ॥ पंचाग्नि साधिती निराहारी ॥ त्यांसी मुरारी नाटोपे ॥८६॥

एक करिती वेदशास्त्रपठन ॥ करिती योगसाधन तीर्थाटन ॥ नाना साधनीं करिती शीण ॥ परी मननोहन नाटोपे ॥८७॥

एका ढेंगेंत ब्रह्मांड आटी ॥ यवन धांवे त्याचिया पाठीं ॥ व्यर्थ पळतां होती हिंपुटी ॥ परी जगजेठी न सांपडे ॥८८॥

क्षण एक अवतारी सगुण ॥ सवेंचि पाहतां तो निर्गुण ॥ म्हणे त्रिविक्रम क्षणें वामन ॥ त्यासी यवन धरील कोठें ॥८९॥

अद्‌भुत हरीचा वेग होये ॥ तों काळयवन मागें राहे ॥ मागुती हरि त्याची वाट पाहे ॥ जवळी यावा म्हणोनि ॥१९०॥

कंठींच्या तुलसी आणि सुमनहार ॥ वाटेसी टाकीत जात श्रीधर ॥ तोचि माग पाहूनि असुर ॥ धांवे थोर वेगेंसीं ॥९१॥

पुढें पराशरपर्वत ॥ त्यावरी चढे रमानाथ ॥ तेथें व्यासपिता अनुष्ठान करीत ॥ जगन्नाथ वंदी तया ॥९२॥

त्या पर्वतीं न दिसे कृष्ण ॥ तों उष्णकाळ शुष्क विपिन ॥ यवनें भोंवता लाविला अग्न ॥ ऋषिजन तेणें आहाळती ॥९३॥

ऐसें श्रीकृष्णें जाणोनी ॥ पर्वत दडपिला बळेंकरुनी ॥ उदक वरी आलें उसळोनी ॥ विझविला अग्नि क्षणमात्रें ॥९४॥

तेथूनि मग पश्चिमपंथें ॥ धांव घेतली कृष्णनाथें ॥ मार्ग दावूनि यवनातें ॥ पुढें पुढें जात असे ॥९५॥

तों तेथें पर्वताचे दरीं ॥ महाभयानक विवरीं ॥ तेथें मुचुकुंदें बहुकाळवरी ॥ निद्रा केली श्रमोनियां ॥९६॥

सूर्यवंशी राजा मांधात ॥ हा मुचुकुंदनामें तयाचा सुत ॥ तेणें स्वर्ग रक्षूनि समस्त ॥ देव सुखी राखिले ॥९७॥

दैत्यांशीं युद्ध अद्‌भुत ॥ केलें बहुकाळपर्यंत ॥ पुढें स्कंद झाला शिवसुत ॥ तेणें स्वर्गा रक्षिलें ॥९८॥

मुचुकुंद बहुत श्रमला ॥ मग शचीवर प्रसन्न झाला ॥ म्हणे वर मागें वहिला ॥ अपेक्षित असेल जो ॥९९॥

येरु म्हणे श्रमलों प्रबल ॥ निद्रा करीन बहुकाळ ॥ जो माझी निद्रासमाधि मोडील ॥ तो भस्म होवों तेथेंचि ॥२००॥

माझे निद्रांतीं जगज्जीवन ॥ भेटो अकस्मात येऊन ॥ तथास्तु म्हणे सहस्त्रनयन ॥ मग विवरीं जाऊनि निजला पैं ॥१॥

यालागीं त्याचि विवरांत ॥ प्रवेशला वैकुंठनाथ ॥ तें दुरुनि काळयवन देखत ॥ म्हणे बरा तेथें सांपडला ॥२॥

हरि विवरांत पुढें गेला ॥ तों मुचुकुंद बहुकाळ निजला ॥ आपुला पीतांबर काढिला ॥ मग झांकिला तयावरी ॥३॥

आपण पुढें जाऊन ॥ गुप्त पाहे जगज्जीवन ॥ तों विवरांत प्रवेशला कालयवन ॥ विलोकून पाहतसे ॥४॥

तों देखिला दिव्य पीतांबर ॥ म्हणे येथेंचि निजला यादवेंद्र ॥ म्हणोनि सबळ लत्ताप्रहार ॥ हाणिता जाहला दुरात्मा ॥५॥

मुचुकुंद उठिला खडबडोन ॥ क्रोधें पाहे विलोकून ॥ तात्काळ तेथेंचि काळयवन ॥ भस्म जाहला क्षणमात्रें ॥६॥

सूत्रधारी नारायण ॥ ऐसा मारविला काळयवन ॥ मुचुकुंद पाहे सावधान ॥ तों पीतवसन देखिलें ॥७॥

तो सुवास न माये अंबरीं ॥ मुचुकुंद सद्गदित अंतरीं ॥ परतोनि पाहे तों मधुकैटभारीं ॥ चतुर्भुज उभा असे ॥८॥

उदारवदन मनोहर ॥ कर्णीं कुंडलें मकराकार ॥ दिव्य मुकुट प्रभाकर ॥ तेजें विवर उजळिलें ॥९॥

कौस्तुभ हृदयीं झळकत ॥ वैजयंती आपाद डोलत ॥ चतुर्भुज वैकुंठनाथ ॥ पाहतां मन निवालें ॥२१०॥

ऐसा मुचुकंदें हरि देखिला ॥ साष्टांग नमस्कार घातला ॥ म्हणे पुराणपुरुषा भक्तवत्सला ॥ तूं परब्रह्म केवळ भाससी ॥११॥

म्यां पूर्वीं बहुकाळवरी ॥ स्वर्गा रक्षिलें नानापरी ॥ श्रमोनियां विवराभीतरी ॥ निद्रा केली बहुकाळ ॥१२॥

तूं कोण मज सांगें निर्धार ॥ मग सुहास्यवदन यादवेंद्र ॥ म्हणे उतरावया भूमिभार ॥ कृष्णावतार आठवा ॥१३॥

मुचुकुंदें धरिले दृढ चरण ॥ दाटला अष्टभावेंकरुन ॥ म्हणे शचीवरें दिधलें वरदान ॥ तें सकळ आजि जाहलें ॥१४॥

धन्य धन्य आजिचा सुदिन ॥ देखिलें क्षीरसागरींचें निधान ॥ परमपावन जाहले नयन ॥ हरिवदन विलोकितां ॥१५॥

धन्य हें जाहलें शरीर ॥ कृष्णें पांघुरविला पीतांबर ॥ निरसोनि अज्ञान अंधकार ॥ सावध केलें मजलागीं ॥१६॥

बहुतकाळ तमभय यामिनी ॥ भ्रांतीं मी पडिलों ये स्थानीं ॥ श्रीकृष्ण उगवला वासरमणी ॥ सरली रजनी अज्ञान ॥१७॥

कीं वैद्यराज रमारंग ॥ कृपावलोकनें निरसोनि रोग ॥ सावध करुनि निजांग ॥ माझें मज दाविलें ॥१८॥

धन्य पंचाक्षरी यदुवीर ॥ मजवरी झांकूनि पीतांबर ॥ निद्राभूत हें अपस्मार ॥ केलें दूर क्षणार्धें ॥१९॥

जय जय यदुकुळटिळका ॥ कामांतकध्येया भक्तपाळका ॥ अनंतब्रह्मांडचित्तचालका ॥ कंसातका श्रीकृष्णा ॥२२०॥

गोपीमानसराजहंसा ॥ दारुणदुरितविपिनहुताशा ॥ गोवर्धनोद्धारना बाळवेषा ॥ शकटांतका श्रीहरे ॥२१॥

कमलशयना कमलालया ॥ कमलनेत्रा कमलप्रिया ॥ कमलभूषणा कमलोद्भवाआर्या ॥ प्रतापसूर्या श्रीरंगा ॥२२॥

हे कृष्ण वृंदावनविहारा ॥ पुराणपुरुषा निर्विकारा ॥ गोपीमनवसनगोरसचोरा ॥ गोरक्षका गोविंदा ॥२३॥

हरि तुझिया स्वरुपावरुन ॥ कोटयनुकोटी मीनकेतन ॥ सांडावे निंबलोण करुन ॥ मज धन्य आजि केलें ॥२४॥

ऐकोनि मुचुकुंदस्तवन ॥ संतोषला जगन्मोहन ॥ वचन बोले प्रीतीकरुन ॥ सुहास्यवदन जगदात्मा ॥२५॥

तूं बदरिकाश्रमीं राहें जाऊन ॥ तेथें असे सत्यवतीहृदयरत्‍न ॥ आणीकही विद्वज्जन ॥ तये स्थानी वसताती ॥२६॥

संतसमागविण ॥ कदा नव्हे निर्वाणज्ञान ॥ तेथें करितां सारासार श्रवण ॥ मन उन्मन होय तुझें ॥२७॥

मृगया करुं नको येथूनी ॥ तूं होसील निर्वाणज्ञानी ॥ माझी भक्ति दिनयामिनी ॥ विसंबूं नको सर्वथा ॥२८॥

माझिया वेदाची आज्ञा प्रमाण ॥ वर्तावें सदा शिरीं वंदून ॥ सखे करावे संतजन ॥ गुरुसी शरण रिघावें ॥२९॥

हृदयीं धरिंजे दृढ बोध ॥ न करावा भूतांचा विरोध ॥ माझीं चरित्रें तीर्थमहिमा विशद ॥ कदा उच्छेद न करावा ॥२३०॥

न करावें कोणाचें हेळण ॥ वादविवाद द्यावा सोडून ॥ सदा कीर्तन श्रवण मनन ॥ निजध्यासीं राहिंजे ॥३१॥

लोकांविरुद्ध न करावें कर्म ॥ न आचरिंजे कदा परधर्म ॥ न बोलावें कोणाचें वर्म ॥ सदा मम नाम स्मरावें ॥३२॥

प्रवृत्तिशास्त्रें नाना कुमतें ॥ क्षुद्रसाधनें क्षुद्रदैवतें ॥ नाना अनुष्ठानें नाना मतें ॥ उपेक्षावीं मनींहूनि ॥३३॥

ऋषींचे आशीर्वाद घ्यावे ॥ अनुचित कदा न बोलावें ॥ आत्मरुप विश्व पहावें ॥ शिरीं वंदावे गुरुचरण ॥३४॥

ऐसें सांगतां भगवंत ॥ सादर ऐके मांधातृसुत ॥ साष्टांग घातलें दंडवत ॥ सद्गदित होय तेधवां॥३५॥

आज्ञा घेऊनि ते वेळां ॥ विवराबाहेर निघाला ॥ तों द्वापाराचा अंत ते वेळां ॥ कलि जवळीं पुढें दिसे ॥३६॥

खुजीं झाडें खुजे लोक ॥ पापचर्या दिसे अधिक ॥ लोक देखिले परमनिंदक ॥ मुचुकुंदभक्तें तेधवां ॥३७॥

न बोलेचि कोणासीं ॥ पावला वेगें बदरिकाश्रमासी ॥ संतसमागम अहर्निशीं ॥ मुचुकुंदासी जाहला ॥३८॥

असो इकडे विवराबाहेर ॥ निघाला वेगें यादवेंद्र ॥ तों द्वारकेहूनि आला बळिभद्र ॥ समाचाराकारणें ॥३९॥

तो जरासंध वैद्यपाळ ॥ सवें काळयवनाचें म्लेंच्छदळ ॥ पाठीलागीं आलें तत्काळ ॥ तों रामघननीळ देखिले ॥२४०॥

म्हणती काय जाहला काळयवन ॥ तो विवरीं गेला भस्म होवोन ॥ मग क्रोधावले अवघे जन ॥ म्हणती धरुन नेऊं दोघांतें ॥४१॥
तें देखोनि शेषनारायण ॥ पुढें चालिले दोघेजण ॥ गोमंताचलावरी रामकृष्ण ॥ चढते जाहले तेधवां ॥४२॥

एकादश योजनें उंच पर्वत ॥ त्यावरी जाहले दोघे गुप्त ॥ तों जरासंधादि समस्त ॥ वेढा घालिती पर्वता ॥४३॥

कृष्णद्वेषी परमदुर्जन ॥ अग्नि लाविला चहूंकडून ॥ अग्निशिखा भेदीत गगन ॥ धूम्रें दाटल्या दशदिशा ॥४४॥

पक्षियांचे पाळे पळती ॥ एक माजी आहाळूनि पडती ॥ नाना जीवजाती आरडती ॥ आकांत थोर ओढवला ॥४५॥

तों वैकुंठींहूनि सुपर्ण ॥ आला हरिइच्छेनें धांवोन ॥ केलें श्रीकृष्णासी नमन ॥ हात जोडोन उभा ठाके ॥४६॥

मग गरुडावरी दोघेजण ॥ बैसले शेष आणि नारायण ॥ आकाशपंथें उड्डाण करुन ॥ चालिले देखती सर्वही ॥४७॥

हरिवंशीं कथा आन ॥ भीमक आला रथ घेऊन ॥ त्या रथावरी रामकृष्ण ॥ करवीरापासोन बैसले ॥४८॥

असो मथुरेकडे रामकृष्ण ॥ वेगें चालिले दोघेजण ॥ दारुक आला रथ घेऊन ॥ द्वारकेहून तेधवां ॥४९॥

त्या रथीं बैसोनि रामहृषीकेशी ॥ वेगें चालिले मथुरेसी ॥ तों जरासंध पाठीशीं ॥ चमूसहित पातला ॥२५०॥
ऐसें देखोनि नारायण ॥ हातीं घेतलें सुदर्शन ॥ जें सकळ शस्त्रांचा बाप पूर्ण ॥ आज्ञा प्रमाण करावी ॥५१॥

जैसा लक्ष विजांचा एकचि भार ॥ तैसें सुदर्शन आलें दुर्धर ॥ मग पळती महावीर ॥ जरासंध चैद्यादि ॥५२॥

काळयवनाचें दळ ॥ जरासंधाचेंही सकळ ॥ सुदर्शनें संहारिलें तत्काळ ॥ क्षणमात्र न लागतां ॥५३॥

मुख्य मुख्य राजे उरले ॥ वरकड दळ संहारिलें ॥ मग मथुरेंत रामकृष्ण प्रवेशले ॥ द्रव्य काढिलें उग्रसेनाचें ॥५४॥

भूमींत होतें जें भांडार ॥ तेणें भरिले रथगजरहंवर ॥ द्वारकेसी चालविले समग्र ॥ रामकृष्णें तेधवां ॥५५॥

मागुती जरासंध धांविन्नला ॥ म्हणे द्रव्य सांडीं सांडीं गोवळ्या ॥ द्रव्य घेऊनि राम द्वारके गेला ॥ कृष्णें मुरडिला रथ तेव्हां ॥५६॥

मागुती धनुष्य घेऊनी ॥ युद्ध करीत चक्रपाणी ॥ जरासंध पराभवोनी ॥ मग गेले द्वारकेसी ॥५७॥

धनुष्य घेऊनि मुकुंदें ॥ केली अष्टादश महायुद्धें ॥ सत्रा वेळ मथुरेपुढें जगद्वंद्यें ॥ युद्ध केलें निर्वाण ॥५८॥

असो द्वारकेसी आला यादवेंद्र ॥ जाहला एकचि जयजयकार ॥ तो सोहळा अपार ॥ न वर्णवेचि सर्वथा ॥५९॥

तों आनर्तदेशाधिपती ॥ रवैत नामें महानृपति ॥ तो जाऊनि ब्रह्मयाप्रति ॥ करी विनंति ते ऐका ॥२६०॥

म्हणे माझी कन्या रेवती ॥ परमसुंदर त्रिजगतीं ॥ तीस वर बरवा निश्चितीं ॥ कोण असे सांग पां ॥६१॥

ब्रह्मा करी अनुष्ठान ॥ राजा उभा कर जोडून ॥ मग कमलासन बोले वचन ॥ बळिरामासी देईं कन्या ॥६२॥

मग आपण येऊनि चतुरानन ॥ जेथें राम कृष्ण उग्रसेन ॥ गेला दळभारेंसीं घेऊन ॥ आनर्तदेशाप्रती पैं ॥६३॥

विधिपूर्वक अतिप्रीतीं ॥ बळिरामासी दिधली रेवती ॥ चारी दिवस निश्चिती ॥ सोहळा जाहला संपूर्ण ॥६४॥

मग अपार आंदण देऊन ॥ बोळाविले रामकृष्ण ॥ समागमें रेवती घेऊन ॥ द्वारकापुरीं प्रवेशले ॥६५॥

पुढें रुक्मिणीस्वयंवरकथा ॥ सुरस असे परम तत्त्वतां ॥ जे उणें आणील अमृता ॥ ऐकिजे श्रोतीं सादर ॥६६॥

हरिवंशीं भागवतीं पाहीं ॥ त्याचि कथा हरिविजयीं ॥ आणि या ग्रंथाचा कर्ता सर्वही ॥ पंढरीनाथ जाणिजे ॥६७॥

तोचि पाठीशीं उभा राहोनी ॥ गोष्टी सांगे ज्या ज्या कानीं ॥ तैशा म्यां लिहिल्या संतजनीं ॥ जाणिजे हें तत्त्वतां ॥६८॥

हा हरिविजय वरद ग्रंथ ॥ करवी आपण पंढरीनाथ ॥ ये‍र्‍हवी श्रीधर मतिमंद बहुत ॥ लोक सर्व जाणती ॥६९॥

नाहीं वाचिले संस्कृत ॥ विभक्तिज्ञान नाहीं कळत ॥ मूढाहातीं हा ग्रंथ ॥ पंढरीनाथें करविला ॥२७०॥

जन म्हणती अद्‌भुत वक्ता ॥ परी नेणती त्या हृदयस्था ॥ अस्थींची मोळी शरीर पाहतां ॥ त्यासी श्रीधर नाम ठेविलें ॥७१॥

कैंचा कोणाचा श्रीधर ॥ सूत्रधारी रुक्मिणीवर ॥ तो हालवी जैसें सूत्र ॥ तैसींच नाचती चित्रें पैं ॥७२॥

वाजविता न पडोनि ठावा ॥ म्हणती काय गोड वाजे पांवा ॥ परी वाजविणार बरवा ॥ लोक त्यातें नेणती ॥७३॥

पांवयाचे काष्ठासी छिद्र ॥ तैसें देहासी नाम ठेवूनि श्रीधर ॥ परी वाजविणार रुक्मिणीवर ॥ भीमातीरविहारी जो ॥७४॥

ब्रह्मानंदा पुराणपुरुषा ॥ श्रीमद्भीमातटविलासा ॥ श्रीधरवरदायका परेशा ॥ पुढें ग्रंथ चालविंजे ॥७५॥

इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ सदा परिसोत भाविक भक्त ॥ द्वाविंशतितमाध्याय गोड हा ॥२७६॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥अध्याय॥२२॥ओंव्या॥२७६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel