जडीबुटीवाल्याजवळ एक गोळी असते . ज्याच्या अंगात विष भिनले आहे अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी नुसती ठेवतात . ती सर्व विष शोषून घेते . नंतर तिला धुतली की ती पूर्ववत होते . त्याचप्रमाणे सत्पुरुषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते , आणि पुन : तो सत्पुरुष स्वत : शुध्दच राहतो . सत्संगती मिळेल , पण ती टिकणे फार कठीण काम आहे . साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण बघतो . मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो . विषयात दोष नाही ; म्हणजेच , नुसते विषय बाधक होत नाहीत , विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते . संगतीने आपल्यावर बरावाईट परिणाम होतो . विषय मागूनही जो ते देत नाही , त्यांपासून परावृत्त करतो , तो संत . विषयतृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे , हा संतसंगतीचा परिणाम . ज्याची संगत केली असताना भगवत्प्रेम प्रकट होते तो संत जाणावा . अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी . विषयाची गोडी फार ; पण तो सुटावा असे वाटू लागले म्हणजे भजनपूजन करणार्‍याची संगत धरावी . वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी . आपला सर्वाठायी भगवदभाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचीती येते . भगवंताच्या लीला पाहणार्‍यांनाच खरा आनंद मिळतो . म्हणून संत नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात . ते जे गातील तो संगीतातला रागच समजावा . तुकारामबुवा नुसते ‘ विठ्ठल विठ्ठल ’ म्हणत , पण त्याची गोडी आपल्या गाण्यामध्ये देखील नाही .

खरोखर संतांना आपल्याविषयी इतकी कळकळ असते , आपल्याला ती कळतही नाही . संत आपल्या हिताचे सांगतात , पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही . औषध कडू असले तरी रोग झाल्यावर आपण ते घेतोच ना ? मग प्रपंचातल्या व्याधींनी त्रस्त होऊनही आपण संतांच्या हितकारक बोलण्याकडे का दुर्लक्ष करावे ? ज्याला भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणेसुध्दा कुणाला लागणार नाही . अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे , कारण ‘ सर्व ठिकाणी मीच आहे ’ ही भावना झाल्यावर भयाचे कारण उरत नाही . आईपण जसे सगळीकडे सारखे , त्याचप्रमाणे सर्व संत एकच भाषा बोलतात . संतांनी मिळविलेले पद मिळविण्याचे साधन आपणही करतो ; पण त्यांचे करणे नि :संशय असते , तर उलट आपण नेहमी शंकाच व्यक्त करीत असतो . डोळ्यांत खुपणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात ; त्याने न खुपता खडा बाहेर पडतो आणि डोळा थंड होतो . त्याचप्रमाणे संतांची वाणी गोड , मऊ , हितकारक असते ; तसे आपण बोलावे .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ब्रह्मचैतन्य महाराज - एप्रिल मास


ब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास
दासबोध
ब्रह्मचैतन्य महाराज - जून मास
ब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - नोव्हेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - ऑगस्ट मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जुलै मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मे मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मार्च मास
ब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास
आत्माराम
हरिपाठ
ज्ञानेश्वरी Dnyaneshwari