भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करुन समजणार नाही . जिथे दुःखच नाही तिथे आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार ? अनन्य भक्त व्हावे आणि तो आनंद पहावा . भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहोत असे दिसते ; म्हणजे सर्व चराचर वस्तू तो भगवद्रूपच पहात असतो . एखाद्या खोलीत सर्व बाजूंनी आरसे ठेवलेले असले , तर कुठेही पाहिले तर आपल्याला काय दिसेल ? आपल्या स्वतःशिवाय दुसरे काहीच दिसणार नाही . म्हणजे , सर्व ठिकाणी एकभाव झाला तिथे दुःखाचे कारणच नाही . तिथे सर्वच आनंद असतो . त्याप्रमाणे , भक्त भगवंताशी एकरुप झाला तिथे आनंदाशिवाय दुसरे काय असणार ? जे याप्रमाणे जगात वावरतात , ते आपल्या आनंदात राहूनही इतर लोकांप्रमाणे वागत असतात . तुकारामांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखविला . समर्थांनीही ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेले . आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही . म्हणून , ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच रहातात , त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे ; म्हणजेच गुरुआज्ञेप्रमाणे वागावे . आपल्याला वाटाड्या भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो , त्याप्रमाणे गुरुंच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे म्हणजे आपले हित होते .

एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्ले , तर ते खारट लागल्यावाचून रहाणार नाही . त्याप्रमाणे , आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयाची संगत धरली , पण त्यापासून दुःखच प्राप्त झाले . पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्याने पुष्कळ सुख मिळते असे मानणे हा भ्रम आहे . खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे , सनातन सुख होय . ते सनातन वस्तूपाशीच , म्हणजे भगवंतापाशीच असते . भगवंताचे आपण झाल्यास सुखी होऊ . तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते , तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते . आपण प्रपंच दुसर्‍याचाच करतो , आपला करीतच नाही . एखाद्या शेतापेक्षा कुंपणालाच जास्त खर्च यावा , त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरुपापेक्षा आपल्या उपाधींचीच जास्त आरास करतो . आपण सर्व मिळवतो , पण सर्व ठेवून जावे लागते . आपल्या फायद्याचे केले तरच आपला प्रपंच ; भगवंताचे स्मरण तेवढाच आपला प्रपंच . आपण आईबापांवर , नवराबायकोवर , मुलांवर , नातेवाइकांवर , शेजार्‍यापाजार्‍यांवर सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुखी होणार नाही . आपले दुःख किंवा यातना जर कोणी नाहीशा करीत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ब्रह्मचैतन्य महाराज - ऑगस्ट मास


ब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास
दासबोध
ब्रह्मचैतन्य महाराज - जून मास
ब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - नोव्हेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जुलै मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मे मास
ब्रह्मचैतन्य महाराज - एप्रिल मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मार्च मास
ब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास
आत्माराम
हरिपाठ
ज्ञानेश्वरी Dnyaneshwari