काट्याच्या अणीवर वसली तीन गावें ।
दोन ओसाड एक वसेचिना ॥१॥

वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।
दोन थोटे एका घडेचिना ॥२॥

घडेचिना त्याने घडली तीन मडकी ।
दोन कच्ची एक भाजेचिना ॥३॥

भाजेचिना त्यांत रांधले तीन मुग ।
दोन हिरवे एक शिजेचिना ॥४॥

शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे ।
दोन रुसले एक जेवेचिना ॥५॥

जेवेचिना त्याला दिल्या तीन म्हशी ।
दोन वांझ्या एक फळेचिना ॥६॥

फळेचिना तिला झाले तीन टोणगे ।
दोन मेले एक जगेचिना ॥७॥

जगेचिना त्याचे आले तीन रुपये ।
दोन खोटे एक चालेचिना ॥८॥

चालेचिना तिथे आले तीन पारखी ।
दोन आंधळे एका दिसेचिना ॥९॥

दिसेचिना त्याला मारल्या तीन बुक्क्या ।
दोन हुकल्या एक लागेचिना ॥१०॥

ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।
सद्गुरूवाचुनि कळेचिना ॥११॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel