ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ‍ ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥११॥

भजती जे जैसे । पार्था माझ्याठायीं । तयां भजें मी हि । तैसा चि गा ॥११५॥

माझिया ठायीं च । मनुष्यमात्राची । वृत्ति भजनाची । स्वाभाविक ॥११६॥

परी नाहीं ज्ञान । म्हणोनि नाशले । तेणें चि पावले । बुद्धिभेद ॥११७॥

मग मी जो एक । साच धनंजया । तेथें कल्पोनियां । अनेकत्व ॥११८॥

देखती ते भेद । अभेदाचे ठायीं । नाम देती पाहीं । अनाम्यासी ॥११९॥

देव देवी ऐसें । म्हणोनियां मातें । देखें अचर्चातें । चर्चिती ते ॥१२०॥

असतां सर्वत्र । सारिखा अखंड । उच्चनीच भेद । पाहती ते ॥१२१॥

भ्रांत -बुद्धीचिया । होवोनि आधीन । ऐशापरी जाण । बोलती ते ॥१२२॥

काङ्‌क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥१२॥

मग नाना हेतु । धरोनियां मनीं । विधिविधानांनी । नानाविध ॥१२३॥

यथोचित त्यांची । करिती अर्चना । मानोनियां नाना । देवतांते ॥१२४॥

आणिक सर्वथा । जें जें अपेक्षित । तें तें चि समस्त । पावती ते ॥१२५॥

परी तें केवळ । कर्मफळ जाण । निश्चयेंकरोन । धनुर्धरा ॥१२६॥

पाहूं जातां साच । दुजें देतें घेतें । नसे कोणी येथें । कर्मावीण ॥१२७॥

देख ज्याचें त्याचें । कर्म चि निभ्रांत । फळा येई येथ । मृत्युलोकीं ॥१२८॥

पेरावें जें तें चि । अंकुरे क्षेत्रांत । दिसे दर्पणांत । पहावें तें ॥१२९॥

गिरिकंदरांत । आपुली च वाणी । उठे प्रतिध्वनि -। रुपें जैसी ॥१३०॥

तैसा उपासना - । मार्गी ह्या सकळ । असे मी केवळ । साक्षीभूत ॥१३१॥

येथें ज्याची जैसी । असेल भावना । तैसें तो अर्जुना । फळ पावे ॥१३२॥

चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।

तस्य कर्तारमपि मां विद्धयकर्तारमव्ययम् ‍ ॥१३॥

पार्था गुणकर्म -। विभागानुसार । सृजिले मीं चार । वर्ण ऐसे ॥१३३॥

विविध प्रकृती । भिन्न भिन्न गुण । ध्यानीं ते आणून । धनुर्धरा ॥१३४॥

चार हि वर्णाच्या । धर्माची व्यवस्था । स्वभावें सर्वथा । केली मीं च ॥१३५॥

मानव तेथोनि । सर्व हि ते एक । चतुर्वर्णात्मक । परी झाले ॥१३६॥

ऐशा रीती गुण -। कर्माचा विचार । केला मीं साचार । सहजें चि ॥१३७॥

वर्णभेदाची ही । व्यवस्था ऐसी च । म्हणोनि मी साच । नव्हें कर्ता ॥१३८॥

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।

इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥१४॥

माझिया सत्तेनें । जाहलें हें पार्था । परी मीं सर्वथा । नाहीं केलें ॥१३९॥

माझें अकर्तृत्व । जाणिलें हें ज्यानें । कर्माचीं बंधनें । नाहीं त्याला ॥१४०॥

एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः ।
कुरु कर्मैव तस्माच्चं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ‍ ॥१५॥

पार्था पूर्वकाळी । मातें मुमुक्षूंनीं । ऐसा ओळखोनि । केलीं कर्मे ॥१४१॥

भाजलेलीं बीजें । पेरिलीं भूमींत । नाहीं जैसीं येत । अंकुरत्वा ॥१४२॥

तैसीं कर्मे तीं च । परि होती जाण । मोक्षासि कारण । सर्वथैव ॥१४३॥

पार्था कर्माकर्म -। विवेक हा येथें । नाकळे बुद्धीतें । ज्ञात्याच्या हि ॥१४४॥

किं कर्म किमकर्मेति कवयो‍प्यत्र मोहिताः ।

तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ‍ ॥१६॥

कर्म ऐसी संज्ञा । कवणातें जाण । किंवा काय खूण । अकर्माची ॥१४५॥

धनंजया ह्याचा । पाहतां विचार । ज्ञाते हि साचार । घोंटाळती ॥१४६॥

जैसें खोटें नाणें । जणूं खरें वाटे । घाली संदेहीं तें । दृष्टिलागीं ॥१४७॥

मनाच्या संकल्पें । दुजी सृष्टि जाण। कराया निर्माण । समर्थ जे ॥१४८॥

कर्मांसी नैष्कर्म्य । मानोनियां भ्रमें । बद्ध होती कर्मे । ते हि तैसे ॥१४९॥

सर्वज्ञ जे द्रष्टे । ते हि होती मूढ । नेणत्याचा पाड । काय तेथें ॥१५०॥

कर्म -अकर्माचा । म्हणोनि विवेक । सांगतसें ऐक । तो चि आतां ॥१५१॥

कर्मणो ह्यापि बोद्धव्यं च विकर्मणः ।

अकर्मणश्व बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥१७॥

स्वभावतां जेणें । आकारतें विश्व । तयातें चि नांव । ‘कर्म ’ ऐसें ॥१५२॥

पार्था कर्माचें त्या । यथार्थत्वें ज्ञान । व्हावें लागे जाण । आधीं येथें ॥१५३॥

मग वर्णाश्रम -। धर्मासी उचित । कर्म जें विहित । विशेषत्वें ॥१५४॥

विकर्म ’ तें पार्था । जाणावें निश्चित । सर्वथा साद्यन्त । फलासह ॥१५५॥

निषिद्ध ’ जें कर्म । तें हि येथें मग । ओळखावें चांग । धनुर्धरा ॥१५६॥

कर्माकर्माचें हें । जाणतां स्वरुप । जीव आपोआप । बंधमुक्त ॥१५७॥
नाहीं तरी सारें । विश्व कर्माधीन । ऐसी चि गहन । व्याप्ति ह्याची ॥१५८॥

परी असो आतां । देई अवधान । सांगेन लक्षण । मुक्ताचें त्या ॥१५९॥

कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः ।

स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत ॥१८॥

साक्षित्वें सकळ । कर्मी वावरतां । देखे नैष्कर्म्यता । आपुली जो ॥१६०॥

आचरितां कर्म । नसे फलासक्ति । जयाचिया चित्तीं । लेशमात्र ॥१६१॥

आत्मरुप जग । म्हणोनियां पाहीं । कर्तव्य तें कांहीं । नुरे जया ॥१६२॥

नैष्कर्म्यावस्थेचा । ऐशापरी चांग । बोध झाला साङ्‍ग । जयालागीं ॥१६३॥

तरी हि जो कर्मे । आचरे सकळ । होवोनि केवळ । साक्षीभूत ॥१६४॥

धनंजया ऐशा । लक्षणांनी युक्त । तो चि जाण मुक्त । सर्वथैव ॥१६५॥

जैसा जळापाशीं । जो का उभा ठाके । जळीं जरी देखे । आपणासी ॥१६६॥

तरी तो निभ्रांत । ओळखे आपण । आहों जळाहून । वेगळे चि ॥१६७॥

किंवा जळीं नाव । चालतां वेगांत । बैसोनियां तींत । जाय जो का ॥१६८॥

थडियेचे वृक्ष । धांव घेती ऐसें । तयालागीं दिसे । तेथोनियां ॥१६९॥

परी वस्तुस्थिति । पाहतां सकळ । वृक्ष ते अचळ । ऐसें म्हणे ॥१७०॥

तैसेम सर्व कर्मी । वर्ततां निःशंक । मानोनि तें देख । भासात्मक ॥१७१॥

मग आत्मरुप । ओळखे आपण । नैष्कर्म्यची खूण । जाणे ऐसी ॥१७२॥

न चालतां जैसें । सूर्याचें चालणें । उदयास्त होणें । दिसे येथें ॥१७३॥

तैसा आपणातें । जाणे कर्मातीत । सर्व हि कर्मात । वावरतां ॥१७४॥

जैसें भानु -बिंब । बुडे ना जळांत । तैसा उपाधींत । सांपडे ना ॥१७५॥

मानवाचें रुप । जरी दिसे त्याचें । तरी जाण साचें । ब्रह्म चि तो ॥१७६॥

न पाहतां त्यानें । देखिलें हें विश्व । न करितां सर्व । केलें त्यानें ॥१७७॥

न भोगितां सर्व । भोगिले गा भोग । ऐसा तो सर्वाङ‌ग -। परिपूर्ण ॥१७८॥

‘ एकदेशी तरी । सर्वत्र तो गेला । असो विश्व झाला । स्वयें चि तो ॥१७९॥

यस्य सर्वे समारम्भाः कामसंकल्पवर्जिताः ।
ज्ञानाग्रिदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥१९॥

ज्याच्या ठायीं नाहीं । कर्माचा विषाद । तरी फलास्वाद । नसे चित्तीं ॥१८०॥

पार्था आणिक हें । कर्म मी करीन । किंवा संपवीन । आरंभिलें ॥१८१॥

येणें संकल्पें हि । जयाचें गा मन । विटाळे ना जाण । लेशमात्र ॥१८२॥

सर्व हि कर्माची । जेणें ऐशा रीती । टाकिली आहुती । ज्ञानाग्नींत ॥१८३॥

मानवाच्या रुपें । आकारलें जाण । तें चि पार्था पूर्ण । परब्रह्म ॥१८४॥

त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः ।

कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः ॥२०॥

देखें सर्वथैव । देहीं जो उदास । फळभोगीं आस । नाहीं ज्यासी ॥१८५॥

अखंड उल्हासें । जो का रात्रंदिन । जाहला तल्लीन । आत्मानंदी ॥१८६॥

संतोषाच्या घरीं । स्वबोध -पक्कान्नें । जेवितां न म्हणे । पुरे ऐसें ॥१८७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to अभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ४ था