अर्जुन उवाच ---

इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः ॥५१॥

ह्या परी तें सर्व । पूर्वीं होतें । पार्थ देखतसे । वीर - श्रेष्ठ ॥१३२८॥

मग म्हणे आतां । वांचलों श्री - पति । देखोनि मागुतीं । तुझें रूप ॥१३२९॥

प्रभो माझें ज्ञान । बुद्धीतें सांडोनि । भयें होतें रानीं । प्रवेशलें ॥१३३०॥

अहंकारासंगें । कैसें श्रीगोविंदा । मन परागंदा । झालें होतें ॥१३३१॥

झाले होते बंद । इंद्रिय - व्यापार । वाचा हि साचार । स्तब्ध होती ॥१३३२॥

दुर्दशा ही ऐसी । सर्व शरीराची । झाली होती साची । हृषीकेशा ॥१३३३॥

मन बुद्धि आणि । इंद्रियें हीं सर्व । मागुतीं सजीव । झालीं आतां ॥१३३४॥

लागलीं कराया । आपुले व्यापार । मूळ ठायावर । येवोनियां ॥१३३५॥

म्हणे देवा मज । जाहाल संतोष । रूप हें मानुष । देखोनियां ॥१३३६॥

बाळ मी अजाण । चुकलों सर्वथा । परी जणूं माता । होवोनि तूं ॥१३३७॥

मातें बुझावून । दिलें स्तन - पान । रूप हें दावून । चतुर्भुज ॥१३३८॥

लाटांवरी लाटा । होतों मी तोडीत । विश्वरूपाब्धींत । बाहु - बळें ॥१३३९॥

तों चि चतुर्भुज । रूपाचिया तीरीं लागलों श्रीहरी । तुझ्या कृपें ॥१३४०॥

सुखाचिया वृक्षीं । जणूं मेघ - वृष्टि । तैसी तुझी भेटी । द्वारकेशा ॥१३४१॥

किंवा तृषार्तासी । क्षीराब्धीची प्राप्ति । तैसा तूं श्री - पति । भेटलासी ॥१३४२॥

वांचलों मी साच । ऐसा भरंवसा । आला ह्रषीकेशा । आतां मज ॥१३४३॥

आनंद - वेलींची । होतसे लावणे । ह्र्दय - रंगणीं । वासुदेवा ॥१३४४॥

माझिया जीवासी । सर्व सौख्य - कंद । ऐसा तूं गोविंद । भेटलासी ॥१३४५॥

श्रीभगवानुवाच ---

सुदुर्दर्शमिदं रूपं द्दष्टवानसि यन्मम ।

देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ् ‍ क्षिणः ॥५२॥

भक्त अर्जुनाचे । ऐकोनि हे बोल । देव श्रोगोपाळ । काय बोले ॥१३४६॥

म्हणे पार्था प्रेम । ठेवावें साचार । नित्य निरंतर । विश्वर - रूपीं ॥१३४७॥

मग सुखें घ्यावें । बाह्यसुख येथें । मज श्रीहरीतें । भेटोनियां ॥१३४८॥

ऐसी तुजलागीं । दिली शिकवण । काय विस्मरण । झालें त्याचें ॥१३४९॥

प्राप्त होतां मेरू । सुवर्णसंपन्न । मानावा तो सान । मूर्यपणें ॥१३५०॥

तैसी तुझ्या मना । आंधळ्या अर्जुना । झालीसे भावना । विपरीत ॥१३५१॥

तरी विश्वात्मक । विराट रूपडें । आम्ही तुजपुढें । दाविलें जें ॥१३५२॥

नव्हे च तें प्राप्त । शंभूस हि पार्था । तपें आचरितां । नानाविध ॥१३५३॥

आणि अष्टांगादि । साधनें करून । जरी योगीजन । श्रांत झाले ॥१३५४॥

तरी तयांतें हि । नाहीं ज्याची भेटी । दुर्लभ किरीटी । ऐसें जें का ॥१३५५॥

रूप तें विराट । तरी एक वेळ । देखावें केवळ । किंचिन्मात्र ॥१३५६॥

ऐशा चिंतनांत । देव हि सकळ । उत्कंठेनें काळ । घालविती ॥१३५७॥

लागली आकाशीं । चातकाची द्दष्टि । व्हावी मेघ - वृष्टि । म्हणोनियां ॥१३५८॥

तैसे उत्कंठित । सदा सुर - वर । पहाया हें थोर । विश्व - रूप ॥१३५९॥

परी स्वप्नीं हि ते । देखिती ना ज्यातें । सुखें प्रत्यक्ष तें । देखिलें तूं ॥१३६०॥

नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया ।

शक्य एवंविधो द्रष्टुं द्दष्टवानसि मां यथा ॥५३॥

पोहोंचे ना येथें । साधनांची धांव । वेद - शास्त्रें सर्व । मुरडलीं ॥१३६१॥

विश्व - रूपाचा हा । चालावया मार्ग । तपांचा हि लागा । नाहीं येथें ॥१३६२॥

यज्ञ - दानें तीं हि । झालीं असमर्थ । रूप हें यथार्थ । देखावया ॥१३६३॥

माझें विश्व - रूप । देखिलें तूं जैसें । आज अनायासें । धनंजया ॥१३६४॥

तैसें पार्था माझें । व्हावया दर्शन । एकलें साधन । भक्ति हें चि ॥१३६५॥

भक्या त्वनन्या शवय अहमेवंविधोऽर्जुन ।

ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥५४॥

परी तो चि कैसा । भक्तीचा प्रकार । सांगतों साचार । ऐक आतां ॥१३६६॥

भूतलावांचोन । जैसी अन्य गति । नेणे पार्था वृष्टि । पर्जन्याची ॥१३६७॥

किंवा गंगा जैसी । मेळवोनि जळें । मिळाली च मिळे । सागरातें ॥१३६८॥

तैसें सर्वभावें । भरोनि जें आलें । प्रेमें तुडुंबले । एकाएकीं ॥१३६९॥

भक्तांचें तें चित्त । मद्रूप होऊन । खेळे रात्रं - दिन । मजमाजीं ॥१३७०॥

सर्वत्र सारिखा । मी तों असें कैसा । क्षीराब्धि का जैसा । क्षीराचा चि ॥१३७१॥

तैसें त्याचें चित्त । काय सांगूं फार । देखे चराचर । मद्रूप चि ॥१३७२॥

मजपासोनियां । कीटकापर्यंत । एक भगवंत । दुजें नाहीं ॥१३७३॥

तत्क्षणीं मी विश्व - । रूप भगवंत । आकळें निभ्रांत । तयालागीं ॥१३७४॥

ऐसें होतां ज्ञान । मग आपोआप । माझें विश्वरूप । दिसे तया ॥१३७५॥

काष्ठामाजीं अग्नि । होतां चि निर्माण । मग काष्ठपण । हारपोनि ॥१३७६॥

काष्ठ चि तें जैसें । पार्था मृर्तिमंत । होवोनि रहात । अग्निरूप ॥१३७७॥

जोंवरी ना होय । सूर्याचा उदय । नभ तमोमय । तोंवरी च ॥१३७८॥

मग एकाएकीं । प्रकाशें संपूर्ण । जातसे भरून । सूर्योदयीं ॥१३७९॥

पार्था तैसा होतां । माझा साक्षात्कार । संपे येरझार । अहंतेची ॥१३८०॥

अहंतेची वारी । संपतां निर्धारीं । द्वैत जाय दूरी । एकाएकीं ॥१३८१॥

मग देव - भक्र । विश्वा हि सकट । स्वभावें निभ्रांत । मी चि एक ॥१३८२॥

ऐसा मजमाजीं । सामावोनि राहे । मी च होत आहे । एकत्वें तो ॥१३८३॥

मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः सङ्गवर्जितः ।

निर्वैरः सर्वभृतेषु यः स मामेति पाण्डव ॥५५॥

इति श्रीमद्भगवर्द्नातासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुअनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नाम

एकादशोऽध्यायः ॥११॥

मग तयाचीं तीं । कर्में होती साच । मज एकासी च । समर्पण ॥१३८४॥

जयालागीं जगीं । आवडें मी एक । नावडे आणिक । दुजें कांहीं ॥१३८५॥

इह - पर लोक - । सार्थक सकळ । जयासी केवळ । मी च आहें ॥१३८६॥

मी च धनंजया । जयालागीं जाण । असें प्रयोजन । जीवनाचें ॥१३८७॥

मग विसरला । सर्व भूतजात । मी च भगवंत । भूतीं देखे ॥१३८८॥

म्हणोनि स्वभावें । निर्वैर होऊन । सर्वत्र जाणून । मातें भजे ॥१३८९॥

ऐसा जो का भक्त । तयाचें शरीर । लोपतां साचार । मद्रूप तो ॥१३९०॥

विश्व हें आघवें । उदरीं सामावे । म्हणोनि स्वभावें । दोंदील जो ॥१३९१॥

आणि कारूण्याचा । रसाळ सागर । देव तो श्रीधर । बोले ऐसें ॥१३९२॥

तें चि सांगितलें । तुज दैव - गुणें । संजय तो म्हणे । ऐक राया ॥१३९३॥

असो गोपाळाचे । बोल हे ऐकून । आनंद - संपन्न । झाला पार्थ ॥१३९४॥

श्रीहरि - चरण - । सेवनीं साचार । एक तो चतुर । जगामाजीं ॥१३९५॥

तेणें देवाचिया । दोन्ही हि त्या मूर्ती । न्याहाळिल्या चित्तीं । नीटपणें ॥१३९६॥

तंव अनावर । विश्वरूपाहून । मानिलें सगुण । कृष्णरूप ॥१३९७॥

परी देवासी तें । नाहीं आवडलें । कीं तें नव्हे भलें । एकदेशी ॥१३९८॥

व्यापक तें थोर । एकदेशी गौण । ठसाया ही खूण । कृष्णदेवें ॥१३९९॥

दिल्या दाखवून । एक दोन युक्त । ऐकोनि त्या चित्तीं । पार्थ म्हणे ॥१४००॥

दोन्ही रूपांमाजीं । कोणतें बरवें । तें आतां पुसावें । देवालागीं ॥१४०१॥

ऐसा निजान्तरीं । करोनि विचार । पुसेल साचार । कैशा रीती ॥१४०२॥

ती च कथा आतां । संत - श्रोते जन । ऐका सावधान । होवोनियं ॥१४०३॥

ज्ञानदेव म्हणे । निवृत्ति - प्रसादें । सांगेन विनोदें । ओंवीछंदें ॥१४०४॥

रम्य ओंवीरूप । फुलें हीं मोकळीं । भरोनि ओंजळीं । सद्‍भावाच्या ॥१४०५॥

विश्व - रूपाचिया । चरण - युगुलीं । मिय़ां समर्पिलीं । ज्ञानदेवें ॥१४०६॥

इति श्री स्वामी स्वरूपानंदविरचित अभंग - ज्ञानेश्वरी

एकादशोऽध्यायः ।

हरये नमः । हरये नमः । हरये नमः । श्रीकृष्णार्पणमस्तु ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to अभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ११ वा


आरंभ : डिसेंबर २०२०