" id="1"> 1 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
2 “यहुदा वंशातील उरी याचा मुलगा बसालेल याला मी निवडून घेतले आहे. (उरी हूर याचा मुलगा होता.)
3 देवाच्या आत्म्याने त्याला भरले आहे; आणि सर्व प्रकारची कामे करण्यासाठी मी त्याला कसब, बुद्धी व ज्ञान ही दिली आहेत. बसालेल आणि अहलियाब
4 बसालेल फार चांगला कसबी कारागीर आहे, तो सोने, चांदी व पितळ यांच्या कलाकुसरीच्या वस्तू तयार करील.
5 तो हिऱ्यांना सुंदर पैलू पाडील व हिरे जडवून देईल; तो लाकडावरील कोरीव कामही करील; आणि अशा सर्व प्रकारची कलाकूसरीची कामे करील.
6 त्याच्या बरोबर काम करण्याकरता दान याच्या वंशातील अहिसामाख याचा मुलगा अहलियाब यालाही मी निवडले आहे; बाकीच्या कारागिरांना मी कौशल्य दिले आहे त्यामुळे ते सर्व मिळून मी तुला सांगितलेली सर्व कामे बरोबर करतील.
7 दर्शनमंडप आज्ञापटाचा कोश, त्यावरील दयासन आणि तंबूचे सर्व सामान;
8 मेज व त्यावरील सर्व समान, शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष व त्याची उपकरणे;
9 होमवेदी व तिची उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक;
10 अहरोन व त्याच्या मुलांनी याजक या नात्याने माझी सेवा करताना घालावयाची, विणिलेली तलम व पवित्र वस्त्रे;
11 अभिषेकाचे सुवासिक तेल आणि पवित्र स्थानी जाळावयाचा सुंगधी द्रव्याचा धूप. ह्या सर्व वस्तू मी तुला सांगितल्याप्रमाणे हे कारागिर तयार करतील.”
12 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,
13 “इस्राएल लोकांना हे सांग की विश्रांतीच्या पवित्र दिवसासंबंधी मी सांगितलेले नियम तुम्ही अवश्य पाळावेत, ते या करता की त्यावरून ते पिढ्यान्पिढ्या तुमच्या माझ्यामध्ये खून म्हणून राहतील आणि त्यामुळे मी जो परमेश्वर त्या मी तुम्हाला माझे पवित्र लोक केले आहे हे तुम्हाला कळेल;
14 “म्हणून शब्बाथ दिवस तुम्ही पवित्रपणे पाळावा; शब्बाथ दिवसाला जर कोणी इतर दिवसासारखा लेखून तो भ्रष्ट करील तर त्याला अवश्य जिवे मारावे; जो कोणी शब्बाथ दिवशी काम करील, त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.
15 काम करण्याकरता आठवड्याचे इतर सहा दिवस आहेत; परंतु सातवा दिवस विसावा घेण्यासाठी पवित्र दिवस आहे हा परमेश्वराला मान देण्याचा पवित्र दिवस आहे; जर कोणी शब्बाथ दिवशी काम करील तर त्याला अवश्य ठार मारावे.
16 इस्राएल लोकांनी शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळावा; त्यांनी तो निरंतर पाळावा कारण हा त्यांच्या माझ्यामध्ये पिढ्यान्पिढ्या चालणारा करार आहे.
17 शब्बाथ दिवस इस्राएल लोकामध्ये व माझ्यामध्ये कायमची खून आहे. परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश व पृथ्वी निर्माण केल्यावर सातव्या दिवशी विसावा घेतला व त्याचा थकवा गेला.”
18 या प्रमाणे परमेश्वराने सीनाय पर्वतावर मोशे बरोबर आपले बोलणे संपविले व मग त्याने आपल्या बोटांनी लिहिलेल्या दोन सपाट दगडी पाट्या (आज्ञापट) मोशेला दिल्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel