गणेश मतकरी ह्यांनी लोकसत्तांत लवक्राफ्ट ह्यांच्या बद्दल एक लेख लिहिला होता ज्याचा सारांश आम्ही इथे उपलब्ध करून देत आहोत. 

कालौघात टिकून राहिलेल्या, गूढ, रहस्यमय, अतिमानवी विषयांना आपल्या दर्जेदार साहित्यातून मान्यता मिळवून देणाऱ्या, अल्पायुषी आणि कफल्लक आयुष्य जगलेल्या एका साहित्यिकाचं नाव आपल्याला आज चांगलंच परिचित आहे. ते म्हणजे एडगर अ‍ॅलन पो. मात्र हेच सारे गुणधर्म असलेला दुसरा एक साहित्यिक आपल्याकडल्या वाचकांच्या केवळ विस्मृतीतच गेलेला नाही, तर अनेकांना त्याचं नाव पूर्णत: अपरिचित असण्याची शक्यता आहे. हे नाव म्हणजे एच. पी. किंवा हॉवर्ड फिलिप्स लवक्राफ्ट. लवक्राफ्ट आणि पो समकालीन नाहीत. वयाच्या चाळिसाव्या वर्षी झालेला पोचा मृत्यू १८४९ चा, तर लवक्राफ्टचा जन्म १८९० चा. पोसारखा तोही अल्पायुषी, १५ मार्च १९३७ ला, वयाच्या सेहेचाळिसाव्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.  पण मृत्युसमयी फार कोणाला माहीत नसलेल्या लवक्राफ्टचा प्रभाव पुढल्या काळात मात्र जगभरात पसरला. स्टीवन किंग, रॅमसी कॅम्पबेल, विलिअम बरोज, अ‍ॅलन मूर, नील गायमनपासून आपल्या नारायण धारपांपर्यंत या क्षेत्रात काम करणारे बरेचसे लेखक या ना त्या मार्गाने त्याच्या ऋणात आहेत. एके काळी सामान्य, रंजक मानल्या जाणाऱ्या या लिखाणाला आज इंग्रजी साहित्यात महत्त्वाचं स्थान आहे. आपल्याकडे मात्र साहित्य प्रामुख्याने मध्यमवर्गीय जाणिवा आणि नातेसंबंधांपुरतं मर्यादित राहिल्याने लवक्राफ्टचं नाव फार माहीत नसणं क्रमप्राप्तच आहे.

मला स्वत:ला लवक्राफ्टचा शोध अनपेक्षितपणे लागला, आणि अप्रत्यक्षपणेही. शालेय काळात कधी तरी घरातली पुस्तकं धुंडाळताना ऑगस्ट डल्रेथ नामक लेखकाचं ‘द मास्क ऑफ कथुलू’ ( कथुलू हा उच्चार सरसकट वापरला जात असला, तरी विवाद्य आहे. इथे मात्र आपण तोच वापरू.) नावाचं एक पुस्तक हाताला लागलं. बाबा (रत्नाकर मतकरी) आणि नारायण धारप यांची गूढ – भय या विषयाला स्थान असलेली पुस्तकं मी नित्यनेमाने वाचत असल्याने ते वाचायला सुरुवात करताना मला काहीच वाटलं नाही, पण लवकरच लक्षात आलं, की ते वाचताना, आपल्याला खरोखरची भीती वाटायला लागलीये. हे प्रकरण केवळ भुताखेतांची भीती दाखवणारं नाही, तर वैश्विक संचार असणारी दैवतं, आणि त्यापुढली माणसाची हतबलता हा या कथांचा प्रमुख विषय आहे. भीती तयार होतेय ती माणसांच्या विरोधातल्या दुष्प्रवृत्तींमधून नाही, तर माणसं या वैश्विक शक्तीच्या खिजगणतीतच नाहीत, या भावनेतून. त्याला जोड आहे, ती चमत्कारिक उच्चार न करता येणारे शब्दप्रयोग- नावं, वातावरणनिर्मिती आणि भाषेचा चमत्कृतीपूर्ण वापर, याची.

Link

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel