संध्याकाळची वेळ . गोकुळात तरुण आणि अवखळ  गोपींचा खेळ रंगात आला होता . त्या झोके खेळत होत्या . फेर धरत होत्या आणि गाणीही म्हणत होत्या . मनभावन श्रावणऋतु होता ना .

राधा मात्र सख्यांची नजर चुकवून पळाली . तिला आता यमुनाकाठ गाठायचा होता .

हुरहूर लावणारीच ती वेळ . हवेत सुखद  गारवा .  सोनेरी पिवळसर ऊन . झाडांच्या शेंड्यांशी सलगी करणारं . घरी जाण्यापूर्वी  प्रियाच्या गळ्यात लडिवाळपणे झुलणाऱ्या अभिसारिकेसारखं . पक्ष्यांचा किलबिलाट चाललेला . घरट्यांकडे परतण्यापूर्वीचा . गुरं आपापल्या घराकडे निघालेली . त्यांचा हंबरण्याचा आणि गळ्यातल्या घंटांचा गोड किणकिणाट . प्रत्येकालाच एक ओढ लागलेली ...

यमुना   वहात  होती . श्रावणसरींनी नुकतंच एक हलकं शिंपण घातलं होतं . गवतावर पाण्याचे थेंब  होते , मोत्यांसारखे . तर काही थेंब  हळदुल्या उन्हामुळे सोनेरी भासत होते .

सोनसरींनी न्हायलेलं इतकं निसर्गरम्य वातावरण की  भान हरपून जावं !

राधेचंही भान तस्संच  हरपलेलं होतं ; पण तो निसर्ग पाहून नव्हे ,तर ते तिच्या प्रियासाठी - कृष्णासाठी !  तिलाही ओढ लागली होती, त्याच्या भेटीची.    

ती अभिसारिका लगबगीने एका सुनिश्चित कदंबवृक्षापाशी चालली होती.  तिला तो निसर्ग जणू दिसतच नव्हता . तिचा निसर्ग , तिचं  विश्व म्हणजे फक्त कृष्णच !

श्रावणसरी  बरसून गेल्या तरी राधेच्या तापल्या मनाला त्यामुळे शीतलता लाभणार नव्हतीच .

ती कदंबापाशी पोचली , पण तिथे कुणीही नव्हतं . ती बिचारी एकदम बावरली.  तिचे  कावरेबावरे नेत्र  भिरभिरले . पण तो खरंच आला नव्हता . तिने कदंबामागे , आजूबाजूच्या झाडांमागे डोकावून पाहिलं . कदाचित , तिची फिरकी घेण्यासाठी तो कुठे दडून बसला असेल , तर त्याला शोधण्यासाठी . कान्हाच तो , काही कमी खोडकर नव्हता !   

आकाशी सप्तरंगी इंद्रधनू उमटलं होतं . पण त्या चित्तकठोराची पावलं अजून तिथे उमटायची  होती .

ती कदंबाच्या झाडाला टेकून उभी राहिली . स्तब्ध , चिंताक्रांत . तिची शांतता भंग पावली ती वर उडालेल्या बगळ्यांच्या पांढऱ्या माळेने . तिने त्रासून वर पाहिलं आणि तिच्या कपाळावरच्या आठ्या पाहून यमुना खळखळून हसली . त्यावर राधेने तीच त्रासिक नजर तिच्याकडे वळवली .

" यमुने,  भारी गं !  अजून आवाज कर . मला तो एरव्हीचा तुझा नादमधुर खळाळसुद्धा नकोसा  वाटतोय . तू मला आणखी छळ . हस मला .  माझ्या जीवाला अगदी नकोसं झालंय तर तू माझ्या अणिकच खोड्या  काढ ," राधा तिला दुःखाने  आणि रागाने म्हणाली.  

तिच्या  त्या बोलण्यावर यमुना अवखळ  खळखळली .  खोडीलसारखी ती आणिकच  लचकत - मुरडत वाहू लागली . ते पाहून राधेचा राग वाढला .

आणि दुरून बासरीचे कर्णमधुर स्वर कानी आले.  स्वर्गीय संगीताने आसमंत भरून गेला .

वेडी राधा मनी मोहरली . तिचा राग कुठे पळून गेला. कृष्णमीलनासाठी तिचं मन , तिचा देह रोमांचितपणे थरथरू लागला .

तिकडे त्या  स्वरांनी यमुनाही क्षणभर थबकली आणि म्हणाली , " राधे , आलाय  गं तो ! ... आता झालं ना समाधान ? त्याच्यामुळे तुझं मन अस्थिर असतं . तुला दुसरं काही सुचत नाही अन काही कळत नाही . मला तर तुझी मनोवस्था पाहून तुला चिडवून  द्यावंसं वाटतं .   मजा वाटते गं मला . लहान आहेस तू माझ्यापेक्षा . अगं वेडे,  त्याची वाट तर मीही पहातच  असते . तो येईपर्यंत मलाही काही सुचत नाही . त्याच्या विचारांमध्ये मग मीही वाहवत जाते. वेड्यासारखी ! जसं तुझं नातं त्याच्याशी , तसंच माझंही . तुला झालेली बाधा तर मलाही आहे . अगदी  आधीपासून ! “

 घनदाट झाडांच्या गर्दीमध्ये कृष्ण नीट दिसत नव्हता . पण पानांमधून, त्याने खोचलेलं मोरपीस मात्र हळूहळू जवळ  येताना दिसत होतं .

राधा यमुनेच्या बोलण्याने भय पावली होती . तेव्हा यमुना खळखळून म्हणाली , " अगं राधे , घाबरू नकोस . मी काही तुझ्या प्रेमात वाटेकरी नाही गं . तो जसा तुझा प्रियकर आहे  तसा तो माझाही भगवंत आहे ! "

आता कान्हा , त्या दोघींच्या समीप आला होता .

-------------------------------------------------

BIPIN SANGLE- bip499@hotmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel