( नंतर साळुंकीचा पिंजरा धरण्यांत हात गुंतलेली सुसंगता प्रवेश करते.)

सुसंगता —— हाय , धिक्कार ! हाय धिक्कार ! माझ्या हाती ह्या साळुंकीला सोपवून माझी आवडती मैत्रीण सागरिका आता कुठे बरे गेली आहे ? पुन्हा कुठे ही भेटणार ? काय ? ही निपुणिका इकडेच येत आहे . तोपावेतो हिला विचारते .

( मग निपुणिका प्रवेश करते.)

निपुणिका —— महाराजांचा ठावठिकाणा तर मला समजला . तर आता राणीसाहेबांना जाऊन सांगते .

सुसंगता —— ( जवळ जाऊन ) गडे निपुणिके , आश्चर्याने मन ( ठिकाणावर नसल्यासारखी ) बावचळल्याप्रमाणे या वेळी समोर असलेल्या मला डावलून निघाली आहेस तरी कुठे ?

निपुणिका —— काय ? सुसंगता ! गडे सुसंगते , तूं बरोबर ओळखलेस . हेंच तर माझ्या आश्चर्याचें कारण ! असें ऐकिवांत आहे की , आज महाराज श्रीपर्वतांतून आलेल्या श्रीकंठदास नावाच्या धार्मिकापासून अकाली फुले उत्पन्न करण्याचा मंत्र शिकून आपल्या मानिलेल्या मोगरीला फुलांच्या गुच्छांनी मोहरून टाकणार आहेत . ही हकीकत कळावी म्हणून तेथे ( राजाजवळ ) राणीने मला धाडिलें आहे . आणि तूं ग कुठे निघाली आहेस ?

सुसंगता —— प्रिय मैत्रीण जी सागरिका तिला शोधण्यासाठी !

निपुणिका —— मैत्रिणी , तुझी प्रियसखी सागरिका , ( रंगाची ) पेटी , चित्रफलक आणि कुंचला घेऊन , जणू खिन्न झाल्यासारखी , केळीच्या मांडवांत शिरताना मी पाहिली . यास्तव प्रिय मैत्रिणीकडे जा . मीहि राणीकडे जाते . ( दोघीहि जातात .)

( प्रवेशक समाप्त)

( नंतर चित्रफलक आणि कुंचला घेतलेली, प्रेमांत सापडल्याचा अभिनय करणारी सागरिका प्रवेश करते.)

सागरिका —— हृदया , धीर धर , धीर धर . ह्या कष्टांतच अखेरी पावणार्‍या दुर्मिळ माणसाची ( उदयनाची ) इच्छा करण्याचा हट्ट धरण्यांत काय अर्थ ? आणि दुसरें असे ही , त्याला ( ज्याला ) पाहतांक्षणीच तुझी मनोव्यथा इतकी वाढते ना ? ( आश्चर्याने ) तरीसुद्धा त्याच्याच भेटीसाठी हपापलेलें असावेंत हा तुझा केवढा बिनडोकपणा ( मूर्खपण ) ! अरे घातुक ( मेल्या ) हृदया , जन्मापासून ( माझ्या ) बरोबर वाढून , मला सोडून थोडाच वेळ पाहून ओळखीच्या झालेल्या माणसाच्या मागून जातांना , तुला लाज कशी वाटत नाही ? किंवा तुझी काय चूक ! मदनाच्या बाणांच्या हल्ल्याला भिऊन तू आज असे ठरविलेस . हरकत नाही ; मदनाची तोपावेतो खरडपट्टी काढिते .

( रडत रडत हात जोडून, गुडघे टेकून) भगवंता मदना, सगळ्य़ा देवदानवांना पूर्णपणें जिंकून स्त्रियांवर शस्त्र चालवितांना तुला शरम कशी वाटत नाही? ( विचार करून) बोलून चालून तुला ( मुळी) शरीर नाही. सर्व बाजूंनी कमनशिबी असलेल्या माझें मरण ह्या अपशकुनाने खात्रीने जवळ आलेले आहे. ( फलकाकडे पाहून) तर जोपर्यंत येथे कोणीहि आले नाही तोपर्यंतच चित्रांत काढिलेल्या त्या आवडत्या माणसाला ( डोळे भरून) पाहून मनांत ठरविल्याप्रमाणे करतें. ( मोठ्या नेटाने मन लावून फलक घेतल्याचा अभिनय करून, सुस्कारा सोडून) जरी पराकाष्ठेच्या घाबरटपणामुळे माझ्या हाताची बोटें थरथर कांपताहेत; तरीसुद्धा त्या माणसाच्या दर्शनाचा दुसरा मार्ग नसल्यामुळे, कसेबसें चित्र काढून ह्याच्याकडे पाहत राहीन.

( चित्र काढण्याचा अभिनय करते.)

सुसंगता —— हा तो केळीचा मांडव ; तर आंत जाते . ( आंत जाण्याचा अभिनय करते . आंत जाऊन , आणि पाहून आश्चर्याने ) ही माझी प्रिससखी सागरिका ! गाढ प्रेमाने मन ताळ्यावर नसल्यामुळे कांहीतरी आकृति आकृति काढणार्‍या हिने मलाहि बघितलें नाही . ठीक . मध्यंतरी हिच्या दृष्टीच्या टप्प्यांत न येतां ही काय काढीत आहे ते निरखून पाहते . ( सावकाश हिच्या पाठीशीं जाऊन , पाहून आनंदाने ) हें काय ? हिने महाराजांची आकृति काढिली . शाबास , सागरिके , शाबास ! किंवा कमळांचे माहेरघर असें सरोवर सोडून राजहंसी दुसरीकडे सुखी होत नाही !

सागरिका —— ( आसवें गाळीत ) मी ह्यांचे ( उदयनाचें ) चित्र रेखाटलें ; पण एकसारख्या न थांबता ओघळणार्‍या आसवांच्या धारांनी ( पाण्याने ) माझ्या डोळ्यांना ( ह्यांच्याकडे ) बघणें अशक्य केले आहे . ( तोंड वर करून , आसवें पुसून , सुसंगतेला पाहून , पांघरलेल्या वस्त्राने : उत्तरीयाने —— चित्र - फलक झाकून , हसून ) अरेच्या , कोण ? प्रियसखी सुसंगता ! ( उठून हात धरून ) मैत्रिणी , इथे बैस .

सुसंगता —— ( बसल्यावर , जबरीने फलक ओढून घेऊन ) सखे , इथे चित्रफलकावर तूं कोणाचे चित्र काढिलें आहेस ?

सागरिका —— सुरू असलेल्या मदनमहोत्सवांतील भगवान् कामदेवांचे !

सुसंगता —— ( हसून ) केवढी तुझी हुशारी ! परंतु चित्र ओंकें ओंकें ( मोकळे , मोकळे , अपुरें ) दिसत आहे ; तर मीहि काही आकृति काढून ( ह्या चित्रांत ) रति दाखवितें . ( कुंचला घेऊन रतीच्या मिषाने सागरिकेचें चित्र काढण्याचा अभिनय करते .)

सागरिका —— ( बघून संतापाने ) सखे , काय म्हणून तू इथे माझे चित्र काढिलेंस ?

सुसंगता —— मैत्रिणी , कारण नसताना कां बरे रागावतेस ? जशी तूं माकाची आकृति रेखाटलीस तशी मी रतीची काढली . अग खोटारडे , ह्या तुझ्या ( खोट्या ) बोलण्याचा काय उपयोग ? इत्थंभूत हकीकत सांग .

सागरिका —— ( लाजेने स्वतःशी ) प्रिय मैत्रिणीने ( माझे गुपित ) नक्की ओळखले . ( सुसंगतेचा हात धरून , मोठ्याने ) प्रिससखी , मला मोठी शरम वाटते ; तर निदान असे कर की ज्यामुळे ही हकीकत दुसर्‍या कोणालाहि कळणार नाही .

सुसंगता —— सखे , लाजू नकोस . अशा ( इतक्या ) सुंदर मुलीचे अशा लोकोत्तर वरावर प्रेम जडावें हे योग्यच आहे . तरीहि ज्यायोगें दुसर्‍या कोणालाहि ही वार्ता समजणार नाही असें मी करीन . पण ही चलाख ( तल्लख स्मरणशक्तीची ) साळुंकी बातमी फोडायला कारण होईल . कदाचित् ह्या ( आपल्या ) बोलण्यांतील अक्षरे लक्षात ठेवून ही कोणाच्याहि ( भलत्याच्याहि ) पुढे बोलून टाकील ( बडबडेल ) !

सागरिका —— ( खिन्न होऊन ) सखे , पूर्वीहूनहि माझा प्रेमविकार बळावला आहे . ( प्रेमविकार वाढल्याचा अभिनय करते .)

सुसंगता —— ( सागरिकेच्या हृदयावर हात ठेवून ) सखे , धीर धर , धीर धर . तोपावेतो ह्या मोठ्या तळ्य़ांतून कमळाचीं पाने आणि देठ घेऊन लगोलग ( झटदिशी ) आलेंच . ( बाहेर जाऊन आणि पुन्हा आंत येऊन , कमळाच्या पानांचे अंथरूण आणि देठांची कांकणे ( बांगड्या ) तयार केल्याचा अभिनय करून , उरलेली कमळाचीं पानें सागरिकेच्या छातीवर ठेविते .)

सागरिका —— सखे , हीं कमळाची पाने आणि ( हे ) देठ काढून टाक . ह्या ( उपचारांचा ) उपयोग नाही . निरुपयोगी गोष्टींत स्वतःला कां कष्टवितेस ? प्रिय मैत्रिणी , प्राप्त होण्यास कठीण अशा माणसावरील प्रेम , अपार लाज , देहावर दुसर्‍यांचा ताबा , एकांगी ( विपरीत ) प्रेम ; ( अशा स्थितींत ) एकटा मृत्यु उत्कृष्ट आसरा नव्हे काय ? १ . ( बेशुद्ध होते )

सुसंगता —— ( देयेने ) प्रियसखे सागरिके , धीर धर , धीर धर . ( पडद्यांत गोंगाट )

पागेंतून निसटलेला , तोडल्यानंतर उरलेली गळ्यांतील सोन्याची दाव्यांची साखळी खेचणारा , ( माकड -) चेष्टांमुळे ज्याच्या हलणार्‍या पायांतील घुंगुरांची माळ वाजत आहे असा , दारें ओलांडून ज्याने स्त्रियांना घाबरवून सोडिलें आहे असा आणि मोतद्दारांनी घाईने ज्याचा पाठलाग केलेला आहे असा हा वानर राजाच्या वाड्य़ांत शिरत आहे . २

आणखी असे ,

माणसांत जमा होत नसल्यामुळे लाज सोडून ( गुंडाळून ) खोजे पळून गेले ; हा ठेंगू ( बुटका ) घाबरून कचुकीच्या अंगरख्याच्या आंत शिरत आहे ; ( राणीवशाच्या ) जवळपास राहणार्‍या किरातांनी आपल्या नावाला शोभेल असें केले ( म्हणजे ते जवळपास निघून गेले ) ; आणि आपण दिसू या भीतीने कुबडे सावकाश वाकूनवाकून चालत आहेत .  .

सुसंगता —— ( ऐकून , समोर बघून , घाईने उठून साळुंकीला पिंजर्‍याच्या सकट हातांत घेऊन ) सखे , ऊठ , ऊठ . हा मेला काळतोंड्या खरेंच इकडे येत आहे !

सागरिका —— आता आपण दोघींनी काय करायचें ?

सुसंगता —— ये , ह्या तमलावृक्षांच्या फांद्यांच्या काळोखांत जाऊन ह्याला चुकवूं या .

( चालत जाऊन, दोघी भीतीने बघत, एकान्तांत उभ्या राहतात.)

सागरिका —— घात झाला , सुसंगते . तू चित्रफलक टाकलास ? कधीतरी कोणालातरी तो दिसेल .

सुसंगता —— निष्काळजी मुली , आतासुद्धा चित्रफलकाशीं काय करणार आहेस ? हा दहीभातासाठी हावरा झालेला वानर हा पिंजरा उघडून निघून गेला . आणि ही चलाख ( साळुंकी ) उडून दुसरीकडे चालली आहे . यास्तव ये . लगबग पाठलाग करूं या . या बोलण्यांतील अक्षरे लक्षांत ठेवून ती ती कोणाच्याहि पुढे उच्चारील .

सागरिका —— सखे , आपण दोघी असें करू या . ( निघून जाता .) ( पडद्यांत ) ह्यः ; ह्यः ; ! नवल , नवल ! !

सागरिका —— ( पाहून ) सुसंगते , मला वाटते की , मेला वानरच पुन्हा येत आहे .

सुसंगता —— ( बघून , मोठ्य़ाने हसून ) अग भित्रे , भिऊं नकोस ; महाराजांच्या अवतीभोवती असणारा हा तर सभ्य वसंतक !

( नंतर वसंतक प्रवेश करतो.)

विदूषक —— ह्यः ; ह्यः ; नवल , नवल ! ! अरे धर्माचिरणी श्रीखंडदासा , छान केलेंस !

सागरिका —— ( कुतुहलाने पाहते ) सखे सुसंगते , ह्याच्याकडे बघत राहावेंसे वाटते !

सुसंगता —— निष्काळजी मैत्रिणी , ह्याच्याकडे बघून काय उपयोग ! खरेंच साळुंकी लांब गेली ; तर ये ; आपण पाठलाग करूं या . ( दोघी जातात .)

विदूषक —— छान ! अरे धर्माचरणी श्रीखंडदासा , बहोत खाशी ! तूं ते चूर्ण देतांच बटमोगरी अशी ( फुली ) फुलून आली . म्हणून दाटी - दाटीने उमलेल्या फुलांच्या झुबक्यांनी फांद्या झाकून गेलेली ही , महाराणीने आपल्या मानिलेल्या मोगर्‍याच्या वेलीचा जणू उपहास करीत आहे असें दिसते . यासाठी तोपावेतो जाऊन प्रिय मित्राच्या कानीं घालतों . हा प्रिय मित्रच , त्या चूर्णाचा अनुभव आल्यामुळे , दुष्टिआड असूनहि ती बटमोगरी डोळ्यांसमोर फुलांनी बहरलेली असल्याप्रमाणे पाहत , डोळे आनंदाने विकसित झालेल्या स्थितींत , इकडे येत आहे . यास्तव याच्यापाशी जातों कसा . ( राजाकडे जातो .)

( मग वर ज्याचे वर्णन केले आहे असा राजा प्रवेश करतो.)

राजा —— ( आनंदाने ) आज खात्रीने मी , ज्याप्रमाणे तत्काळ विपूल कऴ्य़ांनी डवलेल्या , पांढर्‍या रंगाची कांति असलेल्या , विकसित झालेल्या , वार्‍यांच्या अविरत आघातांनी ( तडाख्यांनी ) आपले क्लेश वाढविणार्‍या उद्यांनांतील ह्या वेलीकडे ( पाहावे ), त्याप्रमाणे ( प्रियकराविषयी ) अनिवर्बंध ( अनिवार ) उत्कंठा असलेल्या ( वियोगाने ) अंगकांति अगदी फिकट झालेल्या , आळसावलेल्या , एकसारखे सुस्कारे सोडल्यामुळे स्वतःला थकवा आणणार्‍या , प्रेमांत सापडलेल्या दुसर्‍या स्त्रीकडे पाहिले म्हणजे महाराणीचे मुख रागाने तांबडे लाल ( लालबुंद ) होईल .  .

विदूषक —— ( एकदम जवळ जाऊन ) प्रिय मित्राचा विजय असो , विजय असो ! अरे दोस्ता , सुदैवाने , तुझी भरभराट झाली आहे . (‘ तूं ते चूर्ण देतांच ’ इत्यादि पुन्हा म्हणतो .)

राजा —— मित्रा , ( यांत ) काय संशय ? कारण रत्न , मंत्र आणि वनस्पति यांचे सामर्थ्य तर्काने समजण्याजोंगे नाही .

युद्धांत श्रीपुरुषोत्तमाच्या ( विष्णूच्या ) गळ्यांतील ( कौस्तुभ ) मणि पाहून शत्रु पळून गेले ; श्रेष्ठ मंत्रांनी पराभूत झालेले साप पाताळांत राहूं लागले ; पुर्वी ( त्रेतायुगांत ) मेघनादाने मारलेले जे पराक्रमी लक्ष्मण आणि वानर योद्धे तेसुद्धा गुणकारी वनस्पतीचा वास घेऊन ( हुंगून ) पुन्हा जिवंत झाले .  ( अ )

यासाठी वाट दाखव म्हणजे आपण ती बघून डोळ्यांचे पारणें फेडूं या !

विदूषक —— ( ऐटीने ) चलावें , चलावें , आपण .

राजा —— हो पुढे . ( दोघे ऐटीत चालूं लागतात .)

विदूषक —— ( ऐकून , भीतीने माघारा येऊन , राजाचा हात धरून , गोंधळून ) अरे मित्रा , ये , पळूं या .

राजा —— का म्हणून ?

विदूषक —— अरे , ह्या बकुळीच्या झाडावर कोणीतरी भूत आहे .

राजा —— मूर्खा , धिक्कार असो . विश्वासाने - न भीता जा . येथे ह्यासारख्यांचे अस्तित्व कोठून असणार ?

विदूषक —— स्पष्ट अक्षर असलेले बोलणेंच येत आहे . जर माझ्या बोलण्यावर विश्वास नसला तर पुढे जाऊन स्वतःच ऐक .

राजा : ( तसे करून आणि ऐकून )

ज्या अर्थीं या बोलण्यांतील अक्षरे स्पष्ट आहेत , स्त्रियांच्या ( आवाजाच्या ) धर्मानुसार ते गोड आहे आणि लहानग्या देहांतून ( उत्पन्न झाल्यामुळे ) तें घुमत नाही . ( लांबवर ऐकू जात नाही ), ( त्या अर्थीं ) हे साळुंकी बोलत आहे असें वाटते .  .

( वर निरखून पाहून) काय, साळुंकी !

विदूषक —— ( विचार करून ) ओहो ! खरोखरच साळुंकी !

राजा —— ( स्मित करून ) मित्रा , खरोखर तीच आहे .

विदूषक —— अरे मित्रा , तूं भित्रा म्हणून साळुंकीला भूत असे म्हणालास .

राजा —— मूर्खा धिक्कार ! जें आपण स्वतः केले ते माझ्यावर ढकलतोस .

विदूषक —— अरे , असें जर असेल तर मला अडवू नकोस . ( रागाने लाकडी सोटा उगारून ) अग शिनळीचे , तुला वाटत असेल खरेंच वसंतक भित्रा आहे . तर थोडा वेळ वाट बघ , थांब म्हणजे दुष्ट माणसाच्या अंतःकरणाप्रमाणे वाकड्य़ा असलेल्या या लाकडी सोट्याने , पिकलेल्या कवठाप्रमाणे , ह्या बकुळीच्या झाडावरून तडाखा मारून ( तुला ) भुईवर पाडतों .

राजा —— ( थांबवून ) वेड्या , ही कांहीतरी गोड बोलत आहे . यास्तव हिला का भिववितोस ? तोपावेतो आपण दोघे ऐकूं या .

( दोघे ऐकतात.)

विदूषक —— या ब्राह्मणाला जेवूं घाल असे म्हणत आहे .

राजा —— खादाडाच्या प्रत्येक गोष्टीचाच शेवट खाण्यांतच होतो . तर खरे बोल . साळुंकी काय बोलत आहे ?

विदूषक —— ( ऐकून ) अरे दोस्ता , हिचे बोलणें तूं ऐकलेस का ? ही म्हणते आहे —— ‘‘ मैत्रिणी , हे कोणाचे चित्र काढलें आहेस ?’’ चालू असलेल्या मदनमहोत्सवांतील मदनाचे !’’ पुन्हा ती बोलत आहे —— ‘‘ सखे , इथे माझें चित्र तूं का काढिलेस ?’’ ‘‘ मैत्रिणी , कारण नसतांना का रागावतेस ? तूं जसे कामदेवाचें चित्र काढिलेस तसे मीहि रतीचे चित्र काढिले ! यास्तव खोटारडे , या तुझ्या बोलण्याचा काय उपयोग ? सगळी ( इत्थंभूत ) हकीगत सांग .’’ अरे गड्य़ा , हे आहे तरी काय ?

राजा —— मित्रा , अंदाज असा आहेः कोणीतरी ( स्त्रीने ) प्रेमामुळे हृदयस्थ प्रियकराचे चित्र काढून कामदेवांचे म्हणून मैत्रिणीसमोर लपविलें ; पण मैत्रिणीनेहि ( तिच्या मनांतलें ) ओळखून चतुराईने ( धोरणाने ) हिचे देखील चित्र काढून रति म्हणून ( तिला ) दाखविले !

विदूषक —— ( चुटकी वाजवून ) अरे दोस्ता , हें ठीक जुळतें !

राजा —— अरे मित्रा , बोलू नकोस . ( ती साळुंकी ) पुन्हा बोलत आहे . यासाठी ऐकू या . ( दोघे ऐकतात .)

विदूषक —— अरे , आणखी ही असें म्हणत आहेः ‘‘ सखे , लाजू नकोस . अशा ( इतक्या ) सुंदर मुलीचे अशा लोकोत्तर वरावर प्रेम जडावें , हे योग्यच आहे .’’ अरे मित्रा , शहाणपणाचा टेंभा मिरवूं नकोस . मी तुला हिच्या तोंडून ऐकून सगळे सांगेन . जिचें हे चित्र रेखाटलें आहे ती मुलगी खरेंच अतिशय लावण्यवती आहे .

राजा —— असें असेल तर आपण लक्ष देऊन ऐकावयास हवें . आपल्या जिज्ञासेला इथे भरपूर खाद्य आहे . ( दोघे ऐकतात .)

विदूषक —— अरे गड्या , हिचें बोलणें ऐकलेंस ना ? ‘‘ मैत्रिणी , पूर्वीपेक्षाहि माझा प्रेमविकार बळावला आहे . सखे , काढून टाक ही कमळाचीं आणि देठांची कांकणे . यांचा उपयोग नाही . निरुपयोगी गोष्टींत स्वतःला कां कष्टवितेस ?’’

राजा —— मित्रा , नुसतें ऐकिले नाही तर अभिप्रायसुद्धा समजला मला !

विदूषक —— अरे दोस्ता , ही शिनळीची साळुंकी अजूनहि कुरकुर करीत आहे . म्हणून सगळे ऐकून सांगतो .

राजा —— योग्य बोललास ! ( दोघे पुन्हा ऐकतात .)

विदूषक —— अरे मित्रा , ही रांडलेक साळुंकी , चार वेदांचे अध्ययन केलेल्या ब्राह्मणाप्रमाणे ऋचा म्हणत आहे .

राजा —— मित्रा , मन दुसरीकडे असल्यामुळे मला हिचें जें बोलणें नीट समजलें नाही ते सांग .

विदूषक —— अरे , असें म्हणते —— प्रिय मैत्रिणी , प्राप्त होण्यास कठीण अशा माणसावरील प्रेम , अपार लाज , देहावर दुसर्‍यांचा ताबा , एकांगी ( विपरीत ) प्रेम , ( अशा स्थितींत ) एकटा मृत्यु उत्कृष्ट आसरा नव्हे काय ?

राजा —— ( स्मित करून ) अशा प्रकारच्या निंद्य ( मोठ्य़ा ) ब्राह्मणाखेरीज दुसर्‍या कोणाला ह्या प्रकारच्या ऋचा माहीत असणार ?

विदूषक —— मग हें आहे तरी काय ?

राजा —— अरे ही गाथा ( प्राकृत भाषेंतला श्लोक ) !

विदूषक —— काय ? गाथा . मग म्हणायचें आहे काय ?

राजा —— मित्रा , तारुण्याने मुसमुसलेल्या कोणालातरी स्त्रीने प्रियकराची प्राप्ति न झाल्यामुळे जीविताविषयी निराश होऊन ( ही गाथा ) म्हटली आहे .

विदूषक —— ( खो खो हसून ) अरे , हे वळणावळणांनी बोलणे कशासाठी ? सरळच असे का म्हणत नाहीस की , ‘‘ माझीच प्राप्ति न झाल्यामुळे !’’ नाहीतर मदन म्हणून ( तुझ्याशिवाय ) दुसर्‍या कोणाला दडविणार ? ( टाळी वाजवून मोठ्याने हसतो .)

राजा —— ( वर बघून ) मूर्खा , धिक्कार ! मोठमोठ्याने हसून तू या बिचारीला भिवविलेस ; म्हणून ही उडून दुसरीकडे कुठेतरी गेली . ( नीट पाहतात ).

विदूषक —— ( पाहून ) ही केळीच्या मांडवाकडेच गेली . तर ये , पाठोपाठ जाऊं . ( जाऊं लागतात .)

राजा —— अनिवार ( दुस्सह ) अशी मदनाची पीडा सहन करणार्‍या सुंदरीने विश्वासु मैत्रिणीच्या समोर जे बोलून दाखविलें तें पुन्हा पोपट , मुलें आणि साळुंक्या यांच्या तोंडून ज्यांच्या कानांवर पडतें ते पुण्यवान् होत !  .

विदूषक —— अरे गड्या , हाच केळीचा मांडव ! आंत जाऊं या . ( दोघे आंत जातात .) अरे , ह्या रांडलेकीच्या साळुंकीला शोधण्याचा खटाटोप पुरे झाला . इथे वार्‍याच्या झुळकीने हलणार्‍या लहानग्या केळींच्या पानांनी थंड झालेल्या फरशीवर बसून दोन घटका विसावू या .

राजा —— जशी तुझी आवड ! ( बसतात , ‘‘ अनिवार ’’ हें पुन्हा म्हणतो .)

विदूषक —— ( बाजूस बघून ) अरे मित्रा , दुष्ट वानराने दार उघडलेला हा पिंजरा साळुंकीचा असावा .

राजा —— मित्रा , नीट तपासून पाहा .

विदूषक —— जशी आपली आज्ञा ! ( हिंडून आणि पाहून ) हा चित्रफलकसुद्धा . तोपावेतो हा उचलून घेतो .

( घेऊन आणि न्याहाळून आनंदाचा अभिनय करतो.)

राजा —— ( उत्सुकतेने ) दोस्ता , काय हे ?

विदूषक —— अरे मित्रा , दैवाने खैर केली . मी जें म्हटलें तें हैं ! या ठिकाणी तुझें चित्र काढिलें आहे . एरवी मदन म्हणून दुसर्‍या कोणाला लपविणार ?

राजा —— ( आनंदाने दोन हात पुढे करून ) मित्रा , दाखव , दाखव .

विदूषक —— तुला नाही दाखविणार . त्याहि मुलीचें चित्र इथे रेखाटलें आहे . तर काय बक्षिशी — ( उपटल्या )- वाचून असली सुंदर मुलगी पाह्यला मिळेल का ?

राजा —— ( जोराने घेऊन पाहतो . बघून आश्चर्याने ) मित्रा , बघ , बघ . लीलेने ( खेळ म्हणून ) कमळ फिरविणारी ( किंवा विलासाने लक्ष्मीला अव्हेरणारी ), अधिक अनुकूल असल्याची जाणीव देणारी , चित्रांत काढिलेली अशी ही कोण , आपल्या

डौलदार चालीने कमळें हलविणार्‍या , पंखांच्या फडफडण्यानें आपली हालचाल सुचविणार्‍या , जिची चालण्याची ढब आकर्षक आहे अशा राजहंसाप्रमाणे आपल्या मानसांत ( मनांत आणि मानस सरोवरांत ) शिरत आहे ! ७ .

आणि असे , निष्कलंक ( सोळा कलांनी ) पूर्ण चंद्राप्रमाणे असलेलें हिचे मुख तयार करून ब्रह्मदेव आपलें आसनरूपी कमळ मिटल्यामुळे खात्रीने खट्टू झाला . ८ .

( मागून सागरिका व सुसंगता प्रवेश करतात.)

सागरिका —— सखी सुसंगते , आपल्याला साळुंकी सापडली नाही . यास्तव चित्रफलक तरी निदान या केळीच्या मांडवांतून घेऊन आपण दोघी लगबगीने जाऊं या .

सुसंगता —— मैत्रिणी , असें करूं ( जवळ जातात .)

विदूषक —— अरे दोस्ता , चित्रांत हिचे मुख खाली वाकलेलें कां दाखविले आहे ?

सुसंगता —— ( ऐकून ) मैत्रिणी , वसंतक ज्या अर्थी बोलत आहे त्या अर्थी माझा अंदाज आहे की , महाराजहि इथेच असावेत . तर आपण दोघी केळीच्या मांडवाच्या झुडपाआड लपून बघूं . ( दोघी ऐकतात .)

राजा —— पाहा , पाहा . (‘ अपूर्व पूर्ण चंद्र ...’ हें पुन्हा म्हणतो .)

सुसंगता —— सखे , तुझे दैव जोरावर आहे . हा तुझा प्रियकर तुझेंच वर्णन करीत आहे .

सागरिका —— ( लाजेने ) सखे , थट्टेखोर स्वभावामुळे मला का क्षुल्लक ( तिरस्क रणीय ) करतेस ?

विदूषक —— ( राजाला हलवून ) अरे , मी म्हणतों , चित्रांत हिचे मुख खाली वाकलेले कां दाखविलें आहे ?

राजा —— मित्रा , साळुंकीनेच सगळें सांगितलें आहे .

सुसंगता —— ( मोठ्य़ाने हसून ) सखे , साळुंकीने आपली हुशारी दाखविली .

विदूषक —— तुझ्या डोळ्य़ांना समाधान देते किंवा नाही ?

सागरिका —— ( भीतीने , स्वतःशीं ) हा काय म्हणणार ! मृत्यु आणि जीवन यांच्यामध्ये मी उभी आहे .

राजा —— समाधान देते हें काय सांगायला हवे ? माझी दृष्टि नाखूषीने मांड्यावरून पुढे जाऊन पुष्ट नितंबांवर पुष्कळ काळ हिंडून , हिच्या वळ्य़ारूपी लाटांनी दुर्गम झालेल्या कमरेवर खिळून राहिली ; आता हपापल्याप्रमाणे उन्नत स्तनांपर्यंत हळूहळू पोचून , आसवांचे कण पाझरणार्‍या डोळ्यांवर वारंवार अभिलाषबुद्धीने स्थिरावत आहे ! ९ .

सुसंगता —— सखे , ऐकेलेस ना तूं ?

सागरिका —— ( मोठ्याने हसून ) तूंच ऐक . तुझ्याच ( जिच्याच ) चित्र काढण्याच्या कसबांचे वर्णन चाललें आहे !

विदूषक —— ( फळ्य़ाकडे नीट निरखून ) अरे मित्रा , ह्या सारख्या ( सुंदरी ) सुद्धा ज्याच्या प्रिय संगतीची आतुरतेने वाट पाहतात त्याचादेखील आपल्याविषयी एवढा अनादर की , ज्यामुळे इथेच तिने काढलेल्या आपल्या ( चित्रा ) कडे तूं पाहत

नाहीस ?

राजा —— ( न्याहाळून ) मित्रा , हिने माझे चित्र काढिलें हा , खरें सांगायचे तर , माझा मोठा मान ! तर मी कां बघणार नाहीं ? पाहा . चित्र काढताना तिच्या आसवांच्या पाण्याचे ठिककणारे तुषारकण तिच्या तळहाताच्या स्पर्शाने माझ्या शरीरावर फुटलेल्या घामाच्या थेंबाप्रमाणे दिसतात . १० .

सुसंगता —— सखे , जी अशा रीतीने महाराजांना समाधान देते ती तूंच पुण्यवान् आणि स्तुत्य आहेस .

विदूषक —— ( आजूबाजूस बघून ) अरे मित्रा , खरोखर हें तिचे , ओलीं कमळाचीं पाने आणि देठ यांनी तयार केलेलें , प्रेमामुळे झालेली ( अनुकंपनीय ) अवस्था सुचविणारे अंथरुण दिसत आहे .

राजा —— गड्या , बारकाईने वर्णन केलेंस . उदाहरणार्थ ——

पुष्ट स्तन आणि नितंब यांच्या संपर्कामुळे दोन बाजूंकडे ( उशापायथ्याशी ) कोमजलेले ( चुरगाळलेले ), कमरेशी निकट संबंध न आल्यामुळे मध्यभागीं हिरव्या रंगाचें , लतेसारखे शिथिल बाहु आपटणें आणि लोळणें ( पसरणें आणि आखडणें ) यांच्या योगाने अस्ताव्यस्त झालेलें ( विस्कटलेले ) हें शेलाट्य़ा स्त्रीचें कमळाच्या पानांचे अंथरुण प्रबळ मदनबाधा व्यक्त करीत आहे . ११ .

हिची पुष्ट स्तनांची जोडी , आपल्या असह्य सर्वांगीण पीडेने ( मदनतापाने ) कोमजलेल्या वर्तुळांनी , हृदयांतील प्रेमाने उत्पन्न झालेल्या ( अनुकंपनीय ) अवस्थेची कहाणी जितक्या तीव्रतेने सांगते तितक्या तीव्रतेने हिच्या उन्नतः वक्षःस्थळावर ठेविलेले हे कमळाचें पान ( ती ) सांगत नाही . १२

विदूषक —— ( कमळाचा देठ घेण्याचा अभिनय करून ) अरे मित्रा , हा दुसरा तिच्याच पुष्ट स्तनांना साजेसा , कोमल देठांचा सुकून गेलेला हार ! जरा बघ .

राजा —— ( घेऊन , छातीवर ठेवून तिरस्काराने ) अरे मठ्ठ बुद्धीच्या ( किंवा , थंड स्वभावाच्या ) कमळाच्या देठांच्या हारा , तिच्या घटांसारख्या स्तनांच्या मधल्या भागांतून खाली पडलास म्हणून तू वाळून का बरे गेलास ? तुझ्या लहान तंतूला देखील तेथे जागा नाही ; मग तुला कोठून असणार ? १ .

सुसंगता —— ( स्वतःशी ) धिक्कार , धिक्कार ! मन प्रबळ प्रेमाच्या आहारी गेल्यामुळे महाराजांनी अर्थशून्य बडबडहि सुरू केली आहे . तर यापुढे हयगय करणें योग्य नाही . ( मोठ्य़ाने ) सखे , ज्याच्यासाठी तूं आलेली आहेस तो हा समोर उभा

आहे !

सागरिका —— ( रागाने ) सखे , कोणासाठी मी आलें ग ?

सुसंगता —— ( हसून ) भलताच संशय घेणार्‍या ( संशयखोर ) मुली , अग चित्रफलकासाठी ; म्हणून तो घे !

सागरिका —— ( रागाने ) अग , खरोखर तूंहि असे ( दोन अर्थांचे ) बोलण्यात पटाईत ( सरावलेली ) दिसतेस . तर दुसरीकडे जातें मी ! ( जाऊ लागते )

सुसंगता —— अग असोशिक - असहिष्णु मुली , इथे थोडा वेळ थांब , तोपर्यंत मी या केळीच्या मांडवांतून चित्रफलक घेऊन येते .

सागरिका —— सखे , असें कर ( सुसंगता केळीच्या मांडवाकडे तोंड करून चालूं लागते .)

विदूषक —— ( सुसंगतेला पाहून घाईने ) अरे दोस्ता , हा चित्रफलक झाक ( लपव ). ही महाराणीची दासी सुसंगता येत आहे . ( राजा वस्त्राच्या टोकाने फलक झाकतो .)

सुसंगता —— ( जवळ जाऊन ) महाराजांचा जयजयकार असो !

राजा —— सुसंगते , वेळेवर आलीस . इथे अशी बैस . ( सुसंगता बसते .)

राजा —— सुसंगते , मी इथे आहे हें तुला कसें कळलें ?

सुसंगता —— ( हसून ) नुसते महाराज नव्हेत तर चित्रफलकासह सगळी हकीकतसुद्धा मला कळलेली आहे . यास्तव जाऊन महाराणीला सांगते !

विदूषक —— ( एकीकडे , भिऊन ) अरे मित्रा सगळें शक्य आहे . ही गर्भदासी , ( त्यातून ) बडबडी ( तोंडाळ ) ! तर हिला बक्षिसीने खूष कर .

राजा —— योग्य बोललास तूं . ( सुसंगतेचा हात धरून ) सुसंगते , ही नुसती थट्टा ! विनाकारण तू महाराणीला दुःखी करू नकोस . ही तुझी बक्षिशी ! ( कानांतील अलंकार काढून देऊ लागतो .)

सुसंगता —— ( स्वतःशी ) महाराज खूष आहेत . ( मोठ्य़ाने ) भिऊं नका ; महाराजांची मर्जी असल्यामुळे मी थट्टा केली . कानांतला दागिना देण्याचें काय प्रयोजन ? ‘‘ तुम्ही काय म्हणून या चित्रफलकावर माझे चित्र काढिलेंत ?’’ असें म्हणून माझी प्रियसखी सागरिका रागावली आहे . यास्तव ( तिच्याकडे ) जाऊन तिचा रुसवा काढा ; हीच माझ्यावर मोठी मेहेरबानी लहोई .

राजा —— ( लगबगीनें उठून ) सुसंगते , दाखव , कुठे ( आहे ती ?)

सुसंगता —— असें , या बाजूने यावें महाराजांनी .

विदूषक —— गड्या , घेतों मी हा चित्रफलक . हा उपयोगी पडेल . ( सगळे केळींच्या मांडवांतून बाहेर पडतात .)

सागरिका —— ( राजाला पाहून आनंदाने , भीतीने आणि कांपत , स्वतःशीं ) अरेरे , धिक्कार ! याला पाहून माझी भीतीने गाळण उडाली ; मला एक पाऊलसुद्धा जाणें शक्य नाही . तर इथे काय करूं ?

विदूषक —— ( सागरिकेला पाहून ) ह्यः , ह्यः , आश्चर्य , आश्चर्य ! अशी रत्नासारखी मुलगी पृथ्वीवर आढळत नाही . तर माझा अंदाज आहे की , हिला उत्पन्न केल्यावर प्रजापतीलाहि आश्चर्यं वाटलें असेल .

राजा —— दोस्ता , माझ्याहि मनांत असे येते . त्रैलोक्याचें भूषण झालेल्या या स्त्रीला निर्माण केल्यावर ब्रह्मदेवाने खात्रीने आश्चर्य वाटून आपल्या ( आसनाप्रमाणे असलेल्या ) कमळाच्या पाकळीपेक्षा अधिक पाणीदार ( तेजस्वी ) असे आपले डोळे अधिक विस्फारित केले ; चारहि तोंडावाटे एकाच वेळी ‘ शाबास , शाबास ’ असे खब्द उच्चारिले , आणि आपली ( चारीं ) मस्तकें ( समाधानाने ) डोलविली . १

सागरिका —— ( रागाने सुसंगतेकडे बघून ) सखे , असला चित्रफलक तूं आणिलास ! ( जाऊ लागते .)

राजा —— हे रागीट मुली , जरी तू ही दुष्टि रागाने फेकीत असलीस तरीहि ही प्रेमळ ( दृष्टि ) रखरखीत ( निष्प्रेम ) होणार नाही . घाई न करतां जा . ( नाहीतर ) पावलें अडखळल्यामुळे ह्या तुझ्या पुष्ट नितंबाला चांगला ठणका लागेल . १ .

सुसंगता —— महाराज , ही अतिशय रागीट आहे . यासाठी हात धरून हिचा रुसवा काढा .

राजा —— ( आनंदाने ) जसें तूं म्हणतेस ( तसें ) ! ( सागरिकेचा हात धरून स्पर्शसुखाचा अभिनय करतो .)

विदूषक —— गड्या , तुला ही दुसरी ( नवीन ) लक्ष्मी लाभली !

राजा —— मित्रा , खरेच !

ही लक्ष्मी ! हिचा हातदेखील पारिजातकाची कोवळी पालवी ! एरवी घामाच्या मिषाने हा अमृताचा प्रवाह कसा पाझरला असता ?

सुसंगता —— सखे , तू आता फारच निर्दय झालीस ; कारण महाराजांनी अशा रीतीने हाताचा आधार दिल्यावरसुद्धा राग सोडीत नाहीस .

सागरिका —— ( भिवया वाकड्या करून ) अग सुसंगते , अजूनहि तोंड बंद करीत नाहीस ना !

राजा —— प्रिये सागरिके , मैत्रिणीवर असा राग धरणें शोभत नाही .

विदूषक —— ही दुसरी महाराणी वासवदत्ता !

( राजा भीतीने सागरिकेचा हात सोडतो.)

सागरिका —— ( गोंधळून ) सुसंगते , आता काय करूं ?

सुसंगता —— सखे , या तमालवृक्षाच्या आड होऊन निघून जाऊं . ( दोघी जातात .)

राजा —— ( बाजूस पाहून , आश्चर्याने ) कुठे आहे देवी वासवदत्ता ?

विदूषक —— अरे तें असे ! पुष्कळ काळ राग टिकत असल्यामुळे ती दुसरी वासवदत्ता असे मी म्हटलें !

राजा —— हत् मूर्खा , मोठ्या खटाटोपाने , दैव जोरावर असल्यामुळे , मिळालेली , जिचें प्रेम स्पष्ट झाले आहे अशी , ( रत्नावली नांवाची ) सुंदर स्त्री , आलिंगन देण्यापूर्वीच , मोठ्य़ा प्रयासाने दैवयोगामुळे लाभलेल्या , जिचे तेंज सर्व बाजूंस फाकले आहे अशा रत्नमाळेप्रमाणे गळ्यांत न घालतांच , माझ्या हातून खाली पाडलीस . १७ .

( नंतर वासवदत्ता आणि कांचनमाला येतात.)

वासवदत्ता —— गडे कांचनमाले , ती इकडच्या स्वारींनी आपली मानिलेली बटमोगरी इथून किती लांब आहे ?

कांचनमाला —— हा केळींचा मांडव ओलांडल्यावर दिसेल .

वासवदत्ता —— म्हणून आता वाट दाखव . दोघी तिथेच जाऊं .

कांचनमाला —— यावें , यावें राणीसाहेबांनी . ( दोघी चालू लागतात .)

राजा —— मित्रा , आता लाडकीला कुठे पाहायचें ?

कांचनमाला —— महाराज ज्या अर्थी जवळ बोलत आहेत त्या अर्थी ते राणीसाहेबांचीच वाट पाहत आहेत असा माझा होरा आहे . तर राणीसाहेबांनी जवळ यावें .

वासवदत्ता —— ( जवळ जाऊन ) आर्यपुत्रांचा जयजयकार असो !

राजा —— ( एकीकडे ) मित्रा , चित्रफलक झाक . ( विदूषक उचलून काखेंत ठेवितो .) ( मोठ्याने ) महाराणी , स्वागत असो , इथे बस .

वासवदत्ता —— ( बसून ) आर्यपुत्रा , खरेंच बटमोगरी फुली फुलून आली ?

राजा —— ( आश्चर्याने ) महाराणी , आम्ही अगोदर आलो ; तूं उशीर केलास म्हणून ( आम्ही बटमोकरी ) पाहिली नाही . तर ये . दोघे मिळूनच ती पाहूं .

वासवदत्ता —— ( न्याहाळून ) आर्यपुत्रांच्या तोंडावरच्या तजेल्यानेच मला समजलें की , बटमोगरी फुलांनी बहरली . म्हणून मी जात नाही .

विदूषक —— राणीसरकार , असे असेल तर आम्ही जिंकले . ( दोन हात पसरून नाचतो . काखेतून फलक पडतो .)

( राजा एकीकडे बोटाने विदूषकाला चूप करतो—— धमकी देतो.)

विदूषक —— ( एकीकडे ) गड्या , रागावूं नकोस . तूं गप्प राहा . या बाबतीत ( काय करायचे तें ) मलाच ठाऊक आहे .

कांचनमाला —— ( फलक घेऊन ) राणीसाहेब , इथे चित्रफलकावर काय काढिलें आहे . पाहा तोपावेतो !

वासवदत्ता —— ( निरखून स्वतःशी ) ही इकडची स्वारी ; ही तर सागरिका ! ( मोठ्याने , राजाला उद्देशून , रागाने आणि तिरस्काराने ) आर्यपुत्रा , हें काय ?

राजा —— ( ओशाळे हसून एकीकडे ) मित्रा , काय बोलूं ?

विदूषक —— बाईसाहेब , खरोखर आपले स्वतःचे चित्र काढणें कठीण आहे हे माझे बोलणें ऐकून प्रिय मित्राने हें ( चित्रकलेंतील ) विशेष कसब दाखविलें .

राजा —— वसंतकाने जसे सांगितले तसेंच हें आहे .

वासवदत्ता —— ( फलकावर बोट ठेवून ) आर्यपुत्रा , जी ही दुसरी आपल्या शेजारी दाखविली आहे ते काय वसंतकाचे चातुर्य ?

राजा —— ( स्मित करून ) महाराणी , गैरसमज करून घेऊ नकोस . कारण ही कोणीतरी तरुणी आपल्या मनानेच कल्पून चित्रांत काढिली आहे ; पण ती अगोदर पाहिलेली नाही .

विदूषक —— जर कधी हिच्यासारखी आम्ही पूर्वीं बघितली असेल तर खरेंच जानव्याची शपथ घेतो .

कांचनमाला —— ( एकीकडे ) राणीसाहेब , कधी असें यद्च्छेने ( घुणाक्षर - न्यायाने ) घडतेंच ; एवढ्यासाठी रागावूं नये .

वासवदत्ता —— ( एकीकडे ) अग भोळसटे , याची द्व्य़र्थी दुटप्पी बोलणीं तुला कळणार नाहीत ; हा वसंतक ( घालवेडा ) आहे खरा ! ( मोठ्याने ) अर्यपुत्रा , हें चित्र पाहून माझें तर डोके दुखूं लागले . स्वारींनी आनंदात असावे ; मी आपली जाते . ( उठून जाऊं लागते .)

राजा —— ( लुगड्याचा पदर पकडून ) महाराणी , ‘‘ प्रसन्न हो ; रागावूं नकोस !’’ असें मी म्हटलें तर राग ( मुळांत ) नसतांना ( ते बोलणे ) जुळणार ( योग्य होणार ) नाही ! ‘‘ पुन्हा असे करणार नाही ’’ असे म्हणणें , ( आता चूक केली हें ) मान्य केल्यासारखे ( पदरांत घेण्यासारखे ) होईल ! ‘‘ माझी चूक नाही ’’ हें ( म्हणणें ) सुद्धा खोटें ( लोणकढी थाप ) आहे असे तुला ठाऊक आहे ! तेव्हा हे लाडके , या वेळी काय बोलणे योग्य , हे मला उमगत नाही ! १८ .

वासवदत्ता —— ( मर्यादेने लुगड्याचा पदर ओढून ) आर्यपुत्रा , गैरसमज करून घेऊं नका . खरेंच माझे डोके दुखत आहे . एवढ्यासाठी जातें .

विदूषक —— गड्या , नशीब बलवत्तर आहे . अकालीच्या वावटळीप्रमाणे वासवदत्ता सुखाने निघून गेली .

राजा —— हत् मूर्खा , समाधान मानूं नकोस ! कुलीनपणामुळे महाराणीने सर्वतोपरी ( आवरून धरलेला ) राग तुला समजणार नाही . एकाएकी भिवया वाकड्या होऊन वर चढल्या तरीहि प्रियेने मनाच्या मोठेपणामुळे मुखावर पुरेपूर सौजन्य ठेविलें होते ! माझ्याकडे ( पाहून ) बेचैन करणारें थोडें हास्य तिने केले ; पण कठोर शब्दांचा उपयोग केला नाही ; आंतील आसवांनी जड झालेले ( पाणावलेले ) डोळे तिने वटारले नाहीत . ( अशा रीतीने ) तिने संयम करून , एकाच वेळी आपला रुसवा ( माझ्या ) निदर्शनास आणिला पण मर्यादा ( सभ्यता ) सोडिली नाही ! १९ .

तर ये . ( दोघे जातात .)

‘ कदलीगृह’ नांवाचा दुसरा अंक समाप्त.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel