श्रीगणेशाय नमः ॥

(एकदा) महर्षी एकाग्र मनाने बसलेल्या मनूच्या संमुख गेले (असता मनूने त्यांचा मोठा सत्कार केला.) तेव्हा त्यांनीहे त्याची यथाविधि उलट पूजा केली व ज्या न्यायाने प्रश्न करणे उचित होते त्या न्यायाने (म्हणजे वंदन करून, श्रद्धा व भक्ति यांनी युक्त होऊन) ते त्यास असे बोलले. ॥१॥

'हे षड्रगुणैश्वर्यसंपन्न ईश्वरा, ब्राह्मणादि चार वर्ण व संकीर्ण जाति यांचे धर्म संपूर्णपणे व क्रमाने आम्हांस सांगण्यास तूच योग्य आहेस. ॥२॥

कारण, तूच एक अचिंत्य, अपौरुषेय व अप्रमेय अशा या संपूर्ण वेदाचे अनुष्ठेय कार्य व ब्रह्मतत्त्व यांचा अर्थ (प्रतिपाद्यभाग) जाणणारा आहेस." ॥३॥

याप्रमाणे त्या महात्म्या मुनींनी मनूस प्रश्न केला असता तो अचिन्त्यसामर्थ्यवान् मनु त्या सर्व महर्षींची उत्तम प्रकारे स्तुति करून "ठीक आहे. ऐका" असे उलट म्हणाला ॥४॥

प्रलयकाली हे जग तमसंज्ञक प्रकृतीमध्ये लीन झालेले होते. त्यामुळे ते प्रत्यक्ष दिसत नव्हते. त्यांचे मागे काहीलिंग न राहिल्यामुळे त्याच्याविषयी अनुमान करिता येणेही शक्य नव्हते. त्याचा शब्दांच्या द्वाराही तर्क करिता येत नव्हता, फार काय पण अर्थपत्ति इत्यादि इतर प्रमाणांच्या योगानेही त्याचे ज्ञान होत नव्हते. तर ते चोहोकडून स्वस्थ निजल्याप्रमाणे होऊन राहिले होते. ॥५॥

पण पुढे प्रलयकाल समाप्त झाला असता स्वेच्छेने शरीर धारण करणारा, बाह्य इंद्रियांचा विषय न होणारा, या महाभूतादिकांस प्रथम सूक्ष्मरूपाने व नंतर स्थूलरूपाने व्यक्त करणारा व ज्याचे सृष्टिसामर्थ्य कधीही प्रतिबद्ध होत नाही असा हा प्रकृतीस प्रेरणा करणारा परमात्मा प्रकट झाला. ॥६॥

जो हा सर्व लोक, वेद, इतिहास, पुराणे इत्यादिकांमध्ये प्रसिद्ध असलेला, केवळ मनाने ग्रहण करिता येणारा, श्रोत्र, नेत्र इत्यादि बाह्य इंद्रियांचा विषय न होनारा, अवयवरहित, नित्य, सर्व भूतांचा आत्मा व त्यामुळेंच अचिंत्य (इयत्ताशून्य) ईश्वर तोच महत्तत्त्वादि कार्यरूपाने स्वतः व्यक्त झाला. ॥७॥

नानाप्रकारची प्रजा निर्माण करण्याची इच्छा करणारा तो परमात्मा "जल निर्माण होवो" असे केवल ध्यान करून त्याच्या योगानेच प्रथम जल उत्पन्न करिता झाला. व त्या जलामध्ये त्याने शक्तिरूप बीज पेरिले. ॥८॥

ते बीज परमेश्वराच्या इच्छेने सुवर्णासारिखे शुद्ध अंडे झाले. त्याची प्रभा सूर्यासारखी होती. त्या अंड्यामध्ये हा स्वतः परमात्माच सर्व लोकांचा जनक जो हिरण्यगर्भ (ब्रह्मा) तो झाला. ॥९॥

जलास 'नारा' असे म्हणतात. कारण, ते नरसंज्ञक परमात्म्याची संतति आहे व ते 'नारा' नामक जल पूर्वी ब्रह्मरूपाने राहिलेल्या ईश्वराचे अयन म्हणजे आश्रयस्थान होते. म्हणून त्यास वेदादिकांमध्ये नारायण असे म्हटले आहे. ॥१०॥

लोक व वेद यांमध्ये प्रसिद्ध असलेले, अव्यक्त, नित्य, सत् व असद्रूप जे कारण त्याने उत्पन्न केलेल्या त्या पुरुषास सर्वत्र 'ब्रह्मा' असे म्हणतात. ॥११॥

त्या अंड्यामध्ये तो ब्रह्मा आपल्या एक वर्षभर राहून 'ह्या अंड्याचे दोन भाग होवोत' असा आपणच विचार करून स्वतःचे त्याचे दोन भाग करिता झाला. ॥१२॥

त्या दोन शकलांती वरच्या शकलाच्या योगाने स्वर्ग व खालच्या शकलाच्या योगाने भूमि त्याने निर्मिले व त्या दोन लोकांच्यामध्ये आकाश, पूर्व, आग्नेयी इत्यादि आठ दिशा व जलाचे शाश्वत स्थान म्हणजे समुद्र त्याने निर्मिला. ॥१३॥

नंतर ब्रह्मदेव परमात्म्यापासून मनास उत्पन्न करिता झाला. "मन आहे" हे लोक व वेद या दोन्ही प्रमाणांवरून सिद्ध होत असल्यामुळे ते सद्र्प आहे पण ते प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळे असत आहे. असो; त्या मनाच्यापूर्वी "मी" असा अभिमान करणारा व आपले कार्य करण्यास समर्थ असलेला जो अहंकार त्यास त्याने निर्मिले. ॥१४॥

अहंकाराच्या पूर्वी त्याने महत नामक तत्त्वास आत्म्यापासूनच उत्पन्न केले. ते आत्म्यापासून उत्पन्न झालेले असल्यामुळे त्यास आत्मा असे म्हणतात. एवढा वेळ जी सांगितली आहेत व यापुढे जी मी सांगणार आहे ती सर्व उत्पन्न होणारी तत्त्वे सत्त्व, रज व तमोगुणयुक्त आहेत. शब्दादि विषयांचे ग्रहण करणारी पाच ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रियेही हळुहळु त्याने निर्मिली. ॥१५॥

पूर्वोक्त अहंकार व पाच तन्मात्रे या अति वीर्यवान सहा तत्वांचे जे सूक्ष्म अवयव त्यांस त्यांच्या त्यांच्या इंद्रियादि व आकाशादि विकारांमध्ये योजून तो ब्रह्मा सर्व भूतांस निर्माण करिता झाला. ॥१६॥

शरीर संपादन करणारे सूक्ष्म (तन्मात्रे व अहंकाररूप सहा) अवयव प्रकृतियुक्त ब्रह्माच्या भूतादि व इंद्रियादि वस्तूंचा आश्रय करितात म्हणून त्या ब्रह्मदेवाच्या स्वभावास (मूर्तीस) शरीर असे ज्ञानी म्हणतात. ॥१७॥

शब्दादि पंचतन्मात्र रूपाने असलेल्या ब्रह्मामध्ये आकाशादि महाभूते प्रवेश करतात. म्हणजे तन्मात्रांपासून त्यांची आपापल्या कार्यांसह उत्पत्ति होते. मूर्त पदार्थास अवकाश देणे हे आकाशाचे कार्य, उडविणे, धारण करणे हे वायूचे, पाक करणे हे तेजाचे, गोळा बनविणे हे जलाचे व प्राण्यांस धारण करणे हे पृथ्वीचे कार्य होय. अहंकार रूपाने अवस्थित असलेल्या ब्रह्मामध्ये मन प्रवेश करिते. म्हणजे अहंकारापासून सूक्ष्म अवयवांसह मन उत्पन्न होते. ते शुभाशुभ कर्मांच्या द्वारा सर्व भूतांचे निमित्त आहे व ते मोक्ष होईतो रहाणारे असल्यामुळे अविनाशी आहे. ॥१८॥

महतत्त्व, अहंकार व पंचतन्मात्रे हे जे, आत्म्यापासून निर्माण झालेले असल्यामुळे पुरुषसंज्ञेस पात्र झालेले व स्वकार्य करण्यास समर्थ असलेले सात पदार्थ (तत्त्वे) त्याच्या शरीरास निर्माण करणार्‍या भागांपासून हे नाशिवंत जग होते. कार्याच्या अपेक्षेने स्थिर असणारे जे वर सांगितलेले कारण त्यास येथे अव्यय असे म्हटले आहे व अविनाशी कारणापासून हे विनाशी जग (कार्य) झाले असे सांगितले आहे. ॥१९॥

आकाशादि पांच भूतांतील पहिल्या पहिल्या भूताचा गुण पुढचे पुढचे भूत घेते. त्यामुळे भूताची जी क्रमवाची संख्या असते तितक्याच गुणांनी ते युक्त असते. आकाश पहिले भूत आहे म्हणून त्याचा शब्द हा एकच गुण; वायु हे दूसरे भूत म्हणून त्याचे शब्द व स्पर्श असे दोन गुण; तिसर्‍या तेजाचे शब्द, स्पर्श व रूप असे तीन गुण; चवथ्या जलाचे शब्द, स्पर्श, रूप व रस असे चार गुण आणि पांचव्या पृथ्वीचे गंधासह पाच गुण असतात. ॥२०॥

हिरण्यगर्भरूपाने असलेला तो परमात्मा सर्व प्राण्यांची भिन्न भिन्न नावे व कर्म पूर्वकल्पामध्ये जशी होती तशीच सृष्टीच्या आरंभी वेदशब्दांवरुन समजून घेऊन निर्माण करता झाला. व त्याने कुंभाराने घट करावे, कोष्ट्याने वस्त्रे विणावी इत्यादि भिन्न भिन्न लौकिक व्यवस्थाही केली. ॥२१॥

तो ब्रह्मदेव, कर्मे हाच ज्यांचा स्वभाव आहे असे प्राणी व पाषाणादि अप्राणी यांचा समूह, देवांचा समूह, देवांचाच एक प्रकार असे जे साध्य त्यांचा समूह व सनातन यज्ञ यांस उत्पन्न करिता झाला. ॥२२॥

तो ब्रह्मा, ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद या नावांचे तीन नित्य वेद अग्नि, वायु व सूर्य यांपासून यज्ञसिद्ध्यर्थ उत्पन्न करिता झाला. ॥२३॥

त्याचप्रमाणे काल, कालाचे मास, ऋतु, अयन इत्यादि विभाग, नक्षत्रे, ग्रह, नद्या, समुद्र, पर्वत, सम व विषम स्थाने, प्राजापत्य, चांद्रायण इत्यादि तप, वाणी, चित्ताचे समाधान, इच्छा, क्रोध इत्यादि सृष्टि, ही पुढे सांगितली जाणारी देवादि प्रजा उत्पन्न करण्याची इच्छा करणार्‍या ब्रह्मदेवाने निर्माण केली. ॥२४-२५॥

कर्माच्या विवेकार्थ धर्म व अधर्म यांचे त्याने विवेचन केले व सुख दुःख, लाभ अलाभ, शीत उष्ण इत्यादि द्वंद्वे या प्रजेच्या ठायी योजिली ॥२६॥

सारांश, पंचमहाभूतांच्या ज्या ह्या सूक्ष्म व परिनाम पावणार्‍या तन्मात्ररूपी पांच मात्रा सांगितलेल्या आहेत त्यांच्यासह हे सर्व क्रमाने (म्हणजे सूक्ष्मापासून स्थूल व स्थूलापासून अतिस्थूल) उत्पन्न होते. ॥२७॥

तो प्रभु, प्रथम ज्या प्राण्यास ज्या कर्मामध्ये नियुक्त करिता झाला तो या सृष्टीमध्ये पुनः पुनः उत्पन्न झाला असता तेच ते आपल्या जातीचे कर्म करू लागला. (म्हणजे प्रजापतीने प्रथम व्याघ्र या जातीच्या प्राण्यास उत्पन्न करून हिंसा या कर्मामध्ये नियुक्त केले म्हणून त्यानंतर झालेले व्याघ्रही तेच कर्म करू लागले. सर्वांचय स्वजातीय कर्मांचा हाच प्रकार आहे.) ॥२८॥

सारांश, हिंस्त, अहिंस्त्र, मृदु, क्रूर, धर, अधर्म, सत्य असत्य इत्यादि धर्मातील जो धर्म त्या प्रभूने सृष्टिसमयी ज्यास लावून दिला तोच पुढे त्याच्यामध्ये आपोआप येऊ लागला. ॥२९॥

ज्याप्रमाणे वसंतादि ऋतु बदलला असता त्याची आंब्यांवर मोहोर येणे इत्यादि चिन्हे आपोआप होऊ लागतात त्याप्रमाणे प्राण्यांचि हिंस्त्र, अहिंस्त्र इत्यादि कर्मे जन्मतःच त्यांच्या मागे लागतात. ॥३०॥

भूर्लोक, भुवर्लोक इत्यादि लोकांच्या विवृद्ध्यर्थ त्याने आपल्या मुख, बाहु, उरु व पाद या चार अवयवांपासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांस निर्मिले. ॥३१॥

तो ब्रह्मदेव आपल्या देहाचे दोन भाग करिता झाला. एका भागाने तो स्त्री झाला व दुसर्‍या अर्ध्या भागाने पुरुष झाला त्या स्त्रीच्या ठायी मैथुनधर्माने तो विराटनामक पुरुषास उत्पन्न करिता झाला. ॥३२॥

अहो उत्तम ब्राह्मणांनी ! तो विराट पुरुष स्वतः तप करून ज्यास उत्पन्न करिता झाला तोच य सर्व जगास निर्माण करणारा मी मनु आहे असे समजा. ॥३३॥

प्रजेस उत्पन्न करण्याची इच्छा करणार्‍या मी अति दुष्कर तप करून प्रथम दहा प्रजापतिमहर्षीस उत्पन्न केले. ॥३४॥

मरीचि, अत्रि, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, ऋतु, प्रचेतस, वसिष्ठ, भृगु व नारद हे ते दहा महर्षि होत. ॥३५॥

हे दहा अति तेजस्वी प्रजापति दुसर्‍या सात अति तेजस्वी मनूस, देवांस, देवांच्या स्वर्गादि निवासस्थानास व महर्षीस उत्पन्न करिते झाले. ॥३६॥

यक्ष, राक्षस, पिशाच, गंधर्व, अप्सरा, विरोचनादि असुर, वासुकि इत्यादि नाग, सामान्य सर्प, पितरांचे भिन्न भिन्न गण, मेघांमध्ये चमकणारी विद्युत, वृक्षादिकांवर पडून त्यांचा नाश करणारी वीज, मेघ, इंद्रधनुष्य, अंतरिक्षातून पडणारी रेखाकार ज्योति, अंतरिक्षात होणारा गडगडाट, शेंडे नक्षत्रे, व तशाच लहानमोठ्या ध्रुव, अगस्त्य इत्यादि ज्योति, किन्नर, वानर, मत्स्य, पक्षी, पशु, हरिणे, मनुष्ये ज्यांस खाली वर दात आहेत असे सिंहादि प्राणी, कृमि, मोठे किडे, पतंग, उवा, माशा, ढेकूण, सर्व दंश करणारे प्राणी व वृक्षलतादि सर्व स्थावर प्राणिजात इत्यादि हे सर्व स्थिरचर जग त्यांच्या त्यांच्या कर्मानुरूप माझ्या आज्ञेने त्या महात्म्यांनी तपाच्या योगाने निर्माण केले. ॥३७-४१॥

ज्या प्राण्यांचे जे कर्म या संसारामध्ये पूर्व आचार्यांनी सांगितले आहे व जन्मादिकांच्या क्रमाचा जो योग आहे ते सर्व मी तुम्हांस जसेच्या तसेच सांगतो. ॥४२॥

गाय, म्हैस इत्यादि पशु, हरिणे, ज्यास दोन्हीकडे दात आहेत असे व्याल, राक्षस, पिशाचे व मनुष्ये हे जरायुज प्राणी आहेत. जरायु म्हणजे वार; त्यातून हे प्राणी बाहेर पडतात म्हणून ते जरायुज होत. ॥४३॥

पक्षी, सर्प, नक्र, मत्स्य, कासवे व अशाच प्रकारचे सरडे इत्यादि स्थलचर व शंखादि जलचर प्राणी ते अंडज होते. हे प्रथम अंड्यात होतात व नंतर त्यातून निघतात म्हणून हे अंडज होत. ॥४४॥

चिलटे, उवा, माशा, ढेकूण इत्यादि प्राणी व तसेच प्रत्यक्ष उष्णतेपासून होणारे मुंग्यासारिखे व असेच दुसरेही प्राणी स्वेदज होय. स्वेद म्हणजे पार्थिव पदार्थास उष्णतेमुळे प्राप्त होनारा ओलसरपणा, त्याच्यापासून वरील प्राण्यांची उत्पत्ति होते म्हणून त्यास स्वेदज म्हणतात. ॥४५॥

वृक्षादि स्थावर पदार्थ उद्भिज्ज आहेत. कारण, ते बीज व भूमी यांस फोडून वर येत असतात. पण त्यांच्यामध्ये दोन प्रकार आहेत. काही बीजापासून निर्माण होतात व काहींच्या शाखा भूमीत पुरल्या तरी त्याच्यापासून वृक्ष होतात. आता त्यात ज्या औषधी असतात त्यांची फळे पक्व झाली की, त्या मरतात व त्यास पुष्कळ फुले व फळे येतात. ॥४६॥

ज्यास फुले न येताच फळे लागतात त्यास वनस्पति म्हणावे. वृक्षांस फुलेहि येतात व फळेहि येतात म्हणजे ते दोन्ही प्रकारचे असतात. ॥४७॥

ज्यास मूळापासूनच वेलींचा समूह असतो व काडी नसतात त्यांस गुच्छ म्हणतात. मोगरीचा वेल हे एक गुच्छांचे उदाहरण आहे. ज्यास एकच फळ असून त्याचा पुढे मोठा समूह होतो. त्यास गुल्म म्हणतात. ऊस हे याचे उदाहरण आहे. अनेक प्रकारचे गुच्छ, गुल्म, तशाच गवताच्या अनेक जाति, तंतुयुक्त भोपळे, काकड्या इत्यदिकांच्या वेली व गुळवेलीसारख्या तंतुरहित वेली इत्यादि सर्व बीजांपासून व कांडांपासून उत्पन्न होतात. ॥४८॥

हे सर्व वृक्षादि स्थावर प्राणी विचित्र दुःखरूपी फल देणार्‍या व अधर्मापासून उत्पन्न झालेल्या तमोगुणाने व्याप्त आहेत. यांचे चैतन्य आतल्या आत असते. म्हणजे त्यास स्वेदज, अंडज व जारज प्राण्याप्रमाणे बहिर्व्यापार करिता येत नाही. त्यांच्यामध्ये तमोगुण फार असतो म्हणून त्यास तमाने व्याप्त असे जरी म्हटले तरी त्यांच्यामध्ये सत्त्व व रज गुणांचाही अंश असतो व त्यामुळे ते सुखदुःखयुक्त होतात. उन्हाच्या तापाने कोमेजून गेलेल्या कोमल वृक्षावर पाणी शिंपडले असता त्यास टवटवी येते हे प्रसिद्ध आहे. ॥४९॥

क्षेत्रज्ञांच्या या घोर व प्रवाहाप्रमाणे सतत चालणार्‍या जन्ममरणपरंपरेमध्ये होणार्‍या ब्रह्मादि स्थावरांत उत्पत्ति सांगितल्या. ॥५०॥

याप्रमाणे ह्या सर्व चराचर जगास व मला उत्पन्न करून ज्याची शक्ति अचिंत्य आहे असा तो प्रजापति सृष्टिकालास प्रलयकालाने नष्ट करीत म्हणजे प्राण्यांच्या कर्माप्रमाणे पुनःपुनः सर्व व प्रलय करीत स्वरूपामध्ये अंतर्धान पावतो. ॥५१॥

ज्यावेळी तो देव जागा होतो म्हणजे सृष्टि व स्थिति यांची इच्छा करितो त्यावेळी हे जग श्वास, प्रश्वास, आहार इत्यादि चेष्टा करिते व ज्यावेळी याचा आता उपसंहार करावा असे त्यास वाटते व तो निजतो म्हणजे इच्छारहित होतो तेव्हा हे जग प्रलय पावते. ॥५२॥

याप्रमाणे तो स्वस्थ निद्रित झाला असता कर्माप्रमाणे देह धारण करणारे प्राणी आपल्या देहधारणादि कर्मापासून निवृत्त होतात व त्यांचे मन सर्व इंद्रियांसह वृत्तिशून्य होते. ॥५३॥

(आता महाप्रलय सांगतात) एकाच काली जेव्हा त्या महात्म्यामध्ये सर्व भूते प्रलय पावतात तेव्हा त्या सर्व भूतांचा आत्मा जाग्रत्स्वपन व्यापार सोडून सुखाने निजल्यासारिखा होऊन रहातो. ॥५४॥

हा जीव ज्ञाननिवृतिरूप तमाचा आश्रय करून दीर्घकाल इंद्रियादिकांसह रहातो. तो आपले श्वासप्रश्वासादि कर्मही करीत नाही व अशा वेळी तो पूर्वदेहांतून निघून अन्यत्र जातो. ॥५५॥

(हे प्राण्याच्या मरणाचे वर्णन होय.) (पाच भूते, पुर्यष्टक असे म्हणतात.) या आठ अणुमात्ररूप होऊन जेव्हा तो वृक्षादिकांचे कारण व मनुष्यादिकांचे कारण अशा बीजामध्ये प्रवेश करतो तेव्हा पुर्यष्टकरूप झालेला तो कर्मानुरूप दुसर्‍या स्थूल देहाचे ग्रहण करतो. ॥५६॥

याप्रमाणे तो अविनाशी ब्रह्मा आपल्या जाग्रत्स्वप्नांच्या योगने या स्थावरजंगमात्मक जगास सतत उत्पन्न करतो व त्याचा नाश करतो. ॥५७॥

तो ब्रह्मदेव हे शास्त्र करून प्रथम ते मला यथाविधि स्वतः शिकविता झाला. नंतर मी ते मरीच्यादि पूर्वोक्त मुनीस शिकविले. ॥५८॥

आता हा भृगु हे शास्त्र तुम्हांस संपूर्णपणे सांगेल. कारण, या मुनीने ते मजपासून संपूर्णपणे व निःशेष समजून घेतले आहे. ॥५९॥

त्या मनूने ज्यास असे सांगितले आहे असा तो भृगु तदनंतर संतुष्ट मनाने त्या सर्व ऋषीस "ऐकावे" असे म्हणाला. ॥६०॥

स्वयंभूपासून निर्माण झालेल्या या स्वायंभुव मनूचे वंशज दुसरे सहा मनु झाले. त्या महासामर्थ्यवान महात्म्यांनी आपली आपली प्रजा निर्माण केली. ॥६१॥

स्वारोचिष, उत्तमम, तामस, रैवत, चाक्षुष व महातेजस्वी वैवस्वत हे ते सहा मनु होत. ॥६२॥

अतितेजस्वी अशा या सातही स्वायंभुवादि मनूंनी आपल्या आपल्या अंतरांत म्हणजे अधिकारकाली हे सर्व चराचर जग निर्माण करून त्याचे रक्षण केले. ॥६३॥

डोळ्यांच्या पापण्या क्षणाक्षणांस मिटत असतात. त्यास निमेष असे म्हणतात. असे अठरा निमेष झाले असता एक काष्ठा होते. तीस काष्ठांची एक कला होते, तीस कलांचा एक मुहूर्त होतो व तीस मुहूर्ताची एक अहोरात्र होते. ॥६४॥

सूर्य मनुष्यांच्या व देवांच्या दिवसांचा व रात्रींचा विभाग करतो. (म्हणजे त्याचे दिवस व रात्र हे कालविभाग सूर्यामुळे होतात.)

त्यातील रात्रि हा काल भूतांच्या निद्रेकरिता व दिवस कर्मे करण्याकरिता आहे. ॥६५॥

मनुष्यांचा एक मास हीच पितरांची एक अहोरात्र होय. पक्षांच्या योगाने त्यांचा विभाग होतो. मनुष्यांचा कृष्णपक्ष हाच त्यांच्या कर्मानुष्ठानाकरता दिवस व शुक्लपक्ष हीच त्यांच्या शयनाकरता रात्रि आहे. ॥६६॥

मनुष्यांचे एक वर्ष हीच देवांची अहोरात्र आहे. त्यांचा विभाग असा-मनुष्यांचे उदगयन हा देवांचा दिवस व दक्षिणायन ही रात्रि होय. ॥६७॥

ब्रह्मदेवाच्या अहोरात्रीचे प्रमाण व कृतादि प्रत्येक युगाचे प्रमाण मी आता क्रमाने थोडक्यात सांगतो ते ऐका. ॥६८॥

देवांची चार हजार वर्षे कृतयुगाचा काळ आहे असे मन्वादि सांगतात. युगाच्या पूर्वी जो थोडा असतो त्यास संध्या व युग संपल्यावर दुसरे युग लागेपर्यंत जो काल जातो त्यास संध्यांश म्हणतात. कृतयुगाची संध्या चारशे वर्शे असते व संध्यांशही चारशे वर्षे असतो. ॥६९॥

बाकी जी त्रेता, द्वापर व कलि अशी तीन युगे राहिली त्यांचा संध्या व संध्याश यांसह क्रमाने एकेक कमी इतकी हजार व शंभर वर्षे असतात. म्हणजे तीन हजार, दोन हजार व एक हजार देवांची वर्षे त्रेतादि युगांचे क्रमाने प्रमाण असून सहाशे, चारशे व दोनशे वर्षे हे त्यांच्या त्यांच्या संध्या व संध्यांश या दोघांचे मिळून प्रमाण आहे. ॥७०॥

ही जी मनुष्यांची चार युगे वर सांगितली आहेत ती सर्व मिळून देवांचे एक युग होते. म्हणजे मनुष्यांची युगे, संध्या आणि संध्याश ही सर्व मिळून देवांचे एक युग होते. म्हणजे मनुष्यांची युगे, संध्या आणि संध्यांश ही सर्व मिळून जी देवाची बारा हजार वर्षे होतात तेच त्यांचे युग होय. ॥७१॥

देवांची ही अशी एक सहस्त्र युगे झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो असे समजावे व त्याच्या रात्रींचेही तेच प्रमाण आहे. ॥७२॥

तो ब्रह्मदेवाचा पवित्र दिवस देवांची एक सहस्त्र युगे झाली असता संपतो व रात्रही एक सहस्त्र युगानेच संपते असे जे जाणतात तेच अहोरात्रवेत्ते होते. ॥७३॥

तो निजलेला ब्रह्मा, त्याची अहोरात्र संपली असता जागा होतो व जागा झाल्यावर तो आपल्या सदसद्रूप मनास सृष्टीमध्ये नियुक्त करतो. ॥७४॥

परमात्म्याच्या सृष्टीविषयींच्या इच्छेने ज्यास प्रेरणा केली आहे असे मन म्हणजे महत्तत्व सृष्टि करते. त्याच्यापासुन अहंकार, तन्मात्रे इत्यादि क्रमाने आकाश होते. शब्द हा त्याचा गुण आहे असे समजतात. ॥७५॥

विकारास उत्पन्न करणार्‍या आकाशापासून सुगंध व दुर्गंध यांस वाहणारा पवित्र व बलवान वायु उत्पन्न होतो. तो स्पर्शगुणवान आहे असे मन्वादिकांस संमत आहे. ॥७६॥

विकार पावणार्‍या वायुपासून अन्य पदार्थांस प्रकाशित करणारे, अंधकाराचा नाश करणारे, व प्रकाशरूप असे तेज निर्माण होते, रूप हा त्याचा गुण आहे. ॥७७॥

विकार पावणार्‍या तेजापासून रस या गुणाने युक्त असलेले आप (जल) उत्पन्न होते व आपापासून गंधगुणवाली पृथ्वी होते. अशा प्रकारची ही महाप्रलयानंतर सृष्टीच्या आरंभी भूतांची उत्पत्ति होते. ॥७८॥

पूर्वी जे बारा सहस्त्रवर्षात्मक देवीचे युग सांगितले आहे. त्याच्याच एकाहत्तरपट मन्वंतराचा काल या शास्त्रात सांगितलेला आहे. म्हणजे देवांची अशी एकाहत्तर युगे झाली असता एक मन्वंतर होते. ॥७९॥

मन्वंतरे, सर्ग व प्रलय यांची संख्या करवत नाही. परमस्थानी रहाणारा हा (परमेष्ठी) परमात्मा जणू काय खेळत असल्याप्रमाणे हे सर्व पुनः पुनः करतो. ॥८०॥

कृतयुगामध्ये सकल धर्म सर्वांगपरिपूर्ण असतो व त्या युगामध्ये सत्य असते. त्या युगात शास्त्राचे उल्लंघन करून मनुष्यास धन, विद्या इत्यादिकांची प्राप्ति होत नाही. ॥८१॥

त्रेतादि इतर युगामध्ये मनुष्ये अधर्माने धनादिकांची प्राप्ति करुन घेऊ लागल्यामुळे तो धर्म पादशः क्षीण केला जातो. त्याचप्रमाणे धन, विद्या इत्यादिकांच्या द्वारा अर्जन केलेला असाही जो धर्म चालतो तो चौर्य, असत्य, कपट इत्यादिकांच्या योगाने प्रत्येक युगात पादशः र्‍हास पावतो. ॥८२॥

सत्ययुगामध्ये रोगांचे निमित्त जे अधर्मादि त्याचा अभाव असल्यामुळे प्रजा रोगशून्य असते. त्यांचे सर्व मनोरथ सफल होतात व लोकांचे आयुष्य चारशे वर्ष असते. पण त्रेतादि युगांमध्ये त्यांचे आयुष्य पादशः कमी होते. ॥८३॥

वेदांत सांगितलेले मनुष्यांचे आयुष्य, काम्य कर्मांच्या फलाविषयींच्या आशा व ब्राह्मणादि प्राण्यांचा निग्रहानुग्रहादि प्रभाव हे सर्व युगाप्रमाणे फळ देतात. ॥८४॥

कृतयुगात धर्म निराळे असतात, त्रेतायुगात निराळे असतात; द्वापरांत निराळे असतात व कलियुगांत युगाच्या र्‍हासानुरूप मनुष्यांचे धर्म निराळे असतात. ॥८५॥

तपादि सर्व धर्म सर्व युगांमध्ये सारखेच अनुष्ठेय आहेत हे जरी खरे आहे तरी सत्ययुगात तप हे मुख्य साधन आहे. त्रेतायुगात ज्ञान; द्वापरात यज्ञ व कलियुगात दान मुख्य आहे. ॥८६॥

तो महातेजस्वी ब्रह्मा या समग्र सृष्टीच्या रक्षणार्थ मुख, बाहु ऊरु व पाय यांपासून निर्माण झालेल्या ब्राह्मणादिकांची दृष्ट व अदृष्ट फल देणारी कर्मे भिन्न भिन्न निर्माण करिता झाला. ॥८७॥

अध्यापन, अध्ययन, यजन, याजन, दान व प्रतिग्रह (म्हणजे दान घेणे) ही सहा कर्मे त्याने ब्राह्मणाकरिता नियत केली. ॥८८॥

प्रजेचे रक्षण, दान, यज्ञ, अध्ययन व विषयांमध्ये आसक्त न होणे ही संक्षेपतः क्षत्रियांची कर्मे होत. ॥८९॥

पशूंचे रक्षण, दान, यज्ञ, अध्ययन, वाणिज्य (व्यापार) व्याजबट्टा व शेती ही वैश्याची कर्मे आहेत. ॥९०॥

या तीन वर्णाच्या लोकांची परिचर्या, त्यांच्या गुणाचे ठायी दोषदृष्टी न ठेवता करणे हे एकच कर्म प्रभूने शूद्राकरिता नियत केले आहे. ॥९१॥

पुरुषाचे शरीर सर्वच पवित्र आहे. पण त्यातूनही ते नाभीच्यावर अधिक पवित्र आहे व मुख तर त्याहूनही पवित्र आहे असे स्वयंभूने सांगितले आहे. ॥९२॥

अशा उत्तम अंगापासून उत्पन्न झाल्यामुळे, क्षत्रियादिकांच्या पूर्वी उत्पन्न झाल्यामुळे, वेदांचे अध्ययन, अध्यापन इत्यादिकांच्या द्वारा धारण करीत असल्यामुळे ब्राह्मण हा या सर्व सृष्टीचा प्रभु आहे. ॥९३॥

देव व पितर यांचे हव्य व कव्य नामक अन्न पोचविण्याकरिता व त्याच्या द्वारा सर्व जगाचे रक्षण करण्याकरिता ब्रह्मदेव तप करून आपल्या मुखापासून ब्राह्मणांस प्रथम निर्माण करता झाला. ॥९४॥

ज्याच्या मुखाने देव सदा हव्ये खातात व पितर कव्ये खातात, त्याच्यापेक्षा उत्कृष्ट भूत दुसरे कोण असणार? ॥९५॥

भूतापासून विकार पावणार्‍या स्थावरजंगमरूप पदार्थामध्ये कीटादि प्राणी श्रेष्ठ आहेत; त्यांच्यामध्ये जेथे लाभ होईल तेथे जाणे व न होईल तेथे न जाणे इत्यादि बुद्धिपूर्वक व्यवहार करणारे पश्वादि श्रेष्ठ आहेत. अशा बुद्धिमानांमध्येही विद्वान ब्राह्मण श्रेष्ठ आहेत, व मनुष्यामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ मानिलेले आहेत. ॥९६॥

ब्राह्मणांमध्येही विद्वान ब्राह्मण श्रेष्ठ आहेत, विद्वानांमध्ये जे कृतबुद्धि असतात ते श्रेष्ठ होत (कोणतेही धार्मिक कृत्य उपस्थित होताच मी ते केलेच पहा असे जे म्हणतात म्हणजे इतके जे तयार असतात त्यास कृतबुद्धि म्हणावे.) त्यांच्यापेक्षाही अनुष्ठान करणारे श्रेष्ठ होत. व त्याहूनही ब्रह्मवेत्ते श्रेष्ठ आहेत. ॥९७॥

केवल ब्राह्मणाच्या शरीराची उत्पत्ति हेच धर्माचे अविनाशी शरीर होय. ब्राह्मण हा प्राणी धर्माकरिताच उत्पन्न झालेला आहे. यास्तव, तो आत्मज्ञानाच्या द्वारा मोक्षास समर्थ होतो. ॥९८॥

कारण, उत्पन्न होणारा ब्राह्मण पृथ्वीमध्ये सर्वात श्रेष्ठच होतो. सर्व भूतांच्या धर्मसमूहाच्या रक्षणार्थ तो प्रभु आहे. ॥९९॥

या जगामध्ये जेवढे म्हणून धन आहे ते जणु सर्व ब्राह्मणाचेच आहे. कारण, श्रेष्ठता व कुलीनता या दोन गुणांमुळे त्या सर्वास ब्राह्मण योग्य आहे. ॥१००॥

ब्राह्मण जे काही दुसर्‍यांचेही खातो ते तो वस्तुतः आपलेच खातो. जे वस्त्र दुसर्‍याकडून घेऊन नेसतो ते तो आपलेच नेसतो व जे एकाकडून घेऊन दुसर्‍यास देतो तेही आपलेच देतो आणि असा प्रकार असल्यामुळे केवल ब्राह्मणाच्या करुणेमुळेच इतर जन भोजनादि करतात. ॥१॥

त्या ब्राह्मणांच्या व इतर क्षत्रियादिकांच्या कर्माचे ज्ञान व्हावे म्हणून बुद्धिमान स्वायंभुव मनु हे शास्त्र रचिता झाला. ॥२॥

विद्वान ब्राह्मणाने या शास्त्राचे प्रयत्नपूर्वक अध्ययन करावे व ते शिष्यांस उत्तम प्रकारे त्यानेच शिकवावे. क्षत्रियादि दुसर्‍या कोणी ते कोणास शिकवू नये. ॥३॥

ज्याने व्रतानुष्ठान केले आहे अशा या शास्त्राचे अध्ययन करणारा ब्राह्मण मन, वाणी व शरीर यांच्या द्वारा घडणार्‍या कर्मांच्या दोषांनी कधीच लिप्त होत नाही. ॥४॥

या शास्त्राचे अध्ययन करणारा अपाक्त या दोषाने अशुद्ध ठरलेल्या सर्व पंक्तीस पवित्र करतो. आपल्या वंशात झालेल्या पिता, पितामह इत्यादि मागचे सात व पुत्र, पौत्र इत्यादि पुढचे सात एकंदर चवदा पुरुषांचा उद्धार करतो. तो एकटाच या सर्व पृथ्वीसही योग्य आहे. ॥५॥

इष्ट अर्थाचा नाश न होणे यास स्वस्ति म्हणतात. या शास्त्राचे अध्ययन अशा प्रकारची श्रेष्ठ स्वस्ति प्राप्त करून देणारे आहे. बुद्धीस वाढविणारे आहे. यश प्राप्त करून देणारे आहे. दीर्घायुष्य देणारे आहे. व मोक्षाच्या उपायाचा उपदेश करीत असल्यामुळे श्रेष्ठ निःश्रेयस आहे. ॥६॥

या शास्त्रात धर्म संपूर्णपणे सांगितलेला आहे. विहित व निषिद्ध कर्माची इष्ट व अनिष्ट फलेही सांगितली आहेत. ॥७॥

वेदोक्त व स्मृत्युक्त आचार हाच परमधर्म आहे. यास्तव, आपल्या हिताची इच्छा करणार्‍या द्विजाने आचारामध्ये सतत व अहर्निश तत्पर असावे. ॥८॥

आचारापासून भ्रष्ट झालेला ब्राह्मण वेदोक्त फलास प्राप्त होत नाही. पण जो आचारसंपन्न असतो तो संपूर्ण फलास पात्र होतो. ॥९॥

येणेप्रमाणे आचाराच्या द्वारा धर्मप्राप्ति होते असे जाणून ऋषि चांद्रायणादि संपूर्ण तपश्चर्येचे मुख्य मूळ आचार आहे असे निश्चित करिते झाले. ॥१०॥

(आता यापुढे या शास्त्राची विषयानुक्रमणिका सांगतात.) जगाची उत्पत्ति हा प्रथमाध्यायाचा विषय आहे. (ब्राह्मणांची स्तुति व शास्त्राची स्तुति यांचाही उत्पत्तीमध्येच अंतर्भाव होतो.) जातकर्मादि संस्काराचे अनुष्ठान, ब्रह्मचार्‍याचे व्रताचरण व गुरु इत्यादिकांस अभिवादन करणे, त्यांची उपासना करणे इत्यादि प्रकार हा दुसर्‍या अध्यायाचा विषय होय. गुरुकुलातून परत येणार्‍या शिष्याचा जो संस्कार करितात त्यास स्नान म्हणतात. त्याचा उत्तम विधि ॥११॥

विवाह, त्याच्या ब्राह्मादि प्रकारांचे लक्षण, वैश्वदेवादि पंचमहायज्ञाचे विधान व शाश्वत श्राद्धविधि हा तिसर्‍या अध्यायाचा विषय आहे. ॥१२॥

जीवनोपायाचे लक्षण, गृहस्थाचे नियम, भक्ष्य अभक्ष्य यांचा विचार, मरणादिनिमित्तक शौच, द्रव्यांची शुद्धि ॥१३॥

व स्त्रियांच्या धर्माचा उपाय (हे पाचव्या अध्यायाचे विषय आहेत.) वानप्रस्थास हितकर असे धर्म, यतिधर्म व संन्यास (हे सहाव्या अध्यायाचे विषय आहेत.) अभिषेक केलेल्या राजांचा सर्व धर्म (हा सातव्या अध्यायाचे विषय आहेत.) ऋणादि कार्यांचा (आरोपी, फिर्यादी साक्षी इत्यादिकांच्या व्यवहारांचा) विचारपूर्वक तत्त्वनिर्णय (न्याय) ॥१४॥

व साक्षी पुरुषांस प्रश्न करण्याचे विधान, हे आठव्या अध्यायाचे विषय आहेत. स्त्री व पुरुष अर्थात भार्या व पति यांचे धर्म, मिळकतीच्या वाटणीचे नियम, द्यूताविषयींचा विधि, चोरादिकांचे निरसन ॥१५॥

व वैश्य आणि शूद्र यांचे स्वधर्मानुष्ठान हे नवमाध्यायाचे विषय आहेत. अनुलोम, प्रतिलोम इत्यादि संकर पावलेल्या जातींची उत्पत्ति व आपत्काली उपजीविका कशी करावी त्याचा निर्णय हे दहाव्या अध्यायाचे विषयी होत. प्रायश्चितविधि अकराव्या अध्यायात आहे. ॥१६॥

उत्तम, मध्यम व अधम अशा तीन प्रकाच्या, शुभाशुभ कर्माच्या योगाने प्राप्त होणार्‍या देहान्तरप्राप्तिरूप संसारगमनाचा विस्तार, आत्मज्ञान, विहित व निषिद्ध कर्मांच्या गुणदोषांचे परीक्षण ॥१७॥

प्रत्येक देशात चालणारे देशधर्म, ब्राह्मणादि जातींस नियत असलेले जातिधर्म, विशेष कुलांमध्ये रूढ असलेले कुलधर्म व वेदबाह्यशास्त्रानुरूप निषिद्ध आचरण करणारे जे पाखंडी जन त्यांच्या समूहांचे धर्म या शास्त्रांत मनूने सांगितले आहेत. ॥१८॥

पूर्वी मी प्रश्न केला असता मनूने जसे हे शास्त्र मला सांगितले आहे तसेच ते अक्षरशः तुम्हीही आज मजपासून ऐका. ॥११९॥

ह्याप्रमाणे श्रीमानवधर्मशास्त्रांतील भृगुप्रोक्तसंहितेच्या प्रथमाध्यायाचा विष्णुकृत प्राकृत अनुवाद समाप्त झाला ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel