सैराट चित्रपट भयंकर हिट झाला. माझ्या मनाला ह्याचा प्रचंड आनंद झाला आणि त्याच वेळी त्याचा कारण जोहर ने बनवलेला हिंदी चित्रपट सपशेल आपटला ह्यांचा आणखीन आनंद झाला. यशाला हजार बाप असतात, अपयश नेहमी पोरके पोर असते त्या न्यायाने सैराट का हिट झाला ह्याची हजार कारणे लोक देतात. मी माझे कारण का देऊ नये ? पाय घट्ट जमिनीत ठेवून निर्माण केलेली कलाकृती केंव्हाही श्रेष्ठ, हि सामान्य लोकांच्या आदरास पात्र ठरते. सैराट मध्ये एक गोष्ट होती जी मला प्रचंड, म्हणजे प्रचंड आवडली. त्यातील झिंगाट गाण्याचे बोल. ज्या मातीतून गदिमा आणि कुसुमाग्रज जन्माला आले त्या भूमीवर मी अजय-अतुल ह्यांच्या शब्दांना मी काव्य म्हणावे ह्यावरच काही लोक भडकतील. "दोन माणसे लागून हे बोल लिहिले ? नावे तरी पहा, अजय आणि अतुल म्हणे, नावांत सुद्धा नावीन्य नाही. मराठी गणिताच्या पुस्तकांत चार कलिंगडे विकत घेऊन ९ लोकांत वाटणाऱ्या लोकांची नावे असावीत इतकी सामान्य नावे आहेत. हे लिहिणार म्हणे कविता" अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया नवीन नाहीत.

पण माझ्या मते ह्या गाण्याची जी झिंग आहे ती ह्यातंच आहे. ह्या गाण्यातील पोरसवदा हिरो चांद तार्यांची स्वप्ने दाखवत नाही. तिच्या केसांची तुलना ढगांशी करत नाही, इथे चांद तारे मध्यम वगैरे होत नाहीत. हा येतो परफ्युम मारून, ह्याचे स्वप्न काय तर तिचे नाव हातावर गोंदवावे आणि मिलन कि बेला वगैरे नाही तर त्याला पाहिजे "टेक्नो वरात". ह्याचा अर्थ काय ? तर साधे बँड असलेली वरात ती साधी. पण त्या रिक्षेवर बॅटरी घालून तो भला मोठा केसीओ वाजवत येणारी ती टेक्नो वरात. मुंबईत फ्लॅट मध्ये राहण्याऱ्याना ह्या सर्वांचे महत्व समजणार नाही पण गावांतील तरुण पोरा पोरींना त्या भावना समजतील. अजय-अतुल ह्यांचे हे बोल माझ्या मते खूप खूप चांगले आहेत कारण त्यांत मराठी मातीचा एक वास आहे. आणि असे बोल आपण काव्य ह्या विषयांत डॉक्टरेट मिळवून लिहू शकत नाही तर तुम्हाला त्या साठी "बिन देर डन डेट" असायला पाहिजे.

"तू किसी रेल सी गुजरती है में किसी पूल सा थरथरता हुं" मी हे शब्द इंडियन ओशन च्या आवाजांत ऐकले तेंव्हा अंगावर रोमांच उभे राहिले. ज्यांनी कुणी मुंबईमध्ये प्लॅटफॉर्म वर उभे राहून वेगाने जवळून जाणारी "फास्ट" अनुभवली आहे त्यांना पुलाचे थरथरणे म्हणजे काय हे वेगळे सांगायची गरज नाही. अनेकांना सवय झाली असली तरी आपण नवल असाल तर ते व्हायब्रेशन नक्कीच काळजांत जाते, आणि तुम्ही प्रेम केले असेल, तुम्हाला कुणी क्रश वगैरे असेल आणि त्याने/तुमच्याकडे ना पाहता जरी तो जवळून गेला असेल तर तुमच्या हृदयांत उत्पन्न होणारी कंपने सुद्धा तुम्ही अनुभवली असेल आणि त्याच क्षणी दुष्यंत कुमार ह्यांच्या ह्या गजलेला दाद द्यावीच लागते. रेल्वे आणि प्रेम दोन्हीचा अनुभव घेतलेला माणूसच असे शब्द लिहू शकतो. ह्या उलट काही संगीतकारांचे बोल असतात, "सुरज हुवा मध्यम", "चांद तारे तोड लावू", "सिली हवा चू गयी" असे अनेक बोल ऐकून वाटते कि नासा मध्ये खगोलशास्त्राद्न्य किंवा हवामान तद्न्य होण्याचे स्वप्न बाळगणारा बिचारा कुणी बॉलिवूड मध्ये लिहू लागला. अर्थांत ह्यांना मी हीं भावनेने पाहत नाही, ह्या प्रकारची कविता सुद्धा महत्वाची असते आणि त्याचा आस्वाद वेगळ्या प्रकारे घ्यायचा असतो. वाईन आणि स्कॉच मध्ये फरक असतो तसा. थरथरणारा प्लॅटफॉर्म आपण सर्वानीच पहिला असला तरी त्याचा संबंध थरथरणाऱ्या हृदयाशी जोडण्याची प्रतिभा आमच्याकडे नाही. पु ल देशपांडे जपानात गेले होते तेंव्हा एका टेकडीवरून त्यांनी उजळलेले शहर पहिले. अश्याच एका संध्याकाळी टागोरांनी टिमटिमते दिवे पाहून म्हणे शुभम करोति कल्याणम लिहिले पण तासली प्रतिभा आपल्याकडे नाही म्हणून देशपांडे हळहळ व्यक्त करतात. तिथे आमच्या सारख्यांचे काय ?

समाजा बालब्रह्मचारी आणि भजने लिहीणार्या एका माणसाला बॉलिवूड मध्ये बोल लिहिण्याचे काम मिळाले. मग डिरेक्टर सांगतो, "सिन असा आहे मास्तर, अक्षय कुमार आणि ममता कुलकर्णी एका खोलीत एकटी आहेत आणि ममता कुलकर्णी एकदम शृंगार भावनेत मस्त आहे आणि अक्षय कुमार वर प्रेमाचे जाळे फेकत आहे. त्याला तितका इंटरेस्ट नाही पण कुलकर्ण्यांची ममता सुद्धा मागे हटणारी नाही. ह्यावर कसे एक फक्कड असे शृंगार रस पूर्ण आणि सेक्सी गाणे लिहा". आता हा मास्तर काय लिहिणार ? त्याला मुळातंच "मी नाही त्यातली, कडी लावा आतली" चा अजिबात अनुभव नाही. त्याच्यामते स्त्रीला हात लावायचा तर ती पत्नी असणे आवश्यक. नाहीतर हा बहीण मानून बाहेर येणार. असा लेखक मग "भरो, मांग मेरी भरो, चलो प्यार मुझे करो" असे गाणे लिहितो. मुद्दाम तुनळी वर पहा. ह्यांत ममता कुलकर्णी मादक नृत्य वगैरे करून अक्षय कुमार वर कामबाण सोडण्यासाठी साधन काय काढते ? तर कुंकवाची डबी. एका अर्थाने हे बरे आहे. इथे कुंकूंच्या स्वरूपांत "कॅसेन्ट" आधीच घेतला जातोय त्यामुळे नंतर "मिटू" वगैरे आरोप होण्याची शक्यता नाही.

खूप झाले विषयांतर. आता मूळ मुद्द्याकडे यावे लागेल. ऑर्केष्ट्रा हा एक विशेष प्रकार ९०s मध्ये गावांत भयंकर प्रसिद्ध झाला होता. दसरा पासून गणेश चतुर्थी पर्यंत सगळी कडे "सूर सरगम", "आपके फनकार", "डिस्को वन" अश्या विविध बॅंड वाल्यांचा धंदा जोरात चालला होता. ऑर्केष्ट्रा चे बजेट साधारण १० हजार पासून १ लाख पर्यंत जायचे.
अमुक तारखेला गावांत ऑर्केष्ट्रा येणार म्हणजे काही ठराविक तरुण पोर आणि पोरें आपले विशेष कपडे धुवून वाळत घालायचे. ऑर्केष्ट्रा नेहमीच रात्री सुरु होत असे आणि तिथे सुद्धा काही पोरे गॉगल घालून येत असत. ऑर्केष्ट्रा सुरु करणे म्हणजे प्रोजेक्टच जणू. आधी ट्रक भरून सामान यायचे ९ + ९ ध्वनिक्षेपक दोन्ही बाजूला. मग "मायिक टेस्टिंग १ २ ३" बराच वेळ चालायचे. तिथे घुटमळणारी खटयाळ पोरें मग आपणही जाऊन वन टू थ्री करायची.

गांवातील ठराविक लोकांचा ऑर्केष्ट्राला भयंकर विरोध. त्यांच्या मते हे सर्व संस्कृती विरोधी असून ह्याला किमान धार्मिक ठिकाणी स्थान असता कामा नये. संस्कृती रक्षकांचा आव आणणारी हि मंडळी मग त्या कलाकारांसाठी विविध शब्दप्रयोग करायची ते संस्कृतीत आणि देवालयाच्या आवारांत कसे बसत मला ठाऊक नाही. कामत गुरुजी वगैरे, "अहो ह्याला का ऑर्केष्ट्रा म्हणतात? खरे ऑर्केष्ट्रा असतात ते मुंबईत. मी बघितला ना १०० रूपये देऊन ? लता मंगेशकरांचा आवाज काय काढला पोरींने म्हणून सांगू " वगैरे थापा मारत. (कारगिल युद्धाच्या वेळी मी वर्गणी मागायला गेले तेंव्हा ह्यांनी सव्वा रुपया दिला होता).

गांवातील कलाकारांना प्रोत्साहन म्हणून १ - २ गाणी आणि नृत्ये लोकल कलाकारांना म्हणजे मुलांना देण्यात येत असत. ह्या दरम्यान ऑर्केष्ट्राचे फणकार थोडा ब्रेक घेत असत.

ऑर्केष्ट्रा ची टीम म्हणजे कोण तर प्रत्येकाचे नाव टोपण नाव असे. मुख्य सूत्रधार जो भाड्याने आणलेला आणि फिटिंग न जमणारा सूट घालून बोलत असे त्याचे नाव मग "राहुल कुमार" असे असायचे. ह्याचा आवाज चांगला असला तरी पर्सनॅलिटी मात्र हॉटेलांतील वेटरची. गायिका साधना, मिस माधुरी वगैरे. गिटार वर नेहमी जॉन किंवा सन्नी. आणि तो मोठ्ठाला ढोल दोन काठ्यांनी बडविणारा असाच कुणीतरी. मग तो सूत्रधार नेहमीच हिंदीतून बोलायचा पण त्यातून त्याचा मराठी अक्सेंट साफ दिसायचा. मग त्याचे तेच तेच जोक्स. म्हणजे गांवातील लोकांना हिंदी भाषेंतून "तकिया कलाम" चे जोक तो का सांगायचा आणि "गुरुवार को तू आयेगा मरे? काय लास्ट टाईम सारखी केटा करेगा ? वहा चिरे और माती का ढिगारा बनानेका है" असली हिंदी बोलणारे आम्ही का हसायचो हे एक मोठे कोडे आहे.

सुरुवात नेहमी गणेश आरतीने व्हायची. तू सुखकर्ता किंवा ओंकार स्वरूप वगैरे गाणे सर्वप्रथम. मग चांगली सुंदर दिसणारी गायिका आली कि तिला वन्समोर वगैरे मंडळी जोरांत द्यायची. त्याबाजूला कलाप्रेमी सदानंद मास्तर आणि सरपंच वगैरे "मिस माधुरी ह्यांना अमुक तर्फे १०० रुपयांची बक्षिशी" वगैरे घोषणा करायला लावायचे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र सदानंद मास्तर. मग सूत्रधाराला आणखीन चेव. तो मग "कलाकार भुका होता है तालियो का" वगैरे ठेवणीतल्या शायरी करायचा. काही मुले लेसर वगैरे घेऊन यायची आणि स्टेजवरील लोकांवर मारायची. मग त्यावर सर्व मंडळी हसायची. सरपंच वगैरे मग फिरून ह्या पोरांना ताकीद द्यायचे.

माझ्यासाठी ऑर्केष्ट्रा विशेष प्रकार नव्हता. पण त्याच्या आजूबाजूला ज्या घटना घडतात त्याचे मला भयंकर अप्रूप. कधीही न दिसणारी पोरे ह्यावेळी अगदी चकचकीत होऊन प्रथम रो मध्ये बसायची. मग इकडे गाणी सुरु झाली कि डाव्या बाजूला नेहमीचे आपले हिरो नाचू लागत. गोंदू, दिलखुष, पक्या वगैरे अशी ह्यांची नावे असायची. मग हे नाचतात ते पाहून स्टेजवरील जो "फणकार" असायचा त्याला चेव चढत असे. तो मग सर्व लोकांना नाचायला प्रोत्साहन देत असे. आणि नाचणाऱ्या पोरांनी काही दोन तीन दिवस घरी प्रॅक्टिस केली असावी. त्या काली अक्षय कुमार ने भोली भाली लडकि, तू चीज बडी है मत मस्त वगैरे अशी गाणी दिली होती. त्यांत त्याची सिग्नेचर मूव्ह म्हणजे पेल्विक थ्रस्ट. ह्याचा वापर हि मंडळी मग अति प्रमाणात करत आणि उजव्या बाजूला ज्या तरुणींचा घोळका असायचा तिथे आपल्या आयटम वर हळूच कटाक्ष. तरुणींच्या खेम्यात सुद्दा मग नृत्य सुरु व्हायचे आणि स्टेज वरील ड्रॅमापेक्षा हा सिन मला जास्त भारी वाटायचा. त्या २-३ तासांत तिथे जे काही घडत असे त्यावर गांवातील प्रौढ महिला मग बारीक नजर ठेवून नंतर अनेक दिवस तो विषय चघळत राहत. त्या अमुकची मुलगी बरीच नाचरी आहे बरे. वगैरे वगैरे.

तर गांवातील गरिबांचे अक्षयकुमार आणि संजय दत्त वगैरे स्टेजवर मिमिक्री करायचे. नाना पाटेकर भाजी घ्यायला बाजारांत जातो आणि तिथे त्याला दादामुनी भेटतात वगैरे प्रकारांची प्रात्यक्षिके व्हायची. कधी कधी ह्यांत तद्दन चावट विनोद असायचे. मग काही मंडळी लोकप्रिय गीते कविता वगैरे घेऊन त्यांना मोडून तोडून विनोद करायची. एक अजून याद आहे, "त्या तिथे पलीकडे तांब्या घेऊन परश्या बसला होता परसाकडे" असले विनोद. आता ह्या गरिबांच्या अक्षयकुमारांत एकदा "विद्रोही" वगैरे असायचा. हि मंडळी काही भडकावू साहित्य वगैरे वाचत आणि त्यातील गोष्टी विशेष विचार न करता ओकून टाकत. आमच्या गावांत रानडे नावाचे एक दाम्पत्य होते. थोडे विक्षिप्त आणि ह्यांना सोवळे वगैरे जास्तच लागायचे पण इतर कुणाला ह्यांनी त्रास नाही दिला. त्यांच्यावर विनोद म्हणून एका विद्रोही वाल्याने एक नाट्यछटा कि काय सादर केली त्यांत त्यांचा आडनावावर काही अश्लील कोटी केली आणि त्यावर श्रोत्यांत भयंकर हंगामा झाला. चपला वगैरे फेकल्या गेल्या (बहुतेकांनी इतरांच्या वहाणा फेकल्या) आणि ऑर्केष्ट्रा रद्द झाला.

मग ऐश्वर्या राय ने हम दिल दे चुके मध्ये बॉक्स ऑफिस वर धिंगाणा घातला आणि गांवातील अनेक वयांत आलेल्या पोरींत ऐश्वर्याचा संचार झाला. शाळेचे गॅदरिंग पासून ह्या ऑर्केष्ट्रा पर्यंत सर्वत्र मुलींची निंबोडा निंबोडा ह्या गाण्यावर डान्स चढाओढ सुरु झाली. जसे पुरुषांसाठी आदिवासी समाजांत "rite of passage" असतो त्याप्रमाणे तारुण्यांत पदार्पण करणाऱ्या अनेक गरिबांच्या ऐश्वर्यासाठी हा एक सतरावा संस्कार झाला. मुलीने ह्या गाण्यावर डान्स केला म्हणजे मग इतर पोरे हिच्यावर लाईन मारण्यासाठी मोकळे असाच हिशोब जणू. आणि ती वर स्टेज वर डान्स करत असली तरी "होती है मिठी टकरार" ह्या त्या गाण्याच्या भागावर सुद्धा इथे पोरे अक्षय कुमार ची भोळिभाळी लाडकी ची स्टेप करत असत.

पण हे प्रकार बहुतेक करून गरीब लोकांपर्यंत मर्यादित होते. मला ऑर्केष्ट्रा पाहायचा असेल सुद्धा तरी किमान १०० मीटर चे अंतर ठेवणे आवश्यक होते आणि ठराविक लोकांसोबत जाऊन त्याकाळच्या VIP सदृश्य ज्या जागा होत्या तिथूनच पाहणे होत असे. पण एक गोष्टीचे आश्चर्य नेहमीच वाटायचे कि दिवस भर काम करून, मग ह्या गाण्यावर डान्स प्रॅक्टिस करायला विठोबाच्या संगीताला किंवा लक्षुमनच्या प्रियंकाला वेळ आणि स्फुरण कसे मिळत असावे ? आणि हा डान्स नेहमीच खराब असायचा असे नाही तरी हि मंडळी खरोखरच बेभान होऊन नाचायची. त्यांत त्यांनी आपला आत्मा टाकला होता. ह्यांतील बहुतेकांकडे विशेष शिक्षण नव्हते, शिक्षिकेने स्तुती करावी असे काही कौशल्य किंवा बुद्धिमत्ता नसावी. घरी गरिबी आणि भरपूर काम. मग कुठंतरी लोकांची नजर आपल्यावर असावी. कुणीतरी आपली स्तुती करावी असे ह्यांना वाटत असावे. त्यांच्यासाठी वर्षातून २-३ दा येणारा तो ऑर्केष्ट्रा किंवा गेंदरिंग म्हणजे ब्रॉडवेच जणू. ज्यांची स्वप्ने पाहण्यावर सुद्धा मर्यादा आणि बंधने असावीत त्यांच्यासाठी हा एक खूप महत्वाचा सोहळा होता. त्याकाळी मला हे प्रकार विनोदी वाटायचे तरी आता मला ह्या लोकांप्रती खूप सहानुभूती वाटते. मग हि संगीता किंवा प्रियंका काही वर्षांतच कुणाबरोबर तोंड काळे किंवा कुणाबरोबर हात पिवळे करायची किंवा दोन्ही करायची.

नंतर काय झाले ठाऊक नाही पण DTH, DVD वगैरे गोष्टींनी लोकांची ऑर्केष्ट्रा प्रति रुची कमी झाली आणि आता हल्ली तरी हा प्रकार अस्तित्वांत आहे कि नाही ठाऊक नाही. सार्वजनिक गणेशोत्सवानाची वर्गणी हझारावरून लाखांत जाऊ लागली, पहिले बक्षीस स्कुटी जाऊन त्याजागी मारुती झेन येऊ लागली आणि पुण्य मुंबईहून नाटके, आणि गायक येऊ लागले. मी अर्थांतच गांव सोडला होता. पण अरुण दाते, अविनाश खर्शीकर, सुकन्या कुलकर्णी, वगैरे सेलेब्रिटी असलेली नाटके संगीताचे कार्यक्रम आमच्या पंचक्रोशींत आले होते. त्यामुळे कदाचित सध्या ऑर्केष्ट्रा कडे लोकांचा कल नसावा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel