" आँ?? काय म्हणालात?? " मी तर जवळपास उडालोच, " खरा गुन्हेगार म्हणजे? काय म्हणायचंय काय तुम्हाला?? "

" सरळच आहे ना प्रभू. नागेशने खून केलेला नाहीये, असे आम्हाला म्हणायचेय. " अल्फा म्हणाला. मला तर काही सुचायचेच बंद झाले.

" आपण लवकरात लवकर गुन्हेगार शोधायला हवा, गोष्टी हातातून निसटून जाण्याआधी. " प्रधान म्हणाले, "खुनी खुपच हुशार आहे. त्याने मोठ्या शिताफीने नागेशला जाळ्यात अडकविले आहे. त्यामुळे त्याने काही पुरावे मागे सोडले असण्याची शक्यता फारच धूसर वाटते. तरीही मला खात्री आहे, पठ्ठ्या कुठेतरी सापडेलच."

"यावेळी मी त्याला प्रथम शोधून काढेन. " अल्फा म्हणाला. प्रधान हसले.

" छे! तू तर नेहमीच असे म्हणतोस आणि शेवटी गुन्हेगारापर्यंत मीच पहिल्यांदा पोहोचतो. "

" यावेळी मुळीच नाही. तुम्ही पहाच. यावेळी मीच जिंकणार. " अल्फा निग्रहाने म्हणाला.

" लागली पैज? " प्रधानांनी हात पुढे केला. अल्फाने हात मिळवला, " लागली. "

" ठिक आहे. आपल्यातल्या कोणालाही खुनीचे नाव कळाले, तर त्याने लगेचच प्रभवला मेसेज करायचा. ज्याचा मेसेज पहिला जाईल, तो जिंकला. ठिक आहे ना प्रभव? " प्रधान म्हणाले, " आणि चीटींग करायची नाही. अल्फा तुझा मित्र असला तरीही तू अगदी निःपक्षपाती रहायला हवास. कोण जिंकला, याचा निर्णय तूच सांगशील. चालेल का? "

" बरं बरं. " अजुनही मी धक्क्यातून सावरलो नव्हतो.

" मी निघतो. " प्रधान सर उठले, " आता घाई करायलाच हवी. नंतर भेटू. "

ते निघून गेले. मी अजूनही अल्फाकडे 'आ' वासून पाहत होतो.

" तू विचार करत असशील, की हे सगळं नक्की चाललेय तरी काय. "तो हसत म्हणाला, " काही वेळापूर्वी आम्हीच नागेशला गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या ताब्यात दिले आणि आता आम्हीच म्हणतोय की नागेश गुन्हेगार नाहीये. "

मी संदिग्धपणे नुसती मान डोलावली.

" सांगतो. " अल्फाने आजुबाजुला पाहिले, " पण इथे नको. इथे कुणालातरी ऐकू जाण्याची शक्यता आहे. आपण बाहेरच्या रोडवरून एक फेरी मारून येऊ. तिकडेच सांगतो तुला सगळं काही. "

आम्ही तेथून उठलो आणि बंगल्याच्या बाहेरील रस्त्यावर आलो. थोडे पुढे गेल्यावर अल्फाने कोणी ऐकत नाही, याची खात्री करुन घेतली आणि मग बोलण्यास सुरूवात केली,

" हां, आता सुरुवात करण्यास हरकत नाही. " तो म्हणाला, "कसं आहे ना प्रभू, आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात आणि त्या अगदी सहजपणे, नैसर्गिकरीत्या घडत असतात. आपण त्या घटनांमागच्या कार्यकारणभावाबद्दल कधी विचारदेखील करत नाही. पण निसर्गाचीही घटना घडवून आणण्याची एक पद्धत आहे. कोणत्याही घटनेचे खोलवर जाऊन निरीक्षण केले, की ती पद्धत आपल्या लक्षात येते. याउलट मानवाने घडवून आणलेल्या घटनांमध्ये एक प्रकारचा कृत्रिमपणा असतो, जो थोड्या विचाराअंती लगेच लक्षात येतो. आता या खूनाचंच घे ना. खुनीने मिरासदारांचा खुन केला, ही एक घटना आहे. त्याची खून करण्याची पद्धत, खून झाला त्या ठिकाणची परिस्थिती आणि मागे राहिलेले पुरावे यांमध्ये जी नैसर्गिकता दिसायला हवी, ती मला मुळीच दिसली नाही. "

माझ्या चेहर्‍यावरील प्रश्नचिन्ह पाहून तो पुढे म्हणाला,

" थोडक्यात काय, तर आपण त्या खोलीत जे काही पाहिले, तो फक्त एक देखावा होता, खऱ्या गुन्हेगाराने उभा केलेला. खुनीने खून केलाय आणि अशी व्यवस्था करून ठेवली आहे, की तो नागेशनेच केलाय असे वाटावे. पण तरीही, खुनीचे दुर्दैव म्हण किंवा नागेशचे सुदैव म्हण, की यातील कृत्रिमपणा माझ्या नजरेतून सुटू शकला नाही. आता मी तुला ती गोष्ट सांगतो, जी मला विसंगत वाटली आणि त्यातूनच नागेशने खून केला नसल्याचा विचार माझ्या मनात उभा राहिला. ती गोष्ट म्हणजे त्या खोलीत सुटलेला परफ्यूमचा वास. तूच विचार कर, रात्री अडीच वाजता एखादा माणूस रूममधून बाहेर पडलाय आणि तेही फेरफटका मारायला नव्हे, तर खून करायला. मग तो इतका परफ्यूम मारून बाहेर पडेल का? साधेच लॉजिक आहे. इथेच संशयाला जागा निर्माण झाली. चल ठिक आहे, खुनी परफ्यूमसाठी वेडा आहे आणि त्याने काहीही विचार न करता परफ्यूम मारलाच असे समज. पण मी जेव्हा त्या चादरीला आणि मिरासदारांच्या कपड्यांना हात लावला, तेव्हा मला त्यावर थोडा ओलसरपणा जाणवला, ज्यावरून हे सिद्धच होते की परफ्यूम खुनीने मारला नसून तो थेट त्या चादरीवर आणि कपड्यांवर मारण्यात आला आहे. त्यामुळे अखेर, या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले, की ही केस दिसते तशी साधी नसून यात काहीतरी घोटाळा आहे. खुनी नागेश नसून दुसराच कोणीतरी आहे!! "

" खुपच ग्रेट!! " मी प्रभावित होऊन अल्फासमोर मान तुकविली, " अगदी अनपेक्षित होते हे. "

" मी जर हे नजरेतून निसटू दिले असते, तर मला अकलेचा कांदा म्हणणेच योग्य ठरले असते. " अल्फा म्हणाला. आम्ही मागे वळून पुन्हा बंगल्याच्या दिशेने चालू लागलो. मी माझ्या मनात घोळणारा सर्वात उत्सुकतेचा प्रश्न अल्फाला विचारला, " जर नागेश खुनी नाहीये, तर मग कोणी केला असेल हा खून? तुला काय वाटतंय? "

अल्फा पुन्हा विचारात बुडाला.

" मला सध्या तरी या गोष्टीचा काहीच अंदाज येत नाहीये. " तो म्हणाला, " त्या खोलीत आणखीही अशा काही गोष्टी होत्या, ज्यांचा उलगडा मला होत नाहीये. पहिली गोष्ट, जी नागेशने आपल्या बचावासाठी वापरली, पण त्यात त्याला यश आले नाही - ती म्हणजे मेसेजसाठी वापरण्यात आलेला फोन. वरून दिसायला अगदीच निरर्थक वाटत असला तरीही तो मुद्दा विचार करण्यासारखा आहे. जो नंबर मिरासदार त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तींसाठी वापरत होते तो नंबर ते इतक्या रात्री मेसेज करण्यासाठी वापरतीलच का? आणि तेही अशा माणसाला, जो सदासर्वकाळ तुम्हाला त्रास देण्याशिवाय दुसरे काहीही करत नाही!! मी जर त्यांच्याजागी असतो, तर तो नंबर नागेशला कधीही कळणार नाही, याची मी पुरेपूर खबरदारी घेतली असती. आता तू नसत्या शंका काढू नकोस, पहिल्या नंबरवर बॅलन्स नसेल वगैरे. मी सगळे तपासून बसलो आहे. त्यांनी दुसऱ्या नंबरवरून मेसेज करावा याचे कोणतेच कारण सापडत नाही.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती चादर, जी खुनीने मिरासदारांचा गळा आवळण्यासाठी वापरली. तू पाहिले असशील, त्या खोलीत दरवाज्याच्या जवळच भिंतीवरील खुंटीला एक जाडजूड दोर अडकवला होता. त्याने गळा आवळणे खुनीला फारच सोपे गेले असते. पण त्याने तो न वापरता दरवाजापासून लांब, खिडकीजवळ असलेल्या बेडवरील चादरीचा वापर यासाठी केला. यामागील कारण काय असावे, याचा अंदाज येत नाही. एकूणच, त्या खोलीत काही अशा गोष्टी आहेत, ज्यांचे स्पष्टीकरण करता येत नाही. याचाच अर्थ हा खून सहजपणे घडला नसून त्याच्या दृश्य चेहऱ्यामागे बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत. आणि त्याच आपल्याला शोधून काढायच्या आहेत. "

आम्ही पुन्हा 'देखावा' बंगल्यापाशी आलो.

" मग आता तू काय करणार आहेस? " मी विचारले.

" आता मेंदूचा किस पाडण्याशिवाय पर्याय नाही. " अल्फा एक मोठा सुस्कारा सोडत म्हणाला, " मला काहीही करून हे कोडे प्रधान सरांच्या आधी सोडवायचेय. त्यासाठी या प्रकरणाच्या सर्व बाजूंचा शांतपणे विचार करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी तू माझ्यापासून लांब जाणे आवश्यक आहे. "

" हे काय आता नवीनच? " मी जरा फटकाऱ्यानेच म्हणालो, " मी जवळ असल्यावर तुझी बुद्धी काम द्यायचे बंद करायला लागली की काय?? "

" तसं नाही रे. " अल्फा म्हणाला, " पण माझ्या आणि प्रधान सरांच्या शर्यतीत तू मध्यस्थी आहेस ना. त्यामुळे तू जवळ असलास की माझ्यावर दबाव येत राहिल. तुला प्रधान सरांचा कोणत्याही क्षणी मेसेज येईल आणि आपण हरू, असे मला वाटत राहिल आणि माझे या प्रकरणाकडे लक्षच लागणार नाही. त्यामुळे तू आता चालता हो. अगदी मला गरज पडलीच, तर तुला बोलावून घेईन. "

" वा रे वा!!  तुला मदत लागेल, तेव्हाही मी 'मध्यस्थी'च असणार ना? मग तेव्हा नाही का येणार तुझ्यावर दबाव? नुसता कामापुरता मामा नाही चालणार हां!! "

" अरे देवा!! " अल्फा वैतागून म्हणाला, " बरं ते मदत लागल्यानंतर पाहू. आत्ता तू आत जा बरं. मी अजून पुढे जाणार आहे फिरायला. "

" हो, जातो जातो. " अल्फाने हाकलल्यानंतर मला आत जाण्यावाचून पर्यायच उरला नाही. नऊ वाजायला आले होते. मला वेळ कसा घालवावा, हेच समजेना. ते फार्महाऊस शहरापासून दूर असल्यामुळे नेटवर्क खूपच कमी होते. त्यामुळे इंटरनेट वापरण्याची सोयच नव्हती. माझ्या मोबाईलमध्ये गेमही नव्हते. त्या ठिकाणी माझ्या ओळखीचे असेही कोणी नव्हते. आपण येताना एखादे अभ्यासाचे पुस्तक आणायला हवे होते, मी विचार केला. इतका प्रचंड बोअर मी कधीच झालो नव्हतो. एका बाजूला अल्फा काय करत असेल, प्रधान सर काय करत असतील, मिरासदारांचा खुन कोणी केला असेल या गोष्टींबद्दलची उत्सुकता मला स्वस्थ बसू देत नव्हती आणि दुसऱ्या बाजूला मी काही करूदेखील शकत नव्हतो.

विचार करून करून माझे डोके दुखायला लागले. अल्फाचा शोध कधी एकदा संपतोय, असे मला झाले होते. थोडा वेळ मी गार्डनमध्येच बसून घालविला. फार्महाऊसवर मिरासदारांचे पाहुणे येत -जात होते. माझी एकतर कोणाशी ओळख नव्हती आणि त्यातच हा असा प्रसंग. त्यामुळे मी आत न जाता बाहेरच्या बाहेरच वेळ काढला. एक-दिडच्या सुमारास गणपतने जेवायला बोलावले. जेवणाच्या वेळी सतत मी अल्फा किंवा प्रधान सर यांपैकी कोणी दिसतायत का, हे पाहत होतो. पण दोघेही गायब होते. मी मोबाईलही वारंवार पाहात होतो. पण अजूनतरी दोघांपैकी कोणाचाही मेसेज मला आला नव्हता.  अखेर कंटाळून मी माझ्या खोलीत गेलो. रात्रीच्या अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांवर झापड येत होती. मी विचार करता करताच बेडवर पडलो आणि मला कधी झोप लागली, हे कळालेच नाही.

अखेर दुपारी कधीतरी माझा मोबाईल वाजला आणि मला एकदम दचकून जाग आली. तो कोणाचातरी मेसेज होता. मी ताबडतोब मोबाईल चेक केला. तो अल्फाचा मेसेज होता -

'पटकन वरती मिरासदारांच्या खोलीत ये. तुझी मदत लागण्याची शक्यता आहे. '

मी वेळ पाहिली. संध्याकाळचे चक्क पाच वाजायला आले होते!! मी इतका वेळ कसा झोपलो, याचे मलाच आश्चर्य वाटले. मी तसाच उठलो आणि लगबगीने वरती मिरासदारांच्या खोलीत गेलो. तिथे अल्फा खोलीची तपासणी करीत होता. मी येताच त्याने मला दरवाजा बंद करण्यास सांगितले.

"प्रभू, तुझ्या स्मरणशक्तीला आता भरपूर ताण दे आणि मला सांग, की काल रात्री खुन झाल्यानंतर आपण जेव्हा वरती आलो तेव्हा ही खिडकी उघडी होती का? "

मी काल रात्रीचा प्रसंग डोळ्यांसमोर उभा केला आणि मला स्पष्ट आठवले.

" हो, खिडकी उघडीच होती. "

" नक्की? " त्याने पुन्हा विचारले.

" शंभर टक्के. " मी ठामपणे म्हणालो.

" अगदी पूर्णच्या पूर्ण उघडी होती? " त्याने विचारले.

" हो. खिडकी संपूर्ण उघडलेली होती. " मला उघडी असलेली खिडकी चांगली आठवत होती.

" गुड गुड. " अल्फा म्हणाला. तो स्वतःशीच जाम खुष झालेला दिसत होता.

"तुला काही मिळालंय का? " मी अधीरतेने विचारले.

" एक मिनीटभर काही बोलू नकोस. " अल्फा माझ्याकडे न पाहताच म्हणाला. त्याचा तपास सुरूच होता. मला जरा रागच आला. आपण काय करतोय, याचा दुसऱ्याला थांगपत्ताही लागू न देण्याची अल्फाची वाईट सवय होती. त्याच्या दृष्टीने ती एक कला होती खरी, पण मला काहीच उमजत नसल्याने मला राग यायचा. अल्फा काही वेळ त्या खोलीत इकडे तिकडे फिरत होता आणि मी त्याच्याकडे टकामका पाहत उभारलो होतो. तो प्रथम जमिनीवरून रांगत दारापासून खिडकीपर्यंत गेला. मग उभा राहिला. पुन्हा बसला. मग त्याने मिरासदारांचा मोबाईल भिंतीमधील ज्या कप्प्यात ठेवला होता, त्याची उंची मोजली. दरवाजाला लागून ज्या खुंटीवर जाड दोर अडकवला होता, त्याचीही उंची मोजली. असे करताना तो सारखे खिडकीतून बाहेर पाहत होता. त्याचे हे माकडचाळे नक्की कशासाठी चालले आहेत, याचा मला काही अंदाज येईना. अखेर तो व्यवस्थित उभा रहात मला म्हणाला,

"आता एक काम कर प्रभू. खाली समोर जो रस्ता दिसतोय ना, गार्डनच्या पलीकडे, तिथे जा आणि तिथून मला 'हाय' कर. " त्याने खिडकीतून बाहेर बोट दाखविले.

" काय? " मी चक्रावलोच, " तू नक्की तपासच करतोयस ना??"

"होय रे. मला ठाऊकाय, तू मनातल्या मनात मला वेडपट म्हणत असशील. पण आधी मी सांगतोय तसे कर. "

" बरं. " मी डोके खाजवत खाली आलो. रस्त्यावरून वरच्या मजल्यावरील खिडकीत उभ्या अल्फाकडे पाहात मी जोरात हात हलवला. अल्फानेही हात हलवला आणि तिथून मला फोन केला,

" प्रभू, जरासा मागे जा. " फोन कानाला लावूनच हातवारे करीत अल्फा म्हणाला, " त्या दिव्याच्या खांबापाशी जा. हां, शाबास. आता तुला तेथून या खोलीतले काय काय दिसते, ते सांग. "

मी त्याने सांगितले तसे केले. मला हा प्रकार जरा मजेशीरच वाटत होता.

" मला तूच दिसतोयस. " मी म्हणालो.

" ओह सॉरी.. " तो बाजूला झाला, " आता सांग. "

ती खिडकी बरीच मोठी असल्यामुळे मला मी उभा होतो तिथून मिरासदारांची जवळपास सर्वच्या सर्व खोली दिसत होती.

" मला खोलीतील सगळंकाही दिसतंय. " मी म्हणालो.

" दरवाजा दिसतोय??" अल्फाने प्रश्न केला. दरवाजा तर खिडकीच्या अगदी समोरच होता.

"हो, दिसतोय. " मी उत्तरलो.

"बाजुच्या भिंतीवरील खुंटीला लटकविलेला दोर दिसतोय?"

"हो, दिसतोय. "

" मिरासदारांचा मोबाईल जिथे ठेवला होता, तो कप्पाही दिसतोय? "

" हो. तोही अगदी व्यवस्थित दिसतोय. " मी म्हणालो. आता अल्फा दरवाजापाशी येऊन उभा राहिला.

" आता मी दिसतोय का? "

" हो, दिसतोयस. " मी पुन्हा शहाण्या मुलासारखा उत्तरलो. मग अल्फा खाली वाकला आणि दिसेनासा झाला.

" आता दिसतोय? " त्याने विचारले.

" नाही. " मी म्हणालो, " खिडकीखालची भिंत मध्ये येतेय. "

" वा वा!! फारच उत्तम. "त्याचा आवाज खूपच आनंदी वाटला, " थांब तेथेच. मी आलो खाली. "

मिनीटभरातच तो मी उभा होतो, तेथे आला. येताच त्याने त्या जागेची तपासणी करण्यास सुरुवात केली. हे जे काही चाललं होतं, ते सगळंच्या सगळं माझ्या डोक्यावरून चाललं होतं. मला अल्फाच्या कृती नुसत्या पाहत राहण्याखेरीज काही पर्यायच नव्हता. मिरासदारांची खोली सोडून हा पठ्ठ्या इकडे का आला आहे, हेच मला समजेना. मी अल्फाच्या चेहर्‍याकडे पाहिले. त्याचा चेहरा उत्साहाने भरून गेला होता आणि डोळे चमचमत होते.

" अरे बुद्धिमान प्राण्या, एका शब्दाने तरी बोलशील का, की हे सगळे चाललेय काय?? " मी त्याला सवाल केला, "काहीतरी महत्त्वाचे हाती लागलेले दिसतेय. हो ना?"

"खुपच महत्त्वाचे. " तो आता उत्साहाने जवळपास उड्याच मारत होता, " ही केस इतकी भन्नाट असेल, अशी मी कल्पनाही केली नव्हती. खुपच अनपेक्षित. खुपच अतर्क्य.. अतिशय विलक्षण!! "

" खुनी कोण आहे, हे कळाले? " मी उतावीळपणे विचारले.

" नाही. पण लवकरच कळेल. " अल्फा म्हणाला.

" मला आधी सांग, आपण या ठिकाणी रस्त्यावर उभे राहून करतोय तरी काय? आणि मघाची ती 'तुला काय काय दिसतेय' ची भानगड नक्की काय होती? "

" सांगेन, सांगेन. लवकरच सांगेन. तूर्त तरी मी तुला एवढेच सांगू शकतो की, " अल्फा आवाज खाली करत म्हणाला, " काल रात्री खुन झाला तेव्हा या ठिकाणी रस्त्यावर एक व्यक्ती उभी होती आणि खोलीत चालू असलेल्या सर्व घटना ती पाहत होती..!!! "

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel