हि एक सत्यकथा आहे पण पात्रे आणि स्थळे पूर्ण पणे बदलली आहेत. 

भिंतींना कान असतात असे म्हटले जाते. ह्या वाक्प्रचाराचा अर्थ असा कि आपण आपल्या खोलींत जे काही बोलत असतो ते बाहेर जाणार नाहीच ह्याची खात्री आपण ठेवू शकत नाही कारण भिंतींच्या दुसऱ्या बाजूला कुणीही आपले बोलणे ऐकू शकतो. शहाण्या माणसाने म्हणूनच आपण एकटे आहोत असे समजू नये. 

मुंबई शहरातून एका मोठ्या असामीने गोव्यांत बंगला घेतला. त्या मानाने ग्रामीण भाग असल्याने तशी जास्त लोकवस्ती नव्हतीच पण अनेक लोकांनी कोट्यवधी रुपयांची प्रशस्त पोर्तुगीज कालीन घरें ह्या भागांत घेतली होती. साधारण २५-३० वर्षांची तरुण बायको आणि किमान ५५ असेलेले तिचे पती असे हे जोडपे आपल्या मर्सडिज ने इथे राहायला आले. पहिले काही महिने चांगले आरामांत गेले. शेजार पाजारची ओळख झाली. संध्याकाळी वाईन पार्टी झाल्या. पत्नी प्रिया आणि तिचे पती मिस्टर वाधवा ह्यांची सर्वांशी ओळख झाली. वाधवा हे मुंबईत हिऱ्यांचे व्यापारी होते. सर्व काही व्यापार विकून ते आता गोव्यांत रिटायर्ड म्हणून आले होते. प्रिया त्यांची दुसरी पत्नी. त्याच्या ऑफिसांत कामाला होती. पहिल्या बायकोचं मृत्यूनंतर तिनेच त्यांना आधार दिला आणि दोन्ही मुलांना अमेरिकेत शिकायला पाठविले. प्रिया इतर श्रीमंत लोकांच्या पत्नीप्रमाणे स्वतःला इंटिरियर डेकोरेटर म्हणवत होती. टाईट लेगिंग्स मध्ये दर सकाळी ती टेरेस वर योग करताना दिसायची आणि अनेक शेजार्यांचे डोळे नकळत तिथे वळायचे. 

पण साधारण एक वर्ष गेले असेल आणि शेजारी फर्नांडो रात्रीच्या वेळी दचकून जागा झाला. कुणी तरी बंदुकीतून गोळी झाडली होती. त्यानंतर एक किंकाळी. फेर्नांडोने तात्काळ आपली शॉटगन घेऊन बाहेर धाव घेतली. तोपर्यंत बरेच शेजारी  गोळा झाले होते. कुणी तरी पोलिसांना सुद्धा फोन केला. गोळीचा आवाज वाधवा च्याच बंगल्यातून आला असावा कारण फक्त त्यांच्या घरांतून कुणीही बाहेर आले नव्हते. सर्व शेजाऱ्यांनी बंगल्याला घेरले. बंगल्याची गेट आंतून बंद होती. घरांतील दिवे विझलेले. 

इन्सेप्क्टर कामतांना यायला बराच वेळ झाला. कारण ह्या भागांत गुन्हे तुरळकच असल्याने ह्या भागासाठी पोलीस ठाणे नव्हतेच. कामत आणि हवालदारानी गेट उल्लंघून आंत प्रवेश केला. बंगल्याचे दार आतून बंद होते. त्यांनी चारी बाजूनं फिरून पहिले. कुठेच दरवाजा किंवा खिडकी उघडी नव्हती. सर्वकाही आंतून बंद होते. एव्हाना एक ऍम्ब्युलन्स सुद्धा पोचली होती. त्यामुळे कामतांनी शेवटी दरवाजा फोडून आंत प्रवेश केला. 

हॉलमध्ये मिस्टर वाधवा रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. कामतांनी जवळ जाऊन पहिले. त्यांची प्राणज्योत मालवली होती. लोकांनी घरांत दोन व्यक्ती राहत असल्याचे सांगितले होते त्यामुळे त्यांनी प्रिया चा शोध सुरु केला केला. अनेक दा आवाज देऊन सुद्धा कुणाचीच प्रतिक्रिया येत नसल्याने कदाचित पत्नीला सुद्धा ठार मारले नसावे असा संशय येऊन कामतांनी प्रत्येक खोलींत शोध घ्यायला सुरुवात केली. पण प्रिया कुठेच नव्हती. मग फोटो वगैरे काढून वाढवा ह्यांचे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले तो पर्यंत सकाळ झाली होती. कामत आता बंगल्याला सील ठोकून निघणार इतक्यांत त्यांना दुसऱ्या मजल्यावरून आवाज ऐकू आला. ते बंदूक काढून पळतच वर गेले तर बेडरूमच्या बाहेर एक भले मोठे पोर्तुगीज कालीन कपाट होते त्याच्या आतून कुणी तरी ठोठावत होता.  "मिसेस प्रिया ? आपण आहात का ? " कामतांनी विचारले. आंतून प्रियाने रडत रडत हो म्हटले. 

कामतांनी कपाटाला बारकाईने पहिले. बाहेरून कपाटाला भली मोठी कडी लावली होती. त्यांनी ग्लोव्स घालून कपाटाचे दार उघडले. आंतून आपल्या नाईट ड्रेस मधेय अस्तावस्त झालेली प्रिया बाहेर पडली. कामतांनी सर्वप्रथम तिला एक ब्लॅंकेट आणून दिले, पाणी दिले. शेजाऱ्यांनी येऊन तिला धीर दिला. खाली असलेले रक्ताचे थारोळे पाहून तिने किंचाळी ठोकली. फर्नांडोची बायको कार्मेलीना तिथे होती तिने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि इन्स्पेक्टर कामतांनी तिला घडलेला प्रकार सांगितला. तिला कपडे वगैरे घालायला देऊन कामतांनी तिला इस्पितळांत तपासणी साठी नेले. बाहेर एक हवालदार ठेवला. 

नवरा बायको मध्ये कुना एकाचा खून झाला तर बहुतेक वेळी खुनी त्याचा जोडीदाराचं असतो हे कामतांना ठाऊक होते. पण प्रिया हि कपाटांत कशी पोचली हे गूढ होते. प्रियाने जबानी दिली. तिच्या मते रात्रीच्या वेळी तिला तहान लागली आणि खोलीतील पाणी संपले असल्याने तिने किचन मध्ये जाण्याचा प्रयत्न केला. किचन मध्ये जाऊन ती परत येताना तिला एक सावली बेडरूमच्या दरवाज्याजवळ दिसली. तिला सर्वप्रथम ते आपले पती आहेत असे वाटले पण जवळ जातंच एक अक्राळ विक्राळ चेहेरा दिसला. साधारण ६ फूट उंच माणूस आणि भली मोठी दाढी आणि मिश्या. त्याने आपल्या खडबडीत आणि रक्त हातानी प्रियाचा गळा आवळला तिच्या तोंडून काही बाहेर येण्याच्या आधीच तिच्या डोळ्यासमोर अंधेरी आली. त्यानंतर जेंव्हा डोळे उघडले तेंव्हा ती कपाटांत होती. 

कामतांनी घरांत ठसे घेतले. प्रिया, वाधवा आणि येऊन जाऊन राहणारे नोकर सोडून कुणाचेच ठसे नव्हते. कामतांनी नोकरणाची कसून चौकशी केली. कुक बॉस्त्यांव त्या रात्री ब्लु लगून बार मध्ये दारू पीत पडला होता आणि CCTV वर स्पष्ट दिसला होता.  मोलकरीण वेल्लम्मा मागील ४ दिवसांपासून सुट्टीवर होती आणि आंध्र प्रदेशांत होती. ड्रायवर जेकब त्या रात्री आपल्या घरीच होता, त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला पहिले होते. 

कामतांना राहून राहून वाटत होते कि खून प्रियानेच केला होता. वाधवा ह्यांच्या मृत्युपत्रानुसार अर्धी संपत्ती प्रियाला तर राहिलेली अर्धी दोन्ही मुलांना मिळणार होती. राहणारे घर, मुंबईतील फ्लॅट आणि एकूण दागिने हे त्याशिवाय प्रियाचे होते. 

तरुण पत्नीने म्हाताऱ्या पतीचा खून करण्याची हि काही पहिली वेळ नव्हती. सरकारी वकिलाने आणि कामतांनी बरेच डोके लढवून केस उभी केली पण गोव्यांतील तडफदार वकील मायकल रिबेलो पुढे सरकारी वकिलाचे काहीच चालले नाही. खून होण्याच्या आधी प्रिया हि कपाटांत बंद होती. खून झाला ते पिस्तूल खूप शोध घेऊन कुठेही मिळाले नसले तरी ते ग्लोक ४५ होते असे सिद्ध झाले होते. असले अत्याधुनिक पिस्तूल गोव्यांत असणे मुश्किल होतेच त्याशिवाय ते प्रियाकडे कुठून आले असेल ह्याचा काहीही पुरावा नव्हता. 

आता प्रियासोबत दुसरा कुणी साथीदार असता तर ? कामतांनी फर्नांडो च्या घराच्या बाहेरील सेक्युरिटी केमेरा तसे बाहेरील रस्त्यावरील ATM मधील समीरची फुटेज पहिली होती. घरांत कुणीच बाहेरील व्यक्ती गेली नव्हती किंवा आली नव्हती. 

दुसरा अँगल होता पारिवारिक भांडणाचा. त्याबाबतीत मात्र नोकर चाकर आणि शेजाऱ्यांनी भरपूर मसाला पुरवला होता. प्रिया कधीच घरातून बाहेर पडायची नाही. त्यामुळे तिचे अफेर इतर कुणाबरोबर असणे कठीणच होते. पण वाढावा मात्र वारंवार बाहेर जायचे,. त्यांचे आणि प्रियाचे भांडण प्रचंड मोठे होत असे आणि दोघांचाही तार स्वरांतील आवाज बाहेर जात असे. त्यामुळे त्यांचे पटत नाही हि गोष्ट जगजाहीर होती. 

केस बराच काळ चालली पण वकील रिबेलो ह्यांनी विविध साक्षीदार आणि पुराव्यांनी सिद्ध केले कि प्रिया हा खून करू शकत नव्हतीच आणि समाज तिला कुणी साथीदार असता तर तो गेला कुठे ? शेवटी पुराव्याभावी कोर्टाने प्रियाला बाइज्जत सोडले. वरून इंस्पेक्टर कामतांनी तापसांत ढिलाई ठेवली आणि प्रिया सोडून एकही संशयित त्यांना शोधात आला नाही म्हणून बरेच ताशेरेही उडवले. 

कामतांना हे बरेच मनावर लागले. त्यांनी मुंबई मध्ये वाधवा ह्यांचे दुष्मन होते का किंवा गोव्यात त्यांची कुणाशी दुष्मनी वगैरे असावी का ह्या अँगलने तपास सुरु केला. कोट्यवधींचा व्यापार करणारा हा माणूस अचानक गोव्यांत कसा काय येतो ? संशयाची पाल चुकचुकत होतीच. मुंबईत त्यांनी त्यांच्या जुन्या शेजाऱ्या पाजार्यांकडून माहिती गोळा केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व शेजाऱ्यांनी भरपूर मसाला आनंदाने त्यांना दिला. 

प्रिया हि कमनीय बांध्याची विभ्रम फेकणारी तरुण मुलगी त्या बिल्डिंग मध्ये आल्यापासून अनेक पुरुषांचे पाय घसरायला लागले होते त्यामुळे त्यांच्या पत्नींनी प्रियावर बरीच कडक नजर ठेवली होती. मुंबईत सुद्धा वाधवा आणि प्रिया ह्यांच्यांत प्रचंड भांडणे होते असत. पण इथे हनदानाचे कारण वेगळे होते. सचिन ! सचिन हा एक प्लम्बर होता. एक दिवस काही तरी बिघडले म्हणून त्याला वाढवा नी घरी पाठवला आणि त्यानंतर प्रियाचे एक एक सामान मोडू लागले. आधी सिंक, नंतर फ्रिज आणि नंतर वॉशिंग मशीन. 

प्रिया आणि सचिन ला प्रणयक्रिडेत किमान पाच वेळा वाधवा ह्यांनी पकडले अशी बातमी इन्स्पेकटर कामतांना बिल्डिंग च्या सेक्युरिटीने दिली. शेवटी बायकोच्या ह्याच लफड्यानी त्रस्त होऊन वाधवा ह्यांनी गोव्याची वाट धरली. ह्याला दुसरी बाजू सुद्धा होती. वाधवा हे मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेत होते. वाढवा ह्यांना भास होत असत. आपल्या घरांत कुणी तरी आहे, तो फिरतो, अशी व्यक्ती जी कधी कधी फक्त वाढवा ह्यांनाच दिसते पण इतरांना दिसत नाही. ह्याला मानसोपचार तज्ज्ञाने स्क्रिझोफेनिया ठरवले होते. ह्या रोगांत माणसाला भास होतात. कदाचित प्रियाचे प्रकरण सुद्धा वाधवा ह्यांचा भ्रम असू शकत होता. 

इन्स्पेक्टर कामत हार मानणारे नव्हते. त्यांनी सचिन चा शोध घेतला तेंव्हा त्यांना माहिती मिळाली कि सचिन अवघ्या १७ वर्षांचा होता आणि सध्या दुबईत कामाला आहे. त्यांनी पासपोर्ट ऑफिसांत शोध घेतला. पण सचिन सुर्वे ह्याचे वय १८ च्या खाली आहे अशा कुणाचाच पासपोर्ट ऍक्टिव्ह नव्हता. त्यामुळे कामतांना आता खात्री पटली कि सचिन आणि प्रियाने मिळून हा खून केला आहे. 

कामत गोव्यांत परत आले. सर्वप्रथम त्यांनी मायकल रिबेलोची भेट घेतली. मायकल रिबेलो हे वकील म्हणून कर्तव्यदक्ष होते. कामतांनी मायकल रिबेलोला आपला संशय सांगितला. रिबेलो चांगलेच चमकले. त्यांचे तोंड पाहून इन्स्पेक्टर कामत जे काही समजायचे ते समजले. रिबेलो प्रियाच्या प्रेमात पडले होते. केसच्या  निमित्ताने त्यांचे भेटणे व्हायचे. आता ते वारंवार प्रियाच्या घरी असत. 

रिबेलो ह्यांनी कामतांना समजावयाचा प्रयत्न केला कि सचिन नावाचा कोणीही मानून प्रियाच्या आयुष्यांत सध्या तरी नाही. इतकेच नव्हे तर रिबेलो ह्यांनी प्रियाचे फोन रिकॉर्डस सुद्धा दाखवले तिच्या फोन वरून एकही फोन कुणी अनोळखी व्यक्तीला गेला नव्हता. तिच्या बँक मधून पैसे कुणालाही गेले नव्हते. आणि इतकेच नव्हे तर प्रियाचा इमेल पासवर्ड सुद्धा रिबेलो कडे होता आणि सचिन सोबत काहीही व्यवहार तिने केला नव्हता. तरी सुद्धा कामतांनी रिबेलोला समजावले कि जी प्रिया चतुराईने वाढवाला मारू शकते तीच प्रिया रिबेलोला सुद्धा मारू शकते. 

रिबेलो प्रेमात आंधळा झाला असला तरी क्रिमिनल वकील असल्याने त्याला गुन्ह्याची प्रवृत्ती ठाऊक होती. कामत निघून गेल्यानंतर त्याने सरळ प्रियाच्या घराची वाट धरली. 
प्रियाला त्याने कन्फ्रण्ट केले. प्रिया ने सचिन नावाच्या कुणाला आपण ओळखते ह्या गोष्टीला सुद्धा नकार दिला पण तिच्या हावभावांनी ती खोटे बोलतेय हे रिबेलो समजले होते. शेवटी ह्याचे पर्यवसान दोघांच्या ब्रेकअप मध्ये झाले. रिबेलो ह्यांचा हृदयभंग झाला तरी त्यांनी प्रियाचा नाद सोडून दिला. 

बंद घरांत एका व्यक्तीचा बंदुकीच्या गोळीने खून होतो. त्या वेळी घरांत असलेली एकमेव व्यक्ती एका कपाटांत बंद असते. ह्याचा अर्थ खून करणारी व्यक्ती बराच वेळ आधी घरांत घुसली होती. कदाचित एक - दोन दिवस आधी. आणि पोलीस त्यावेळी घरांत आले असले त्यावेळी सुद्धा ती व्यक्ती त्याच घरांत लपून बसली असेल. आणि पोलिसांनी कसून शोध घेतला तरी ती व्यक्ती सापडली नाही. ह्याचा अर्थ एकच. त्या घरांत आणखीन एखादा चोरकप्पा असला पाहिजे.  त्यांनी वाढवा ह्यांच्या मानसोपचार तज्ज्ञाला फोन लावला. त्यांनी कामतांना सांगितले कि गोव्यांत जाऊन सुद्धा वाधवा ह्यांचा भ्रम सुटला नव्हता उलट वाढला होता. वाढवा ह्यांना रात्री घरांत आणखीन कुणी आहे असा सतत भ्रम होत असे. म्हणूनच त्यांनी रात्री घरांत कुठल्याही नोकराला राहण्यासाठी मनाई केली होती. 

कदाचित वाधवा ह्यांचा भ्रम, भ्रम नसून काहीतरी दुसरी भानगड नसावी ? इन्स्पेक्टर कामत ह्यांचा संशय बळावत चालला होता. त्यांनी म्हणूनच प्रियाच्या बंगल्याची माहिती काढली. पोर्तुगीजकालीन असे ते घर ४ वर्षे मागेच वाधवा ह्यांनी घेतले होते आणि त्याचे इंटिरियर प्रियाने स्वतः केले होते. कामतांनी पणजीत सेंट्रल लायब्ररीत जाऊन तेथील लायब्रेरियन नोरोन्हा ह्यांची भेट घेतली. त्यांच्याकडे पोर्तुगीजकालीन घरांचे ब्लूप्रिंट होते. प्रियाचे घर जुने असल्याने त्याची कागदपत्रे होती त्यांत कामतांना ब्लु प्रिंट मिळाली. 

मग कामतांनी थेट रिबेलो ची भेट घेतली. रिबेलो नी या घरांत वास्तव्य केले असल्याने त्यांना त्याची आतून माहिती होती. आणि ब्लु प्रिंट वरून घरांत काय बदल केले होते हे रिबेलो ह्यांनी आठवणीतून कामतांना सांगितले. 

इन्स्पेक्टर कामत ह्यांनी जज शी भेट घेतली आणि सर्च वारंट काढले. त्यांनी मग एकदम प्रियाच्या घरी छापा मारला. प्रिया प्रचंड चतुर होती. तिने रिनोव्हेशन च्या नावाखाली घरांत बरेच बदल केले होते. जुन्या पोर्तुगीज घराचे सिलिंग १४ फूट होते ते तिने फाल्स सिलिंग लावून १० फूट केले होते. बेडरूम च्या भिंतींच्या बाहेर लाकडी खोटी भिंत केली होती तसेच संपुन घरांत एका रुमातून दुसऱ्या रम मध्ये जाण्यासाठी ह्या खोट्या भिंतीतून आणि सिलिंग मधून वाट ठेवली होती. हे सर्व सापडणे जवळ जवळ अशक्य होते कारण ह्या चोर वाटांत आंत घुसायला दार असे नव्हतेच. त्यामुळे हवालदारानी आधी सर्व जागीचा शोध घेतला असला तरी त्यांना हि चोरवाट सापडली नव्हती. पण चतुर इन्स्पेक्टर कामतांनी आपल्या बरोबर अश्रुधुराचे नळकांडे आणले होते ते त्यांनी सर्व बंगाल्यांत फोडले. सर्वत्र धूर झाला आणि बेडरूम मध्ये खोकत खोकत एक व्यक्ती अचानक प्रकट झाली. प्रियाने डोक्यावर हात मारला. 

फाल्स भिंतींत घुसण्याची वाट आश्चर्यकारक रित्या प्रियाच्या बेडरूम मधील कपाटांत होती. कपाटाच्या खालच्या बाजूला पादत्राणे ठेवण्याचा जो कप्पा होता तो तिच्या महागड्या चपलांची खचा खच भरला होता, ह्या कप्प्याला मागच्या बाजूने एक दार होते ते ह्या भिंतीं उघडायचे. सचिन अत्यंत हाडकूट होता आणि त्याचे शरीर इतके लवचिक होते कि फक्त तोच त्या चोर दरवाज्यांतून भिंतीत घुसायचा. तो बाहेर आला कि पोलिसी हिसका दाखवून त्याने कबुल केले कि त्यानेच मिस्टर वाधवा वर गोळी झाडली. पिस्तूल त्याने नष्ट केले होते. 

त्याचे आणि प्रियाचे अफेर जे मुंबईत सुरु झाले होते ते सुद्धा इथे बिनबोभाट चालू होते. तोच वाधवा ह्यांना घाबरावयाचा. सचिन ची तपासणी करताना कामतांना समजले कि ह्या माणसाचा स्क्रू थोडा ढिला आहे कारण प्रियाने त्याला वर्षभर भिंतींत ठेवले ह्याचे त्याला काहीही वाईट वाटत नव्हते. वाढवा मेल्या नंतर सुद्धा तो भिंतीतच राहायचा. फक्त स्नान आणि नैसर्गिक विधी उरकण्यासाठी तो बाहेर यायचा तो सुद्धा रात्री. भिंतीत प्रियाने त्याच्या साठी खूप प्रोटीन बार्स आणि पाण्याच्या बाटल्या ठेवल्या होत्याच. त्याचे प्रियावर किंवा प्रियाचे त्याच्यावर प्रेम नव्हते. होते ते कदाचित शारिरीक प्रेम. 

इन्स्पेक्टर कामतांनी पुन्हा केस उभी केली. पण ह्या वेळी सुद्दा प्रियाने त्यांना हुलकावणी दिली. प्रिया आणि सचिन ने आपले अफेर मान्य केले पण सचिन ने खून आपण केला हे साफ नाकारले. गोळीचा आवाज ऐकून आपण घाबरलो आणि आणि प्रियाला वाचवण्यासाठी तिला जबरदस्तीने आपण कपाटांत बंद केले आणि आपण सुद्धा भिंतींत जाऊन लपलो अशी बतावणी त्याने केली. 

पण कोर्टाने हे मानले नाही. प्रियाला फक्त शपथेवर खोटे बोलण्याची शिक्षा झाली आणि सचिन ला मनुष्यवधाची जन्मठेप झाली. पण तो एक दिवस तुरुंगाच्या कोठडीतून जो गायब झाला तो पुन्हा कुणालाच दिसला नाही. प्रिया जेल मधून बाहेर आली तेंव्हा रिबेलो ने पुन्हा तिच्यावर आपले प्रेम व्यक्त केले. त्याच्या मते प्रियाचा ह्या खुनात काहीही सहभाग नव्हता, जे काही केले ते सचिन ने. इन्स्पेक्टर कामतांना मात्र आपण केस सॉल्व केल्याचे समाधान लाभले. प्रिया आणि रिबेलो ने काही महिन्यांत आपले लग्न उरकले आणि ती दोघेही पोर्तुगाल ला स्थायिक झाली. 

आणखी काही वर्षांनी कामत रिटायर झाले. ते कधी कधी त्या घराच्या बाजूला फेरफटका मारत असत. मागच्या काही वर्षांत ते घर टुरिस्ट अट्रॅक्शन झाले होते. विविध पर्यटक हे विलक्षण घर पाहण्यासाठी येत असत. इन्स्पेक्टर कामत ह्यांनी ह्या विषयावर एक पुस्तक सुद्धा लिहिले आणि अनेक मुलाखती सुद्धा दिल्या. 

सचिन अचानक गायब कसा झाला हे कोडे कधीही सुटले नसले तरी कामत ह्यांनी पुस्तकांत काही थेअरी दिल्या होत्या. त्यांच्या मते खून सचिन ने केला असे कोर्टाने मानले असले तरी तेच सत्य असावे जरुरी नव्हते. विशेषतः रिबेलो आणि प्रियाने लग्न केले तेंव्हाच त्यांचा मनात शंकेची पाल चुकचुकली होती कि रिबेलो आणि प्रिया ह्यांचे सूत प्रिया मुंबईत असतानाच जुळले होते आणि हा सर्व प्लॅन ह्यांचाच होता. प्रियानेच पोरसवद्या सचिन ला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्याचा गोव्यांतील घरांत उपभोग घेतला आणि वाधवा ह्यांचा खून करायला त्यालाच परावृत्त केले. नंतर हत्येची बंदूक तिने रिबेलो च्या द्वारे नष्ट केली. 

खुनाच्या आरोपांतून ती पहिल्यांदा सुटल्यावर तिने हळू हळू रिबेलो बरोबर असलेले आपले संबंध उघड करायला सुरुवात केली होती. फक्त सचिन त्यांच्या वाटेतला काटा होता. कामतांना घरांतील चोरकप्प्यांची माहिती मिळाली हे रिबेलो समजल्यानंतर त्याने सचिन ला अडकवण्याचा प्लॅन केला. प्रियाला फक्त १-२ वर्षांची शिक्षा होईल अश्या पद्धतीने त्याने केस बनवली. ती बाहेर आल्यानंतर दोघांनी लग्न करून पोबारा केला. 

सचिन अत्यंत लवचिक होता आणि मासिक दृष्टया १००% नव्हता, त्याने कुठल्यातरी छोट्या कंटेनर मध्ये स्वतःला घुसवून तुरुंगातून पलायन केले असावे. ती केस अद्याप ओपन आहे. पण कामतांच्या मते दोन गोष्टी असाव्यात, एक, सचिन हा प्रिया आणि रिबेलो ह्यांना सामील होता. किंवा रिबेलो आणि प्रियाने त्याला गायब केले असावे. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel