शबरी विद्या म्हणजे भानामती किंवा बंगाली चेटूक यांसारखे थोथांड करणारी विद्या नव्हे. शबरी विद्या हि देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती भिल्लीणीच्या रूपात असताना सामान्य माणसांना कळवा यासाठी बोली भाषेत सांगितलेला वेद आहे. याची अनुभूती संपूर्ण जगाला करून देणारे गुरु म्हणजे स्वामी मच्छिन्द्रनाथ होते. महादेवांचा मानसपुत्र वीरभद्र याला आपल्या शक्तीचा आणि पराक्रमाचा गर्व झाला होता. वीरभद्राच्या गर्वहरण करण्याचे धैर्य स्वामी मच्छिन्द्रनाथांनी केले होते. मच्छिन्द्रनाथांना एका अकलनीय विध्येचा ज्ञान होते. भगवान शंकरांनंतर समस्त विश्वात या विद्येचे ज्ञान फक्त मच्छिन्द्रनाथांना होते. हि विद्या म्हणजे "संजीवनी विद्या" . मच्छिन्द्रनाथ हे अत्यंत कठीण विद्येत पारंगत होते. त्यांनी आपले व गोरक्षनाथानाचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी या विद्येचा वापर केला होता.
मच्छिन्द्रनाथांची महती सांगावी तितकी कमीच आहे. मछिंद्रनाथांनी गोरक्षनाथांसारख्या अवधूत सिद्धी प्राप्त योगीचा अहंकार निर्मूलन केला होता. नवनाथांपैकी श्री मच्छिन्द्रनाथ महाराज यांची समाधी सावरगाव येथे आहे. या ठिकाणी दरवर्षी ऋषिपंचमीला जन्मोत्सव साजरा केला जातो.
नवनाथ म्हणजेच मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, रेवणनाथ, भर्तरीनाथ, नागनाथ, चरपटनाथ आणि त्यांनी निर्माण केलेल्या त्यांच्या चौर्यांशी सिद्धांनी रचलेली मंत्रशक्ती म्हणजे शाबरी किंवा साबरी कवच आहे.
हे अखंड विश्व ज्या सुत्रांमध्ये गुंफले गेले आहे, त्या सुत्रांशी नादब्रह्माच्या माध्यमातून केलेला परीसंवाद म्हणजेच शाबरी मंत्र असे म्हणणे गैर ठरणार नाही.
ह्या मंत्रांच्या एक लाखांहून अधिक ओव्या नाथांनी आणि त्यांच्या शिष्यांनी रचल्या आहेत. हे कुठेही लिखीत स्वरूपातील साहित्य नाही. गुरूशिष्य परंपरेतून दिले जाणारे हे मंत्र स्वयंसिद्ध आहेत. हे मंत्र अतिशय प्रभावी आहेत. ह्या मंत्रांचा प्रभाव तत्काळ बघता येतो.
बाजारात मिळणाऱ्या पुस्तकांत सांगितले जाणारे शाबरी मंत्र हे मुळ शाबरी मंत्र नाहीत. बाजारातील पुस्तकांत जे मंत्र दिले जातात ते वास्तविक बर्भरी मंत्र आहेत. मुळ शाबरी मंत्राची बिजं या मंत्रामध्ये रोवून बर्भरी मंत्र बनवले गेले असावेत. नवनाथांनी ज्या ज्या प्रदेशांत तिर्थाटन केले त्या त्या भागांमध्ये त्यांचे अनुयायी तयार झाले होते. त्यामुळे मुळ मंत्रांची रचना वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या बोली आणि प्राकृत भाषांमध्ये केली होती. त्यामुळे शाबरी विद्देचं मूळ स्वरूप, बंगाली, कोकणी, धनगरी,इ. भाषांत विस्तारत किंवा भाषांतरित केले गेला होता असे आपण पाहू शकतो.
नाथपरंपरेतील अनेक अनुयायी मुस्लिम पंथाचे हि होते. त्या मुस्लिम साधकांनी त्यांच्या भाषेत रचना केल्या. या रचना मुळ शाबरी किंवा बर्भरीच आहेत. ज्यावेळी समाजात विघातक कृत्य करणार्या अघोरी तांत्रिकांनी, समाजकंटकांनी, इतर म्लेंछ संप्रदायांनी शाबरीचा दुरूपयोग करणं चालू केला होता. तेव्हा नाथांनी मुळ शाबरी कवच मंत्र लुप्त करून टाकला. मुळ शाबरी मंत्र आज प्रचंड दुर्मिळ आहे. शाबरी विद्या हि फक्त आणि फक्त गुरूशिष्य परंपरेतून पुढे प्रदान केली गेली. अर्थात देणार्याला हि विद्या आपल्या गुरूकडून मिळालेली असते आणि घेणाऱ्याने ती पुढे फक्त एक नाथ पंथीय शिष्याला द्यावी या वचनाने दिली गेली असते.
शाबरी कवच व मंत्र देताना गुरूंनी शिष्यांना स्पष्ट सांगितलेलं होते,
'या शाबरी मंत्राचा उपयोग फक्त जनसेवेसाठीच करण्यात यावा, दीनदुबळ्यांच्या सेवेसाठीच करण्यात यावा, पैसे, धनसंपत्ती गोळा करण्यासाठी, बडेजाव मिरविण्यासाठी याचा उपयोग करू नये'
नाथ संप्रदायात आपल्या गुरुकडून ज्ञानार्जन करताना हि ताकीद दिलीच जाते शिवाय शिष्य चांगला सादक असेल तर स्वतः नवनाथांपैकी नाथ दर्शन देऊन याची ताकीद देतात. त्यांना नाथ दृष्टान्त देतात.
संपुर्ण शाबरी कवच व शाबरी विद्या कुणालाही वारसा हक्काने दिली जात नाही. शाबरी विद्या हि गरजेपुरती दिली जाते. या विद्येचा दुरूपयोग केला तर असे करणाऱ्याला याचे परिणाम भोगावे लागतात. श्री नवनाथांचा साधनमार्ग सरळ आणि सोपा नाही, इतरांना वाटते तितके अवघड नाही व कठीण काही नाही. आपण नवनाथांच्या शाबरी विद्येचा अभ्यास करत असाल तर पावलोपावली नवनाथांकडून आपली परीक्षा घेतली जाऊ शकते. या परीक्षेस आपण पात्र ठरता म्हणजे आपण नवनाथांनी दिलेल्या सिद्धीच्या मार्गावर चालत आहात.