प्रास्ताविक                                        

एक नवीन कल्पना घेऊन काही पोस्ट लिहिण्याचा विचार आहे .बऱ्याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता  त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज  मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे ,  व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी  वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्‍हास  झाल्यामुळे  बर्‍याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही .  पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास  या प्रयोगामुळे  संस्कृत सुभाषिते माहीत होतील  .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता  लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक  भाषा कमनीय व सौष्ठवपूर्ण होईल
      
                       १      
अङ्गं गलितं पलितं मुण्डं दशनविहीनं जातं तुण्डम्|
वृद्धो याति गृहीत्वा दण्डं 
तदपि न मुञ्चत्याशा पिण्डम् ||

शरीर थकले आहे. डोके पांढरे झाले आहे. तोंडात दात नाहीत. म्हातारा काठी घेऊन जात आहे. [इतके म्हातारपण आले तरीहि] हाव माणसाला सोडत नाही. 

या सुभाषितामध्ये वस्तुस्थितीचे वर्णन केले आहे.कोणतेच षड्रिपू मनुष्याला सोडत नाहीत .शरीर थकल्यामुळे काम आणि मद हे कमी होत असतील .मनातून ते जातात का हा खरा प्रश्न आहे .त्याचे उत्तर दुर्दैवाने नाही असे द्यावे लागेल .

--तदपि न मुञ्चत्याशा पिण्डम् ---
हा चरण जरी  महत्त्वाचा असला तरी तो लक्षात ठेवणे कठीण आहे
मराठीत एक म्हण आहे-- स्मशानात गोवऱ्या गेल्या तरी  अजून लोभ अाशा मोह इ.विकार सुटत नाहीत -- अङ्गं गलितं पलितं मुण्डं--हा सहज लक्षात राहण्यासारखा आहे .त्याला एक लय आहे .प्रत्येकाने विशिष्ट वयानंतर संसारातून लक्ष काढून घेतले पाहिजे .या संदर्भात राजकारणातील व्यक्तींचा हव्यास उल्लेखनीय आहे .शरीर रोगाने ग्रस्त झाले वृद्धत्व आले तरीही त्यांना षड्रिपू सोडून जात नाहीत असे आढळून येते.लोभ हाव सत्तेचा मोह  सुटत नाही .तरुणांना त्यांचे आयुष्य त्यांच्या मनासारखे जगू द्यावे.त्यांना योग्य संधी द्यावी  म्हणजे संघर्ष निर्माण  होणार नाही . पूर्वी वानप्रस्थाश्रम प्रथा होती.ती जरी आता नसली तरी आपण संसारात असून नसल्यासारखे असले पाहिजे. त्यांच्या कामात ढवळाढवळ करणे,त्यांना दोष देणे ,सल्ले देणे हे टाळावे . अर्थात् जर कोणी तुमचा सल्ला विचारला तर तो प्रांजल पणे द्यावा .विरक्त अलिप्त साक्षीभूत होणे महत्त्वाचे आहे .आशा सुटत नाही असे सांगून काय केले पाहिजे हे+-- अध्याहृतपणे+-- सूचित केले आहे .एकत्र कुटुंब जिथे असेल तिथे वरील संदेश अंमलात आणणे शक्य आहे . हल्ली बहुतेक कुटुंबे काही ना काही कारणाने विभक्त झालेली आढळून येतात .अशा वेळीही जेव्हा कुटुंबातली माणसे एकत्र येतील तेव्हा वरील उपदेश  वडिलधार्‍यानी लक्षात ठेवण्यासारखा आहे . त्याही पुढे जाऊन आपल्याला असे म्हणता येईल की सर्वांनी(तरुण व मध्यमवयीन सुद्धा ) षड्रिपू  नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे . नियंत्रण करतो म्हणून नियंत्रण करणे कठीण आहे .जर मी म्हणजेच  हे षड्रिपू आहेत ,असे लक्षात येईल तर मात्र काही परिणाम शक्य आहे . त्यासाठी स्व-परीक्षण स्व- अवलोकन स्व-जागृती आवश्यक आहे .

                 २
तैलाद्रक्षेत् जलाद्रक्षेत् रक्षेत् शिथिलबंधनात् ।
मूर्खहस्ते न दातव्यमेवं वदति पुस्तकम् ॥

पुस्तक म्हणते की तेलापासून माझे रक्षण करा, पाण्यापासून माझे रक्षण करा, माझे बंध शिथिल होणार नाहीत असे बघा, आणि मूर्ख लोकांच्या हातात मला देऊ नका.

याचा अर्थ साधा सोपा आहे .परंतु त्याचे आचरण मात्र फार कमी लोक करताना दिसून येतील. 

पुस्तक वाटेल तिथे टाकू नका, नाहीतर त्यावर तेल पाणी किंवा इतर डाग पडतील .पुस्तक फेकणे, पुस्तक दुसऱ्याला मारण्यासाठी वापरणे,  पुस्तक दप्तर बॅग यांमध्ये वाट्टेल तसे कोंबणे,  वाट्टेल तसे हाताळणे, खूण म्हणून पुस्तकाचे पान दुमडणे ,पुस्तक जागेवर न ठेवता ते कुठेही टाकणे, या सर्व त्याज्य गोष्टी आहेत .परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूर्खाच्या हाती पुस्तक न देणे .कारण तो वर करू नये म्हणून सांगितलेल्या सर्व गोष्टी तर करीलच पण त्याशिवाय काय काय करिल ते सांगता येणार नाही!!!!(प्रत्येकाने पुस्तकाचे अापण काय काय करतो त्याचा मनातल्या मनात विचार करण्यासारखा आहे .)

              स्मरणीय 
१)अङ्गं गलितं पलितं मुण्डं
)२मूर्खहस्ते न दातव्यमेवं वदति पुस्तकम् ॥

२७/९/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel