काही हजार वर्षांपूर्वी  यमुना नदीचा प्रवाह यमनोत्री नंतर सपाटीवर येण्यापूर्वी  हल्लींपेक्षा बराच मोठा होता .यमुना नदी सपाटीवर येण्यापूर्वी एका उंच कड्यावरून खाली उडी मारीत असे .हा धबधबा सुमारे पन्नास फूट उंचीचा होता .धबधब्याच्या दोन्ही बाजूला दूरवर सलग कडा होता .या कड्याखाली व कड्यावरतीही घनदाट जंगल होते.त्यामुळे जंगलातून खाली किंवा वर जाणे जवळजवळ अशक्य होते .दाट जंगल, असंख्य हिंस्र पशू, साप, यामुळे जंगलातून जाणे अशक्यप्राय होते .या धबधब्याच्या वरच्या बाजूला  तीन मोठी वडाची झाडे होती .त्या झाडांच्या खांद्या कड्यावर  वाकलेल्या होत्या  व पारंब्या धबधब्याच्या कडेकडेने खाली आल्या होत्या. त्या पारंब्या जवळजवळ जमिनीपर्यंत पोचलेल्या असल्यामुळे त्या पारंब्याच्या साह्याने खाली येणे किंवा वर जाणे शक्य होते.खाली येणे सहज शक्य होते परंतु वर लोंबकळत जाणे एखाद्या सुदृढ व्यक्तीलाच शक्य होते.जंगलातील आदिवासी खाली किंवा वर कधीकधी  कष्टाने येत जात असत.

धबधब्याच्या वरच्या बाजूला व खालच्या बाजूला रानटी लोकांची दोन राज्ये होती .रानटी हा शब्द आपण नेहमी ज्या अर्थाने वापरतो त्या अर्थाने वापरलेला नाही .केवळ रानातील एवढाच अर्थ अभिप्रेत आहे .कित्येक वेळा तथाकथित रानटी लोक नागरी लोकांपेक्षा जास्त सुसंस्कृत असतात असे आढळून येते.धबधब्यांवरील राज्याचे नाव नगारा राज्य होते तर धबधब्याखालील राज्याचे नाव तुतारी राज्य होते . ही नावे केवळ नगारा वादन कौशल्य व तुतारी वादनातील कौशल्य यावरून पडली होती .  त्या त्या राज्यांची ती रणवाद्येही होती.

या दोन राज्यांमध्ये  शेजारील राज्यांमध्ये नेहमी असते त्याप्रमाणे शत्रुत्व होते .त्या बाबतीत ते आधुनिक राज्यांप्रमाणे होते .एका राज्यातील व्यक्ती दुसऱ्या राज्यात गेल्यास त्याला ठार मारण्यात येत असे.   कड्याखाली व कड्यावर सैनिकांचा  पहारा असे.पारंब्यांना धरून वर जाणे कठीण असल्यामुळे वरच्या बाजूला पहारा कमी असे.अर्थात तुतारी राज्यातील सैनिक पारंब्यांना धरून वर येतील आणि दोर सोडून किंवा दोराच्या शिडय़ा सोडून किंवा बांबूच्या एकाला एक जोडलेल्या शिड्या लावून त्याच्या मार्फत वरती चढतील अशी भीती  होतीच.तेव्हा पहारा आवश्यक होता. परंतु वरून खाली येणे जास्त सोपे असल्यामुळे खालच्या बाजूला तुतारी राज्यातील सैनिक खडा पहारा देत असत .ते जास्त सावध असत .ही तीन वडाची झाडे तोडून टाकावी असे एकाने सुचविले होते .परंतु दोन्ही राज्ये वडाला देव मानीत असत .त्यामुळे झाडे तोडणे शक्य नव्हते .देव कोपेल अस्मानी संकट  येईल याची सगळ्यांना बालंबाल खात्री होती. 

नगारा राज्यातील राजा वृद्ध होता.वृद्ध म्हणजे फार वृद्ध नाही साठ वर्षांचा होता. त्याला तीन राण्या होत्या .त्याला मूलबाळ नव्हते . त्याच्या राज्याला वारस नव्हता.या राज्यात एका गरीब शेतकरी कुटुंबांमध्ये एक रत्न जन्माला आले होते .तिचे नाव हिरा होते. ती खरीच हिऱ्यासारखी तेजस्वी व कणखर होती .तिला अप्सरा हे नाव शोभून दिसले असते .या हिराचे आई वडील या रत्नाला योग्य वर कसा मिळणार या चिंतेत नेहमी असत.एक दिवस राजा घोड्यावरून हिंडत असताना त्याच्या दृष्टीला हिरा पडली . त्याला ती फार आवडली त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निश्चय  केला.राजवाडय़ावर पोचल्यावर त्याने प्रधानाला त्या शेतकऱ्याकडे राजासाठी त्या मुलीला मागणी  घालण्यासाठी पाठविले.प्रधान काही सैनिक घेऊन शेतकऱ्यांकडे पोचला.प्रधानाने राजाची इच्छा शेतकऱ्याला सांगितली .शेतकरी व त्याची बायको यांचा आनंद गगनात मावेना .राजासारखे योग्य स्थळ कोणते असणार ?त्याने प्रधाना बरोबर त्यांची संमती कळवली .मुलीची जर संमती नसेल तर  त्या राज्यात विवाह होत नसे.शेतकऱ्याने व त्याच्या बायकोने मुलीला विचारणे आवश्यक होते. मुलीची संमती त्याने गृहीत धरली.राजाबरोबर विवाह करण्याला कोण नाही म्हणणार ?राज्याची राणी होणे कुणाला बरे आवडणार नाही ?अशी त्यांची कल्पना होती .

लगेच सैनिकांची एक लहानशी तुकडी त्या शेतकऱ्याच्या घराभोवती पहार्‍याला बसली.कारण आता तो शेतकरी राजाचा सासरा होणार होता.त्यांची मुलगी राणी होणार होती .त्यामुळे त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था करणे आवश्यकच होते .

या सर्व घडामोडींमध्ये हिराला तुझी इच्छा काय असे कुणीच विचारले नाही .ती खूष असणारच. तिची संमती असणारच.राणी होणे ही काही साधी गोष्ट नाही.असे तिचे आईवडील गृहीत धरून चालले होते. हिराचे एका तरुणावर प्रेम होते.तो तरुण तुतारी राज्यातील होता .त्या राज्याचा तो राजकुमार होता .परंतु ही गोष्ट त्याने हिरापासून लपविली होती .किंवा असे म्हणूया की त्याने ती गोष्ट तिला सांगितली नव्हती. 

कुमार व हिरा यांची एक प्रेमकहाणी होती.एकदा कुमारला नगारा राज्यात फिरून यावे असे वाटले.त्याला एका अद्भुत मुळीचा शोध लागला होता.ती मुळी पेटविल्यानंतर जो धूर निघे तो सुगंधी होता.तो वास जे घेत ते दोन तास बेशुद्ध होत असत .कुमारने ती पेटती मुळी बाणाच्या साह्याने धबधब्यावरील सैनिकांकडे फेकली.सुगंधी वास आल्याबरोबर वरती पाहर्‍यावर असलेले सैनिक बेशुद्ध झाले.कुमार सरसर पारंबीच्या साह्याने वर चढून गेला. पाहर्‍यावर असलेल्या सैनिकांपैकीॅ एकाचा घोडा घेऊन तो नगारा  राज्यात रपेट मारण्यासाठी आला.त्यावेळी यमुना नदीकाठी हिरा स्नान करीत होती .झाडाआडून त्याने हिराला स्नान करताना पाहिले .तिला पाहून तिचे सौंदर्य पाहून तो तिच्या प्रेमात पडला .तो तिला भेटला .दोघांचेही सूर जुळले .त्यांच्या वारंवार भेटी होत होत्या .त्याने आपण तुतारी राज्यातील आहोत असे फार नंतर सांगितले.तोपर्यंत ती त्याला नगारा राज्यातीलच समजत होती तरीही आपण राजकुमार आहोत हे त्याने सांगितले नव्हते .घरातून तू पळून ये .आपण माझ्या  राज्यात जाऊ. तिथे विवाह करू. असे कुमार नेहमी हिराला म्हणत असे.आपल्या आई वडिलांना सर्व काही सांगू आणि मग कुमारबरोबर निघून जाऊ असा हिराचा विचार होता.त्याच्या अगोदरच राजाने हिराला पाहून मागणी घातली होती.मी संकटात आहे मला पळवून ने असा संदेश हिराला कुमारला द्यायचा  होता. संदेश कसा पाठवावा? कुणाबरोबर पाठवावा? अश्या विचारात ती होती. काय करावे हे तिला कळत नव्हते .

सैनिकांचा संरक्षणासाठी पाहरा बसला त्याच्या नंतर दोन दिवसांनी त्यांची संकेत भेट ठरली होती .कुमार आल्यानंतर त्याला  बातमी कळेल आणि तो तिला सोडवील एवढ्याच आशेवर ती होती .तसेच झाले दोन दिवसांनंतर कुमार नेहमीप्रमाणे त्यांच्या संकेतस्थळी भेटण्यासाठी आला.त्याला बातमी कळताच तो ताबडतोब तिच्या घरी आला.त्याने  सुगंधी धुराने सर्व संरक्षक सैनिकांना बेशुद्ध केले. त्याचबरोबर तिचे आई वडील ती व भावंडे सर्वच बेशुद्ध झाली .त्याने तिला उचलून घोड्यावर बसविले व तिला स्वतःशी एका वेलीने घट्ट बांधून तो दौडत धबधब्याकडे निघाला.धबधब्यावरील सैनिक शुद्धीवर येण्याच्या अगोदर त्याला पारंबीच्या सहाय्याने  खाली उतरून जाणे आवश्यक होते.

तिला घेऊन दौडत जात असताना वाटेत एका  गस्त घालणार्‍या सैनिकाने त्याना पाहिले.त्याने लगेच सेनापतीला जाऊन ती बातमी दिली . होणाऱ्या राणीला तो पळवून नेत आहे असे समजताच सैनिक त्याच्या  पाठोपाठ निघाले. तिला पाठीवर घेऊन तो जेमतेम खाली उतरला तोच पाठलागावरील सैनिक पोहचले.वरून त्यांनी बाणांचा वर्षाव सुरू केला . खालून तुतारी राज्यांच्या सैनिकांनी बाणसोडण्यास सुरुवात केली . कुमार तिला घेऊन सुरक्षित ठिकाणी गेला.थोड्याच वेळात ती शुद्धीवर आली .आपल्या शेजारी कुमारला पाहून तिचा आनंद गगनात मावेना . कुमारने थोडक्यात तिला कसे आणले ती सर्व हकिगत सांगितली .

राजाला त्याची होणारी राणी तुतारीच्या सैनिकाने पळविली अशी बातमी मिळाली.त्याच्या अंगाचा नुसता संताप झाला.त्याने आपल्या सेनापतीला सर्व सैनिकांना एकत्र करून तुतारी राज्यावर आक्रमण करा म्हणून सांगितले 

इकडे कुमार तिला आपल्या राजवाड्यात घेऊन आला.कुमार हा तुतारी राज्यातील साधा नागरिक नसून एक राजपुत्र आहे हे  तिला कळताच धक्का बसला .कुमारने राजेसाहेबांना व राणीसाहेबांना म्हणजे त्याच्या वडिलांना व आईला हीच ती मी सांगत होतो ती हिरा, असे सांगितले .त्याने  राजेसाहेबांच्या व राणीसाहेबांच्या  कानावर हिराबद्दल सर्व माहिती पूर्वीच घातली होती. अगोदर कुमारने सर्व हकीकत सांगितलेली असल्यामुळे त्यांच्या विरोधाचा  नाराजीचा काहीच प्रश्न नव्हता .त्यांची  संमती त्याने अगोदरच घेतली होती.

कुमारला नगारा सैनिक स्वस्थ बसणार नाहीत आक्रमण करतील याची खात्री होती.त्यानेही आपल्या सैनिकांना  तयार होण्यास सांगितले.सर्व सैनिक तुतारीच्या आवाजावर जयघोष करीत धबधब्याच्या दिशेने निघाले .तर तिकडे नगारा वाजवीत नगारा राज्याचे सैनिक धबधब्याच्या दिशेने निघाले.

थोड्याच वेळात धबधब्यापाशी दोनही बाजूचे सैनिक जमले.युद्धाची एकच धुमश्चक्री उडाली .तुतारी सैनिकांना कोणत्याही मार्गाने (पारंबीच्या साहाय्याने किंवा दोराच्या सहाय्याने किंवा शिडीच्या साह्याने )नगारा सैनिकाना खाली उतरू द्यायचे नाही एवढेच काम होते .खालून बाण सोडणे त्रासदायक व कष्टाचे होते .ते बाण काही वेळा वर न जाता खाली सैनिकांवरच पडत असत.

वरून बाण सोडणे सोपे होते .नगारा सैनिक वरून जळते बाण खाली सोडीत .तुतारी सैनिकांचे जास्त नुकसान होत असे. शेवटी कुमारने एक युक्ती काढली .शिड्यांना शिडय़ा बांधून त्याने पंचावन्न फूट  लांब शिड्या तयार केल्या .अशा पंधरा शिडय़ा तयार केल्यावर त्याने आपल्या जवळील सुगंधी वासाचे गुंगी आणणारे अनेक बाण वरती सोडले.बाण सोडण्यासाठी त्यांनी एक यंत्र तयार केले होते. सैनिक बेशुद्ध झाल्यावर शिड्या लावून तुतारी सैनिक वर चढले .नगारा सैनिक बेशुद्ध होते .त्यांची सर्व शस्त्रास्त्रे काढून घेण्यात आली .त्यांना बांधून ठेवण्यात आले .सर्व पारंब्या कापून टाकण्यात आल्या .शिड्यांच्या साह्याने सर्व तुतारी सैनिक खाली उतरले.

नगारा सैनिक शुद्धीवर येतात तो त्यांना आपण निशस्त्र झाल्याचे आढळले.सर्व शस्त्रे नेण्यात आली होती.आता पुन्हा लढाई करायची म्हणजे खूपच तयारी करावी लागणार होती .

मुलीची संमती असल्याशिवाय विवाह होता कामा नये अशी प्रथा होती .हिरा ज्याअर्थी त्या तरुणाबरोबर पळून गेली त्याअर्थी तिची राजाबरोबर  लग्नाला संमती नव्हती हे शेतकऱ्यांच्या लक्षात आले होते.हिराच्या जिवलग मैत्रिणीनेही ती गोष्ट शेतकऱ्याला सांगितली. हिराची राजाबरोबर लग्न करण्याला मान्यता नव्हती ,हे शेतकऱ्यांने व प्रधानाने राजाच्या कानावर घातले.

*हिराची (मुलीची )संमती नाही असे म्हटल्यावर प्रथेप्रमाणे सर्व प्रश्नच मिटला.*

*आता उगीचचच्या उगीच लढाई करून सैनिकाचे प्राण खर्ची घालण्यात काही अर्थ नव्हता *

*लढाईचा ज्वर संपला .नेहमीप्रमाणे धबधब्याच्या वर व खाली गस्त सुरू झाली*

११/५/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel