रोज त्या दरवाजा ढकलून पहात असत.दरवाजा बंद असे .बहुधा आतून कडी कुलूप असावे .आठ पंधरा दिवस असा प्रयत्न केल्यावर एके दिवशी दरवाजा हळूच उघडला

दोघी क्षणभर आत जावे की न जावे अशा विचारात घुटमळल्या. एकमेकींचा हात घट्ट धरून त्या आत जाऊ लागल्या.तेवढ्यात विमलचा परकर कशात तरी गुरफटला. कमलला ठेच लागली. विमलचा हात सुटला. कमल ठेच लागल्यामुळे थोडीशी भेलकांडत पुढे गेली. विमल मागे राहिली.दरवाजा आपोआप बंद झाला .जवळपास कुणीही नव्हते . जिवाच्या आकांताने कमल आतून दरवाजा ओढीत होती, तर विमल बाहेरून ढकलीत होती.दरवाजा कसा कोण जाणे आपोआप पक्का बंद झाला होता.काही केल्या उघडत  नव्हता.

कमल हताश होऊन उलट फिरली आणि  बागेकडे पाहू लागली.

बाग कुठेही दिसत नव्हती.गुलाबाचे एखादे फूल सुद्धा दिसत नव्हते .

एवढी निरनिराळ्या रंगांची गुलाबाची फुले, गुलाबांचे ताटवे ,ते रंगीबेरंगी आकर्षित करणारे षटकोनी वाफे,कुठेही काहीही दिसत नव्हते .पटांगणावर सर्वत्र हिरवळ होती. आणखी काहीही नव्हते.एखादा पक्षी, एखादा चरणारा प्राणी,काहीही  दिसत नव्हते . संध्याकाळ झाली होती.संध्याकाळी परत फिरणारे पक्ष्यांचे थवेही आकाशात दिसत नव्हते.सर्वत्र भयाण शांतता पसरली होती .कमल पिंजऱ्यात अडकली होती.

कमल आंत ओरडत  रडत होती. विमल बाहेर रडत ओरडत होती.

कमल बाहेर येऊ शकत नाही हे पाहिल्यावर विमलने घाबरून गावाकडे धाव ठोकली.

कमल कुठेतरी अडकली आहे असे ऐकल्याबरोबर गावकरी धावत निघाले.

विमल त्यांना घेऊन कमल जिथे अडकली होती तिथे आली .

विमलला गुलाबाची बाग ,फाटक ,दिसत होते.तर गावकऱ्यांना कुठेही गुलाबाची बाग फाटक दिसत नव्हते .

त्यांना फक्त मोकळे पटांगण दिसत होते .

कमल दोघांनाही दिसत नव्हती .कमल गेली कुठे ?

दरवाजा बंद झाला आतून कडी कुलुप नाही तरीही दरवाजा उघडत नाही हे पाहून कमल अतिशय घाबरली.आज पर्यंत जी निरनिराळ्या रंगांच्या गुलाबांची बाग ती बघत आली होती, ती बागही कुठे दिसत नव्हती . त्या षटकोनी पटांगणात सर्वत्र हिरवळ पसरलेली होती .हळूहळू संध्याकाळ गडद होत होती .थोड्याच वेळात संधीप्रकाशही नाहीसा झाला असता . ती घाबरून मटकन खाली बसली. विस्तीर्ण पटांगणात हिरवळीवर काळोखात ती एकटीच बसली होती.तिला रडू आवरत नव्हते .तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते .डोके दोन गुडघ्यात घातले होते.

एवढ्यात तिला दिव्य प्रकाश डोळे मिटलेले असूनही दिसू लागला .तिने हळूच डोळे उघडले .तिला समोरच एक मोठा राजवाडा दिसत होता .गोष्टी वाचताना,सिनेमा बघताना ,तिने राजवाडा पाहिलेला होता .त्यामुळे समोर दिसणारा  राजवाडाच आहे हे तिने लगेच ओळखले .त्या प्रासादातून खिडक्यांच्या चौकटीतून  प्रकाश बाहेरच्या हिरवळीवर पडत होता.प्रकाशमान राजवाडा आणि त्यातून  पडलेला प्रकाश  अतिशय मनोहर दिसत होता .त्या प्रकाशात एक प्रकारचे आकर्षण होते .संमोहित करण्याचे सामर्थ्य होते .कमल स्वत:ला विसरली .ती व विमल शाळेतून रोज घरी जात असताना, गुलाबाची बाग बघण्यासाठी ,त्या रोज दरवाजा ढकलून बघत होत्या. दरवाजा रोज उघडत नव्हता .आज उघडला परंतु  कमलच आत येऊ शकली. विमल येऊ शकली नाही.   ती हिरवळीवर एकटीच होती .गुलाबाची बाग दिसत नाहीशी झाली होती.ती हमसून हमसून रडत होती वगैरे सर्व गोष्टी विसरून गेली.

भारल्याप्रमाणे, संमोहित झाल्याप्रमाणे, ती राजवाड्याकडे चालू लागली.दरवाजा जणू काही तिच्या स्वागतासाठी उघडाच होता .आंत सर्वजण तिचीच वाट पाहात होते.ती आत शिरताच दरवाजा आपोआप बंद झाला . दास दासी तिच्या सेवेसाठी हजर होत्या .तिला सर्वजण छोट्या राणीसाहेब म्हणत होत्या.

आपण दमल्या असाल असे म्हणून प्रथम तिला एका सिंहासनासारख्या खुर्चीवर विश्रांतीसाठी बसा म्हणून विनंती करण्यात आली .तिला कॉफीसारखे कुठले तरी  दिव्य पेय देण्यात आले.ते घेतल्यानंतर तिला  तरतरी आली .एखाद्या राजकन्येप्रमाणे ती रुबाबात बोलू,चालू, वागू लागली .

श्रमपरिहारासाठी तिला स्नान करण्याची विनंती करण्यात आली .दासींबरोबर ती हमामखान्यात गेली.असे स्नानगृह तिने अद्याप पाहिले नव्हते .उंची औषधी तेलाने तिला प्रथम मसाज करण्यात आला .नंतर बाष्प स्नान देण्यात आले. नंतर टबबाथ देण्यात आला .तिच्या आगेमागे दासी तिचे स्नान आनंददायी व्हावे म्हणून फिरत  होत्या.

स्नानानंतर तिला उंची वस्त्रे देण्यात आली . त्या पोषाखात  ती एक सुंदर राजकन्या दिसू लागली.या स्नानामध्ये एक दीड तास सहज गेला असावा .तिची नेहमीची जेवण्याची वेळ झाली होती .तिला कडकडून भूक लागली होती .  तिला मधूनच आपण कमल असल्याची जाणीव आठवण होत होती .तरीही ती न घाबरता सर्व काही मनापासून उपभोगत होती.एकदा तर तिला आपण स्वप्न  पाहत तर नाही ना असे वाटले. तिने एका दासीला तिला चिमटा काढण्यास सांगितले .दासी त्यासाठी तयार नव्हती.शेवटी रागावून तिने तिला जोरात चिमटा काढण्यास सांगितले .दासीने जोरात चिमटा काढला.तिच्या मस्तकात कळ गेली .आपण स्वप्नात नाही याची तिला खात्री पटली .

दासीनी तिला नंतर भोजन कक्षात नेले .तिच्या आवडीचे सर्व पदार्थ तिथे होते .विविध प्रकारची मधुर पक्वान्ने तिथे होती .तिला कोणते पदार्थ आवडतात ते त्यांना माहीत कसे काय होते कुणास ठाऊक ?ती आनंदाने पोटभर जेवली.दासींनी  हात धुण्यासाठी तिच्या हातावर सुगंधी पाण्याची धार धरली . नंतर तिला बहुगुणी विडाही देण्यात आला .

कमलने राजवाडा बघण्याची इच्छा प्रगट केली .तिला सर्व राजवाडा फिरून दाखवण्यात आला .स्वागत कक्ष, स्नान कक्ष, भोजन कक्ष, तिने अगोदर पाहिलेच होते. दरबार कक्ष, न्यायकक्ष, सामान्य जन कक्ष, अभ्यागत कक्ष,पुस्तकालय कक्ष इत्यादी सर्व विभाग तिने पाहिले. 

सर्व दालने लांबलचक व भव्य होती.प्रत्येक कक्षाचे छत  उंच असल्यामुळे भव्यतेत भर पडत होती . सर्वत्र उंची झुंबरे लावलेली होती.प्रत्येक दालनात निदान दोन झुंबरे होती .सर्वत्र उंची इराणी गालीचे पसरलेले होते .चालताना त्यात पाय रुतत होते.टाचणी  दिसेल इतका स्वच्छ प्रकाश सर्वत्र पसरलेला असूनही कुठेही डोळ्यांना त्रास होत नव्हता.राजप्रासाद तीन मजली होता .

सर्व राजवाडा फिरण्यासाठी तिला जवळजवळ एक तास लागला .कमल दमली होती .तिला आता झोप अनावर झाली होती .

*दासीनी तिला शयनकक्षामधील राजकन्येच्या  कक्षात नेले.*

*उंची शिसवी पलंगावर, परांच्या गादीवर, परांच्या उशीवर, परांची दुलई घेऊन, ती शांतपणे निद्राधीन झाली.*

(क्रमशः)

५/१/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel