(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

या शहरात मी नुकताच बदलून आलो होतो.मी सरकारी नोकरीत आहे.सरकारी क्वार्टर्स उपलब्ध नसल्यामुळे मला जागा बघावी लागली.मला सरकारतर्फे महिन्याला फक्त दहा हजार रुपये  भाडे मिळणार होते .या शहरात भाडय़ाचे दर अवास्तव चढे होते .मला ज्या विभागात जागा हवी होती तिथे  ब्लॉकसाठी भाड्याचे दर महिन्याला किमान वीस हजार रुपये होते .इस्टेट एजंट मार्फत मला एक हवा तसा ब्लॉक केवळ महिना दहा हजार रुपये भाडे देऊन मिळाला.

जागा ताब्यात घेण्यापूर्वी अर्थातच एजंट बरोबर जाऊन मी जागा प्रत्यक्ष बघितली . बिल्डिंग जुनी दहा मजली होती. माझा ब्लॉक सातव्या मजल्यावर होता.लिफ्टमधून बाहेर आल्यावर एक लांबलचक बोळ (पॅसेज) होती . प्रत्येक मजल्यावर तीन ब्लॉक होते .एक ब्लॉक बोळीच्या डाव्या बाजूला दुसरा ब्लॉक बोळीच्या उजव्या बाजूला तिसरा ब्लॉक बोळीच्या टोकाला लिफ्टच्या समोर होता. मी भाड्याने घेणार असणारा ब्लॉक बोळीच्या डाव्या बाजूला होता .मला ब्लॉक समाधानकारक वाटला .एवढ्या कमी भाड्याने ब्लॉक कसा मिळतो अशी मला एक शंका आली .जुनाट इमारतीत ब्लॉक घेण्याला विशेष कोणी उत्सुक नसतो.ब्लॉक तसाच राहण्यापेक्षा कमी भाडे आले तरी  चालेल असे मालक मला म्हणाले .तुम्हाला म्हणून मी कमी भाड्यात हा ब्लॉक मिळवून देत आहे . इमारत जुनाट असली तरी गेला बाजार पंधरा हजार रुपये भाडे यायला काहीच हरकत नाही .इत्यादी गप्पा एजंटने मारल्या.आपल्याला काय करायचे आहे स्वस्त भाड्याने जागा मिळते आहे घेऊन टाकावी.असा विचार करून मी अॅडव्हान्स डिपॉझिट कमिशन इत्यादी पैसे देऊन ब्लॉक ताब्यात  घेतला.

इमारतीत प्रत्येक मजल्यावर तीन याप्रमाणे एकूण तीस ब्लॉक होते. तळमजल्यावर  पार्किंग होते.माझी पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेलेली होती .अजून

तीनचार महिने तरी ती येण्याचा संभव नव्हता. एवढा काळ मी एकटाच ब्लॉकमध्ये राहणार होतो .जागा ताब्यात घेतल्यावर चार दिवसांनी मी तिथे राहायला आलो .हल्ली काही ब्लॉक ठळक  सामानासह (फर्निश्ड)भाड्याने मिळतात.त्यांतीलच हा एक होता.

अजून माझी इमारतीत कुणाशीही ओळख झाली नव्हती .फक्त वॉचमन मला नवीन भाडेकरू म्हणून ओळखत होता .येथे प्रत्यक्ष राहायला आल्यावर मला येथील गैरसोयी जाणवू लागल्या.पॅसेजमधील(बोळ) दिवे कमी प्रकाशाचे होते . त्यामुळे थोडे थ्रिलर पिक्चरमध्ये आल्यासारखे वाटे.वातावरण किंचित भीतीदायक वाटे.

येथील  लिफ्ट सर्वांगाने खास वैशिष्ठ्यपूर्ण  होता .हल्ली बहुतेक इमारतीत अत्याधुनिक लिफ्ट असतात .सर्व कामे स्वयंचलित पद्धतीने होत असतात.भरपूर प्रकाश, भरपूर वारा देणारा लिफ्टच्या छताला पंखा ,  अापण कोणत्या मजल्यावर आहोत हे दर्शवणारा दर्शक( इंडिकेटर), अश्या सर्व सोयी असतात. जेथे लिफ्ट थांबणार असते तिथे दरवाजाची उघड झाप  स्वयंचलित पद्धतीने होत असते . इत्यादी .अशा अद्यावत लिफ्टमधून जाताना मला नेहमी थोडीशी भीती वाटते .लिफ्ट वर किंवा खाली जात आहे हे जाणवत नाही .लिफ्टची गतीही तीव्र असते .केवळ इंडिकेटरवर आपण कुठे आहोत ते कळते. वीज गेली, लाइट गेले, लिफ्ट बंद पडला, तर काय असा मला नेहमी प्रश्न पडतो .लोखंडी जाळीच्या सरकत्या दरवाजामुळे आपण जगापासून अलग पडलो नाही अशी एक जाणीव धीर देत असते .

मी जागा भाड्याने घेतली तेथील लिफ्ट बाबा आदमच्या जमान्यातील होता .सर्व ऑपरेशन्स( लिफ्ट वर खाली करायचा सोडून )स्वत: करायच्या होत्या. लिफ्टला दोन लोखंडी सरकते दरवाजे होते.त्याला तेलपाणी नसल्यामुळे ते सरकताना अडकत असत.जोर करून ते सरकावे लागत.भिंतीमध्ये त्याचा खटका कधी कधी पडत नसे त्यामुळे सर्किट पुरे होत नसे.अशा वेळी सरकता लोखंडी दरवाजा थोडा मागे ओढून जोरात लावावा लागे.लिफ्ट खाली वर जात असताना आपल्याला दरवाज्यांच्या जाळीमधून बाहेरील  भाग दिसत असे .प्रत्येक मजल्यावर मजल्यांचा क्रमांक दर्शविणारे अंक लिहिलेले होते .त्यामुळे आपण किती मजले चढून आलो किती मजले शिल्लक आहेत ते कळत असे. हा माझ्या दृष्टीने जरी प्लस पॉइंट असला तरी जुनाटपणा वाटे तो वाटेच. लिफ्टमध्ये कमी प्रकाशाचा  दिवा होता .त्यामुळे मजल्याची बटणे नीट दिसत नसत .डोळे ताणून किंवा स्पर्शाने मोजून बटण दाबावे लागे.छताला एक पंखा होता .त्यावर सुरक्षिततेसाठी नेहमी प्रमाणे जाळी होती.कमी शक्तीच्या बल्बचा प्रकाश आणखी अंधूक करण्यासाठी जाळीप्रमाणेच त्यावर जमलेली कोळिष्टकेही हातभार लावीत असत.  छताचा पंखाही फार आवाज करीत असे .काही वेळा बटण दाबूनही तो सुरू होत नसे. गाडीला काही वेळा ज्याप्रमाणे धक्का मारावा लागतो त्याप्रमाणे या पंख्यालाही कोणत्या ना कोणत्या साधनाने गती द्यावी लागे.अशा वेळी पेनचा छान उपयोग होत असे .पुरेश्या उंच माणसालाच ते शक्य होते. काही वेळा लिफ्ट सुरू झाल्यावर पंख्यालाही आपण फिरावे असे वाटत असे.लिफ्ट थांबला की तोही थांबत असे .अशा प्रकारे तो काही वेळा स्वयंचलित पद्धतीने काम करीत असे !!! लिफ्ट सुरू होताना थोडा मागे पुढे हाले. कुरकुर करी.वर खाली जातानाही त्याचा एक आवाज येत असे.वाहन थांबताना जसा एक लहानसा धक्का बसतो त्याप्रमाणेच लिफ्ट थांबतानाही एक लहान मोठा धक्का बसत असे .एकूणच लिफ्टची किरकिर व कुरकुर फार होती .  अद्यावत लिफ्टमध्ये कोंडल्यासारखे वाटल्यामुळे मला भीती वाटे तर या लिफ्टमध्ये लिफ्ट आता कोसळतो की नंतर कोसळतो अशी भीती वाटत असे .

एकूणच लिफ्ट प्रकरणाचे माझ्याशी फारसे जुळत नाही .थोडीशी भीती व बऱ्याच प्रमाणात सहज होणारा व्यायाम यामुळे अनेकदा मी लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांचा वापर प्रत्येक ठिकाणी करीत असतो.

मी नवीन जागेत राहायला आलो .तूर्त काही महिने मी एकटाच होतो.माझा ब्लॉक सातव्या मजल्यावर आहे हेही तुम्हाला मी अगोदरच सांगितले आहे.येथेही मी शक्यतो पायऱ्यांचा वापर करीत असे .सात मजले चढउतार म्हणजे  मला विशेष काही वाटत नसे.येथे जिन्यातही कमी प्रकाशाचे दिवे लावलेले होते.दिवे चोरीला जावू नयेत व सुरक्षितता  म्हणून त्यावर जाळी बसवलेली होती.त्यामुळे प्रकाश आणखी अंधुक होत असे.जाळीवर बऱ्याच वेळा कोळिष्टके जमलेली असत. बल्ब व जाळी यावर धूळ जमलेली असे. (अशीच कोळिष्टके लिफ्टमधील पंख्याच्या जाळीवरही असत.)त्याची देखभाल विशेष होत नसे .एखादा बल्ब उडाला तर त्या जागी नवीन बल्ब चार आठ दिवसांनी  येत असे .त्यावेळी वरच्या व खालच्या  दिव्यांच्या येणाऱ्या अंधुक प्रकाशातच मार्गक्रमणा करावी लागे.दिवसाही जिन्यात अंधार असे. दिवा असावा असे वाटे .परंतु दिवे दिवसा कटाक्षाने बंद केले जात .एकंदरीत वातावरण भीतीदायक करण्याची पुरेपूर खबरदारी घेतलेली होती. 

एकूण काय जिन्याने गेले तरी भीती व लिफ्टने गेले तरी भीती असा प्रकार होता.आपल्याला भीतीची निवड करण्याची संधी जरुर होती .हळूहळू मला जागेचे भाडे कमी कां आहे त्याचा उलगडा होऊ लागला होता.मी ऑफिसातून जरी लवकर निघालो तरी जेवण बाहेर घ्यावे लागत असल्यामुळे आठ साडेआठ वाजेपर्यंतचा वेळ मी कुठेतरी काढीत असे.नंतर नऊ ते दहा या वेळात माझ्या ब्लॉकवर परत येत असे.सुटीच्या दिवशी मित्रांबरोबर बाहेर किंवा घरात एकटाच असे .

ब्लॉकवर येत असताना मी लिफ्टचा वापर करावा की जिन्याचा वापर करावा हा विचार करीत असे .मी भुताने पछाडलेल्या इमारतीत राहत आहे असा विचार एकदा माझ्या मनात येऊन गेला . 

ब्लॉकमध्ये आल्यावर मी सुटलो बुवा असे मनाशी म्हणून एक सुस्कारा टाकीत असे .ब्लॉकमध्ये शिरल्यावर दिवाणखाना , दिवाणखान्याच्या डाव्या व उजव्या बाजूला एक एक शयनगृह,समोरच्या दरवाज्याने गेल्यावर स्वयंपाकघर कोठीची खोली अशी रचना होती .प्रत्येक शयनगृहाला संलग्न न्हाणीघर होते. डावीकडचे शयनगृह जरा जास्त प्रशस्त व हवेशीर होते .मी शयनगृह म्हणून त्याचाच वापर करीत असे.

शयनगृह लिफ्टच्या भिंतीला लागून असल्यामुळे लिफ्टचा आवाज एेकायला येत असे.इमारतीत बहुतेक सर्व कुटुंबवत्सल मंडळी राहत होती .माझ्याप्रमाणेच काही जण व्यायामाचे भोक्ते होते.लिफ्टचा वापर करण्यापेक्षा जिन्याचाच वापर करण्याकडे त्यांचा कल होता .एकूण रात्री लिफ्ट ,मी आल्यावर विशेष वापरात नसे.त्यामुळे लिफ्टच्या  आवाजाचा विशेष  त्रास होत नसे.रात्री नाटक सिनेमाला गेलेली मंडळी किंवा अन्य कारणाने बाहेर गेलेली  मंडळी आली तर रात्री एक दीडच्या सुमारास लिफ्टचा वापर होत असे .त्यावेळी मी गाढ झोपेत असल्यामुळे  लिफ्टच्या आवाजाचा मला त्रास होत नसे .

एकूण सर्व काही ठीक चालले होते.त्या जुन्या इमारतीच्या वातावरणांत मी रुळत चाललो होतो.

मला येथे येऊन एक महिना झाला होता. मी गाढ झोपी गेलो होतो .कशीकोण जाणे मला अकस्मात जाग आली.जाग कां आली याचा मी विचार करीत होतो.रात्रीचे तीन वाजले होते .लिफ्टचा आवाज अव्याहत येत  होता.कुणीतरी सतत लिफ्टने खाली वर येत जात होते.रात्रीच्या शांत वातावरणात आधीच त्रासदायक असलेला लिफ्टचा आवाज जास्तच घुमत होता. त्रासदायक वाटत होता. अंगावर काटा उभा करीत होता. लिफ्टमध्ये बसून मुलांनी जर लिफ्ट सतत खालीवर नेला, त्याचा एखाद्या खेळण्यासारखा वापर केला तर जसा एकसुरी आवाज होईल तसा आवाज येत होता. 

*कुणीतरी लिफ्टमध्ये बसून लिफ्ट सतत खालीवर करीत होते.*

*बाहेर जावून हा खेळ कोण खेळत आहे ते पाहावे जमल्यास त्याला दम द्यावा असा विचार मनात आला.*

*दम देण्यासाठी मी दरवाजा उघडून बाहेर जाणार एवढ्यात हा भुताटकीचा प्रकार तर नाही ना असा एक विलक्षण विचार मनात आला.*  

* लिफ्टचा आवाज ऐकत मी बाहेरच्या दरवाजाजवळ तसाच खिळून उभा राहिलो.*  

(क्रमशः)

२२/६/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel