नेहमीप्रमाणे पोलिसांची गस्त घालणारी गाडी महात्मा गांधी रस्त्यावरून जात होती.पोलिसांच्या गाडीच्या प्रकाशात रस्त्यावर एक मनुष्य पडलेला दिसत होता .बहुधा दारू पिऊन रस्त्यातच ढेर झालेला दिसतो असे एक पोलीस म्हणाला .जवळ येऊन गाडी थांबली तरीही हालचालीचे काही चिन्ह दिसत नव्हते.त्याच्या अंगावरून गाडीचे चाक गेलेले दिसत होते .शर्टवर टायर्सचे ठसे स्पष्टपणे दिसत होते. रस्त्यावर कोणत्या तरी गाडीचे तेल सांडलेले होते .त्यातून गाडीचे चाक गेल्यामुळे शर्टवर स्पष्टपणे ठसे उमटले होते .प्रेताच्या दोन्ही बाजूला  टायरचे ठसे स्पष्टपणे दिसत होते. पोलिसांनी आपली गाडी साईडला लावली आणि कंट्रोल रुमला फोन केला .थोड्याच वेळात पोलिसांची व्हॅन सर्व तंत्रज्ञांसह आली .निरनिराळ्या कोनातून प्रेताचे फोटो घेण्यात आले.आजूबाजूच्या जागेचेही जवळून व लांबून अनेक फोटो काढण्यात आले .एक छोटीशी परंतु सर्व काही व्यवस्थित दिसेल अशी व्हिडिओ क्लिप घेण्यात आली .रस्त्यावर जिथे प्रेत होते त्या भोवती मार्किंगही व्यवस्थित करण्यात आले.एकदा प्रमुखाने काही राहिले नाही ना याची खात्री करून घेतली .एवढ्यात अॅम्ब्युलन्स आली .प्रेत पोस्टमार्टेमसाठी शवागारात पाठविण्यात आले.सर्व माहिती कॉम्प्युटरवर लोड करण्यात आली .सर्व पोलीस स्टेशन्स आता ती माहिती व व्हिडिओ क्लिप पाहणार होते .कुठेही त्या मेलेल्या व्यक्तींबद्दल काही माहिती मिळाल्यास ती लगेच सर्वांना उपलब्ध होणार होती .त्याची एक व्यवस्थित फाइल करून ती शामरावांच्या टेबलावर ठेवण्यात आली .

दुसऱ्या दिवशी सकाळी शामराव नेहमीप्रमाणे आठ वाजता ऑफिसमध्ये आले.विशेष काय असे विचारता पोलिसाने टेबलावरील फायलीकडे निर्देश केला.शामरावानी  कॉम्प्युटर सुरू करून सर्व माहिती व्यवस्थित वाचण्यास सुरुवात केली.त्यांनी व्हिडिओ क्लिपही पुन्हा पुन्हा तीन तीनदा बघितली .प्रथमदर्शनी ही केस हिट अॅण्ड रन या टाइपची वाटत होती .रस्त्यावरून एक मनुष्य चालत असताना गाडी आली आणि त्याला तुडवून निघून गेली  असे वरवर पाहता वाटत होते .परंतु प्रत्यक्षात अनेक प्रश्न मनात निर्माण होत होते.पोस्ट मार्टेमचा रिपोर्ट आल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट होणार होत्या. उदाहरणार्थ मृत्यूची वेळ ,मृत्यूचे कारण ,इ.

युवराज नेहमीप्रमाणे सकाळी जॉगिंग केल्यानंतर परत घरी येत होते. त्यांना सरळ घरी जाण्याऐवजी का कुणाला माहित  शामरावांच्या ऑफिसवर चक्कर मारावी असे वाटले .काही ना काही कारणाने युवराज दीर्घ काळ व्यस्त असल्यामुळे दोघांची बऱ्याच दिवसांत भेट झाली नव्हती .युवराजांची गाडी थांबल्यावर बाहेर उभ्या असलेल्या पोलिसांने त्यांना कडक सॅल्यूट मारला. शामराव व युवराज यांच्या दोस्तीची सर्वांनाच माहिती होती .युवराजांनी पोलिसांना केस सोडविण्यामध्ये वेळोवेळी केलेली मदतही सर्वांना माहित होती.युवराज नामांकित वकील असल्यामुळे केव्हा केव्हा त्यांना पोलिसांच्या विरुद्धही कोर्टात उभे राहावे लागे .अशा वेळी पोलीस प्रॉसिक्युटर व युवराज यांच्यामधील जुगलबंदी पाहण्यासारखी असे . बहुतेक वेळा युवराज केस जिंकत असत .युवराज त्यांच्याकडे आलेली केस जर सत्य वाटली तरच घेत  असत.युवराज केवळ कोर्टात केस लढण्यापुरते आपले कौशल्य मर्यादित ठेवीत नसत .ते स्वतः किंवा संदेशाच्या मार्फत केसचे इन्वेस्टिगेशनही करीत असत.शामरावांना रिसेप्शनिस्टने  युवराज आल्याचे इंटरकॉमवर सांगितले .शामरावांनी युवराजांना लगेच आत पाठवून देण्यास सांगितले .दोन कडक कॉफीही आत पाठविण्यास सांगितली .रिसेप्शनिस्टने युवराजांना हाताने आत जाण्यास सुचवले.आत गेल्यावर शामरावांनी उठून युवराज यांचे स्वागत केले व त्याना आपल्या शेजारी बसण्यासाठी सुचविले.

काय विशेष असे युवराजांनी विचारता शामरावांनी कम्प्युटरकडे व टेबलावरील फाईलकडे बोट दाखविले .व्हिडिओ क्लिप बघितल्यावर व इतर डिटेल्स पाहिल्यावर युवराजांनी शामरावांजवळ पुढील मत व्यक्त केले. ही हिट अँड रन केस वाटावी असे चित्र निर्माण केले असले तरी ही खुनाची केस आहे .शामराव म्हणाले मलाही असेच वाटत आहे .कशावरून असे विचारता शामराव पुढे म्हणाले .

जर रस्त्यावरून गाडी भरधाव येत असताना मध्ये अकस्मात कुणी आले तर प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून ड्रायव्हर ब्रेक जोरात दाबतो.टायर रस्त्यावर घासल्यामुळे टायरच्या स्पष्ट खुणा रस्त्यावर उमटतात .इथे तश्या खुणा  कुठेही उमटलेल्या दिसत नाहीत .अर्थात एखादा मद्यधुंद गाडी तशीच अंगावरून नेईल .पण तो अपवाद.

युवराज पुढे म्हणाले की शामराव अगदी बरोबर ,तुम्ही माझ्या मनातील बोललात .आणखी एक गोष्ट ज्या वेळी गाडी एखाद्या व्यक्तीवर जोरात आपटते त्या वेळी ती व्यक्ती एक तर फेकली जाते किंवा गाडीबरोबर घासटत रस्त्यावरून जाते .तश्या खुणा कुठेही दिसत नाहीत.

आणखी एक गोष्ट  प्रेताच्या खिशात काहीही नाही असे कसे होईल.

ही व्यक्ती व्यवस्थित पोशाख केलेली आहे .अशी व्यक्ती रुमाल पाकीट मोबाईल अशा नेहमी लागणार्‍या  गोष्टी घेऊन बाहेर पडत असते .त्याच्या खिशात पाकीट मोबाइल रुमाल काहीही सापडत नाही .

याला मारणार्‍या व्यक्तीने त्या वस्तू चोरल्या असतील आणि प्रेत रस्त्यावर टाकून दिले असेल .

किंवा मारणाऱ्यांनी याची ओळख पटू नये म्हणून मुद्दाम त्या वस्तू काढून घेतल्या असतील.ओळख पटू नये हेच कारण जास्त संयुक्तिक वाटते .

किंवा आणखी एक शक्यता प्रेत रस्त्यावर टाकल्यावर येणाऱ्या जाणाऱ्या कुणीतरी त्याच्या खिशातील पाकीट वगैरे वस्तू काढून घेतल्या असतील .

काहीही असो परंतु प्रेताची ओळख पटणे आवश्यक आहे .त्यासाठी जवळच्या काही सोसायट्यांमध्ये त्याचा फोटो घेऊन चौकशी केली पाहिजे. त्याचप्रमाणे पोलिस स्टेशनमध्ये ज्या मिसिंग कम्प्लेंट येतात त्यावरही लक्ष ठेवले पाहिजे .त्याच्या शर्टवर व पँटवर जे लाँड्री  मार्क्स आहेत त्यांच्या साह्याने त्याचा पत्ता सापडतो का तेही पाहणे आवश्यक आहे .

या सर्वांसाठी संदेशची मदत घेणे जास्त योग्य ठरेल असे  एकमताने ठरले त्याप्रमाणे लगेच संदेशला फोन करण्यात आला .युवराजांनी त्याला सर्व माहिती देऊन त्याने कोणत्या दिशेने काम करावे याचे  मार्गदर्शन केले .

विशेष काही बोलण्यासारखे उरलेले नसल्यामुळे युवराज आपल्या ऑफिसवर जाण्यासाठी निघाले. पोस्टमार्टेम रिपोर्ट आला की मला अवश्य कळवा असे त्यांनी शामरावाना सांगितले .

काही माहिती पोलिसांनी गोळा केली. काही माहिती संदेशने गोळा केली.पोस्टमार्टेम रिपोर्टही आला. रिपोर्टमध्ये डोक्याला झालेली जखम रस्त्यावर आपटून झालेली नाही तर एखाद्या कठीण वस्तूने मागून कुणीतरी जोरात मारल्यामुळे ती जखम झाली आहे असे म्हटले होते .जवळच्या सोसायट्यांमध्ये चौकशी करतात तिथे काहीही सुगावा लागला नाही .लाँड्री मार्कवरून लाँड्रीचा शोध घेत असताना ती लाँड्री शहराच्या दुसऱ्या भागात मिळाली .लाँड्रीवाला अगोदर माहिती देण्यासाठी कुरकुर करीत होता .त्याला थोडीशी पोलिसी समज दिल्यानंतर त्याने आपले रेकॉर्ड पाहिले परंतु त्याच्याजवळ संपूर्ण पत्ता लिहिलेला आढळला नाही. ज्या अर्थी कपडे इथे दिले जातात त्या अर्थी ती व्यक्ती इथेच कुठे तरी जवळपास राहात असली पाहिजे असे अनुमान काढून शोध घेण्यास सुरुवात केली .एस के व्ही एवढ्या मार्क्स वरून त्याचे नाव सदाशिव कृष्णा वणकुद्रे आहे हे लाँड्रीमधील पावती पुस्तकावरून कळले.जवळच्याच एका सोसायटीमध्ये तो राहात असल्याचे आढळून आले.त्याचे लग्न झालेले होते परंतु तूर्त तो एकटाच राहत होता .तो नुकताच इथे राहण्यासाठी आला होता .त्याची बायको माहेरी गेली होती .याशिवाय आणखी काही कुणाला सांगता आले नाही .

तो भाड्याने राहात होता .फ्लॅटच्या मालकाजवळ चौकशी करण्यात आली.तिथे त्याच्या ऑफिसचा पत्ता मिळाला .अॉफिसमध्ये त्याच्या गांवचा पत्ता मिळाला . त्याच्या घरी जाऊन आई वडिलांशी चौकशी करताना त्याने आंतरजातीय विवाह केला आहे आणि त्यामुळे त्यांच्या घरचे नाराज आहेत असे कळले .तिथे पोलिसांना त्याच्या बायकोच्या माहेरचा पत्ता मिळाला.शेवटी पोलीस त्याच्या बायकोच्या माहेरी जाऊन धडकले .तिथे कुणीच काही व्यवस्थित माहिती देत नव्हते .कमला माहेरी काही दिवसांसाठी आली आहे .सदाशिव पुढच्या आठवड्यात तिला नेण्यासाठी येणार आहे .एवढीच माहिती कळली .

कमलाचा भाऊ गुंड प्रवृत्तीचा होता त्याच्याविरुद्ध एक दोन तक्रारी स्थानिक  पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या आढळून आल्या .कमला दबावाखाली असल्यासारखी वाटत होती .

शामराव व युवराज ही सर्व माहिती घेऊन एकत्र चर्चा करण्यासाठी बसले .काही माहिती संदेशने गोळा केली होती .काही माहिती शामरावानी गोळा केली होती.युवराजांनी सर्व माहितीचे संकलन करून पुढील अंदाज वर्तविला .

हा विवाह कमलाच्या भावाला मान्य  नव्हता.त्याचा विरोध डावलून कमलाने रजिस्टर मॅरेज केले होते. सदाशिव त्याच्या मित्राकडे आलेला असताना कमला व सदाशिव यांची ओळख झाली .यातून त्यांनी विवाह करण्याचे ठरविले .कमलाने घरातून पळून जाऊन सदाशिव बरोबर रजिस्टर विवाह केला .हा विवाह दोनही कुटुंबांना पसंत नव्हता .काही काळ गेला कमलाला मूलबाळ झाले म्हणजे नेहमीप्रमाणे विरोध मावळेल अशी दोघांनाही आशा होती .कमलाचा भाऊ कमलाला भेटण्यासाठी शहरात आला. वरवर त्याने सर्व मान्य केले आहे असे दाखविले.वडील आजारी आहेत असे सांगून त्यांना भेटण्यासाठी म्हणून कमलाला घरी नेले .सदाशिव कमलाला नेण्यासाठी आला असताना तेथे काहीतरी वाद झाला असावा .त्याची परिणीती सदाशिवला मारण्यात झाली असावी .ठार मारण्याचा हेतू कदाचित नसेलही .परंतु वर्मी मार लागल्यामुळे सदाशिव जागच्याजागी कोसळला असावा.आपल्यावर खुनाचा आरोप येऊ नये म्हणून त्याला मोटारीत घालून माहात्मा गांधी रस्त्यावर ठेवण्यात आले व त्याच्या वरून मोटार नेण्यात आली असावी.ओळख पटू नये म्हणून त्याच्या खिशातील सर्व वस्तू काढून घेतल्या असाव्यात .हा जाणून बुजून केलेला खून आहे किंवा अपघाती खून आहे .लोखंडी गज मारण्याचा उद्देश ठार मारणे हा नसावा .

कमला व कमलाचा भाऊ यांना ताब्यात घेऊन जर त्यांची स्वतंत्र चौकशी केली त्याचप्रमाणे कमलाच्या आई वडिलांची चौकशी केली तर उलगडा होऊ शकेल .कमलाच्या भावाच्या किंवा त्याच्या मित्रांच्या गाडीचे टायर्स तपासले पाहिजेत.

शामरावानी वेळ दवडला नाही.लगेच कमला व तिचा भाऊ याना ताब्यात घेउन त्यांची स्वतंत्र चौकशी केली.त्याचप्रमाणे कमलाच्या आई वडिलांची चौकशी केली.थोड्या फार फरकाने युवराजांनी सांगितल्याप्रमाणे घडले होते.

केवळ रागामुळे केलेल्या कृत्याने कमला विधवा झाली.तिच्या आईवडिलांचा मुलगा दहा वर्षांसाठी तुरुंगात गेला.सदाशिव प्राणाना मुकला.त्याच्या आईवडिलाना मुलाचा मृत्यू पहावा लागला.

* केवळ रागामुळे तीन कुटुंबे उध्वस्त झाली*

५/३/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel