(ही गोष्ट काल्पनिक आहे.वास्तवाशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

कॅप्टन निरंजन नेहमीप्रमाणे  संध्याकाळी क्लबमध्ये आले होते .ते नुकतेच आर्मीमधून निवृत झाले होते . त्यांचे वय पन्नासच्या आसपास असावे .सैन्यात त्यांनी मर्दुमकी गाजविली होतीच .परंतू पर्वत आरोहणात नंबर एक म्हणून त्यांची ख्याती होती .अठरा वीस वर्षांचे असल्यापासून ते त्यांच्या चाळीशीपर्यंत त्यांनी अनेक पर्वत शिखरावर झेंडा रोवला होता .अशाच एका मोहिमेवर असताना त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली होती .तेव्हापासून त्यांनी पर्वतारोहण सोडून दिले होते.त्यांनी पादाक्रांत केले नाही असे जवळजवळ एकही शिखर हिमालयात राहिले नव्हते.तसे ते स्वभावाने शांत होते .क्लबच्या एका कोपऱ्यात बसून ते नेहमी कोणते ना कोणते पुस्तक वाचीत असत.अनेक पर्वतारोहण मोहिमांमध्ये भाग घेतल्यामुळे व सैन्यात प्रदीर्घ काळ असल्यामुळे त्यांच्याजवळ अनुभवाचा व माहितीचा प्रचंड साठा होता.काही संदर्भ निघाला तर ते त्यांच्या एखाद्या मोहिमेमधील अनुभव सर्वांना सांगत असत.कॅप्टनसाहेब एखादा किस्सा सांगत आहेत असे लक्षात आल्यावर आता काहीतरी सुरस व सरस ऐकायला मिळणार याची सर्वांना खात्री होती. लगेच त्यांच्या भोवती ऐकणाऱ्यांचा वेढा पडत असे . 

आज पेपरमध्ये पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात एक बातमी छापून आली होती ."एव्हरेस्टवर आरोहण करणाऱ्याना हिममानव दिसला" थोडक्यात पुढीलप्रमाणे बातमी होती.पर्वतारोहण करणाऱ्यांचा एक चमू आपल्या तंबूमध्ये संध्याकाळी विश्रांती घेत बसला असताना त्यांना जवळच्याच एका पर्वतावर बारा पंधरा फूट उंचीचा हिममानव झपाट्याने बर्फमय पर्वत चढून जाताना दिसला आणि तो क्षणार्धात पर्वताच्या पलीकडे नाहीसा झाला .एखाद्याला संध्याकाळच्या धूसर वातावरणात भास होऊ शकेल परंतु आठ दहा जणाना एकच भास होणे शक्य नाही .दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पर्वतावर गिर्यारोहक  पाहणीसाठी गेले होते. त्यांना पर्वतउतारावर जवळजवळ पाचसहा हिममानवांच्या पायांचे ठसे आढळून आले .त्यांचे पाऊल सामान्य मनुष्याच्या पावलापेक्षा जवळ जवळ तिप्पट मोठे असावे.पावलांची लांबी दोन फूट व रुंदी सात ते आठ इंच होती .वर्तमानपत्रात त्या पावलाचा फोटोही आला होता.

लोकांना काही ना काही विषय चघळण्यासाठी हवाच असतो.हिममानव आहे की नाही याबद्दल तिथे चर्चेला सुरुवात झाली.मधून मधून हिममानव दिसल्याच्या बातम्या पेपरमध्ये छापून येतच असतात.काही जण त्याला यती म्हणूनही संबोधतात.

शिळोप्याच्या गप्पा म्हणून तावातावाने चाललेल्या चर्चेकडे किंचित स्मित हास्य करीत कॅप्टन निरंजन बघत होते.एवढ्यात एकाचे कॅप्टनसाहेबांकडे लक्ष गेले .कॅप्टनसाहेबांकडे अनेक अनुभवांचा व गोष्टींचा खजिना आहे हे सर्वांनाच माहीत होते. त्याने कॅप्टन निरंजनना विचारले की तुम्हाला काय वाटते ?"हिममानव" "हिमयती" आहे की नाही?

त्यावर कॅप्टनसाहेब म्हणाले हा वाटण्याचा किंवा न वाटण्याचा प्रश्नच नाही .हा अनुभवाचा भाग आहे .नंदादेवी(पर्वत) शिखरावरील एका मोहिमेमध्ये मी व माझ्या सहकाऱ्यांनी त्यांच्या सहवासात चार पाच दिवस घालविले आहेत.तुम्ही मला जेवढे पाहात आहात तेवढेच जवळून मी हिममानवाला पाहिले आहे.

त्यांच्या या बोलण्यावर सर्वजण आश्चर्यचकित झाले.किती वर्षांपूर्वीची गोष्ट? किती हिममानव तुम्ही पाहिलेत ?ते दिसायला कसे असतात?बर्फामध्ये ते काय खाऊन राहतात ?ते कपडे घालतात का?ते कुठे राहतात?त्यांच्यामध्ये नरमादी  असतात का ?अश्या  अनेक प्रश्नांचा एकच भडीमार कॅप्टनसाहेबांवर झाला.

त्यातल्या कोणत्याच प्रश्नांवर उत्तर न देता कॅप्टन म्हणाले मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो .तुम्हाला त्यातून तुमच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे मिळतील .कॅप्टनसाहेबांनी बोलण्याला सुरुवात केली .

त्यावेळी मी पंचवीस वर्षांचा होतो .आमचा आठदहाजणांचा एक गिर्यारोहण क्लब होता.त्यावेळी मी सैन्यात होतो .मेजरसाहेबांची अनुमती घेऊन आम्ही गिर्यारोहण मोहिमा काढीत असू.या वेळी आम्ही नंदादेवी शिखरावर जाण्याचे ठरविले होते.त्यावेळी आमचा सहा जणांचा एक गट मोहिमेवर होता. आमच्या पाठीवरील सॅकमध्ये भरपूर सामान होतेच.त्याचप्रमाणे आमच्या बरोबर सामान वाहतूकीसाठी दोन शेर्पा होते.नंदादेवी शिखर आता आमच्या टप्प्यात आले होते .दुसऱ्या दिवशी वर चढत जाऊन शिखरावर झेंडा रोवायचा व संध्याकाळी पुन्हा खाली यायचे अशी आमची योजना होती .

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठून आम्ही मार्गस्थ होणार होतो .रात्री आम्ही स्लीपिंग बॅगमध्ये नेहमीप्रमाणे झोपलो. सकाळी जाग येऊन पाहतो तो वातावरणात प्रचंड बदल झालेला होता .हिमालयातील वातावरण अतिशय अस्थिर असते .केव्हां ऊन पडेल, केव्हां बर्फ पडेल, केव्हा पाऊस पडेल, केव्हा वादळ येईल,याचा अंदाज करता येत नाही .सर्वत्र लख्ख ऊन पडलेले असताना अकस्मात ढग गोळा होऊन पावसाला सुरुवात होते .वारा पूर्णपणे पडलेला असताना अकस्मात तो जोराने वाहू लागतो .विशेषत:दुपारनंतर वातावरणात अकस्मात बदल होऊ लागतात.म्हणूनच आम्ही सकाळी शिखरावर जाऊन लगेच खाली येण्याचे ठरविले होते.

परंतु आज सकाळीच वातावरणात अकस्मात बदल झाला होता .आज पर्वतशिखरावर जाणे अशक्य होते .आकाश ढगांनी काळवंडले होते .सोसाटय़ाचा वारा सुटला होता .आमचा तंबू उडून जाईल की काय असे वाटत होते .तेवढ्यात धुवांधार पावसाला सुरुवात झाली.पावसाचे रुपांतर थोड्याच वेळात बर्फवृष्टीमध्ये झाले .भरपूर जाड कपडे घातलेले असतानाही थंडी बोचू लागली .एवढ्यात जोरात प्रचंड वावटळ आली .आमचा तंबू उडून जाऊ लागला .परंतु पडणाऱ्या बर्फाच्या मार्‍याखाली तो जागच्या जागी दबला गेला.आम्हालाही बर्फाखाली गाडले जाणार असे वाटू लागले.

एवढ्यात आमच्या पुढ्यात अंगावर लांब लांब दाट  केस असलेले असे चार राक्षस उभे आहेत असे लक्षात आले.सोसाट्याचा वारा, जोरात पडणारा पाऊस, या गडबडीत ते केव्हा आले कुठून आले ते आम्हाला कळले नाही .प्रतिक्षिप्त क्रियेने आमचे हात आमच्या कमरेला असलेल्या शस्त्रांकडे गेले.परंतु या राक्षसांपुढे त्याचा काहीही उपयोग नाही हे आमच्या लक्षात आले .आमच्यापैकी दोघादोघाना त्यातील एकेकाने दोन बाजूला  खाकेमध्ये घट्ट धरले.अाम्हा आठ जणांना अशाप्रकारे पकडून ते चालू लागले.हिममानव किंवा यती म्हणतात ते हेच हे आमच्या लक्षात आले .आता आपण संपलो असे आम्हा सर्वांना वाटले .हे नरभक्षक तर नाहीत ना असे वाटून आमच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला.

थोड्याच वेळात ते आम्हाला एका गुहेमध्ये घेऊन गेले.ती गुहा इतकी संरक्षित होती की बाहेरील वादळाचा तेथे मागमूसही लागत नव्हता .आतील वातावरण उबदार होते .कुठेही काही शेगडी कोळसे लाकडे पेटलेली नव्हती.तरीही गुहेतील वातावरण उबदार होते .त्या यतींच्या आम्ही  कमरेला लागत होतो.त्यांनी एका दगडी पेल्यातून आम्हाला काही पेय पिण्यासाठी दिले .त्या पेयाची चव मधुर होती .आम्ही चार दिवस गुहेमध्ये होतो .रोज सकाळ संध्याकाळ अाम्हाला  तेच पेय दिले जात होते.आमची भूक त्याने भागत होती.ते आपापसात काय बोलत होते त्यातील एक अक्षरही आम्हाला कळत नव्हते .आम्हाला भरपूर  प्यायला देऊन नंतर आम्हाला मारून खाण्याचा तर त्यांचा विचार नाही ना अशी एक कुशंका आमच्या मनात डोकावत होती . त्यांची वागणूक प्रेमळ होती.तसा काही त्यांचा इरादा असावा असे वाटत नव्हते . प्राप्त परिस्थितीत आम्ही काहीही करू शकत नव्हतो . आम्ही सर्वस्वी त्यांच्या हवाली होतो. आम्ही तिथेच जमिनीवर झोपत होतो. तिथे आम्ही चार दिवस होतो .त्या काळात आमच्यापैकी कुणालाही नैसर्गिक विधी झाले नाहीत.आम्ही इतके गांगरून गेलो होतो, आम्ही इतके घाबरून गेलो होतो, की  आम्हाला नैसर्गिक विधींची आठवणही  झाली नाही.

आम्हाला गुहेत सोडून ते कुठेतरी गायब होत असत .आम्हाला पेय देण्याच्या वेळी ते हजर होत.त्या पेयामुळे किंवा विशिष्ट हवामानामुळे किंवा गुहेतील वातावरणामुळे किंवा त्या सर्व गोष्टीमुळे आम्ही सर्व एक प्रकारच्या गुंगीत चार दिवस होतो.

चार दिवसांनंतर बाहेरील हवामान बहुधा  सुधारले असावे.त्या चौघाजणांनी पुन्हा आम्हाला बकोटीला धरून आमच्या उद्ध्वस्त झालेल्या व गाडल्या गेलेल्या तंबूजवळ आणून सोडले.नंतर लगेच ते डोंगराआड निघून गेले.आकाशात सूर्य चमकत होता .सर्वत्र उबदार वातावरण होते .आम्ही गाडलेला तंबू पुन्हा उभा केला .दुसऱ्याच दिवशी आम्ही नंदादेवी शिखर सर केले .नंतर खाली निघून आलो .

*त्यानंतर पायथ्याला येईपर्यंत आम्हाला केव्हाही ते यती दिसले नाहीत.

*हिममानव, यती,ही तुम्हाला कदाचित एखादी रम्य कल्पना असेल,परंतू आम्हाला ती वस्तुस्थिती आहे .

*सर्वत्र पसरलेल्या  बर्फामध्ये ते खातात काय पितात काय ते विशिष्ट पेय कुठून मिळवितात ते आम्हाला माहीत नाही .

*त्यांच्या दिनचर्येबद्दलही आम्हाला काहीही माहिती नाही.

* ते आहेत याशिवाय आम्हाला विशेष काही सांगता येणार नाही .

* आम्ही त्यांच्याबरोबर होतो त्या काळात त्यांच्या अंगावर कपडे नव्हते परंतु आम्हाला त्यात काहीही विचित्र गैर चूक अॉकवर्ड वाटले नाही एवढे मात्र खरे.

* मला आशा आहे की आता तुम्ही हिममानव(यती) आहे की नाही ही चर्चा थांबवाल.*

* असे म्हणून स्मित हास्य करीत कॅप्टन निरंजन आलेल्या चहाचे घुटके घेऊ लागले.*    

२२/८/२०१९©प्रभाकर  पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel