( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग
समजावा.)

सकाळचे नऊ वाजले होते.इन्स्पेक्टर सुधाकरानी ऑफिसमध्ये त्यांच्या दैनंदिन कामाला केव्हांच सुरुवात केली होती.त्यांच्या टेबलवरील फोन वाजू लागला.त्यांनी फोन उचलताच स्वागतिकेने "अपटूडेट सर्व्हिस हॉस्टेल"च्या मॅनेजरचा फोन आहे असे सांगितले.काम काय आहे असे विचारताच त्यांच्या हॉस्टेलमधील एक खोली अजून उघडली नाही.बेल वाजवून दरवाजा ठोठावूनही कुणी उघडत नाही.दरवाजा आंतून बंद आहे.कांहीतरी गडबड वाटते.पोलिसांच्या उपस्थितीतच दरवाजा फोडावा यासाठी फोन केला आहे असे सांगितले.

बरोबर दोन पोलिस घेऊन इन्स्पेक्टर सुधाकर जीपमधून सर्व्हिस हॉस्टेलकडे निघाले.दहा मिनिटांत ते यू एस हॉस्टेलजवळ पोचले.हॉस्टेलचे व्यवस्थापक करमरकर त्यांची वाटच पाहत होते.

करमरकर,सुधाकर व दोन पोलिस खोली नं एक शे नऊ जवळ पोचले.सुधाकरांच्या उपस्थितीत बेल वाजवण्यात आली.दरवाजा जोरजोरात ठोठावण्यात आला.आंतून कांहीही प्रतिसाद मिळाला नाही. सर्व कांही शांत शांत होते. शेवटी दरवाजा फोडण्यात आला.दोन प्रेते रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.अतोनात   रक्तस्त्राव झाल्यामुळे जमिनीवर रक्ताचे थारोळे झालेले होते. त्यातील एक प्रेत पुरुषाचे होते तर दुसरे स्त्रीचे होते.शेजारीच एक सुरा पडला होता.तोही रक्ताने माखला होता.बहुधा त्या सुर्‍यानेच दोघांचीही डोकी उडवलेली होती.टेबलही रक्ताने माखलेले होते.पोस्टमार्टेम केल्यावरच, शवविच्छेदन अहवाल आल्यावर, हातांचे ठसे इत्यादी पाहिल्यावर, सुर्‍यानेच डोकी उडविल्याची खात्री होणार होती.सेवासदनचा (सर्व्हिस हॉस्टेलचा) मॅनेजर करमरकर दोघानाही ओळखत होता.पुरुषाचे,तरुणाचे नांव दिनेश होते. तो शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक(पीटी इन्स्ट्रक्टर) होता.तो सेवासदनमध्येच राहात होता.सुभाषचंद्र हायस्कूलमध्ये तो पीटीआय होता.बाई, बाई कसली मुलगीच(तरुणी), त्याच हायस्कूलमध्ये शिक्षिका होती.तिचे नाव कोमल होते.करमरकरांची मुलगी तिचा उल्लेख कोमल मॅडम म्हणून करीत असे.व्यवस्थापक करमरकरांची मुलगी त्याच हायस्कूलमध्ये शिकत असल्यामुळे ते तिला ओळखत होते.क्वचित कधीतरी ती हॉस्टेलवर प्रवीणला भेटायला येत असे.करमरकरांना तिच्या घरचा पत्ता माहीत नव्हता.

इन्स्पेक्टर सुधाकरनी पोलिस स्टेशनला फोन करून त्यांचे   तपास पथक (इन्व्हेस्टिगेशन स्क्वॅड) बोलावून घेतले.थोड्याच वेळात तपास पथक तेथे पोहोचले. अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली.तपास पथक त्यांच्या नेहमींच्या कामाला,निरनिराळ्या कोनातून जागेचे फोटो घेणे,प्रेताचे फोटो घेणे,ठसे गोळा करणे,प्रेत व इतर वस्तू कोणत्या स्थितीत होत्या ते कळण्यासाठी मार्किंग करणे,इत्यादी कामाला लागले.     

सुभाषचंद्र हायस्कूलच्या  प्राचार्यामार्फत कोमलचा घरचा पत्ता शोधून काढण्यात आला.कोमलच्या वडिलांना ताबडतोब हॉस्टेलवर बोलावण्यात आले.पंचनामा करून दोन्ही प्रेते मुंडक्यांसह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवण्यात आली. दोन्ही प्रेतांच्या हाताचे ठसे घेण्यात आले.खोली नंबर एक शे नऊ मधील सर्वच ठसे गोळा करण्यात आले.त्याचे वर्गीकरण करून तिथे कोणकोण येत असे वगैरे माहिती कळणार होती.खुन्याचा शोध लावण्यासाठी त्याचा उपयोग होणार होता.खुनी ताकदवान व अत्यंत क्रूर वाटत होता.दयामाया न दाखवता एका फटक्यात त्याने दोघांचीही मुंडकी उडवली होती.

हॉस्टेलची एक शे नऊ नंबरची खोली आंतून संपूर्णपणे बंद होती.खोलीला बाहेर जाण्यासाठी तीन दरवाजे व दोन खिडक्या होत्या.एक दरवाजा पॅसेजमध्ये उघडत होता.तेथून लिफ्टपर्यंत जाता येत होते.दुसरा दरवाजा अंतर्गत बोळीमध्ये (पॅसेजमध्ये) उघडत होता.त्या पॅसेजमधून किचनमध्ये जाता येत होते. तिसरा दरवाजा जेमतेम उभे राहता येईल,खुर्ची टाकून एकाला बसता येईल,अशा छोट्याश्या  गॅलरीत उघडत होता.खोली सेवा सदनची(सर्व्हिस हॉस्टेल)असते त्याप्रमाणे पूर्णपणे स्वयंपूर्ण होती.छोटीशी बाथरूम कम टॉयलेट असलेली खोली होती. कपाट, एसी, रेफ्रिजरेटर, टेबल खुर्ची,  इत्यादी सामान खोलीमध्ये होते.बाहेरील दरवाजा फोडून जेव्हां पोलीस व इन्स्पेक्टर सुधाकर आंत गेले,तेव्हां आंतील दोन्ही दरवाजे,किचनमध्ये जाणारा व छोट्या गॅलरीत जाणारा बंद होते.बाहेरून कुणी येऊन दोघांचा खून करणे कठिण दिसत होते.खून करून खुनी बाहेर गेला तर आंतून दरवाजा बंद कसा असा प्रश्न निर्माण होत होता.त्याने कोणत्या युक्तीने आंतील दरवाजा बंद केला असा प्रश्न निर्माण होत होता.प्रत्येक दरवाज्याला अंगचे कुलूप (लॅच) होते. शिवाय कडय़ा व बोल्ट होते.दोन्ही दरवाजांच्या आंतील कड्या लावल्या होत्या.बाहेरील जो दरवाजा फोडला त्याचीही कडी आंतून लावलेली होती.दरवाजा तोडून आंत आल्यावर कडी उचकटलेली दिसत होती.खिडक्या फ्रेंच विंडो टाईप नव्हत्या.त्यांना ग्रील होते.खिडक्यांचे शटर्स बंद होते.खून करून बाहेर जाणे आणि दरवाजाची कडी आंतून लावणे अशक्य दिसत होते.                     

तेथील काम आटोपल्यावर इन्स्पेक्टर सुधाकर कोमलच्या वडिलांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी गेले.कोमलचे वडील  हॉस्टेलवर येताना त्यांच्या स्कूटरवर आले होते.मुलीचा क्रूरपणे केलेला खून पाहून ते पार कोलमडले होते.स्वत: स्कूटर चालवीत घरी जाणे त्याना शक्य नव्हते.त्यामुळे इन्स्पेक्टर सुधाकरनी त्यांची स्कूटर एका पोलिसाला त्यांच्या घरी पोहोचवण्यास सांगितले.ते स्वतः त्यांना पोचविण्यासाठी त्यांच्या पोलिस जीपमधून कोमलच्या वडिलांच्या घरी गेले.त्यांच्या घरात शोकाकुल वातावरण होते.शेजारी पाजारी जमले होते.सर्व खिन्न मुद्रेने कोमलच्या आईचे सांत्वन करीत होते.  

इन्स्पेक्टर सुधाकरना वडिलांजवळ व सोसायटीत शेजारीपाजारी बरीच चौकशी करायची होती.त्या चौकशीतून कोमलबद्दल बरीच माहिती समजली असती.खुन्याचा शोध लागण्यासाठी त्याचा उपयोग झाला असता.परंतु ही वेळ चौकशी करण्याची नव्हती.कोमलच्या वडिलाना केव्हांही पोलिस स्टेशनला बोलवून घेता आले असते किंवा त्यांच्या घरी येवून चौकशी करता आली असती.तिच्या वडिलांचा निरोप घेऊन इन्स्पेक्टर सुधाकर परतले.

बाहेरच एका तरुणाने त्यांना थांबविले.त्याने त्याचे नाव प्रवीण सांगितले.त्याच्या चेहऱ्यावर मूर्तिमंत दु:ख दाटले होते.डोळे पाण्याने डबडबले होते.तो थोडा बहुत शॉकमध्ये होता.त्याला बसलेला धक्का तीव्र स्वरुपाचा असावा असे वाटत होते.त्याने तो शेजारीच राहतो असे सांगितले.इन्स्पेक्टर सुधाकरना त्याच्या फ्लॅटमध्ये येण्याची विनंती त्याने केली.त्याच्याकडून केस सोडवण्यासाठी उपयुक्त अशी  कांहीतरी माहिती मिळेल याची सुधाकरना खात्री वाटत होती.इन्स्पेक्टर सुधाकरना घेऊन तो त्याच्या फ्लॅटमध्ये गेला. 

त्याचे आईवडील धाकटी बहीण व तो त्या फ्लॅटमध्ये राहत होते.आता त्याचे आईवडील व बहीण कोमलच्या फ्लॅटमध्ये होते.तोही तिथेच होता.इन्स्पेक्टर सुधाकरना कोमलच्या वडिलांना घरी सोडून परत जाताना पाहून त्याने त्याना थांबविले होते.

त्याच्याकडून सुधाकरना पुढील माहिती मिळाली. प्रवीण व कोमल लहानपणापासून मित्र होते.दोघांच्या वयात जेमतेम दोन वर्षांचे अंतर होते.हायस्कूल कॉलेज मधे दोघेही एकत्र होती.प्रवीणने बारावीनंतर बीएस्सी केले.नंतर पदव्युत्तर शिक्षण घेऊन एनईटी उत्तमरीत्या पास होऊन तो कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीला लागला. 

कोमलही सायन्स शाखेकडेच होती.तिने पदव्युत्तर शिक्षण न घेता टीईटी करून ती शाळेत नोकरीला लागली.

लहानपणापासून दोघेही परस्परांना ओळखत होते.एकत्र दोघेही खेळली होती.त्यांचे भावबंध जुळले होते.दोघांनीही विवाह करण्याचे निश्चित केले होते.दोघांच्याही घरच्यांचा त्यांच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा होता.कोमल अनेकदा प्रवीणच्या फ्लॅटमध्ये लहानपणापासून येतच होती.विवाहानंतर ती तेथे कायमची राहण्याला येणार होती.त्यांचा साखरपुडा पुढच्याच महिन्यात ठरला होता.

दिनेशला सुभाषचंद्र हायस्कूलमध्ये पीटी टीचर(पी टी इन्स्ट्रक्टर)म्हणून लागून वर्षभर झाले होते.सुरुवातीपासूनच दिनेशला कोमल आवडत होती.त्याचे तिच्यावर प्रेम असावे.त्याने तिच्याजवळ लग्न करण्याचा प्रस्तावही ठेवला होता.कोमलने अर्थातच त्याला एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त जवळ येऊ दिले नव्हते.तो कोमलला वारंवार सिनेमा, पार्क, मॉल, वगैरे ठिकाणी येण्यासाठी आग्रह करीत असे.त्याला तिच्याबरोबर संबंध वृद्धिंगत करायचे होते.ती वेळोवेळी दिनेशला त्याच्या विचारांपासून निवृत्त करायला पाहत असे.तिने कधीही त्याला उत्तेजन दिले नाही.ती दिनेशच्या खोलीवर कां गेली होती असा प्रश्न त्यानेच स्वतःलाच विचारला.

बरोबर हाच प्रश्न सुधाकरना पडला होता.जर कोमल दिनेशला त्याचा विचारांपासून निवृत्त करायला पाहत होती.तिने त्याला कधीही उत्तेजन दिले नाही.तर ती त्याच्या खोलीवर कशाला गेली होती? असा प्रश्न सुधाकरनाही पडला होता.  

प्रवीणकडून इन्स्पेक्टर सुधाकरना बरीच माहिती मिळाली होती. 

प्रवीणचा निरोप घेऊन इन्स्पेक्टर सुधाकर पोलिस स्टेशनला परत आले.शवविच्छेदन अहवालाची  ते वाट पाहत होते.त्याचप्रमाणे ठसे तज्ज्ञांकडून येणार्‍या अहवालाची  ते         

वाट पाहत होते.

कोमलचे वडील, सुभाषचंद्र हायस्कूलमधील शिक्षिका,हॉस्टेलचे करमरकर,यांच्याकडून कोणती   माहिती उपलब्ध होते त्यावरती शेवटी काय झाले असावे यासंबंधी अंदाज बांधता येणार होता.केस सोडविण्यासाठी या सर्वांचा उपयोग होणार होता.प्रवीण सांगतो त्याची सत्यता तपासणे आवश्यक होते.त्याची अॅलिबी पाहणे गरजेचे होते.  

* कांहीही असले तरी खोलीचे दरवाजे बंद असताना दोन खून कसे झाले?याचा उलगडा होणे कठीण दिसत होते.*

*वरवर पाहता कोमल दिनेशचा खून करू शकली नसती.दिनेश पीटी शिक्षक होता. ताकदवान होता.त्याचे शरीर कमावलेले होते.*

*जरी दिनेश बेसावध होता असे गृहीत धरले,तरीही एका घावात त्याचे शिर धडापासून अलग करणे कोमलला केवळ अशक्य होते.*

*दिनेश कोमलचे शिर एका घावात सहज उडवू शकला असता.पण सर्व दरवाजे आंतून बंद असताना दिनेशचे शिर कुणी उडवले हा प्रश्न इन्स्पेक्टर सुधाकरांच्या मनात घोळत होता.*

*कुणीही कुणाचाही खून केला असला तरी ज्याने प्रथम खून केला त्याचा खून कोणी केला हे कोडे सुटत नव्हते.*           

(क्रमशः)

२४/११/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel