नुकतेच नवीन धरण बांधण्यात आले होते .त्याला डावा व उजवा असे दोन कालवे काढण्याचे काम सुरू होते.उजव्या कालव्याच्या वाटेमध्ये एक मोठा डोंगर येत होता .त्या डोंगरात बोगदा खणून त्यातून कालवा काढणे जरुरीचे होते . बोगदा खणण्याचे काम चालू होते .बोगदा खणताना त्यात एक मानवी सांगाडा मिळाला .केव्हातरी प्राचीन काळी भूकंप किंवा अन्य कारणाने एखादा माणूस  गाडला गेला असावा किंवा एखादी कबर किंवा समाधी असावी .काळाच्या ओघामध्ये ती खोलवर गाडली गेली.बोगद्याचे काम चालू असताना ती उद्ध्वस्त झाली .काहीही असो सांगाडा मिळाला एवढी गोष्ट खरी .सांगाडा बोगद्याबाहेर आणून मातीच्या ढिगाऱ्यावर टाकण्यात आला .त्याच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. मातीबरोबर तो बाहेर टाकण्यात आला. मरणोत्तर माणसाची किंवा कोणत्याही प्राण्याची हाडे काही काळाने सुटी   होतात .अग्नि दिल्यास ती लगेचच मोकळी होतात .काही हाडे तर जळून भस्मसात होतात.  हाडे तारांनी किंवा अन्य मार्गाने जोडून सांगाडा तयार करावा लागतो .असे सांगाडे शरीर शास्त्राच्या अभ्यासासाठी शाळा कॉलेज इत्यादी ठिकाणी लागतात.पूर्वी मनुष्य किंवा प्राणी यांच्या हाडांपासून सांगाडे तयार केले जात असत .हल्ली  बरेच वेळा सांगाडे प्लास्टिकचे असतात.प्लास्टिकचे सांगाडे इतके हुबेहूब केलेले असतात की ते प्लॅस्टिकचे आहेत याचा पत्ताही लागत नाही.

मनुष्य गाडला गेलेला असो किंवा कबर समाधी इत्यादी असो,कालांतराने  हाडे मोकळी होणे स्वाभाविक असते.ही हाडे परस्परांना जोडलेली होती .हा सांगाडा सलग होता. सर्व हाडे काळजीपूर्वक जोडलेली होती. असे का? असा विचार कुणाच्याही मनात आला नाही.गावातील सरपंच बोगद्याचे काम पाहण्यासाठी सहज आले होते .त्यांनी तो सांगाडा पाहिला .शरीरशास्त्राच्या अभ्यासासाठी शाळेत सांगाड्याची  गरज होती .गावातील  शाळेचे अध्यक्षही सरपंचच होते.शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगाड्याची गरज त्यांच्या लक्षात आणून दिली होती.त्यांनी खोदकामाचा प्रमुख असलेल्या ठेकेदाराला  हा सांगाडा आम्ही नेला तर चालेल का?असे विचारले .त्याने तुम्ही तो सांगाडा खुशाल घेऊन जा असे सांगितले .

गावात गेल्यावर कुणाला तरी तो सांगाडा घेऊन यायला सांगू असा विचार त्यांनी मनात केला .गावात आल्यावर ते ती गोष्ट विसरून गेले .

दुसऱ्या दिवशी सरपंच ग्रामपंचायतीच्या  ऑफिसमध्ये येतात तो त्यांना तो सांगाडा तेथे उभा असलेला दिसला. त्यांनी ग्रामपंचायतीचा शिपाई म्हादबाला हाक मारून सांगाडा येथे आणलास ते बरे  झाले.आपल्याला तो सांगाडा  शाळेला द्यायचा आहे .मी तुला हा सांगाडा आणण्यास सांगणारच होतो.तुला ठेकेदार किंवा आणखी कुणी  तो सांगाडा घेऊन जा असे म्हणाला का ?असे विचारले .त्यावर म्हादबा  म्हणला नायबा मी नाय सांगाडा आणला.  मला कुणी तो इथे आण असेही सांगितले नव्हते. मला तो इथे आणायचा होता हेही माहीत नाही .मी येथे आलो तेव्हा तो सांगाडा येथेच होता . त्यावर सरपंचानी आणखी काही जणांजवळ सांगाड्याबद्दल चौकशी केली.तो सांगाडा इथे कुणी आणला त्याची माहिती कुणालाच नव्हती.सरपंचांनी बोगद्याच्या ठेकेदाराला फोन करून त्याने सांगाडा येथे पाठविला का ते विचारले .कदाचित काल त्याला मी सांगाडा नेऊ का? म्हणून विचारले होते तेव्हा त्यानेच तो आपणहून  पाठविला असेल,असे त्यांच्या मनात आले.ठेकेदारानेही मी तो पाठविलेला नाही असे खात्रीपूर्वक सांगितले .

तेव्हा सांगाड्याकडे बघत सरपंच म्हणाले जर याला कुणीच इथे आणला नाही तर हा काय आपल्या पावलांनी चालत आला ?

*त्यावर तो सांगाडा दात विचकून हसला असा सरपंचांना भास झाला .*

सरपंचांनी म्हादबाला हाक मारली आणि तो सांगाडा शाळेत मुख्याध्यापकांकडे नेऊन देण्यास सांगितले.सांगाडा मुख्याध्यापकांच्या ताब्यात दे आणि नंतरच परत ये असे सांगितले. होय नक्की  देतो असे तो म्हणाला आणि नंतर कामाच्या गर्दीमध्ये विसरून केला.दुसऱ्या  दिवशी मुख्याध्यापकांचा सरपंचांना फोन आला . मागितलेला सांगाडा तातडीने पाठविला ते चांगलेच झाले. पण तो सांगाडा माझ्या ताब्यात न देता म्हादबा तसाच कां निघून गेला ? त्याने बंद शाळेबाहेर दरवाज्याजवळ तो सांगाडा उभा ठेवला होता . कुणी काही सांगाड्याला केले असते आणि तो मोडला असता तर मेहनत फुकट गेली असती .म्हादबा हल्ली जरा जास्तच कामचुकार झाला आहे त्याला जरा दम द्या असेही  सांगितले.

सरपंचांनी पुन्हा म्हादबाला हाक मारून तो सांगाडा मुख्याध्यापकांच्या ताब्यात कां दिला नाही म्हणून विचारले. त्यावर म्हादबा म्हणाला मी काल तो सांगाडा शाळेत नेऊन द्यायला विसरलो .इथे मी आज सांगाडा बघितला नाही तेव्हा मला असे वाटले की तुम्ही दुसऱ्या  कुणाला तरी तो शाळेत नेऊन द्यायला सांगितला .

आता मात्र सरपंच चांगलेच हादरले.हा सांगाडा  कुणीही कुठेही घेऊन जात नाही, तरीही जिथे हा सांगडा न्यावा असे मी म्हणतो तिथे हा सांगाडा जातो हे गौडबंगाल काय   

आहे.मी बोलतो ते या सांगाड्याला कळते की काय ?एवढेच नव्हे तर त्याप्रमाणे हा सांगाडा स्वतःच त्या ठिकाणी कसा जातो ?

ही काहीतरी भुताटकी आहे. हे काहीतरी रहस्य आहे. गूढ आहे.अजूनही तो सांगाडा अखंड कसा हा प्रश्न कुणाच्याही मनात आला नव्हता.सरपंच बराच वेळ विचार करीत बसले होते.सांगाडा बघितल्यापासूनच्या सर्व घटना ते आठवीत होते.

त्यांनी पुन्हा एकदा जाऊन तो सांगाडा नीट पाहायचे असे ठरविले .सांगाडा पाहत असताना त्यांच्या दोन तीन गोष्टी लक्षात आल्या .सामान्य माणसांपेक्षा त्या सांगाड्याची उंची जास्त होती .कवटी लहान होती.सांगाडय़ाचे सर्व दात जागच्या जागी होते. एकूणच तो सांगाडा वैशिष्टय़पूर्ण वाटला .

सांगाडा प्रयोगशाळेत नेण्याच्या अगोदरच प्रयोगशाळेला   आग लागली.आग चपळाईने विझविण्यात आली .आगीचे कारण कळले नाही .एक शिक्षिका म्हणाली हा सांगाडा अशुभ आहे याला प्रयोगशाळेत ठेवू नका. सांगाडा प्रयोगशाळेत नेण्याचे पुढे ढकलण्यात आले. त्याच दिवशी रात्री शाळेजवळून मुख्याध्यापक जात होते .त्यांना आपल्या ऑफिसमध्ये दिवा लागलेला दिसला .आपण तर दिवा लावला नव्हता मग दिवा कसा लागला हे पाहण्यासाठी ते  शाळेत गेले.ऑफिस बंद करताना त्यानी काळजीपूर्वक खिडक्या बंद आहेत ना हे पाहिले होते. तरीही खिडकी उघडी कशी असा प्रश्न त्यांच्या मनात आला .कदाचित आपण विसरलो असू म्हणून त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले . उघड्या खिडकीतून त्यांनी आत डोकावून पाहिले.त्यांना तो पुतळा खोलीत फेऱ्या मारताना दिसला.त्यांची अक्षरश: बोबडी वळली .तिथल्या तिथे ते बेशुद्ध झाले. जवळजवळ दोन तासांनी ते शुद्धीवर अाले.त्यानी भीतभीत ऑफिसमध्ये पाहिले .सर्व काही शांत होते .दिवा लागलेला नव्हता. खिडकी लावलेली होती. मुख्याध्यापकांना आपण पाहिले ते स्वप्न होते, भास होता, की सत्य होते, तेच कळेना .आपण शाळेजवळून जात होतो ते त्यांना आठवत होते .सर्व घटना व्यवस्थित आठवत होत्या .दिवा कुणी बंद केला? खिडकी कुणी लावली?असंख्य प्रश्न त्यांच्या डोक्यात घोंगावत होते .कुठेतरी काहीतरी अमानवी आहे असे त्यांना वाटत होते .या सर्वांचा संबंध सांगाड्याशी असावा असाही संशय त्यांना आला.  

दुसऱ्या दिवशी त्यांनी शिक्षकांची सभा बोलाविली .सभेला त्यांनी सरपंचांनाही बोलाविले होते. रात्री दिसलेला प्रकार त्यांनी सर्वांना सांगितला .मुख्याध्यापकांना काहीतरी भास झाला असावा,रात्री त्यांना स्वप्न पडले असावे ,असे बरेच जण मनात म्हणाले . उघडपणे तसे बोलण्याची कुणाची हिंमत नव्हती.एका जरा वात्रट शिक्षकाने मुख्याध्यापक रात्री थोडी घेतात का? असाही प्रश्न शेजारच्या शिक्षकाला  हलक्या स्वरात विचारला.आणखी दोन चार जणांना तो प्रश्न ऐकू गेला आणि एक हलकासा हास्यस्फोट झाला. तीच गोष्ट सरपंचानी वेगळ्या शब्दात बोलून दाखविली .रात्री तुम्ही येथून जात असाल. म्हादबाने खिडकी कदाचित उघडी टाकली असेल. दिवाही त्यानेच लावला असेल .तोच ऑफिसमध्ये येरझारा मारत असेल. आपण त्याला बोलवून विचारूया .त्याला बोलावण्यात आले .तो म्हणाला संध्याकाळी मी सरांसमोरच कुलूप लावून किल्ली त्यांच्याजवळ दिली. 

मुख्याध्यापक म्हणाले या सांगाड्यात काहीतरी अमानवी किंवा अद्भुत शक्ती आहे असे मला वाटते. जर तुम्हाला मी खोटे बोलत आहे असे वाटत असेल,मला स्वप्न पडले असे वाटत असेल, मला भास झाला असे तुमचे म्हणणे असेल, तर तुम्ही कुणीही  हा सांगाडा आपल्या घरी घेऊन जा .आणि मग रात्री काय चमत्कार होतो तो पहा.प्रत्यक्ष प्रचिती नंतर तुमचे मत बदललेले असेल .

मुख्याध्यापक पुढे म्हणाले ,मी असे का म्हणतो ते लक्षपूर्वक ऐका .हा सांगाडा बोगद्यात खाणकाम सुरू असताना सापडला.कित्येक वर्षांपूर्वी कदाचित शतकांपूर्वी हा मनुष्य जिवंत किंवा मृत गाडला गेला असला पाहिजे .त्याची हाडे शरीराचे विघटन होऊन सुटी होणे आवश्यक होते .

ही हाडे सुटी सापडणे स्वाभाविक होते. हा सांगाडा  सलग कसा?याचे उत्तर कुणी देऊ शकेल का ? 

(क्रमशः)

४/१२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel