यमी कॅफेच्या बाहेर स्कुटी उभी करून प्राचीने आपली हेल्मेट काढली आणि काही कळायच्या आतच तिच्या चेहऱ्यावर एक द्रव पदार्थ उडाला. त्या द्रव पदार्थाने तिचा संपूर्ण चेहरा भिजला होता. तिच्या संपूर्ण चेहऱ्याची आग होत होती. ती वेदनेने विव्हळू लागली. जेव्हा तो द्रव तिच्या नाकातून आणि तोंडातून आत गेला. जिभेवर आणि घशात पसरला तेव्हा ती मुकी झाल्याप्रमाणे तिचा आवाज आतल्या आत दबला गेला.
ती जमिनीवर पडून तडफडत होती. तो द्रव जसा तिच्या मानेला, खांद्याला स्पर्श करून गेला तिची चामडी सोलवटून निघाली. आतापर्यंत तिच्या डोळ्यातही तो द्रव गेला होता ज्यामुळे ती आंधळी झाली होती. तिचे नाक आतापर्यंत वितळून गेले होते. हिरड्या वितळल्यामुळे दात सुद्धा हळू हळू पडले.तिचे केस सुद्धा अर्धे जळून गेले.
वेदनेची परिसीमा तेव्हा झाली जेव्हा बाजूला उभ्या असलेल्या प्रशांतने तिच्यावर हातातली अॅसिडची पूर्ण बाटली रिकामी करून टाकली होती. प्राचीने त्याला पहिले होते. पण ती हतबल होती.
बराच वेळ ती खाली पडून तडफडत होती आणि जमलेली बघ्यांची गर्दी तमाशा बघत होती. थोड्यावेळात अॅसिडमधून वाफा येणे कमी झाले. तेव्हा प्रशांत तिच्या जवळ गेला आणि असुरी हास्य करत म्हणाला,
“नाऊ आय लव यु..... बट...... ओन्ली अॅज अ फ्रेंड. तू माझ्याशी जशी वागलीस तशी आता तू कोणाशीच वागू शकत नाहीस.”
नंतर प्रशांत शांतपणे यमी कॅफे मध्ये गेला. त्याने प्राचीचे आवडते फ्रेंच फ्राईज आणि आलू टिक्की बर्गर विथ कोक ऑर्डर केले. मग शांतपणे बसून खात राहिला आणि प्राचीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी लोकांची चाललेली धावपळ विकृत आनंदाने पहात राहिला.