अध्याय दुसरा

जनक राजा म्हणतो - हे शतानंद मुने, "वायूने शेषास सांगितले होते की, भगवान् श्रीहरी या पर्वतावर राहण्यास येतील." असे तुम्ही मला सांगितले होते तर ती हकीकत मला विस्ताराने सांगा. ॥१॥

या पर्वतावर नारायण कसे प्राप्त झाले ! कोणत्या कारणास्तव प्राप्त झाले? या पर्वतावर येऊन त्यांनी काय केले? हे सर्व मला सांगा. ॥२॥

भगवान पुरुषोत्तमांनी वैकुंठाचा त्याग का केला? पर्वताचे व तीर्थांचे सर्व चरित्ररूपी महात्म्य मला सांगा. ॥३॥

वराहरूपी परमात्म्याचेहि महात्म्य विस्ताराने मला सांगा. आकाशराजा व त्याचा बंधु यांचे चरित्रहि आपण मला सांगा. ॥४॥

ज्याची कन्या रमादेवी व जावई साक्षात जगदाधिपति नारायण होते. त्या विवाहाच्या वेळी देव व ऋषि यांचा समुदाय जमला होता. अशा त्या राजाचे चरित्र आपण मला सांगा. ॥५॥

याप्रमाणे जनक राजाचा प्रश्न ऐकून शतानंद म्हणाला - हे राजा, पूर्वी कश्यपादि मुनिश्रेष्ठ गंगा नदीच्या तीरावर मोठ्या आनंदाने चांगला यज्ञ करीत होते. ॥६॥

त्यावेळी मुनिश्रेष्ठ नारद ऋषि सर्व ऋषींना म्हणाला की, तुम्ही सर्वजण कोणत्या कारणासाठी यज्ञ करीत आहात? ॥७॥

या यज्ञाचे फल कोण उपभोगणार आहे? या यज्ञाचा अध्वर्यु कोण? देवता कोण? केलेल्या यज्ञाचे फल कोणास समर्पण करणार आहात? ॥८॥

याप्रमाणे नारदाचा प्रश्न ऐकून सर्व ऋषि संशयग्रस्त झाले. याचा निर्णय कसा करावा? ॥९॥

मग ऋषिंनी एकत्र जमवून ब्रह्मज्ञानी लोकात श्रेष्ठ अशा भृगुमुनीस मोठ्या भक्तीने नम्र होऊन हात जोडीत म्हणाले. ॥१०॥

"हे महाज्ञानी अशा भृगो, "सर्व देवामध्ये श्रेष्ठ कोण आहे? हे जाणण्यासाठी (त्रैलोक्यात) जा." याप्रमाणे सर्व ऋषींचे म्हणणे ऐकून भृगुऋषि अगोदर ब्रह्मलोकास आला. ॥११॥

त्याठिकाणी महाबाहु व आपला ज्येष्ठ बंधु अशा, चार तोंडे असलेल्या, सरस्वतीकडून सेविला जाणार्‍या भव्याकृति, ज्याच्या चारी मुखातून चार वेदाचा घोष निघत आहे, किरीटानी शोभणारा, दिशांच्या अधिपतीसह, जगदीशर व निर्दोष अशा नारायणाचे स्तवन करणार्‍या ब्रह्मदेवास भृगुमुनीने पाहिले. महातेजाने शोभणार्‍या ब्रह्मदेवाला अत्यंत भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार केला असता ब्रह्मदेव, भृगुस (कुशल प्रश्न पूर्वक सन्मानदर्शक असे) काहीच म्हणाला नाही. ॥१२-१३-१४-१५॥

(शिष्टाचाराप्रमाणे आदर सत्कार न झाल्याने) ब्रह्मदेव किंचित् अज्ञान असल्याने तो काही सर्वोत्तम् नव्हे असे ठरवून भृगुऋषि कैलास पर्वताकडे गेला. ॥१६॥

कैलास पर्वतावरील आपल्या मंदिरात पार्वतीसह क्रीडा करणार्‍या कामुक अशा महादेवास पाहिले. ॥१७॥

त्यावेळी आपल्या मंदिरात आलेल्या भृगुला महादेवाने पाहिले नाही. पण भृगुऋषि आलेले पाहून लज्जित झालेली पार्वती महादेवास म्हणाली. ॥१८॥

हे महाबाहो, लवकर मला सोड. कारण मुनिश्रेष्ठ भृग आले आहेत. हे पार्वतीचे बोलणे ऐकून महादेव रागाने लाल झाला. ॥१९॥

व त्या रागाच्या भरात ऋषीला मारण्याकरिता धावला असता भृगुऋषीने महादेवास शाप देऊन आपणास ठार मारण्यास प्रवृत्त झालेल्या महादेवाचे निराकरण केले. त्या ऋषीने "तू लोकांत पूज्य होणार नाहीस व तू तुझ्या लिंगपूजनाने लोकात प्रसिद्ध होशील." असा शाप दिला. शाप दिल्यानंतर भृगुऋषि. हरिमंदिर अशा वैकुंठास आला. ॥२०-२१॥

तो वैकुंठ, प्राकार, गोपुर, नऊ द्वारे यांनी सुशोभित होता. चार दिशांची द्वारे व द्वारपाल यांनी वैकुंठ शोभिवंत दिसत होता. ॥२२॥

वैकुंठात प्रवेश केल्यावर तेथील दिव्य अशा शय्यागृहांत शेषरूपी पर्यंकावर पहुडलेल्या, देवाधिदेव श्रीविष्णूस लक्ष्मीसह वर्तमान भृगुऋषीने पाहिले. ॥२३॥

त्यावेळी भृगुऋषीने श्रीहरीस आपल्या पायाने लाथ मारली तेव्हा ताबडतोब आपल्या पलंगावरून उठून अत्यंत नम्रतापूर्वक भृगुऋषीचे चरण भक्तीने धरले. व त्यांना आलिंगन देऊन श्रीहरी भृगुऋषीस म्हणाला. ॥२४-२५॥

हे ऋषिश्रेष्ठा, माझ्या छातीवर तुम्ही कशाकरिता लाथ मारलीत? कारण माझे ह्रदय अतिशय कठीण आहे. माझे शरीर, न मरणार्‍या देवदानवानाहि अत्यंत अभेद्य असे आहे. ॥२६॥

हे ब्राह्मणश्रेष्ठा,माझे शरीर वज्रापेक्षाहि कठिण आहे असे समजा. आपल्या कोमल अशा पायाने माझ्या कठिण अशा ह्रदयावर का बरे लाथ मारलीत? ॥२७॥

आपल्या कोमल पायाचा संगम् माझ्या कठीण शरीराशी झाल्याने आपला पायास केवढी इजा पोहोचली असेल? हे काही मी सांग शकत नाही. ॥२८॥

याप्रमाणे बोलून तात्काल उन पाण्याने त्या ऋषीचे पाय धुतले. व ते पादप्रक्षालनचे मंगल जल आपल्या मस्तकावर धारण केले. ॥२९॥

आपल्या घरांत, आपल्या कुटुंबावर प्रोक्षण केले. सर्व लोकांस आदर्श दाखविण्याकरिता 'आत्मज्ञानी लोक आपल्या दर्शनानेच तीन्ही लोकास पवित्र करतात." असे भृगुऋषीस श्रीहरीने म्हटले. ॥३०॥

याप्रमाणे त्याचे भाषण ऐकून भृगुऋषि मृत्युलोकावर येऊन श्रेष्ठ अशा ऋषीच्या सभेत सांगितले की, ॥३१॥

साक्षात् श्रीहरी सर्वोत्तम् आहे असा सिद्धान्त ऐकून सर्व ऋषींनी आपण केलेल्या यज्ञाचे फळ श्रीहरी चरणी सम्र्पण केले. ॥३२॥

श्रीहरी हा सर्वोत्तम् असून त्यानंतर साक्षात् रमादेवी होय. रमादेवीनंतर ब्रह्मदेव व वासुदेव यांचा क्रम् समजावा. यांचे खाली रुद्रादिकांचा क्रम् समजावा ॥३३॥

याप्रमाणेच देव, दैत्य व मानव यामध्ये तरतम् भाव जाणावा. याप्रमाणे तत्त्ववेत्या भृगुऋषीने सर्वास उपदेश केला. या उपदेशाप्रमाणे सर्व ऋषींनी श्रीहरीस सर्वोत्तम् मानून त्यासच यज्ञफल समर्पण केले. ॥३४॥

त्यानंतर रमादेवी आपल्या मंदिरात एकांती असता श्रीहरीस म्हणाली. हे देवाधिदेवा, हे जगदीश्वरा, मी तुला सोडून दुसरीकडे जाते. ॥३५॥

हे जगन्नाथा, आपल्याहून अत्यंत कमी योग्यता असलेल्या ऋषीने, माझे आलिंगनस्थल अशा ह्रदयावर लाथ मारली आहे. ॥३६॥

हे गरुडध्वजा, मी आता दिव्य अशा करवीरपुरास जाते. याप्रमाणे श्रीहरीबरोबर प्रेमकलह करून महालक्ष्मी, तिचे वास्तव्य स्थान अशा करवीरपुरास आली. ॥३७॥

ज्यावेळी महालक्ष्मी करवीरपुरास निघून गेली त्यावेळी म्हणजे अठ्ठाविसाव्या द्वापारयुगाच्या शेवटी व कलियुगाच्या प्रारंभी ज्या देशात रमादेवीचा प्रेमकलह मिटेल व ज्या योगाने मिटेल असे कर्म त्या काली व त्या देशात मी करीन. ॥३८-३९॥

याप्रमाणे आपल्या क्रीडेकरिता मानवावतार धारण करणार्‍या मायावी श्रीहरीने संकल्प करून परमानंददायक, व सर्वश्रेष्ठ अशा वैकुंठाचा त्याग केला. ॥४०॥

(वैकुंठाचा त्याग केल्यावर या मृत्युलोकात) गंगा नदीच्या दक्षिण दिशेला तीनशे योजनावर नद्यामध्ये श्रेष्ठ अशी शुक्राचार्यांना वर देणारी, व अगस्त्यमुनीने पूजिलेली सुवर्णमुखरी नामक नदी आहे. त्या नदीच्या उत्तरेस दोन कोसावर पुण्यकारक अरण्ये असलेला वेंकटगिरि नामक एक भाग आहे हा पर्वत सुवर्णगिरीचा पुत्र असुन सर्व तीर्थांनी युक्त आहे. ॥४१-४२-४३॥

हा पर्वत सर्व धातूनी शोभत असून हा साक्षात शेषाचा अवतार आहे. हा वैकुंठसमान असून श्रीहरीने याठिकाणी वास्तव्य केले आहे. ॥४४॥

या पर्वताचे मुख म्हणजे पुढील भागास याला वेंकटगिरि असे म्हणतात. मधल्या भागास नृसिंहाचल असे म्हणतात व पुच्छ भागास श्रीशैलपर्वत असे म्हणतात. तात्पर्य हा सर्व पर्वत क्षेत्रस्वरूपी आहे. ॥४६॥

हा सर्व प्रकारच्या वृक्षांनी व्याप्त असून सर्व प्रकारच्या धातूनी भूषित झाला आहे. कुंद, मंदार, फणस, वड, औदुंबर, किंशुक, पिचुमंद, पारिजात, चिंच, जांभूळ, पांढरे चंदन, आंबा इत्यादि झाडे या पर्वतावर असून कृष्णागरु या धातुने हा पर्वत शोभिवंत दिसतो. ताल, हिंताल, सुपारी, देवदार आदि वृक्षांनी हा पर्वत सुशोभित दिसतो. हंस, कारंडब, बक, कोक, शुक, कपोत, हंस, मृगसमुदाय यांनी सुशोभित दिसतो. सिंह, वाघ, शरभ, वराह, हत्ती, वानर, लांडगे, कोल्हे, कस्तुरी मृग इत्यादि वन्य प्राणी या पर्वतावर राहतात. घोडे, रानगाईचे कळप अनेक म्हशी यांचे समुदायाकडून हा पर्वत सेविला जात होता. ॥४७-४८-४९-५०-५१॥

या पर्वतावर मल्लिका, मालती, जाती, नंदावर्त, चंपक, अशोक, पुन्नाग, केवडा, पिवळा केवडा इत्यादि फुलाचे वनस्पती होते. ॥५२॥

याप्रमाणे पुण्यकारक अरण्ये असलेला, अत्यंत सुंदर असा हा पर्वत आहे. याठिकाणी असलेले वृक्ष हे देवगण होत. सर्व हरिणे ही ऋषिश्रेष्ठ होत. सर्व पक्षी पितृगण होत. पाषाण हे यक्षकिन्नर होत. ॥५३॥

याप्रमाणे गिरिश्रेष्ठापासून जन्मलेल्या वेंकटाचलाचे व श्रीहरीचे अल्पसे महात्म्य आहे. असे हे महात्म्य ब्रह्मदेव, महादेव इत्यादि देवहि साकल्याने जाणत नाहीत तर अल्पज्ञानी मानव कसे बरे महात्म्य जाणतील? ॥५४॥

याप्रमाणे भविष्य पुराणांतर्गत वेंकटेशमहात्म्याचा दुसरा अध्याय समाप्त झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel