एके काळी जर्मनीमध्ये टिल्लू नांवाचा एक मुलगा होता. लहानपणापासूनच तो फार वात्रट होता. खोटे बोलणे, लोकांना त्रास देणे याचे जणुं बाळकडूच त्याला मिळाले होते. त्याने काही कामधंदा शिकावा, शेतीवाडी करावी म्हणून बापाने पुष्कळ प्रयत्न केला. कमीत कमी त्याने घरांतील काम थोडे फार करावे म्हणून आईनें पण भरपूर प्रयत्न केले, पण सर्व व्यर्थ, त्याचा उनाडपणा कांही गेला नाही.

गांवांत तो पुंड म्हणून प्रसिद्ध होता. टिल्लू सोळा वर्षाचा होता तेव्हा त्याचें वडील वारले. त्याची आई पतीच्या मृत्यूनें अगोदरच दुःखी होती, त्यांत आपल्या मुलाची पुंडगिरी. ती बिचारी बेजार होऊन गेली. आकाबाईला असलीच घरे आवडतात. मग काय विचारता त्यांची अवस्था. “आधीच मर्कट....” सारखी त्यांची स्थिति झाली होती. टिल्लूच्या आईने त्याला पुष्कळ सांगण्या सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

शेवटी त्यांच्या जवळ फुटकी कवडी देखील शिल्लक राहिली नाही की धान्याचा कण राहिला नाही. आईला फार वाईट वाटत असे. ती नेहमी मुसमुसुन रडत असे. असह्य झालें म्हणजे टाहो फोडून रडत असे.

टिल्लूची आई म्हणत असे, "मी फुटक्या कपाळाची म्हणूनच हे सर्व पाहावयास ह्यांच्या मागे जिवंत राहिले आहे."

“आई! तूं रोटीच्या चार तुकल्यासाठी रडत बसली आहेस? मी आणून देतो तुला."

असे सांगून टिल्लू बाहेर गेला. तो एका रोटीच्या दुकानांत गेला.

म्हणाला, "आमचे मालंक एक जमीनदार आहेत. या गांवाच्या वेशीवरच्या एका धर्मशाळेत उतरले आहेत. त्यांनी मला पुढील मुक्कामापर्यंत पुरतील एवढ्या पाव रोट्या द्यावयास सांगितल्या आहेत. असें करा, आपल्या एका नोकराला माझ्याबरोबर पाठवा. मी त्याच्या हाती पैसे पाठवितो."

रोटीवाल्याने लगेच एक टोपलीभर पाव देऊन नोकराला टिल्लू बरोबर पाठवून दिले. काही अंतर गेल्यावर,

टिल्लू म्हणाला "अरे! टोपली नीट धर. पाव पडतील सर्व."

टोपली नीट करण्यासाठी म्हणून नोकराने ती थोडी खाली केली. त्याबरोबर दोन चार पाव खाली पडले.

“बघ. मी सांगत होतो ना? ह्या जर आमच्या मालकाने पाहिल्या तर आपल्या दोघांची चांबडी लोळवील तो. तूं जाऊन दुसरे घेऊन ये. तोपर्यंत मी येथेच थांबतो." टिल्लूने सांगितले.

नोकर पाव बदलुन आणण्यासाठी परत फिरला. तो दृष्टिआड होताच टिल्लू ती टोपली घेऊन पसार झाला.

"रोटी, रोटी, रोटी. ह्या घे. हव्या तेवढ्या खा आणि विक सुद्धा पाहिजे तर." टिल्लूने मोठ्या डौलाने आपल्या आईला सांगितले.

पाव रोटया संपल्या. पुन्हां उपास करण्याची पाळी आली.

आई रडू लागली, "तूं तरी कसा रे इतका नालायक निघालास..!"

"तूं रडू नकोस, आई, मी काही तरी काम धंदा करतो." टिल्लु म्हणाला.

त्याने एका रोटीवाल्याच्या दुकानांत नोकरी धरली. दोन दिवस त्याने पाव रोट्या केल्या. तिसऱ्या दिवशी दुकानदार म्हणाला,

“आज मी शेजारच्या गांवी जाऊन येणार आहे. म्हणून तूंच सर्व काम कर."

"बरं आहे मालक. पण मग मी काय काय करूं???" टिल्लू म्हणाला.

“काय सांगितलं तुला? कुत्री मांजरी वाटेल तें कर उगीच बडबड नको करुस." मालकाने सांगितले व तो निघून गेला.

टिल्लूच तो. मालकाची आज्ञा मिळतांच स्वयंपाकघरांत घेला. पीठ मळले आणि त्याची खरोखरच कुत्री मांजरी करून भाजून काढली. दुसऱ्या दिवशी मालकाने येऊन पाहिले तर त्याला कपटांत पिठाची कुत्री मांजरी दिसली.

तो संतापून म्हणाला, “गाढव कुठला. काय केले आहेस???"

टिल्लू उदास चेहेरा करून म्हणाला, "आपलीच ना आज्ञा होती तशी? तुम्हीच नाहीं का म्हणालांत कुत्री मांजरी कर म्हणून....!!"

"अकलेच्या कांद्या...! पुन्हा मला तोंड दाखवू नकोस... जा चालता हो आणि एवढे पीठ फुकट घालविलेस त्याचे पैसे चुकते कर..." मालक गरजला.

"हे सगळे मला द्या. मी तुमचे पैसे देतो." टिल्लू म्हणाला.

त्याला दोन दिवसांची मजूरी मिळावयाचीच होती. तो सर्व कुत्री मांजरी उचलुन घेऊन निघून गेला. त्या दिवशी चर्च मध्ये काही विशेष कार्यक्रम असल्या कारणाने बरेच लोक तेथे येणार होते. म्हणून टिल्लू तें टोपलें घेऊन तेथे जाऊन बसला.

त्याच्याजवळ हा नवीन त-हेचा माल असलेला पाहून लोकांना मौज वाटली आणि मौजेखातर त्यांनी त्याचा माल विकत हि घेतला. तेच पाहिजे होते टिल्लूला. त्याला थोडे पैसे मिळाले. त्याने ते आईला आणून दिले. टिल्लू, कोठे चिकाटीनें काम करीत नसे. ते कधी जमले नाही. परंतु तो लबाडी आणि लुच्चेगिरीमध्ये तरबेज होता. त्या व्यवसायावरच त्याने थोडे पैसे जमवले आणि एक घोडा विकत घेतला. आता त्याला गांवांत हिंडून लोकांना त्रास देणे फार सोयीचे झाले होतें.

एकदा एका गांवांत आठवड्याचा बाजार भरला असतां तो तेथे गेला. तेथे बऱ्याच गवळणी दूध विकावयास आल्या होत्या. टिल्लू एक मोठे बगौणे घेऊन आला. एके ठिकाणी आपली कासंडी ठेवून गवळणींना म्हणाला,

“मला दूध पाहिजे आहे. तुम्ही जेवढे देऊ शकाल तेवढे द्या. मी तुम्हांला त्याबद्दल भरपूर किंमत देईन.”

बऱ्याच गवळणी तेथे आल्या. आपल्याजवळ असलेले दुध त्याला देऊन पैसे मागू लागल्या.

"थांबा ! जरा थांबा !! हे द्या. मग देतो सर्वांना पैसे." बगौणे भरेपर्यंत सर्व गवळणी तेथेच उभ्या राहिल्या. ते भरतांच त्यांनी पैसे मागितले.

“आज मला हे एवढे दूध पुरे आहे. ह्याचे पैसे मी तुम्हाला पंधरा दिवसांनी देईन." टिल्लू, मोठ्या ऐटीत म्हणाला.

"आणि जी कोणी तोपर्यंत थांबू शकणार नाही तिनें आपलें दूध परत घ्यावें."

कोणाच्या भरवशावर त्या थांबणार...! सर्व जणी आपण दिलेले दूध परत घेण्यासाठी पुढे झाल्या. बगौण्या भोवती एकच गर्दी जमली. हिसका हिसकी सुरू झाली. थोडेसें दूध जमिनीवर सांडले आणि या गडबडीत टिल्लू कोठेतरी नाहीसा झाला.

एकदां टिल्लूजवळचे सर्व पैसे संपून गेले होते. शेवटी घोडा विकावयाची वेळ आली. परंतु घोडा विकायला तो तयार नव्हता. मग पैसे कसे मिळावे म्हणून तो विचार करू लागला. त्याला एक युक्ति सुचली. तो एका खाणावळींत गेला. तेथे घोड्यांच्या पागेत त्याने आपला घोडा बांधला आणि आंत गेला. तेथे सर्व लोक जेवायला बसले होते. टिल्लू, आंत शिरला आणि म्हणाला

“माझ्याजवळ एक विचित्र घोडा आहे. तसा घोडा पृथ्वीच्या पाठीवर कोठे हि मिळणार नाही. त्याची गंमत अशी आहे की शेपटीच्या जागी डोके आणि डोक्याच्या जागी शेपूट आहे. त्याला पाहण्यासाठी एक एक पैसा तिकिट आहे."

सर्वांना गंमत वाटली त्याची. त्यांनी भराभर ते पाहण्यासाठी एक एक पैसा टाकला. हां, हां, म्हणता त्याची टोपी पैशांनी भरली. त्यानंतर त्याने तो घोडा सर्वांना दाखविला. टिल्लने आपल्या घोड्याच्या. शेपटीलाच दोरी बांधून ठेविली होती.

टिल्लूच्या या कामाबद्दल ज्यांनी पैसे दिले होते त्यापैकी काहीं लोक चिडले आणि कांहींनी त्याच्या सुपीक डोक्याच्या कल्पनेचे कौतूक केले आणि म्हणूनच तो एवढ्या लोकांच्या जमावांतून सुखरूप बाहेर पडला. एक दिवस टिल्लू आपल्या घोड्यावर बसून शहराबाहेर निघाला. वाटेत त्याला बारा आंधळे भिकारी दिसले.

तो त्यांना म्हणाला, "किती दिवस असे हिंडून हिंडून भीक मागणार? एकाद्या धर्मशाळेत जाऊन का नाहीं राहात..!”

“त्याला भाग्य लागते. कोण आम्हांला आपल्याकडे ठेवून घेऊन फुकट जेवावयाला घालणार?" ते म्हणाले.

"असे का म्हणता? दानाचे पुण्य महत्पुण्य आहे. मी देतो तुम्हाला पैसे, प्रत्येकाला एक एक मोहोर, जा वाटेल त्या खाणावळीत जाऊन पाहिजे तेवढे दिवस राहा." असे म्हणत त्याने नाण्यांचा आवाज केला.

परंतु कोणाच्या हि हातांत ही नाणी दिली नाहीत. त्या आंधळ्यांना वाटले आपल्यापैकी कोणाजवळ तरी नाणी दिली आहेत. म्हणून ते त्याला आशीर्वाद देत निघुन गेले. ते आंधळे शहरांत आले. एक चांगली खाणावळ पाहिली आणि आंत शिरले. त्यांना पाहतांच खाणावळवाला ओरडला,

"अरे! ही कांही भिकारी राहाण्याची जागा नाही. येथे पैसे देऊन रहावे लागते. जा, जा बाहेर."

"आम्ही काय फुकट राहावयाला आलो...! आमच्याजवळ बारा मोहोरा आहेत. आमचा जो काहीं खर्च होईल तो आम्ही देऊन टाकू." आंधळे म्हणाले.

म्हणून खाणावळीच्या मालकाने त्यांची व्यवस्था केली. सात दिवस ते भिकारी मोठ्या आनंदाने चैन करीत तेथे राहिले. मनसोक्त खाल्ले, प्याले. मऊमऊ गादीवर पहुडले. मनसोक्त आराम केला. एक आठवडा झाल्यावर खाणावळवाला म्हणाला

"सात दिवस झाले. तुमच्या प्रत्येकाच्या नांवावर एक एक मोहोर झाली आहे. द्या आमचे पैसे आणि जा येथून."

"संपले आमचे सुख. कोण्या दात्याच्या कृपेने आम्हाला हे लाभले त्याचे कल्याण होवो.” परंतु कोणीहि पैसे काढून देत नाही.

हे पाहून मालक ओरडला, "हं काढा पैसे. कितीवेळ असे पाहात राहणार?"

“कोणाजवळ रे त्या दानी गृहस्थाने पैसे दिले? देऊन टाका ना खाणावळीचे पैसे." एक भिकारी म्हणाला.

तेव्हां त्यांना कळले की त्यांच्यापैकी कोणाजवळच टिल्लूने पैसे दिले नव्हते. ते गयावया करून सांगू लागले की, “आम्ही फसवण्यासाठी आलों नव्हतो. एका गृहस्थाने पैसे देतो म्हणून सांगितले आणि दिले मात्र नाहीत."

“ते सर्व मला काय सांगतां? देतां का नाही माझे पैसे? का पाठवू कैदेत?" असे म्हणून त्याने भिकऱ्याना बाहेर काढले. त्याने त्यांना गोठ्यांत नेऊन कोंडून ठेवलें, टिल्लू हे सर्व पाहातच होता. तो त्या खाणावळीच्या मालकाकडे आला आणि म्हणाला

"का हो त्या बिचाऱ्या आंधळ्यांना गोठ्यात कोंडून ठेवलेत? आतिथ्य सत्कार करण्याची तुमची ही कुठली रीत. सोडा बिचाऱ्याना. जाऊं द्या त्यांना."

“तुम्हीं जाऊं दे म्हणता. अन्न काही फुकटचे नाही येत आमच्याकडे. हे सात दिवस मोठ्या मजेत राहिले आणि पैसे देतांना का कुरकुर...? पैसे देऊन खुशाल जाऊं देत. चोर आहेत चोर.... हे लुच्चे...!" मालक गरजला.

“ह्याचे पैसे दुसऱ्या कोणी दिले तर सोडाल ना यांना." टिल्लूने विचारलें.

"मी पैसेच तर मागतो आहे तेव्हां पासून. यांना घेऊन मी काय करूं?"

“या गांवांत कोणी दानी नाहीतच का?" असे म्हणत टिल्लू, एका मठाधिशाकडे गेला.

टिल्लू म्हणाला, "एका माणसाच्या मानगुटीस भूत बसले आहे. मेहेरबानी करून ते उतरवा. आपल्याला पुण्य मिळेल."

"ठीक आहे. घेऊन ये त्याला माझ्या समोर." मठाचा अधिकारी म्हणाला.

टिल्लू खाणावळीच्या मालकाकडे आला आणि म्हणाला "एक मठाधीश मिळाला आहे. तो त्या भिकाऱ्यांना जे काही द्यावयाचे आहे तें देईल. तूं आपल्या बायकोला पाठवून चौकशी करून येण्यास सांग."

खाणावळीच्या मालकाची बायको टिल्लूबरोबर त्या मठाधिशाकडे गेली. टिल्लू मठाधिशाला म्हणाला,

"मघांशी मी ज्याच्या विषयी म्हटले होते त्यांची ही बायको आहे. ह्यांची इच्छा पूर्ण करणार ना?"

मठाधीश गभीर वाणीनें म्हणाला, "आपल्या पतीला सांग की काही काळजी करूं नकोस. त्यांच्या सारख्यांची मदत करण्याएवढे दुसरें दान पुण्य काय असणार...!"

मठाधिकाऱ्याचे वाक्य ऐकून त्या बाईला बाटले की मठाधिकारी आपल्याला त्या भिकाऱ्याचा झालेला खर्च देणार आहे. म्हणून ती घाई घाईने घरी आली आणि नवऱ्याला तें सांगितले. त्याने भिकाऱ्याना सोडून दिले आणि आपले पैसे वसूल करण्यासाठी मठाधीशाकडे गेला व आपले पैसे म्हणजे बारा मोहोरा मागू लागला. त्यामुळे दोघांचें भांडण झाले. तेव्हा त्यांना समजलें की हे त्या टिल्लूचं काम आहे. पण तोपर्यंत टिल्लू व आंधळे केव्हांच निघून गेले होते.

बिचारा खानावळवाला लहान तोंड करून परतला. टिल्लूची पुंडगिरी फार वाढली. त्याचे वागणें गांवाला फार त्रासदायक वाटू लागले. त्याला पकडून कैद करण्याशिवाय काही उपाय नव्हता. म्हणून पोलिसांनी त्याला पकडून कैदेत टाकले. त्याच्यावर खटला भरला आणि त्याला त्याच्या गुन्ह्या बद्दल फाशीची शिक्षा झाली. निश्चित दिवस उजाडला. त्याला फाशी द्यावयाच्या वेळी वधस्तंभाजवळ लोकांची गर्दी जमली.

काहींना वाईट वाटले. काहींना विश्वास वाटत होता की तो कसे तरी करून सुटून जाईल, अशा प्रकारे लोक आपसांत बोलत होते. टिल्लूला वधस्थानी आणले. खांबाजवळ उभे केले. त्याच्या गळ्या भोवती फास टाकला. आणि तेथील अधिकाऱ्याने विचारले की टिल्लूला काही सांगावयाचे आहे का..!

टिल्लू 'हो' म्हणून बोलु लागला.

टिल्लू म्हणाला, "येथे जमलेल्या सर्वांना माहीत आहे की मी आता थोड्याच वेळात मरणार आहे. माझे अपराध पाहता खरोखर ही शिक्षा त्या साठी थोडीच आहे. मला सात वेळां जरी फांसावर चढवले तरी सुद्धा ती पुरी पडणार नाही, एवढा मी दोषी आहे. तरी सुद्धा साहस करून मी एक विनंती करणार आहे. मला माझे प्राण मागावयाचे नाहीत किंवा धन दौलतीची मला इच्छा नाही. माझी इच्छा एवढीच आहे की आपला खर्च थोडा कमी करावा."

तेथे जमलेल्या अधिकारी वर्गानं विचार केला की, “जर आमचा खर्च कमी होणार असेल तर पाहूया हा काय म्हणतो आहे तें. अधिकार्यांनी टिल्लुची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले आणि बजावलें की त्यामुळे मरणाच्या शिक्षेत बदल होता कामा नये."

“मी आपल्याकडून तीच अपेक्षा करीत होतो. माझ्या मनांत मला फासावर चढविण्यांत आपला एक पैसा सुद्धा खर्च होऊं नये असे आहे. तुम्ही मला एक जुनी दोरी आणून द्या. मी स्वतः माझ्या गळ्याला फांस लावून घेतो. त्यामुळे नव्या दोरीचा आणि फास लावणाऱ्या मजुराचा दोन्हीं खर्च वाचतील." टिल्लूने शांतपणे सांगितले.

टिल्लूचे म्हणणे कबूल करण्यात आले. त्याच्या गळ्यांत घातलेला फास काढला. त्याला खाली उतरविले. त्याच्या हातांत एक जुनी दोरी दिली. आणि सर्व जण त्याच्याकडे पाहू लागले की हा कसा फांस लावून घेतो...??

टिल्लू पुन्हां बोलू लागला, “मी आपला फार आभारी आहे. माझ्या हातांत दोरी आलेलीच आहे. आता मी मला वेळ मिळतांच म्हणजे हाताला सवड होताच माझ्या गळ्याला फास लावून घेईन."

असे म्हणत म्हणत टिल्लू लोकांच्या घोळक्यांत शिरला आणि एकदम पळून जाऊन कोठें नाहींसा झाला कोणाला कळले नाही. त्याच्या समय सूचकतेचे लोकांनी कौतुक केले. टिल्लूची कीर्ति जर्मनीच्या बाहेर देशा देशांतरी पोहोचली. पोलंडचा राजा थट्टेखोर होता. त्याच्याजवळ दोन विदूषक सुद्धा होते. त्याने टिल्लूला निमंत्रण पाठविलें की आमच्याकडील दोन्ही विदूषकांच्यावर तुम्ही विजय मिळवा तुम्हांला दरबारी नौकरी देऊ. टिल्लू पोलंडच्या राजासमोर हजर झाला.

राजाजवळच त्याचे विदूषक बसलेले होते. त्यांची हि टिल्लूने ओळख करून घेतली. इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा झाल्या.

राजा म्हणाला, "तुमच्या तिघांत जो कोणी जास्तीत जास्त मागेल त्याला मी बक्षीस देईन."

एक विदूषक म्हणाला, "आकाशाला कागद करून आणि समुद्राची शाई करून जेवढे धन मी त्यावर लिहीन तेवढें मला यावें."

"ठीक आहे." राजा स्मित करून म्हणाला.

दुसरा विदूषक म्हणाला, "माझ्या मित्राने जेवढें धन मागीतले आहे ते ठेवण्यासाठी आकाशांत जेवढे तारे आहेत तेवढे किल्ले मला पाहिजेत.”

"अगदी कबूल." म्हणून राजा हसला.

त्यानंतर राजानें टिल्लूला विचारले.

तो म्हणाला, "माझी एवढीच इच्छा आहे की मला या दोघांचा वारसा देऊन यांना फाशी द्यावें.”

टिल्लचे उत्तर ऐकून राजाला मजा वाटली तो खदखदा मोठ्याने हसला आणि देऊ केलेले बक्षीस त्यालाच दिले. टिल्लू फांसावर गेला नाही. तो सुखासमाधानाने आपले आयुष्य घालवू लागला. म्हातारा झाला. आजारी पडला. आता मरणार असें वाटल्यावर त्याने मृत्युपत्र तयार केले.

त्यात त्याने लिहिले, “माझ्या पलंगाजवळ एक लोखंडी तिजोरी आहे. त्यांत मी मिळविलेले धन आहे. त्या धनांतील एक हिस्सा देवळाला द्यावा. दुसरा हिस्सा माझ्या मित्रांना द्यावा. आणि तिसरा हिस्सा त्या गांवाला जावा. ज्या गांवांत माझा मृत्यू होईल, माझ्या मरणानंतर एका महिन्यानें नगरपित्यांनी तिजोरी उघडून पैशांची वाटणी करावी.”

त्या नंतर आठ दिवसांनी टिल्लू मरण पावला. टिल्लूची कीर्ति चहूकडे पसरली होती. त्याने आपली संपत्ति सुद्धा नगरपालिकेला दिली होती. म्हणून त्याची अंत्य क्रिया सरकार तर्फे मोठ्या थाटाने करण्यांत आली. त्याच्या समाधीवर एक संगमरवरी दगडाचा चबूतरा बसविण्यांत आला.

एक महीना झाला.

नगरपिते टिल्लूच्या तिजोरीशी जमले. मोठ्या समारंभानें टिल्लूची तिजोरी त्यांनी उघडली. पाहातात तों त्यांचे डोळे पांढरे झाले. त्यांत दगडगोटे भरलेले होते. व्रात्य टिल्लूने आपले सर्व आयुष्य अशाच खोडसाळपणाने घालविले आणि मरतांना सुद्धा वात्रटपणा करण्यास तो चुकला नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel