( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

भारताच्या मुख्य भागाच्या दक्षिणेला ( पश्चिमेलाही म्हणता येईल.एखादा आग्नेय सुद्धा म्हणेल. ) अंदमान निकोबार बेटांचा समूह आहे हे सर्वांनाच माहित आहे.त्या समूहामध्ये शेकडो लहान मोठी बेटे आहेत.त्यातील कित्येक बेटांवर अजूनपर्यंत  कुणीही पोचलेले नाही.त्यातील एक बेट शापित बेट म्हणून ओळखले जाते.त्या बेटाचे नाव ~जाजूझा~

या बेटावर आजपर्यंत कुणीही जिवंत मनुष्य पोचलेला नाही.किंवा असे म्हणूया की जर एखादा जिवंत तिथे पोचला तर तो थोड्याच वेळात ऑक्सिजनअभावी मृत्यू पावतो .तेथे जावून कुणीही परत आलेला नाही .हे बेट वैशिष्टय़पूर्ण आहे .नेहमी झाडे  दिवसा ऑक्सिजन सोडत असतात .रात्री कार्बनडायऑक्साईड सोडतात.येथे झाडे दिवसा व रात्री फक्त कार्बन डायऑक्साइड आंत घेतात व बाहेर  सोडतात.येथील हवेत प्राणवायू अजिबात नाही.फक्त कर्ब द्वि प्राणिद आहे. त्यामुळे येथे एखादा जिवंत मनुष्य चुकून  पोचल्यास तो प्राणवायूअभावी मरण पावतो.या बेटावर कोणतेही प्राणी नाहीत .

या बेटाच्या सभोवतालील समुद्रात अनेक उंच सखल भाग आहेत.  लहान मोठे खडक आहेत.प्रचंड ताकदीचे भोवरे आहेत .राक्षसी लाटा उठत असतात .या बेटाजवळ एखादी बोट आल्यास ती प्रचंड लाटांमुळे फेकली जाते.तिचा विनाश ठरलेला आहे .राक्षसी भोवऱ्यात सापडून ती बुडेल.उथळ  जमिनीवर अडकून पडेल .अांतील प्रवासी खलाशी  बाहेर पडू शकणार नाहीत.त्यांचा अन्न पाण्याअभावी मृत्यू अटळ आहे .लहान होड्यातून जे बाहेर पडतील  ते बेटावरील खडकावर आपटून मृत्यूमुखी  पडतील.यदाकदाचित बेटावर पोचल्यास प्राणवायूअभावी मृत्युमुखी पडतील.बुडून, आपटून, प्राणवायूअभावी, अन्नपाण्याअभावी, मृत्यू निश्चित आहे. 

या बेटाचा महिमा सर्व दर्यावर्दी लोकांना माहित आहे . या बेटाला टाळून लहान होडय़ा, लाँचेस, मोठ्या होड्या,जहाजे, प्रवास करीत असतात .परंतु  वादळात सापडून,वाट चुकल्यामुळे,किंवा आणखी अन्य कारणांमुळे या बेटाच्या तडाख्यात काही नौका सापडतात.मी वर म्हटल्याप्रमाणे जे या तडाख्यात सापडतात त्यांचा मृत्यू निश्चित होतो .या बेटाच्या सभोवतालील पांच किलोमीटरचा समुद्रातील प्रदेश शापित आहे.त्या प्रदेशात तुम्ही एकदा प्रवेश केला की तुमचा मृत्यू अटळ आहे .

गेल्या शेकडो वर्षांमध्ये कोणत्यांना कोणत्या प्रकारे या बेटाच्या तडाख्यात सापडून हजारो लोक मृत्यू पडले आहेत .आकडे बोलायचे झाल्यास आतापर्यंत तीन हजार चारशे सत्तावीस लोक मृत्यू पडले असावेत. त्या सर्वांचे आत्मे या बेटाच्या चक्रव्युहात सापडलेले आहेत .त्यांना मुक्ती नाही .ते पुढच्या योनीमध्ये जाऊ शकत नाहीत. एखाद्याला वाटेल हे आत्मे आक्रोश करीत असतील .परंतु तसे काहीही नाही .मी पणाची भावना आहे तोपर्यंत प्रत्येकजण कुठे तरी आहे .मनुष्य योनी तसेच भूत योनीतील किंवा आणखी कुठल्या देव यक्ष गंधर्व किन्नर असूर भूत इत्यादी  योनीत आत्मा असेल.मुक्ती याचा मर्यादित अर्थ घ्यायचा आहे.भूतयोनीतून सुटका एवढाच याचा अर्थ आहे.

तर हा प्रदेश हे बेट भुतांनी व्यापलेले आहे .वर उल्लेख केल्याप्रमाणे तीन हजार चारशे सत्तावीस भुते येथे आहेत. त्यांना खायला प्यायला काही लागत नाही .दिवसा त्यांचे अस्तित्व त्यांना जाणवत नाही.ते झोपी गेलेले असतात असे म्हणूया.

रात्री ते सर्व जागृत होतात .त्यांचीही एक शासन पद्धती आहे .लोकशाही साम्यवाद  वगैरे त्यांना मान्य नाही.तिथे राजेशाही आहे .वेताळ त्यांचा राजा आहे.समंध खवीस वगैरे सरदार आहेत.त्यांचा दरबार भरतो.तिथेही करमणुकीचे कार्यक्रम होतात .लावसट डाकीण वगैरे नृत्य करतात.रात्री सर्व बेट जागृत होते.सर्वत्र प्रकाशाचा झगमगाट असतो.

बेटावर एखादा मनुष्य

आला की तो  प्राणवायूअभावी थोड्याच वेळात मृत्यूमुखी पडतो.त्यांच्या भूत समुदायात एक नवीन भर पडते . त्याचा आनंद साजरा केला जातो . दिवसा सुप्तावस्था झोप आणि रात्री जागृती नाचगाणी असा कार्यक्रम कित्येक वर्षे चालू आहे .       

एकदा एक साधू जहाजातून जात होते .वादळात  त्यांचे जहाज भरकटले .खडकावर आपटून फुटले.लाईफ बोटीत जीवनरक्षक होडीत कॅप्टनने सर्वांना उतरवले.त्यातील साधू असलेली जीवरक्षक होडी,या बेटाच्या किनाऱ्याला येऊन लागली.बेट बघून सर्वांना आनंद झाला.आपण बालंबाल बचावलो याचा तो आनंद होता .सर्वजण बेटावर पायउतार झाले .प्राणवायूअभावी साधूमहाराज सोडून सर्वजण तडफडू लागले.महाराज योगविद्येमुळे प्राणवायू शिवाय राहू शकत होते.महाराज त्यांच्यासाठी इच्छा असूनही काही करू शकले नाहीत .आणखी पांच भुतांची  असलेल्या संख्येत भर पडली .  

महाराजांना योगविद्येने  येथे काय होत आहे, ते कां होत आहे या सर्वांची जाणीव होत होती.त्या सर्वांचे कर्म व त्याचे फल त्याना दिसत होते.ते या बेटावर कां आले तेही त्यांना समजत होते.त्यांचे विहित कर्म काय तेही त्यांना दिसत होते .तेथील सर्व भुतांना ते अडकलेले आहेत याची जाणीव नव्हती.ते पूर्वी मनुष्य  योनीत होते तेही त्यांना माहित नव्हते  रहाटचक्राप्रमाणे त्यांचे दिवस रात्रीचे चक्र चालू होते.

ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे.ते भूत योनीत  आले होते.आता त्यांच्या सुटकेचा समय आला होता.त्याची अर्थातच त्याना कल्पना नव्हती. 

त्यांच्या समुदायात सहा नवीन पाहुणे आले होते.त्यांचे स्वागत  करण्यासाठी कार्यक्रम होता .  स्वामींबरोबर (साधूबरोबर) जीवरक्षक नौकेतून आलेले ते पांच अभ्यागत होते .प्राणवायूअभावी त्यांचा मृत्यू झाला होता . स्वामीना त्यांच्या मृत्यूबद्दल खेद होत होता.नियती पुढे कुणाचाच कांही इलाज नव्हता.

स्वामी व त्यांच्याबरोबरील पांचजण दिवसा त्या शापित बेटाच्या समुद्र किनाऱ्याला लागले होते .पांचजणांचा मृत्यू झाला होता .स्वामी योग विद्येमुळे जिवंत होते.रात्र झाली होती .शांत निस्तब्ध वाटणारे ते बेट आता जागृत होत होते.

जे जे समुद्रकिनाऱ्याला येऊन लागत.त्यांची कलेवरे तिथेच  असत .नेहमी अशा प्रेतांचे विघटीकरण होत असते . या बेटावर प्रेतांचे विघटीकरण होत नसे.या शापित बेटाचे आणखी एक वैशिष्टय़ होते .ती प्रेते जशी जिथे पडली तिथे रहात असत.रात्री त्या त्या व्यक्ती जिवंत होत असत .जिवंत झाल्यावर जरी त्यांची आकृती मनुष्याची असली तरी त्यांचे अंतरंग भुतांचे असे.त्यांचे आचरण धड मनुष्य नाही धड भूत नाही असे असे.कमी जास्त प्रमाणात दोघांची वैशिष्टे त्यांच्यात रात्री आढळत .

स्वामींबरोबर जे या बेटावर आले होते.ते रात्री जागृत झाले .त्यांनी स्वामींना अर्थातच ओळखले .प्राणवायूअभावी आपण मृत्यू पडलो आहोत याची जाणीव त्यांना नव्हती.या बेटावर इतकी गर्दी पाहून त्यांना आश्चर्य वाटत होते .इतरांप्रमाणे तेही इतस्ततः भटकत होते .जहाजे बेटाच्या तडाख्यात सापडून फुटल्यामुळे शेकडो वर्षांपासून हजारो माणसे तिथे आलेली होती.त्यांची भाषा, त्यांचे वेष ,त्यांची संस्कृती, अर्थातच भिन्न होती.तो समुदाय वैशिष्ट्यपूर्ण  खास दिसत होता .त्याचे योग्य नियंत्रण आवश्यक होते. ते काम राजा त्याचे मंत्रिमंडळ सेवक सैनिक यांच्याकडून केले जात असे.

रात्री जागृत असणारे ते बेट सूर्योदयाबरोबर निस्तब्ध होत असे .जो जेथे असे तिथे तो मृत्यू झाल्याप्रमाणे आडवा होत असे .त्या बेटाकडे दिवसा एखाद्याने पाहिले. त्या बेटावर तो फिरला तर त्याला जिकडे तिकडे मानवी देह विखुरलेले दिसून आले असते .एवढी निरनिराळ्या देशांतील निरनिराळ्या पोषाखाची माणसे येथे मृत्यूमुखी कशी पडली म्हणून तो आश्चर्यात झाला असता .

स्वामीना अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टींची माहिती होती.रात्री  ताजे ताजे बेटावर आलेले ते पांच व स्वामी यांना राजापुढे हजर करण्यात  आले.स्वतःची ओळख करून देण्याचा कार्यक्रम होता .त्यानंतर राजाने त्यांचे काम त्यांना सांगितले असते.

स्वामी काय होत आहे ते फक्त पहात होते .स्वामींकडे पाहून ही कुणीतरी विशेष व्यक्ती आहे असे राजाच्या लक्षात आले होते .तो राजा स्वामीना त्या चौघांप्रमाणेच समजत होता .स्वामीनीही स्वतःची ओळख स्वामी म्हणून करून दिली.राजाने स्वामींना आपला सल्लागार म्हणून नेमले .त्या चौघांना साधारण व्यक्ती म्हणून समुदायात सामील करण्यात आले .

स्वामींचे पुढील ध्येय त्या सर्वांची त्या बेटावरून सुटका हे होते.  

स्वामींनी थोड्या वेळात कमी परिश्रमात त्या सर्वांची सुटका कशी करता येईल यावर विचार केला .त्या सर्व व्यक्तींना जर काही कारणाने आपण एकत्र आणू शकलो  आणि त्याच वेळी सूर्योदय झाला तर सर्व एकत्रच निद्रिस्त होतील.त्यांना जर अग्नी दिला तर रात्री त्या आत्म्यांना आपला देह सापडणार नाही .ते सर्व या योनीतून सुटतील.आणि ज्याच्या त्याच्या भागधेयाप्रमाणे  प्रमाणे पुढील वाटचाल सुरू करतील.हे त्यांच्या लक्षात आले.

स्वामींनी काही दिवस तसेच जाऊ दिले .त्यांना त्या सर्वांची सुटका करण्यासाठी योग्य समय हवा होता .ती वेळ आल्यानंतर त्या दिवशी रात्री त्यांनी राजाला सांगितले.मला सर्वांजवळ काही महत्त्वाचे बोलायचे आहे . जर सर्व व्यक्ती एकत्र आल्या तर मला सर्वांजवळ बोलता येईल .

राजाने आपल्या सेवकांमार्फत दवंडी पिटवून सर्वांना एकाच वेळी काही महत्त्वाच्या कामासाठी  सार्वजनिक पटांगणांमध्ये बोलाविले .राजाला ज्या ज्या वेळी काही महत्त्वाची गोष्ट सर्वांना सांगायची असे तेव्हा तो याप्रमाणे त्यांना पटांगणात बोलवत असे .अशा वेळी सर्वांना हजर रहावेच लागे.हजर राहण्यात चुकवाचुकव  केल्यास त्याचे गंभीर परिणाम होत असत.हे माहीत असल्यामुळे सर्व एकत्र येतील याची खात्री होती .  

सर्वांना पहाटे पाच वाजता पटांगणात बोलावले होते.त्याप्रमाणे सर्व एकत्र जमले .स्वामीनी थोडक्यात पुढील प्रमाणे भाषण दिले .

माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,आपण सर्व एकाच मार्गाचे वारकरी आहोत हे आपण सर्व जाणता.निरनिराळ्या देशातून निरनिराळ्या कालखंडात आपण सर्व एकत्र येथे आला आहात .आता आपल्याला एकाच मार्गाने जायचे आहे.उद्यापासून तुम्ही मी सांगतो त्याप्रमाणे सर्व दिवसभर(त्यांचा दिवस सूर्यास्ता बरोबर सुरू होत असे) आचरण करायचे आहे. पुढे त्यांनी काय करावे काय करू नये याचे विवरण करण्याला सुरुवात केली .

हळू हळू सूर्योदय व्हायला लागला होता .त्या बेटावरील सर्व जण हळूहळू निद्रिस्त होऊ लागले होते .थोड्यात वेळात सूर्योदय झाला .राजासकट सर्व  निद्रिस्त झाले .

सर्व एकत्र आले आहेत ना ?  चुकून एखादा बेटावर अन्य जागी राहिला नाही ना? याची स्वामीनी खात्री करून घेतली. स्वामीनी योगबलाने त्या सर्वांना अग्नी दिला.सर्वांची राख झाली .

त्या रात्रीपासून त्या आत्म्यांना त्यांची शरीरे सापडणार नव्हती.

स्वामींनी आणखी काही मंत्र पठण केले .

ते सर्व आत्मे आपआपल्या भागाधेयाप्रमाणे पुढील वाटचाल करू लागले.

ते बेट व त्या सभोवतालील परिस्थिती अजूनही तशीच आहे.अजुनतरी त्या बेटावर कुणी आलेले नाहीत.

२८/९/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel