एकदा संगारव नावाच्या ब्राह्मणाने हा प्रश्न विचारला, 'भो गौतम, एखाद्या वेळी पुष्कळ कालपर्यंत परिचित असलेले देखील वेदमंत्र मला आठवत नाहीत 'मग तोंडपाठ येत नसलेल्या मंत्रांची गोष्ट काय सांगावी !  पण असे होण्याचे कारण कोणते, ते आपण सांगाल काय ?'

तेव्हा भगवान् म्हणाला, 'हे ब्राह्मण, ज्या वेळी कामविकाराने मनुष्याचे चित्त व्यग्र होऊन जाते, व कामविकाराच्या उपशमाचा मार्ग त्याला माहीत नसतो, त्या वेळी त्याला आत्मार्थ काय हें समजत नाही.  परार्थ काय हे समजत नाही, आणि पुष्कळ दिवस परिचित असलेले मंत्र देखील त्याला आठवत नाहीत.  ज्या वेळी त्याचे चित्त क्रोधने पराभूत झाले असते, किंवा आळसाने मंदावले असते,  अथवा इतस्ततः भ्रांत झाले असते, किंवा संशयग्रस्त झाले असते, तेव्हा आपले किंवा परक्याचे हित कशात आहे हे तो यथार्थतया जाणत नाही, आणि चिरकार परिचित असलेले मंत्रदेखील त्याला आठवत नाहीत.

''हे ब्राह्मणा, भांड्यातील पाण्यामध्ये निळा किंवा काळा रंग टाकला असता त्यात आपली पडछाया दिसत नाही, त्याचप्रमाणे ज्याचे चित्त कामविकाराने व्यग्र झाले असेल, त्याला आपल्या हिताहिताचे ज्ञान होत नाही.  स्वच्छ पाण्याचे भांडे संतप्त झाले असता त्यातून वाफा निघतात, व पाणी उकळू लागते.  अशा वेळी मनुष्याला आपले प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये दिसणे शक्य नाही.  त्याचप्रमाणे मनुष्य क्रोधाभिभूत झाला असता त्याला आत्महित कशात आहे हे समजणे शक्य नाही.  त्या भांड्यातील पाणी जर शेवाळाने भरले असले, तरी देखील माणसांना आपले प्रतिबिंब त्यात दिसणार नाही.  त्याप्रमाणे ज्याच्या मनाला आळसाने ग्रासले, त्याला आपले हित समजण्यासारखे नाही, मग परक्याचे हित समजणे तर बाजूलाच राहिले !  ते पाणी जर वार्‍याने हालू लागले, तर देखील त्यात आपले प्रतिबिंब दिसणार नाही.  त्याचप्रमाणे ज्याचे चित्त भ्रांत झाले असेल त्याला, आत्मपरहित कशात आहे, हे समजणार नाही.  तेच पाणी जर गढूळ झाले असेल, तरी त्यात देखील आपले प्रतिबिंब नीट दिसणार नाही.  त्याचप्रमाणे ज्याचे चित्त संशयग्रस्त झाले असेल, त्याला आपले किंवा परक्याचे हिताहित समजणार नाही.  तेच पाणी जर स्वच्छ व शांत असले, तर त्यात मनुष्याला आपले प्रतिबिंब स्पष्टपणे पहाता येते.  त्याचप्रमाणे ज्याचे चित्त कामच्छंद , व्यापाद (क्रोध), आळस, भ्रांतता, आणि संशयग्रस्तता, या पाच आवरणांपासून विमुक्त झाले असेल, ल्यालाच आत्मपरहित यथार्थतया समजते.१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१.  बुद्धिलीलासारसंग्रह, भाग ३ रा. प्र. १०
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel