आपल्या समाजाच्या हिताविषयी नेहमी झटणार्‍या शहाण्या हत्तीला असे वाटले की, प्राण्यांमध्ये कित्येक वाईट चाली असून त्या ताबडतोब सुधारल्या पाहिजेत. म्हणून त्याने सभा भरविली. त्या सभेत त्याने एक उपदेशपर असे मोठे भाषण केले. विशेष करून आळस, भयंकर स्वार्थ, दुष्टपणा, द्वेष, मत्सर या दुर्गुणांवर सविस्तरपणे टीका केली. श्रोत्यांपैकी बर्‍याच जणांना त्याचे भाषण शहाणपणाचे वाटले विशेषतः मनमोकळा कबुतर, विश्वासू कुत्रा, आज्ञाधारक उंट, निरुपद्रवी मेंढी व लहानशी उद्योगी मुंगी यांनी ते भाषण लक्षपूर्वक ऐकले. नेहमी कामात असलेल्या मधमाशीलादेखील ते भाषण आवडले, पण श्रोत्यांपैकी दुसर्‍या काहीजणांना फारच राग आला व त्यांना एवढे लांबलचक भाषण ऐकणे मुळीच आवडले नाही. उदा. वाघ व लांडगा यांना फार कंटाळा आला. साप आपल्या सर्व शक्तीनिशी फुसफुसू लागला व गांधील माशी व साधी माशी यांनी फार कुरकूर केली. टोळ तुच्छतेने सभेतून टुणटूण उडत निघून गेला. आळशी अजगराला राग आला व उद्धट वानराने तर तुच्छतेने वाकुल्या दाखविण्यास सुरुवात केली. हत्तीने ही गडबड पाहून आपला उपदेश खालील शब्दात संपवला, 'माझा उपदेश सर्वांना सारखाच उद्देशून आहे. पण लक्षात ठेवा की ज्यांना माझ्या बोलण्याने राग आला ते आपला अपराध कबूल करताहेत. निरुपद्रवी प्राणी मात्र माझं भाषण स्वस्थपणे ऐकताहेत.'

तात्पर्य

- आपले दुर्गुण काय आहेत हे ऐकून घेणे माणसाला फारसे आवडत नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel