शिवचरित्र हा पदोपदी प्रेरणा देणारा दीपस्तंभ आहे. शिवचरित्रातून आज आपणाला अनेक जीवनमूल्ये शिकता येण्यासारखी आहेत. शिवरायांनी प्रतिकूलपरिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. शिवरायांवर अनेक संकटे चालून आली. अफजलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान, सिद्दी जोहर, औरंगजेब अशा असंख्य शत्रूंशी महाराजांनी मोठ्या धैर्याने मुकाबला केला. म्हणजे शिवाजीमहाराज संकटसमयी रडणारे नव्हते, तर लढणारे होते. आज तरुणांनी संकटसमयी हताश, निराश न होता मोठ्या आत्मविश्वासाने संकटांविरुद्ध लढण्याची प्रेरणा शिवचरित्रातून घ्यावी.

शिवाजीराजे प्रयत्नवादी होते; निराशावादी नव्हते. शिवचरित्रातून आज आपण प्रयत्नवाद शिकला पाहिजे. शिवाजीमहाराज निर्व्यसनी होते. त्यांचे सर्व मावळेही (सैनिक) निर्व्यसनी होते. त्यामुळेच शिवाजीराजे यशस्वी झाले. व्यसनाधीन लोक कधीच क्रांती करू शकत नाहीत. शिवरायांच्या जीवनचरित्रातून निर्व्यसनीपणा तरुणांनी शिकावा.

शिवाजीराजे चारित्र्यसंपन्न होते. "शत्रूंच्या स्त्रियांचादेखील त्यांनी आई-बहिणीप्रमाणे आदर केला. ""ज्याला यश पाहिजे त्याने स्त्रीअभिलाषा धरू नये. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे!'' असे उद्गार शिवरायांनी वेळोवेळी काढले. हिरकणीच्या निर्भीडपणाचा, साहसाचा आणि मातृप्रेमाचा सन्मान करताना शिवाजीमहाराज म्हणाले होते, ""ताई, सर्व संकटांवर मात करून बाळाच्या ओढीने घरी जाणारी तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत स्वराज्यात आहे, तोपर्यंत ते कोणालाही जिंकता येणार नाही.'' आपली आई राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानला. आज आपण २१ व्या शतकाची भाषा बोलतो. खरेच, आज स्त्री स्वतंत्र आणि सुरक्षित आहे?

शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी मारणारे असंख्य मावळे बहुजनसमाजातून पुढे आले, कारण शिवाजीमहाराज समतावादी होते. शिवरायांचे राज्य रयतेचे, गरिबांचे, एत्तद्देशीयांचे, जनमानसाचे राज्य होते. शिवरायांनी कधी भेदाभेद केला नाही. त्यामुळेच वीर बाजी पासलकर, कान्होजी जेधे, येसाजी कंक, कृष्णाजी बांदल, कावजी कोंढाळकर, जिवाजी महाले, शिवाजी काशीद, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, शेलारमामा, बहिर्जी नाईक, हिरोजी भोसले, मदारी मेहतर, सिद्दी इब्राहिम इत्यादी नरवीर शिवरायांसाठी पुढे आले. आज सर्वत्र अविश्वासाचे सावट आहे. एकमेकांबद्दल कमालीचे गैरसमज आहेत. अशा काळात शिवरायांची निष्ठावान फळी कशी असेल?

शिवरायांच्याकडे आप-पर भाव नव्हता. नागनाथ महाराला महाराजांनी पाटील केले. रामोशी समाजातील बहिर्जीला गुप्तहेर खात्याचे प्रमुख केले. हंबीरराव मोहिते यांना सरसेनापती केले. जिवाजी महाले या नाभिकाला अंगरक्षक केले. माळी, धनगर, मातंग, महार, कोळी, आग्री, शेणवी, मुसलमान या सर्वांना शिवरायांनी हक्क-अधिकार दिले. आज जातीचे, धर्माचे, पंथाचे, संप्रदायाचे राजकारण झाले आहे. अशा काळात शिवरायांच्या चरित्रातून "समता' शिकावी.

शिवाजी महाराज निःस्वार्थी होते. ""एखाद्या गावच्या पाणवठ्यावरचे पाणी गरजेपेक्षा जास्त घेऊ नका, अन्यथा रयत म्हणेल, की मुघलच बरे. संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझवून झोपा अन्यथा एखादा उंदीर पेटती वात तोंडात धरून धावत सुटेल आणि ती वात कडब्याच्या गंजीला लागून गंजी जळून खाक होईल, मग पावसाळ्यात जनावरांना चारा मिळणार नाही. तेलवातीचे दिवे विझवून झोपा,'' अशी शिवरायांनी प्रजेची काळजी घेतली.

शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालादेखील हात लावू नका, अशा सूचना शिवरायांनी दिल्या. आज मात्र शेतकऱ्यांच्या भाजीचे देठच काय "शेतकरीच' जिवंत ठेवायचा नाही, असे क्रूर राजकारण शिजत आहे. शिवरायांनी शेतकऱ्यांना बी-बियाण्यांचा पुरवठा केला. ओसाड जमिनी ओलिताखाली आणल्या. वतनदारी-मिरासदारी बंद केली. पाणवठे, धरणे, तलाव बांधले. दुष्काळग्रस्तांना मदत केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, तर शिवरायांचे हे कृषिधोरण अवलंबावे लागेल.

अफजलखान आल्यानंतर शिवाजीमहाराज काही अनुष्ठानाला बसले नाहीत किंवा वारीला, कुंभमेळ्याला किंवा नारायण नागबळी करायला गेले नाहीत, तर "यश मिळविण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागते, रणांगण गाजवावे लागते, चातुर्य पणाला लावावे लागते,' हे महाराजांनी ओळखले होते. शिवरायांकडून आज वैज्ञानिक दृष्टिकोन शिकावा. शिवाजीराजांची लढाई आदिलशहा, मुघल, सिद्दी, पोर्तुगीज यांच्याविरुद्ध होती; पण ती राजकीय लढाई होती. धार्मिक लढाई नव्हती. याउलट शिवरायांच्या सैन्यात ३५ टक्के सैन्य मुस्लिमांचे होते. त्यांच्या २७ अंगरक्षकांपैकी १० अंगरक्षक मुस्लिम होते. त्यांचे पहिले चित्र रेखाटणारा मीर महंमद हा मुस्लिमच होता. आरमारदलाचे प्रमुख दर्या सारंग व दौलतखान हे मुस्लिमच होते. असे असंख्य मुस्लिम शिवरायांकडे होते. म्हणजे शिवाजीमहाराज धर्मनिरपेक्ष म्हणजेच समता, मानवतावादी होते. शिवचरित्रातून मानवतावाद शिकता येतो.

शिवाजीराजांचे सहा भाषांवर प्रभुत्व होते. जगाच्या स्पर्धेत टिकावयाचे असेल तर बहुभाषक असावे, ही प्रेरणा शिवचरित्रातून मिळते. कोणतीही अनुकूलता नसताना शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण केले. शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी गाव सोडले. त्यामुळेच ते कोकण, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, जिंजी जिंकू शकले. रेल्वे, विमान, हेलिकॉप्टर, मोबाईल, इंटरनेट, ध्वनिक्षेपक इत्यादी अत्याधुनिक साधने नसताना शिवरायांनी अश्यक्य कार्य शक्य केले.

शिवाजीराजांनी झाडांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. "झाडे सर्वथा न तोडावी. लाकूड-फाटा हवा असेल तर जीर्ण झाड तोडा; पण त्या ठिकाणी नवीन झाड लावा. विनामोबदला शेतकऱ्यांकडून काही घेऊ नका. सागाची, आंब्याची, फळांची झाडे न तोडावीत,' असे आवाहन शिवरायांनी केले होते. आज पर्यावरण धोक्यात आले आहे. जागतिक तापमानवाढ हा जगापुढचा गंभीर प्रश्न आहे. सजीवसृष्टीचे म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण करावयाचे असेल तर शिवरायांच्या पर्यावरणदृष्टीची अंमलबजावणी करावी लागेल.

शिवाजी महाराज आज येणार नाहीत. आज आले तरी आपल्या हाती ढाल-तलवार देणार नाहीत, कारण ढाल-तलवारीची लढाई कालबाह्य झाली आहे. इथून पुढचे युद्ध ज्ञानाचे, विचारांचे, संगणक, माहिती तंत्रज्ञानाचे आहे. शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन आपण गाव सोडून न्यायपालिकागड, प्रशासनगड, चित्रपटगड, साहित्यगड, सांस्कृतिकगड, दूरदर्शनगड, शिक्षणगड, धर्मगड, कलावाङ्मयगड जिंकले पाहिजेत.

संग्रहित लेख - प्रबोधन टीम
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel