‘सायंकाळची पाळी संपली म्हणजे येईन.’

‘सायंकाळी मी मोटार घेऊन योईन हां.’

सायंकाळ झाली. प्रेमाचे काम संपले. ती बाहेर दवाखान्याच्या बागेत उभी होती. तो मोटार आली. प्रेमा त्या मोटारीत बसली. त्या श्रीमंत बाईने प्रेमाचा हात हातात घेतला.

‘तुमची संगती असावी असे मला वाटते.’

‘परंतु नोकरी आहे ना.’

‘सोडा ती नोकरी. तुम्ही कोणीतरी माझ्या व्हा. व्हाल? मला कोणी नाही. त्या दवाखान्यातील नोकरीचा तुमचा करार नाही ना? झाले तर मग.’

‘बघू. विचार करू.’

बंगल्याजवळ मोटार आली. नोकर सामोरे आले. प्रेमा त्या बाईबरोबर वर गेली. केवढा थोरला दिवाणखाना! त्यात आफ्रिकेतील सुंदर सुंदर वस्तू होत्या. सिंह-वाघाची कातडी होती. झेब्य्रांची पट्टेदार कातडी होती. शहामृगाची सुंदर अंडी टांगलेली होती. जंगलांचे देखावे होते; हस्तिदंती सामान होते. प्रेमा पाहात होती.

‘बसा. या कोचावर बसा.’

प्रेमा बसली.

‘माझ्या भावासाठी आफ्रिकेतून या सुंदर चिजा आणल्या होत्या. त्याचा मोठा वाडा होता. त्यात शोभल्या असत्या; परंतु नव्हता तो भेटायचा. मग तुम्ही येता का राहायला माझ्याकडे? द्या राजीनामा. चार दिशी महिना संपतो आहे.’

‘मी विचार करीन.’

‘कसला विचार? तुम्हीही एकट्या आहात. आणखी कोणाला विचारायचे आहे? तुमचा मला आधार होईल. माझा देवाचा आधार गेला; परंतु माणसाचा तरी मिळू दे.’

नोकराने फळे आणली. गोड गोड द्राक्षे, अंगूर, केळी, संत्र्याच्या सोलीव फोडी, चिकू. रसाळ मेवा समोर होता.

‘खा, घ्या.’

प्रेमाने थोडा फलाहार केला. कॉफी प्यायली. ती जायला निघाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel