पाणबुडीतील एकूण एक गोष्ट आणि सर्व नौसेनीक डेप्थ चार्जेसच्या मा-याने हादरुन निघाले होते.  ओ'केन आणि फ्रेजी कसेबसे तोल सावरून कोनींग टॉवरमध्ये उभे होते.

'काही सेकंदांचाच प्रश्न ! एक डेप्थ चार्ज अचूक आपटला की खेळ खलास !' फ्रेजीच्या मनात आलं.

अचानकपणे सर्वत्र शांतता पसरली ! डेप्थ चार्जेसचा मारा संपला होता !

टँग पूर्ण वेगाने भर समुद्राच्या दिशेने निघाली होती. ती जपानी गनबोट बरीच मागे पडली होती. आपला डेप्थ चार्जेसचा मारा यशस्वी झाला अशी त्या बोटीच्या कॅप्टनची ठाम खात्री झाली होती. तो पाणबुडीचे अवषेश शोधत होता !

बावीस डेप्थ चार्जेस टँगच्या जवळ फुटले होते ! परंतु लाईट बल्बच्या काचांचा खच पडण्यापलीकडे कोणतंही मोठं नुकसान झालं नव्हतं ! मात्र एकूण एक नौसेनीक डेप्थ चार्जेसच्या मा-याने हादरला होता. अनेक मोहीमांत भाग घेऊनही असा हल्ला त्यांनी कधी अनुभवला नव्हता !

" मला आधी कल्पना आली असती तर मी डिस्ट्रॉयर्सवरच राहीलो असतो !" लॅरी सॅव्ह्डकीन उद्गारला.
" तुला त्याची सवय नाही झाली अजून !" ओ'केन म्हणाला, " यापेक्षाही जवळ येऊन आदळल्यावर हे परवडले असं वाटेल तुला !"

सॅव्ह्डकीनच्या चेह-यावरचे भाव पाहून ओ'केन खळखळून हसला !

" कम् ऑन लॅरी ! माझी पण सॉलीड टरकली होती !" ओ'केन.

मरे फ्रेजीने आतापर्यंतच्या दहा मोहीमांत अडीचशेच्या वर डेप्थ चार्जेसचा मारा झेलला होता. परंतु या एकाच हल्ल्यात त्यापेक्षाही जास्त डेप्थ चार्जेस आपण खाल्ले असावेत असं त्याचं ठाम मत होतं !

काही दिवसांनी टँग मिडवे बेटांवर न थांबता पर्ल हार्बरला परतली. टँगची चौथी मोहीम संपली होती. पॅसीफीक फ्लीटमधील टँग सर्वात खतरनाक पाणबुडी म्हणून टँगचा लौकीक पसरला होता !

पर्ल हार्बरला परतल्यावर इतर सर्वजण सुट्टी उपभोगण्यात मग्न असताना ओ'केन मात्रं पुढच्या मोहीमेच्या दृष्टीने पाणबुडीची दुरुस्ती आणि उपलब्ध असलेली आधुनिक यंत्रसामग्री आणि टॉर्पेडो पाणबुडीत बसवण्याच्या कामात मग्न होता.

दरम्यान टँगचा एक्झीक्युटीव्ह ऑफीसर मरे फ्रेजीची बदली झाली ! ओ'केन आणि फ्रेजी या जोडीने चार यशस्वी मोहीमांत आपला चांगलाच दरारा निर्माण केला होता. फ्रेजीच्या जागी सव्वीस वर्षांच्या फ्रँक स्प्रिंगरची नेमणूक झाली. स्प्रिंगर प्रशिक्षण कालावधी दरम्यान ओ'केनचाच विद्यार्थी होता !

ओ'केनच्या पहिल्या तीन मोहीमाही चांगल्याच गाजल्या  होत्या. दुस-या मोहीमेत तर टँगने पाण्यात कोसळलेल्या बावीस फायटर पायलट्सची यशस्वी सुटका केली होती. पॅसिफीकमध्ये सर्वात जास्तं जहाजं बुडवण्यचा विक्रम ओ'केनच्या नावावर जमा होता !

न्यू हॅम्पशायरमधील डोव्हरचा असलेला रिचर्ड ओ'केन वयाच्या एकोणीसाव्या वर्षी नेव्हीत दाखल झाला होता. सुरवातीला डिस्ट्रॉयरवर काम करणा-या ओ'केनने कनेक्टीकटच्या सबमरीन स्कूलमधून विशेष प्राविण्यासह आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. टँगचा कॅप्टन म्हणून नेमणूक होण्यापूर्वी ओ'केन मश मॉर्टनच्या वाहू पाणबुडीवर एक्झीक्युटीव्ह ऑफीसर होता.

मश मॉर्टन हा अत्यंत गाजलेला सबमरीन कॅप्टन होता. शत्रूवर हल्ला करण्यासाठी कितीही आणि कसलाही धोका पत्करण्याची त्याची तयारी होती. पाणबुडीच्या नौदलाच्या पारंपारीक हल्लापध्दतीला धाब्यावर बसवून तो बिनधास्तपणे पाण्याच्या पृष्ठभागावरुन भर दिवसा हल्ला चढवत असे ! शत्रू कधीही तुम्हाला पाण्यावर शोधणार नाही हा त्याचा साधा हिशोब होता. शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान करणं हेच एकमेव उद्दीष्टं डोळ्यासमोर ठेवून त्याच्या हालचाली होत असंत. रिचर्ड ओ'केनने मॉर्टनच्या हाताखाली हेच धडे गिरवले होते. आपल्या नौसैनीकांच्या मनावर टँगचा पहिल्या मोहीमेपासून त्याने हेच बिंबवलं होतं !

चार यशस्वी मोहीमांनंतर ओ'केनच्या शब्दाखातर नरकात जाण्याचीही त्याच्या सैनीकांची तयारी होती !

पर्ल हार्बरवर टँगच्या दुरुस्तीच्या आणि टॉर्पेडो बसवण्याच्या कामावर ओ'केन देखरेख करत असतानाच त्याला व्हाईस अ‍ॅडमिरल लॉकवूडने बोलावल्याचा निरोप आला.

" जपानच्या दिशेने तू लवकरात लवकर कधी जाण्यास तयार आहेस ?" लॉकवूडने विचारलं.
" जास्तीत जास्तं चार दिवस ! परंतु माझी एक विनंती आहे !"
" येस ?"
" टँग इतरांच्या तुलनेत जवळपास दुप्पट समुद्रावर आहे. मला रडार पेरीस्कोपची आवश्यकता आहे. तसंच या मोहीमेनंतर मेर आयलंडवर टँगची पूर्ण देखभाल आणि दुरुस्ती करण्यास मला परवानगी मिळावी !"
मेर आयलंड सॅन फ्रान्सिस्को बे मध्ये आहे. मेर आयलंडवर पाणबुडीची दुरुस्ती म्हणजे पाणबुडीवरील सर्वांनाच आपल्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवता येणार होता !

" या मोहीमेवरुन आल्यावर सर्वांना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सुटी मिळेल !" ओ'केनचा हेतू ध्यानात घेऊन अ‍ॅडमिरल लॉकवूड म्हणाला.

लॉकवूडने मग ओ'केनला मोहीमेची कल्पना दिली. चीनच्या पूर्व किना-यावर असलेल्या फार्मोसा सामुद्रधुनीत गस्त घालून जपानी जहाजांचं नुकसान करण्याच्या अत्यंत धोकादायक कामगीरीवर ओ'केनची नेमणूक झाली होती ! फार्मोसा सामुद्रधुनीत जपानी जहाजांचा सुळसुळाट होताच परंतु दोन्ही बाजूच्या किना-यावरील प्रदेशांतही जपान्यांचं वर्चस्व होतं.

बाकीच्या पाणबुड्यांबरोबर 'वुल्फ पॅक' मध्ये किंवा स्वतंत्र हालचाली करण्याचा लॉकवूडने ओ'केनला पर्याय दिला होता. अर्थात ओ'केनने स्वतंत्र हालचालींचा मार्ग निवडला !

आपल्या नौसैनीकांना एकत्रं करुन ओ'केनने आपण आतापर्यंतच्या सर्वात धोकादायक मोहीमेवर जात असल्याची कल्पना दिली. चार दिवसांची सुटी कमी झाल्याबद्दल काहींनी नाराजी व्यक्त केली. मोहीमेवरुन परतल्यावर दीड महिना कॅलीफोर्नीयात सुटी घालवण्याच्या विचाराने मात्रं सर्वजण खूश झाले.

" आम्ही अत्यंत धोकादायक मोहीमेवर चाललो होतो याची आम्हांला कल्पना होती." फ्लॉईड कॅव्हर्ली म्हणतो, " आम्ही डिस्ट्रॉयर, विमानं, एस्कॉर्ट बोटी..सर्वांच्या निशाण्यावर असणार होतो. अर्थात त्याच परिसरात आम्हांला जपान्यांचं सर्वात जास्तं नुकसान करण्याची संधी होती !"
पर्ल हार्बर सोडण्यापूर्वी अ‍ॅडमिरल चार्ल्स निमिट्झ आणि व्हाईस अ‍ॅडमिरल लॉकवूड टँगवर आले. टँगच्या तिस-या मोहीमेतील कामगिरीबद्दल नौसेनीकांना सन्मानपदके देण्यात आली. त्याखेरीज टँगच्या तीन मोहीमांतील कामगिरीसाठी अध्यक्ष फ्रँकलीन रुझवेल्टचं खास पदकही टँगच्या प्रत्येक सैनीकाला देण्यात आलं होतं !

आपल्या पाचव्या मोहीमेसाठी टँगने पर्ल हार्बर सोडलं आणि फार्मोसा सामुद्रधुनीचा मार्ग पकडला !

" ऑल बॅक टू थर्ड !"
" लेफ्ट ट्वेंटी डीग्री रडार. ऑल अहेड टू थर्ड. शिफ्ट द रडार !"

पर्ल हार्बरपासून निघाल्यावर तीन दिवस उलटून गेले होते. पूर्वेच्या दिशेने असणा-या अरुंद खाडीत टँग शिरली होती. मात्रं या खाडीच्या चिंचोळ्या पट्ट्यातून मार्ग काढताना ती खाडीच्या दोन्ही टोकांकडे पाळीपाळीने ढकलली जात होती. मोठ्या मुष्कीलीने किना-यावर किंवा खाडीतील प्रवाळ खडकांना धडकण्याचं टाळून अखेर चौथ्या दिवशी सकाळी सातच्या सुमाराला टँग मिडवे बेटावर विसावली. पाणबुडीसाठी आवश्यक असणारं जास्तीचं डिझेल भरुन घेण्यासाठी ओ'केनने मिडवेला भेट दिली होती.

जेमतेम पाच तासांत टँगने मिडवे बेट सोडलं आणि उसळत्या सागरातून फार्मोसा सामुद्रधुनीकडे मोर्चा वळवला. २७ सप्टेंबर १९४४ ! पर्ल हार्बरवरील जपानी हल्ल्याला तीन वर्ष होत आली होती.

दोन इंजिनांच्या सहाय्याने टँगची वाटचाल सुरू होती. फार्मोसा बेटांवर आखण्यात आलेल्या हवाई हल्ल्यापूर्वीच तिथे पोहोचण्याचा ओ'केनचा इरादा होता. हवाई हल्ल्यांपूर्वी जपानी बोटींचं शक्यं तितकं नुकसान करण्याची त्याची ईच्छा होती. हवाई हल्ल्यात शत्रूकडून पडलेल्या वैमानीकांची सुटका करण्याची जबाबदारीही त्याच्यावर येणार होती. मात्रं वादळी हवामानापुढे त्याचा नाईलाज झाला होता. वादळाचा जोर कमी झाल्यावर वेळ वाचवण्याच्या दृष्टीने ओ'केनने तिस-या इंजीनाचाही वापर करण्यास सुरवात केली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel